काँग्रेसच्या नेतृत्वानेच घडवून आणलेल्या पहिल्या फुटीमुळे एककल्ली राजकारणाची पायाभरणी झाली.. त्यातूनच हा पक्ष अशक्त होत गेला..

आजपासून ५० वर्षांपूर्वी देश राजकीय भूकंपानंतरची अवस्था अनुभवत होता. या भूकंपाचे कारण होती तोपर्यंत सुमारे ८४ वर्षे अनेक जण सोडून गेले तरी एकसंध राहिलेल्या काँग्रेस पक्षातील पहिली फूट. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या पक्षफोडीच्या कृतीने देशात एक नवी राजकीय संस्कृती उदयास आली. या फुटीमागची कारणे, ती प्रक्रिया यांचे एक साक्षेपी साक्षीदार शरद पवार यांनी रविवारच्या लोकसत्तात मांडलेला याचा साद्यंत आणि रोचक इतिहास जाणत्या वाचकांनी वाचला असेलच. त्याची पुनरावृत्ती करण्याचे कारण नाही. तथापि या फुटीमुळे आपल्याकडे जी राजकीय संस्कृती उदयास आली ती आता पूर्ण भरात आली असून, या निमित्ताने दोन प्रश्नांचा ऊहापोह करणे देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आवश्यक ठरते.

पहिला मुद्दा देशातील राजकारण व्यक्तिकेंद्रित कसे बनत गेले त्याचा. इंदिरा गांधी यांच्या त्या पक्षफोडीच्या कृतीने राजकारणात पक्ष, संघटना यापेक्षा व्यक्ती अधिक महत्त्वाची ठरत गेली. म्हणजेच राजकारण हे या मध्यवर्ती नेत्याभोवतीच फिरू लागले. हा नेता म्हणजेच पक्षाचे धोरण आणि हा नेता म्हणजेच पक्ष. त्याचीच पुढची पायरी म्हणजे, हा पक्ष सत्तेवर असेल तर त्याचा नेता म्हणजेच देश असे मानले जाऊ लागले. इतकेच नव्हे, तर तसे मिरवलेदेखील जाऊ लागले. वास्तविक यातून कदाचित त्या नेत्याचे नेतृत्व कौशल्य उजळून निघत असेलही. पण समाज, व्यवस्था म्हणून देशाची अशक्त बाजूच त्यातून समोर येते, या वास्तवाचे आपले भान सुटले. त्यामुळे वास्तविक ज्याची लाज वाटायला हवी, तेच आपण अभिमानाने मिरवू लागलो.

इंदिरा गांधी यांचे कौतुक कोणत्या कारणांसाठी केले गेले, त्यास उजाळा दिल्यास हा मुद्दा मान्य होणे अवघड जाणार नाही. उदाहरणार्थ, इंदिरा गांधी यांचा खमकेपणा, त्यांची धडाडी, कोणाची फिकीर न बाळगता निर्णय घेण्याची त्यांची क्षमता, इत्यादी. ‘श्रीमती गांधी यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव पुरुष’ (ओन्ली मॅन इन हर कॅबिनेट) असे इंदिरा गांधी यांचे वर्णन केले गेले आणि अजूनही केले जाते. खुर्चीत बसलेल्या इंदिरा गांधी आणि सभोवताली उभे लाचार भासणारे काँग्रेसजन या त्या वेळच्या एका गाजलेल्या छायाचित्राची आठवण या संदर्भात अनेकांना होईल. श्रीमती गांधी राजकीयदृष्टय़ा अत्यंत यशस्वी. त्याचा परिणाम म्हणजे नेतृत्व करायचे असेल तर नेत्याने एककल्लीच असायला हवे, कोणाचीही पत्रास ठेवता नये आणि मुख्य म्हणजे आपण स्वत: आणि दुसरी फळी यांत कायमस्वरूपी अंतर राहील याची खबरदारी घ्यायला हवी, असे मानण्याचा प्रघात पडला. म्हणजे सर्वाना समवेत घेऊन जाणाऱ्या, सहमतीचे राजकारण करू पाहणाऱ्या नेत्यांस नेभळट मानले जाऊ  लागले. त्याआधीचे राजकारण असे नव्हते. पंडित नेहरू यांचे व्यक्तिमत्त्व त्यानंतरच्या कितीतरी नेत्यांपेक्षा उत्तुंग होते हे खरेच. पण त्यांचे नेतृत्व हे एककल्ली होते असे म्हणता येणार नाही. अलीकडे पं. नेहरू यांना टीकेचे धनी करण्यात स्वत:ला धन्य मानणारी राजकीय संस्कृती उदयास आलेली असली, तरी नेहरूंच्या सहमतीच्या राजकारण शैलीचे एक वैशिष्टय़ आवर्जून नमूद करायला हवे. निवडणुकांत राममनोहर लोहिया, आचार्य कृपलानी या आपल्या विरोधक वा टीकाकारांविरोधात कमकुवत उमेदवारच उभे केले जातील, याची दक्षता पं. नेहरू जातीने घेत. का? तर, संसदेत अशा नेत्यांमुळे दुसरी बाजू समोर येते, असे ते मानत. आपला विरोधक कायमचाच नेस्तनाबूत व्हायला हवा, हा राजकीय विचार नंतरचा. अलीकडच्या काळात तो शिगेला गेला असला, तरी त्याची सुरुवात इंदिरा गांधी यांनी ५० वर्षांपूर्वी घडवून आणलेल्या फुटीने झाली, हे नि:संशय. हा त्या फुटीच्या परिणामांचा एक मुद्दा.

