आणीबाणीच्या श्राद्धदिनी काँग्रेसच्या हुकूमशाही नेतृत्वाचे स्मरण केले जात असताना अन्य पक्षांच्या नेतृत्वाचा पिंडदेखील तपासून पाहायला हवा..

हुकूमशहाची विशिष्ट अशी काही लक्षणे असतात. तो एकलकोंडा असतो. त्याला कोणीही मित्र नसतो, कोणीही विश्वासाचा नसतो आणि म्हणूनच तो संशयी असतो. तो नेहमी स्वतला असुरक्षित मानतो. खरे तर बरेच हुकूमशहा संशयग्रस्तच असतात. भयगंडाने ग्रासलेले असे. आसपासचे सगळे आपल्या विरोधात कट करीत असल्याचा भास त्यांना होत असतो. त्यामुळे त्यांना टीका जराही सहन होत नाही. टीकाकार जणू शत्रूच असे ते मानतात. हुकूमशहा स्वतच्या आसपास नेहमी खुशमस्कऱ्यांचा गोतावळा बाळगतात. या गोतावळ्यात स्तुतिपाठासाठी एकमेकांत स्पर्धाच असते. तसेच हुकूमशाही राजवटीत तो सर्वोच्च सत्ताप्रमुख सोडला तर अन्य कोणालाही महत्त्व नसते. सगळा प्रकाशझोत त्याच्यावरच. तसेच त्याची पक्षांतर्गत उंची इतकी असते की बाकीचे सगळेच खुजे वाटू लागतात. हुकूमशहा कामाला वाघ. रात्रंदिवस तो स्वतला कामात गाडून घेतो. तो कोठे मौजमजा करायला गेल्याचे सहसा दिसत नाही.

यातील बहुतेक सर्व लक्षणे इंदिरा गांधी यांच्यात होती. म्हणूनच आणीबाणी लादण्यासारखे टोकाचे पाऊल त्या उचलू शकल्या. आणीबाणीच्या काळात २१ महिने नागरिकांचे मूलभूत अधिकार गुंडाळून ठेवले गेले आणि सरकारच्या विरोधात ‘ब्र’ काढण्याची कोणाची शामत नव्हती. इंदिरा गांधी यांच्या या एका कृतीने देशाचे एकाधिकारशाहीत रूपांतर झाले. त्यामुळे लोकशाही निष्ठांचे स्मरण नागरिकांना करून देण्यासाठी आणीबाणीची आठवण ठेवणे गरजेचे असते. देशाची घटना संस्थगित करून हुकूमशाही राजवट लागू करणाऱ्या त्या घटनेचा ४३ वा वर्धापन दिन मंगळवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मेळाव्यात काँग्रेसच्या घराणेशाहीची लक्तरे वेशीवर टांगून तो साजरा केला. त्याच्या आदल्या दिवशी बिनखात्याचे मंत्री अरुण जेटली यांनी घरबसल्या आपल्या प्रतिक्रियांत इंदिरा गांधी यांची तुलना ही थेट हिटलर याच्याशीच करून आणीबाणीच्या चच्रेस तोंड फोडले. मोदी यांनी या तुलनेस दुजोरा दिला. या पाश्र्वभूमीवर आणीबाणीकडे आणि नंतरच्या कालखंडाकडे पुन्हा वळून पाहायला हवे.

आणीबाणी ही जरी एखाद्या व्यक्तीकडून लादली जात असली तरी मुळात त्या व्यक्तीच्या ठायी हुकूमशाही प्रवृत्ती असावी लागते. इंदिरा गांधी यांच्यात ती काही अंशी होती आणि नंतरच्या काळात ती बळावतच गेली. आणीबाणीसारखे टोकाचे पाऊल त्या उचलू शकल्या त्यातल्या अनेक कारणांपकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे घराणे. देशाचे पहिले पंतप्रधान, खरे लोकशाहीवादी पं. जवाहरलाल नेहरू यांची ती कन्या. नेहरू यांच्या काळात त्या घराण्यास काँग्रेसच्या कुलदैवतासारखे महत्त्व अजिबातच नव्हते. नेहरूंनीही कधी इंदिरेस पुढे केल्याचे दाखले नाहीत. त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री आणि नंतर खुद्द इंदिरा गांधी यांच्या हाती सत्ता आली आणि काँग्रेस बदलली. एके काळची गुंगी गुडिया इंदिरेने पक्षातील ढुढ्ढाचार्याना असा काही धक्का दिला की पक्षच हादरला. पुढे तो फुटलाही. खरे तर इंदिरा गांधी यांनी फोडला. त्यानंतर त्यांचा पक्षावर एकछत्री अंमल सुरू झाला तो झालाच. हुकूमशाही वृत्ती असणाऱ्या नेत्याच्या हाती पक्षाची सूत्रे गेली की तोपर्यंत नेतेपद भूषवणाऱ्यांचे महत्त्व हातोहात कमी केले जाते. इंदिरा गांधी यांनी तेच केले. परिणामी इंदिरा गांधी म्हणजे भारत आणि भारत म्हणजे इंदिरा गांधी असे म्हणणारा देवकांत बरुआ यांच्यासारखा अध्यक्ष त्या पक्षास मिळाला. हे असे का होते? अशा एकचालकानुवर्ती नेत्याभोवतीचे नेते असे माना का टाकतात?

