सीरिया बॉम्बफेकीनंतर पश्चिम आशियातील तणाव असाच राहिल्यास खनिज तेलाचे दर आणखी चढतील आणि आपल्या अर्थव्यवस्थेस घोर लावतील..

अलीकडे काही राज्यकत्रे खुशमस्कऱ्यांना काही कामच ठेवत नाहीत. म्हणजे आपली कृती, आपला निर्णय किती सर्वोत्तम होता असे ते स्वत:च सांगत सुटतात. अशा राज्यकर्त्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते धडाक्याने निर्णय घेतात तर खरे. परंतु पुढे काय करायचे हे त्यांना माहीत नसते. म्हणजे त्यांच्या ठायी धडाडी असते. पण त्या धडाडीस कोणत्या कामी जुंपायचे याच्या सम्यक ज्ञानाचा अभाव असतो. अशा राज्यकर्त्यांना एक प्रकारचा गंड असतो आणि त्यांची प्रत्येक कृती या गंडभावनेतून केली जाते. आपण किती चांगले आहोत हे दाखवण्यात यांना जेवढा रस असतो त्यापेक्षा अधिक आपले विरोधक किती वाईट हे सिद्ध करणे त्यांना महत्त्वाचे वाटते. ही सर्व गुणवैशिष्टय़े अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ठायी एकवटलेली असून सीरिया या देशावर केलेल्या क्षेपणास्त्र माऱ्यातून त्यांचेच दर्शन घडते. सीरिया या देशास धडा शिकविण्याची भाषा त्यांच्याकडून केली जात असताना त्याच वेळी अमेरिकेच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख जेम्स कॉमी यांचे ट्रम्प हे सर्वोच्च स्थानासाठी किती अपात्र आहेत हे सांगणारे विधान प्रसिद्ध होते, हा या संदर्भातील योगायोगदेखील सूचक मानावा लागेल.

सीरियावरील ही बॉम्बफेक अत्यंत यशस्वी झाली, आमची उद्दिष्टपूर्ती झाली असा दावा ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर केला. शुक्रवारी मध्यरात्री अमेरिकेतील भांडवली बाजार बंद झाल्यावर ट्रम्प यांनी सीरियावर बॉम्बफेक केली. त्या देशाचा अध्यक्ष बशर अल असाद याने लहानग्यांविरोधात रासायनिक अस्त्रे वापरण्याचे अधम कृत्य केले. तेव्हा त्यास धडा शिकविण्याचा प्रयत्न म्हणून अमेरिकेने आपली क्षेपणास्त्रे डागली. फ्रान्स आणि इंग्लंड या देशांनीही या मोहिमेत भाग घेतला. त्यानंतर ही मोहीम अत्यंत यशस्वी झाली असे ट्रम्प यांनी सांगितले तर तिकडे लंडनमध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांनी वार्ताहर परिषदेत या कृत्याची अपरिहार्यता दाखवून दिली. या दोघांनीही आपली कामगिरी फत्ते झाल्याचे दावे केले. विनोदी आणि हास्यास्पद अशीच त्यांची संभावना होऊ शकते.

याचे कारण कामगिरी मुळात ठरवली काय होती, याचे उत्तर या दोघांनाही देता आलेले नाही. उद्दिष्ट काय होते हे निश्चित ठाऊक असेल तर उद्दिष्टपूर्ती झाली या विधानास अर्थ असतो. परंतु सीरियावरील हल्ल्यासंदर्भात या ध्येयाची वाच्यता अमेरिकेने केलेली नाही. असाद यांना धडा शिकविणे हे जर उद्दिष्ट होते असे मानले तर पाचपन्नास इमारतींवर बॉम्बफेक करून ते साध्य झाले असे कसे आणि का म्हणायचे, याचेही उत्तर त्यांच्याकडे नाही. अमेरिकेच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात सीरियाच्या एकाही विमानाचा टवकादेखील उडाला नाही. सीरियाच्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हल्ले झाले म्हणावे तर तसेही नाही. सीरियाच्या एकाही सनिकाला या हल्ल्यातून साधे खरचटलेदेखील नाही. ज्या रासायनिक अस्त्रांच्या वापरासाठी असाद यांना ही शिक्षा देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता त्या रासायनिक अस्त्राचा सर्व साठा या बॉम्बफेकीनंतरही तसाच्या तसा अबाधित आहे. या हल्ल्यात सीरियाचा सर्वेसर्वा बशर अल असाद याचे निवासस्थान हे लक्ष्य होते असेही नाही. म्हणजे मग या हल्ल्याने नक्की साधले काय?

