नवशांततावादी मोदी आणि नवाझ यांच्यातील चच्रेनंतर हल्ला होणार हे उघड दिसत असतानाही तो आपणास रोखता आला नाही..
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या गुरुदासपूर हल्ल्याची चौकशीही अद्याप पूर्ण झालेली नाही. म्हणून पठाणकोट प्रकरण अधिकच लाजिरवाणे ठरते. या हल्ल्यातून आता बरेच काही शिकावे लागणार असून मोदी यांना आपल्या धोरणांची फेरआखणीही करणे गरजेचे आहे.
पठाणकोट हल्ल्याचे गांभीर्य पाहता त्यामुळे आपल्या संरक्षण, हेरगिरी यंत्रणांची आणि परिणामी नरेंद्र मोदी सरकारची लाज निघाली आहे. दोन दिवसांनंतरही ही दहशतवादी घुसखोरी संपवण्यात आलेली नाही आणि या हल्ल्यात एनएसजीच्या उच्च प्रशिक्षित अधिकाऱ्यासह सात सनिक शहीद झाले. ख्रिस्त जन्मदिनी शांततेचा पगाम देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाकडी वाट करून पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची पाकिस्तानात भेट घेतली त्याच वेळी भारतावर दहशतवादी हल्ला होणार हे स्पष्ट झाले. पठाणकोटवरील ताज्या हल्ल्याने हे दाखवून दिले. या विधानावर नवशांततावादी मोदी यांच्या प्रेमात असणाऱ्यांचा प्रश्न असेल: म्हणजे मोदी गेले नसते तर हा हल्ला झाला नसता असे आपणास म्हणावयाचे आहे काय? तर तसे नाही. या विधानाचा अर्थ इतकाच की मोदीभेटीने हल्ल्याची गरज पाक लष्कराला अधिक तीव्रतेने वाटली. परंतु अशी शक्यता होती म्हणून मोदी यांनी पाकिस्तानात जायलाच नको होते, असाही त्याचा अर्थ अजिबात नाही. पाकिस्तानशी चर्चा करायलाच हवी. कारण आपण दुसरे काहीही करू शकत नाही हे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. परंतु पंतप्रधानपद मिळेपर्यंत आपण असे काही ‘दुसरे’ पर्याय निवडू शकतो, असा मोदी यांचा दावा होता. देशाच्या सुदैवाने तो आता मागे पडला आहे. तेव्हा या भेटीच्या निमित्ताने जसा मोदी यांचा नवशांततावाद समोर आला तसाच या भेटीनंतरच्या ताज्या पठाणकोट हल्ल्याने पाकिस्तान लष्कराचा जुना शांतताविरोधही उफाळून आला, असे म्हणावयास हवे. नवशांततावादी मोदी आणि नवाझ शरीफ यांच्या भेटीसंदर्भातील अग्रलेखात आम्ही पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली होती. कारण पाकिस्तानात पंतप्रधान नवाझ शरीफ हे अधिकाराबाबत नामधारी आहेत. खरी सत्ता आहे ती पाक लष्करप्रमुख राहील शरीफ यांची. कोणताही पाकिस्तानी लष्करप्रमुख हा भारताविषयी शांततेची आणि सौहार्दाची भूमिका घेऊ धजणार नाही. शरीफ झाले म्हणून आताचे लष्करप्रमुख यास अपवाद ठरतील असे मानावयाचे कारण नाही. कोणताही पाक लष्करप्रमुख शांततावादी झालाच तर तो त्याचा सेवान्त असेल. पाकिस्तानी लष्कराची चूल पेटती राहाते तीच मुळी सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत राहिल्याने. त्यामुळे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक शांततेचे महत्त्व लक्षात येऊन सत्ता मिळाल्यावर त्यांचे जसे हृदयपरिवर्तन झाले म्हणून पाकिस्तानी लष्कराचेही होईल असे आपण मानायची काहीच गरज नाही. पठाणकोट हल्ल्याने नेमकी तीच बाब अधोरेखित केली. तेव्हा भारतावर असे हल्ले करणे हा ज्याप्रमाणे पाकस्थित इस्लामी दहशतवाद्यांचा धर्म आहे त्याचप्रमाणे या दहशतवाद्यांना जिवंत ठेवणे हे पाक लष्कराचे कर्तव्य आहे. मोदी यांना शांततेची अनुभूती आली म्हणून दहशतवाद्यांनी धर्म सोडला आणि पाक लष्कराने आपले कर्तव्य नाकारले असे झाले नाही. तेव्हा पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून हे सर्व अपेक्षेप्रमाणेच झाले. त्यात धक्का बसावा असे काही नाही. प्रश्न आहे तो आपला. या पठाणकोट हल्ल्याच्या निमित्ताने आपण आपल्या अपेक्षांना जागतो आहोत का, हा प्रश्न विचारणे गरजेचे ठरते. या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर नाही, असेच द्यावे लागेल. हे उत्तर तसे का आहे, त्यामागील कारणे कोणत्याही राजकीय अभिनिवेशाविना समजून घेणे आवश्यक ठरते.