स्वार्थ हे त्याचे उत्तर. या आसपासच्या मंडळींना संघर्ष नको असतो. पण तरी अधिकारपदे वा सत्तेमुळे मिळणारे फायदे हवे असतात. त्यामुळे असा नेतृत्वगुण मुख्य नेत्याच्या खांद्यावर मान टाकून निवांत होतो. या नेत्याच्या आरत्या गाऊ लागतो. या नेत्यामुळे काही उत्तम झालेच तर त्याचा फायदा या नेत्यांच्या ओंजळीत पडतच असतो. आणि नाही काही भले झालेच तर पापाचा धनी होण्याची तयारी त्या मध्यवर्ती नेत्याची असतेच. तेव्हा असे एकाधिकारशाही गाजवणारे नेते असणे हे उभय गटांच्या फायद्याचे असते. या अशा हितसंबंधांत हुकूमशहा निर्मितीची मुळे असतात. तेव्हा आणीबाणीचे स्मरण करणे म्हणजे केवळ इंदिरा गांधी यांनी काय केले, त्या कशा कशा चुकल्या याचा पाढा वाचणे नाही. तर नेतृत्वाची पारदर्शी अशी काहीएक व्यवस्था तयार करणे आणि कोणा एकावरच पक्षाचा डोलारा अवलंबून राहणार नाही, याची काळजी घेणे. आणीबाणीस ४३ वर्षे झाली. याचा अर्थ गेली ४३ वर्षे या निमित्ताने आणीबाणीच्या काळ्या कहाण्या या देशाने ऐकल्या. परंतु मुद्दा असा की या काळात आपल्या राजकीय व्यवस्थेत नक्की बदल काय झाला?

काहीही नाही हे त्याचे उत्तर. उलट ज्या दोन पक्षांतील एक पक्ष अपवाद असेल असे वाटत होते तो पक्षदेखील अन्य एकखांबी तंबूंसारखाच निघाला. आता उरले आहेत तेवढे डावे. परंतु त्यांचा जिवांकुरच खुरटा. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा करणे व्यर्थच. ते वगळता देशातील एकूण एक पक्ष हे पूर्णपणे एकखांबी वा एककुटुंबीच आहेत हे सत्य नाकारता येणारे नाही. आणीबाणीच्या श्राद्धदिनी काँग्रेसच्या हुकूमशाही नेतृत्वाचे स्मरण केले जात असताना अन्य पक्षांच्या नेतृत्वाचा पिंडदेखील तपासून पाहायला हवा. सध्या काश्मीर ते कन्याकुमारी या संपूर्ण टापूत असा एकही पक्ष नाही जो व्यक्ती वा कुटुंबकेंद्री नाही. यावर ‘आम्ही बुवा अपवाद’, असे भाजपीय म्हणू पाहतील. पण ते खोटे आहे. गेल्या आठवडय़ात जम्मू-काश्मीरमधील सरकारचा पाठिंबा काढून राज्यपाल राजवट लागू करण्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत गृहमंत्री राजनाथ सिंग यांना तो माहीतदेखील नव्हता. हे भाजपचे लोकशाही नेतृत्व. ही ताजी घटना म्हणून त्याचा दाखला दिला. अन्यथा असे नमुने शेकडय़ांनी नाही तरी डझनांनी नक्कीच देता येतील. तेव्हा या सगळ्याचा अर्थ इतकाच की आणीबाणीनंतरच्या चार दशकांत आपले राजकारण अधिकाधिक लोकशाहीवादी होण्याऐवजी उत्तरोत्तर व्यक्तिकेंद्री वा कुटुंबकेंद्रीच होत गेले. म्हणजेच आणीबाणीच्या अनुभवातून जे घ्यायला नको तेच नेमके आपण घेतले. हे असे पक्ष जोपर्यंत सत्तेबाहेर असतात तोपर्यंत त्यांचा धोका जाणवत नाही. परंतु सत्ता मिळाली की पक्षाची एककल्ली प्रवृत्ती सत्ता राबवतानाही दिसू लागते आणि सत्ता राबवणारा पक्ष एक व्यक्ती वा कुटुंब यांच्या भोवतीच फेर धरू लागतो. सर्व अधिकारांचे अशा ठिकाणी केंद्रीकरण होते.

अशा वेळी पुन्हा आणीबाणी लादताच येणार नाही, हा आशावाद आपणास कितपत आधार देऊ शकेल हा प्रश्न आहे. प्रत्यक्षात तो निर्थक ठरतो. याचे कारण आज कोणत्याही सत्ताधीशास आणीबाणी जाहीर करण्याची आवश्यकताच नाही. ती तशी घोषणा न करताही स्वतची मुस्कटदाबी करून घेण्यास विचारशून्य नागरिकांच्या, कणाहीन माध्यमांच्या आणि टाळकुटय़ा भक्तांच्या टोळ्या तयार असतील तर आणीबाणी प्रत्यक्षात लागू करण्याची गरजच काय? हे समजून घेण्याइतकी सामाजिक प्रगल्भताच आपल्या ठायी नाही, हे आपले खरे दुख. ते विसरण्यासाठी म्हणून आपण आणीबाणीची आठवण काढतो आणि इंदिरा गांधी यांच्या नावे बोटे मोडणे म्हणजेच लोकशाही कर्तव्य पार पाडणे असे मानून समाधानाचा सामाजिक ढेकर देतो. तथापि प्रत्येक ढेकर हा शरीरात सर्व काही आलबेल असल्याचा सांगावा असतोच असे नाही.