इतरांच्या हक्कांबाबतची अनास्था ज्या पर्यावरणातून येते त्याच्या मुळाशी कोणती तत्त्वे आहेत याचा विचार एकदा करायलाच हवा..

आता शिकल्यानंतर वगरे माणसाने सुसंस्कृत बनावे अशी अपेक्षा करणे म्हणजे भारीच. हे म्हणजे पारपत्र वा शिधापत्रिका वा आता ते खुशीच्या सक्तीचे आधारकार्ड मिळाल्यानंतर माणसे ‘नागरिक’ बनतात किंवा मतदारयादीत नाव आले व मतदान केल्यानंतर त्या शाईयुक्त बोटासह स्वछायाचित्र काढले म्हणजे ‘जबाबदार नागरिक’ बनतात असे वाटण्यासारखेच झाले. मग कोणी म्हणेल की या शिकण्याचा उपयोग तरी काय? सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिकल्यामुळे माणूस साक्षर होतो. शिवाय नोकरी वगरे लागण्याची दुर्मीळ संधीही त्याला मिळू शकते हा त्याचा अतिरिक्त फायदाच. तर असे नोकरी-धंदा करणारे, साक्षर वगरे असणारे बरेच लोक दोन दिवसांपूर्वी तेजस नामक रेल्वेगाडीत बसून कोकणात आणि गोव्यात गेले. या गाडीचा उद्घाटन सोहळा तसा रेल्वेखात्याच्या कारभाराला साजेसा असाच झाला. म्हणजे तो निर्धारित समयाहून अंमळ उशिरास सुरू झाला. असे असले तरी ही गाडी मात्र द्रुतगती आहे आणि ती अत्याधुनिकसुद्धा आहे. म्हणजे त्यात बऱ्याच सुखसोयी आहेत. आपोआप उघडमिट करणारे दरवाजे आहेत. आरामदायी खुच्र्या आहेत व त्यामुळे त्यातून प्रवास करताना विमानात बसल्यासारखे वाटते म्हटल्यावर तिचा प्रवासदर अंमळ महागच असणार हे गृहीतच आहे. तर असा महाग प्रवासदर मोजून विमानातल्यासारखा प्रवास करणाऱ्या प्रवाशांपकी त्या गाडीत चक्क चोऱ्यामाऱ्या केल्या व तेथील कानास लावावयाची श्रवणयंत्रे, तसेच अत्याधुनिक चित्रपडदे पळविले. काहींनी बहुधा पाहू बरे भक्कम आहेत का हे चित्रपडदे असे म्हणत त्यांवर ओरखडेही ओढले. तर काहींनी बहुधा सहन होत नाही एवढी स्वच्छता असे म्हणत तेथील शौचालयादी व्यवस्था सुंदर दरुगधीयुक्त करून ठेवल्या. तर यात धक्कादायक गोष्ट अशी की हे पाहून अनेकांना धक्का बसला व लोक म्हणू लागले की आपण अशा व्यवस्थेस तंतोतंत नालायक वगरे आहोत. आता यास भाबडेपणाखेरीज अन्य काही म्हणता येणे कठीण आहे. या अशा गोष्टींनी ज्या कोणा भाबडय़ांच्या मनात खेद-खंत-संताप-कीव अशा भावनांचा उद्भव झाला असेल, ते नक्कीच व्हॉट्सअ‍ॅपवरून दररोज रतिबाने येणाऱ्या सुविचारांचे वाचन व मनन करणाऱ्यांतले असावेत. त्यांना हा देश समजलाच नाही असे म्हणणे भाग आहे.