पहिले कारण म्हणजे दहशतवाद्यांची कार्यक्रम ठरवण्याची क्षमता. तसेच हल्ल्यासाठी त्यांनी निवडलेले स्थळ. नवशांततावादी मोदी आणि नवाझ यांच्यातील चच्रेनंतर हल्ला होणार हे उघड दिसत असतानाही तो आपणास रोखता आला नाही. आपण आता भले विमानांवर हल्ला होऊ दिला नाही, त्यांना वेळीच रोखले वगरे फुशारकी मारून स्वत:च्या पाठीवर थाप मारून घेऊ. परंतु तरीही या हल्ल्याने आपल्या सुरक्षा यंत्रणेतील कच्चे दुवे उघड केलेच केले. दहशतवादी तर स्वत:ची कुर्बानी देण्यासाठीच आले होते. तेव्हा ते टिपले गेले यात काही विशेष नाही. पण आपले सात जवान या हल्ल्यात हकनाक बळी पडले. तसेच दोन दिवसांनंतरही या तळात घुसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढणे आपणास शक्य झाले नाही. भारतीय बाजूने बळी पडलेल्यांत काही उच्च प्रशिक्षित कमांडोंचादेखील समावेश आहे. हे नुकसान मोठे आहे. ते आपण टाळू शकलो नाही. या संदर्भातील दुसरे कारण म्हणजे दहशतवाद्यांनी निवडलेले स्थळ. लष्करी आस्थापनांवर हल्ला केल्यास कमी श्रमांत जास्त प्रसिद्धी मिळते. तसेच संबंधित सरकारचीही नाचक्की होते. दहशतवाद्यांचे दोन्ही हेतू पठाणकोट हल्ल्याने साध्य झाले. पठाणकोट हवाई तळ हा देशातील सर्वात मोठय़ा तळांपकी एक आहे. त्यामुळे हा हल्ला दिसतो त्यापेक्षा अधिक गंभीरपणे घ्यायला हवा. त्यामागील कारण क्रमांक तीन म्हणजे दहशतवाद्यांनी निवडलेला प्रदेश. या काळात हिवाळा असतो. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात वा पीर पांजाल डोंगररांगांतील नेहमीच्या पूंछ, राजौरी पट्टय़ांतून घुसखोरी करणे अवघड असते. तसेच तेथे पठाणकोटप्रमाणे मोठे लष्करी केंद्रदेखील नाही. त्यामुळे दहशतवादी तेथून घुसखोरी करणार नाहीत, हे उघड होते. तशी लष्करी केंद्रे जम्मू परिसरात आहेत. परंतु नवशांततावादी मोदी आणि नवाझ भेटीनंतर तेथे डोळ्यांत तेल घालून पहारा असणे नसíगक होते. त्याचप्रमाणे पंजाबच्या दक्षिण भागात दहशतवादी हल्ला करण्यासारखे महत्त्वाचे काही नाही. अशा वेळी उत्तर पंजाबमध्येच दहशतवादी कृत्ये होणार याचे भाकीत वर्तवण्यासाठी लष्करी तज्ज्ञ असण्याची गरज नाही. काश्मीरशी असलेले भौगोलिक सख्य, तसेच गुरुदासपूर, पठाणकोट येथे असलेले सुरक्षा यंत्रणांचे तळ पाहता दहशतवादी हल्ला झालाच तर हाच परिसर लक्ष्य असेल हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. ते तसे असूनही आपण हा हल्ला रोखू शकलो नाही. पाकिस्तानी सीमेपासून अवघ्या ३० किमी अंतरावर असणारा पठाणकोट हवाई तळ दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी सहज निवडला. याआधीही गत वर्षीच्या जुल महिन्यात याच परिसरातील गुरुदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्याने तर पंजाब पोलिसांची अब्रूच काढली. तरीही आपण त्यातून काहीही शिकलो नाही, हे पठाणकोट प्रकरणाने दाखवून दिले. आता तर गुरुदासपूर हल्ल्याची चौकशीही अद्याप पूर्ण न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून पठाणकोट प्रकरण अधिकच लाजिरवाणे ठरते. यातील अधिक आक्षेपार्ह बाब म्हणजे हे दहशतवादी प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी किमान दोन दिवस पठाणकोट परिसरात िहडत होते, असेही उघड झाले आहे. भारतीय सुरक्षा रक्षकांचा गणवेश आदी त्यांना मिळाले ते याच परिसरात. याचाच अर्थ आपल्या सुरक्षा यंत्रणांना या घुसखोरीचा आगाऊ सुगावा लागला नाही. संशय होता. तरीही त्यांना याबाबत संपूर्ण माहिती मिळाली नाही. तेव्हा उगाच छातीठोक फुशारक्या मारण्याचे कारण नाही. मोदी सरकारने तसे केले आणि रविवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या हल्ल्याने त्याचा फोलपणा उघड केला.
तेव्हा यातून आता बरेच काही शिकावे लागणार आहे आणि नवशांततावादी मोदी यांना आपल्या धोरणांची फेरआखणीही करावी लागणार आहे. १५ जानेवारीपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकृत चर्चा सुरू होईल. ती अनौपचारिक पातळीवरही सुरू करण्याचा प्रयत्न नवशांततावादी मोदी यांनी लाहोरभेटीतून केला. त्याचे कौतुक असले तरी अनौपचारिक चच्रेनंतर घडलेल्या या दहशतवादी हल्ल्याने औपचारिक चच्रेत काय भूमिका घ्यायची असा पेच सरकारसमोर असेल. राष्ट्रभक्तीवर फक्त आपलीच मक्तेदारी आहे असा भाजपचा दावा होता. तो राखताना या पक्षाकडून मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा अशी चूक होण्याची शक्यता आहे. ती टाळणे ही सरकारची कसोटी असेल.