तर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना जे जमले नाही ते आपण करून दाखवले असे मिरविण्याची सोय हे या हल्ल्याचे फलित. याआधी २०१३ सालीदेखील असाद यांनी आपल्याच नागरिकांविरोधात रासायनिक अस्त्रे वापरल्याचे उघड झाले होते. लहान लहान मुले सरीन आणि क्लोरिनसारख्या अस्त्रांनी विदग्ध होऊन तळमळताना जगाने पाहिली. त्या वेळी ओबामा यांनी असाद यांना लक्ष्मणरेषा न ओलांडण्याचा इशारा दिला. परंतु ही लक्ष्मणरेषा म्हणजे काय, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. परिणामी असाद त्यांना हवे तेच करीत राहिले आणि ओबामा इशारा देण्यापलीकडे काहीच करू शकले नाहीत. या असाद यांस इराण आणि रशिया या दोन देशांचा पािठबा आहे. पश्चिम आशियाच्या राजकारणातील शिया आणि सुन्नी या वादातही सीरिया, इराण या दोन देशांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्या देशावर अचानक कारवाई केली तर पश्चिम आशियात आग्यामोहोळ उठण्याचा धोका होता. तसेच ओबामा यांचे पूर्वसुरी, ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी इराकमध्ये केलेल्या हस्तक्षेपाचे परिणाम अमेरिका त्यानंतरही बराच काळ भोगत होती. हा सगळा विचार करून ओबामा यांनी असाद यांना केवळ इशारा दिला. त्या पलीकडे त्यांनी प्रत्यक्ष काही कारवाई करणे जाणूनबुजून टाळले. त्यामागे ही महत्त्वाची कारणे होती. परंतु विचारी जनांना जे जमत नाही ते अविचारी सहज करून दाखवतात या अलीकडे ठिकठिकाणी प्रत्ययास येणाऱ्या उक्तीनुसार ट्रम्प यांनी सीरियावर बॉम्बफेक करूनच टाकली. ओबामा यांना जे जमले नाही ते आपण करून दाखवले ही त्यांची त्यावर घमेंड.

ती किती पोकळ होती हे सीरियाची राजधानी दमास्कस या शहराच्या रस्तोरस्ती ज्या उत्साहाने या हल्ल्यांचे स्वागत झाले यातून दिसून आले. असाद यांच्या समर्थकांनी या हल्ल्यानंतर राजधानीत जल्लोष केला. कारण या निरुपयोगी बॉम्बफेकीशिवाय अमेरिका आता आणखी काही करू शकत नाही, हे त्यातून दिसून आले. सीरियात मोठय़ा प्रमाणावर रशियाचे सन्य आहे. ट्रम्प यांची लबाडी अशी की आपल्या बॉम्बफेकीत या रशियन सनिकांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. तसेच या असाद यांची राजवट उलथून टाकणे हे काही आपल्या कारवाईचे उद्दिष्ट नव्हते असेही ट्रम्प यांनी बॉम्बफेकीनंतर सांगून टाकले. तेव्हा प्रश्न असा की मग या कारवाईने नक्की साधले तरी काय? एवीतेवी सीरिया हा देश प्रचंड मोठी उद्ध्वस्त धर्मशाळा झाला असून ट्रम्प यांच्या क्षेपणास्त्र माऱ्याने त्या देशातील आणखी दोनपाच इमारती कोसळल्या, इतकेच. थोडक्यात ही कारवाई केवळ प्रतीकात्मकच होती. तरी तिचे दोन परिणाम संभवतात.

एक म्हणजे पश्चिम आशियाच्या वाळवंटातील वावटळ. सीरियावरील कारवाईच्या निमित्ताने लगेचच इराणने शड्डू ठोकण्यास सुरुवात केली असून सौदी अरेबियाने त्यावर प्रतिक्रिया देत इराणला इशारा दिला. सध्याची परिस्थिती अशी की या खडाखडीतून होणार काहीच नाही. फक्त खनिज तेलाचे दर तेवढे वाढतील. आताच ते ७२ डॉलर प्रतिबॅरलच्या टप्प्यात आहेत. हा तणाव असाच राहिला तर ते आणखी चढतील आणि अर्थातच आपल्या अर्थव्यवस्थेस घोर लावतील. दुसरा परिणाम असेल उत्तर कोरियासंदर्भात. सीरियामध्ये ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने बिचकत बिचकत कारवाई केली त्यातून त्यांच्या कथित शौर्यामागील निर्थकता तेवढी दिसली. म्हणजे त्यांना काही केल्यासारखे दाखवण्यातच रस आहे. प्रत्यक्षात ते काहीच करणारे नाहीत असा संदेश यातून गेला असून उत्तर कोरियाचा किम जोंग उन यास त्यामुळे गुदगुल्याच होतील. सीरियाप्रमाणे अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प हे या किम यांसही इशारे देत आहेत. प्रत्यक्षात ते फसवेच ठरण्याची शक्यता अधिक.

तात्पर्य इतकेच की अमेरिकेने सीरियावरील हल्ल्यांतून कमावण्यापेक्षा गमावलेच अधिक. अविवेकी धाडसापेक्षा विवेकी सावधपणा अधिक फलदायी ठरतो, हा याचा धडा. अन्य अनेकांनी शिकावा असा.