वस्तुत: आपल्याकडे हे असेच होत आलेले आहे व हीच आपली संस्कृती व परंपरा आहे हे एकदा नीटच लक्षात घेतले पाहिजे. परंतु तत्पूर्वी ही संस्कृती नेमकी काय आहे व ती कशातून आली हे समजून घेतले पाहिजे. आता हे तर सर्वानाच माहीत असते की हिंदुस्थानला किमान पाच हजार वर्षांची संस्कृती आहे व एवढी जुनी संस्कृती ज्या राष्ट्राला असते, ते राष्ट्र फारच महान वगरे गणले जाते. यात हल्ली किंचितसा बदल करावा लागतो. कारण की हिंदुस्थानची संस्कृती श्रेष्ठ वगरे म्हटले की मग त्यात हल्लीचे पाकिस्तान, बांगलादेश वगरे देशही येतात. आता त्यांना हा सांस्कृतिक वारसा देणे म्हणजे अगदीच काही तरी. म्हणून केवळ भारताच्या संस्कृतीचीच आरती गाणे हेच योग्य. तर या संस्कृतीने आपणांस अनेक धडे दिले. म्हणजे आपले सिंधु संस्कृतीतले मोहेंजोदारो पाहा. ते आता पाकिस्तानात आहे हा भाग वेगळा. परंतु तेथील संस्कृतीने आपणास नगररचना, सांडपाण्याची व्यवस्था वगरे छान छान गोष्टी शिकवल्या. तेथे सार्वजनिक स्नानगृह होते व शिवाय घराघरांतही स्नानाची सोय असे म्हटल्यावर आपल्या पूर्वसुरींना स्वच्छतेचे केवढे तरी महत्त्व असणार हे नक्कीच. कारण की पुढे जाऊन स्वच्छ धुतल्या अंगाने स्वयंपाक करावा यांसारख्या गोष्टीही आपल्यात आल्याच. फार काय अस्पृश्यतेच्या समर्थनासाठीही काही चलाख लोकांनी हाच स्वच्छतेचा मुद्दा पुढे आणला होता म्हणजे पाहा. आता किमान पाच हजार वर्षांची ही स्वच्छतेची संस्कृती आपण मिरवतो आहोत व त्या संस्कृतीचा आपणास एवढा भलाथोरला अभिमान आहे की येथे झाडूलाही लक्ष्मी मानून पुजण्याची परंपरा आहे म्हटल्यावर आपला देश कसा आरशासारखा लख्ख असायला हवा. परंतु येथे तर महात्मा गांधींपासून नरेंद्र मोदीमार्गे आर. आर. पाटील असे अनेक नेते आपणांस सतत स्वच्छता मोहिमेवर धाडताना दिसतात. आपणही ‘हाती धरून झाडू तू मार्ग झाडलासी’ म्हणत त्यांचे कौतुक वगरे करतो. शिवाय आता गदिमांच्या याच गीतातील ‘सेवेस लाविले तू धनवंतही विलासी’ ही पंक्ती तर आपण खास मोदींचे यश म्हणून गणतो आहोत. या धनवंतांची, मार्ग झाडतानाची किती तरी छायाचित्रे आजही आपल्यासमोर लखलखत आहेत. आणि तरीही तेजससारखी गाडी परतीच्या प्रवासात दरुगधीने भरून वाहताना दिसते आहे. किंवा सिंगापुरी वगरे जाऊन आल्यानंतर तेथे कसा कागदाचा कपटा रस्त्यावर दिसत नाही असे कौतुकाख्यान लावणारे आपण येथे सार्वजनिक जागा हीच आपली कचराकुंडी असे समजत असतो व त्यात काही विसंगती आहे हेही आपल्या लक्षात येत नसते. हीच बाब आपल्या एकूणच नागरी कर्तव्यांची. तेथे गरीब-श्रीमंत असा भेदभाव कसा छान मिटतो. म्हणजे रस्ता ही आपल्या पिताश्रींची स्थावर मालमत्ता असून, त्यावरील अन्य  घुसखोरांवर हॉर्नद्वारे भुंकण्याचे काम चारचाकीतून फिरणारे लक्षाधीशही करीतच असतात.  ही आपली नागरी जाणीव म्हटल्यावर याला काय म्हणावे?

तर त्याला दांभिकपणा म्हणावे. तो कुठून येतो? तर तो आपल्याच सामाजिक पर्यावरणातून येत असतो. तो संस्कृतीचाच भाग असतो. त्याचमुळे आपण एकीकडे प्रचंड धार्मिक असतो. एवढे की आपल्या खिशाला आपल्या प्रिय बाबा-बुवाचे चित्र लावलेले पेन असते व आपल्या धार्मिक भावना काचेच्या भांडय़ाप्रमाणे जपत असतो. आता हे सारे धर्म मुळातून जाऊन पाहिले तर काय शिकवतात, तर चांगले वागा. प्रेम करा. हिंसा करू नका. चोरी करणे पाप आहे. या झाल्या धार्मिक नतिक आज्ञा. त्या गुंडाळून ठेवूनही धार्मिक बनण्याची कला ही सर्वच संस्कृतींनी विकसित केली आहे. आता याचे समर्थन करताना दारिद्रय़, लोकसंख्यावाढ, साधनांचा अभाव येथपासून मानवी मनातील आदिम क्रौर्य, हिंसावृत्ती येथपर्यंत बरेच काही वैचारिक-सूत कातता येईल. म्हणजे तेजस या वातानुकूलित गाडीची काच दगड मारून फोडणे हा अभावग्रस्तांचा सूड-आक्रोश आहे असे म्हणता येते. परंतु मग सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणारे मध्यमवर्गीय ‘नागरिक’च असतात त्याला काय म्हणावे? किंवा रेल्वे वा बसमध्ये समोरच्या बाकावर बुटासह पाय ठेवून बसणाऱ्या सद्गृहस्थांस काय म्हणावे? इतरांच्या हक्कांबाबतची ही अनास्था ज्या पर्यावरणातून येते त्याच्या मुळाशी कोणती तत्त्वे आहेत याचा विचार तर एकदा करायलाच हवा. कारण ही अशी अनास्था असणारे जे लोक आहेत त्यांचे देशावर मात्र भलतेच प्रेम असते. तेजसमधील श्रवणयंत्रे पळविणाऱ्यास विचारून पाहिले तर तोही ‘भारतमाता की जय’च म्हणेल. एकीकडे देशातील जे जे सार्वजनिक आहे ते ते सरकारने आपणांस नासधूस करण्यासाठीच ठेवलेले आहे असे मानणारी ही प्रवृत्ती जेव्हा स्वत:च्या माथ्यावर देशभक्तीचा उभा गंधही लावून फिरते तेव्हा त्याचा रंग दांभिकतेचाच असतो हे ध्यानात घ्यायला हवे. संक्रांतीचे जसे वाहन असते, तसेच दांभिकता हे आपल्या सांस्कृतिक परंपरांचे वाहन बनले आहे. ते काढून घेतले नाही, तर बिघडणार काहीच नाही. तेजसमधील सामान असेच चोरीस जाईल. स्वच्छता मोहिमा स्वछायाचित्रापुरत्या उरतील आणि नागरिकशास्त्र हे शाळेत शिकून तेथेच विरून जाईल. देश आपला भाबडय़ा दांभिकांचाच राहील..