जागतिकीकरणाच्या रेटय़ात जग कितीही बदलले तरी शहरवासीयांसाठी स्थानिक बातम्यांचे मोल तसूभरही कमी झालेले नाही. होणारही नाही. रोजचे जगणे हाच मोठा संघर्ष आहे, अशा शहरांत तर ते अधिकच असते.
मुंबई हे एक असे शहर. जणू एक राज्यच ते. सहा राज्यांना लाजवेल इतका मोठा अर्थसंकल्प असणारे आणि फक्त आकारात का असेना जागतिक शहरांशी स्पर्धा करणारे. बहुभाषिक तरीही महाराष्ट्राची राजधानी असल्याने मराठी तोंडवळा असणारे. जिवंत आणि रसरशीत.
तेव्हा या शहराचे स्थानिक वर्तमान सादर करणारे वृत्तपत्रही असेच हवे. जिवंत आणि रसरशीत. खऱ्या बातम्यांना हात घालणारे. खऱ्या आव्हानांवर प्रामाणिक भूमिका घेणारे आणि शहर विकासातील खऱ्या अडथळ्यांवर प्रकाश टाकणारे. केवळ मनोरंजन करणे हाच आपला धर्म असे मानणाऱ्यांच्या भाऊगर्दीत शहराची स्पंदने टिपणाऱ्या मराठी वर्तमानपत्राची मुंबईस गरज होती. ‘लोकसत्ता मुंबई’ आजपासून सुरू होत आहे ते हीच गरज लक्षात घेऊन.
हे सहदैनिक आहे. म्हणजे मुख्य अंकात जे देता येत नाही वा द्यावयाचे नसते ते देणारी केवळ रंगीतसंगीत पुरवणी नाही. त्यामुळे स्थानिकांच्या जगण्याच्या संघर्षांस सर्वागाने भिडणारे वृत्तांत जसे आपणास या अंकात सापडतील, तसेच मुंबईच्या कानाकोपऱ्यांचा धांडोळा घेणाऱ्या बातम्याही तुम्हाला यात आढळतील. एखाद्या समृद्ध व्यक्तीप्रमाणे चांगल्या शहराच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक अंगे असतात, असायला हवीत. मुंबईचे असे सर्वागी प्रतिबिंब आपणास ‘लोकसत्ता मुंबई’ या सहदैनिकात निश्चित आढळेल. आणि या सगळ्याच्याही वर एक घटक तुम्हाला येथे नक्कीच आढळेल, तो म्हणजे बातम्या. खऱ्याखुऱ्या खणखणीत बातम्या.
वर्तमानपत्राने प्रवाही आणि प्रयोगी असावे लागते. आमचा तोच प्रयत्न आहे. आमच्या शहर वृत्तांकनाचा प्रयोग आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. तो अधिक प्रवाही करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागतच होईल.
वर्षप्रतिपदेनिमित्त शुभेच्छांसह..
आपला,
kuber