दुसरा काँग्रेसच्या भवितव्याचा. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यानेच आपल्या धक्कादायक वर्तनाने पक्षात फूट घडवून आणल्याने राजकीय साध्यासाठी साधनास महत्त्व देण्याची गरज मागे पडली. त्यामुळे काँग्रेसचे जे काही नुकसान झाले ते झाले. पण त्याचा देशावरील दुष्परिणाम म्हणजे, उत्तरोत्तर तो पक्ष अशक्त होत गेला आणि आता तर तो मुडदुसावस्थेतून बाहेर येईल की नाही, याचीच शंका आहे. देशात डझनभर सशक्त पक्ष असते, तर काँग्रेस पक्षाच्या बऱ्यावाईटाचे सुखदु:ख वाटते ना. परंतु तशी परिस्थिती नाही. तसेच काँग्रेस हा केवळ एक पक्ष नाही. तो देशातील मध्यममार्गी, नेमस्त वृत्तीचे प्रतीक होता. तो सक्षम होता तोपर्यंत देशाचे राजकारण आणि समाजकारण हे काही एका मध्यममार्गी आणि सुरुवातीस काही काळ प्रामाणिक धर्मनिरपेक्षतेने सुरू होते. तो जसजसा खचत गेला- त्यास अर्थातच त्या पक्षाचे नेतृत्वच जबाबदार होते- तसतसे देशाच्या राजकारणाने आणि समाजकारणाने या मध्यममार्गाची कास सोडली. ते अधिकाधिक एकारलेले आणि एकांगी होत गेले. आणि आता तर त्याची परिसीमाच गाठली गेल्याचे दिसते. अशा वातावरणात काँग्रसचे रसातळास जाणे काही एका वर्गास आनंददायक वाटत असले, तरी ते बालसुलभवृत्तीचे द्योतक ठरते. याचे कारण साध्या विद्युतप्रवाहाच्या संतुलनासाठीदेखील धन आणि ऋण अशा दोन भारांची गरज असते. केवळ एकाच्या असण्याने मंडल पूर्ण होऊ शकत नाही.

हे वैज्ञानिक सत्य देश आणि समाज यांनाही तसेच लागू पडते. त्यामुळे काँग्रेस या पक्षाचे काय होणार, हा प्रश्न देशाचे व्यापक हित आणि इतिहासाचा त्याहूनही अधिक व्यापक पट लक्षात घेता अत्यंत गौण ठरतो. मुद्दा आहे तो या देशातील लोकशाहीचे काय होणार, हा. त्याचे गांभीर्य काँग्रेस नेतृत्वास किती आहे, हा प्रश्न असला तरी ते सत्ताधाऱ्यांना निश्चितच आहे. हे त्यांच्या राजकीय आणि संसदीय वर्तनातून सतत आढळून येते. म्हणूनच संख्येने नगण्य खासदार असूनही पंतप्रधानांपासून सर्व सत्ताधारी सातत्याने काँग्रेसचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. वस्तुत: जेमतेम ५० खासदार असलेला पक्ष हा कोणत्याही अंगांनी तूर्त धष्टपुष्ट भाजपसाठी आव्हान असू शकत नाही. परंतु असे आव्हान भविष्यात का असेना, येणार असेल तर ते काँग्रेसकडूनच येऊ शकते हे भाजपचे नेतृत्व जाणते. त्यामुळेच काँग्रेस पक्षास झोडण्याची तसेच फोडण्याची संधी भाजप दवडत नाही आणि त्या पक्षासंदर्भातील सारी चर्चा ही नेतृत्वाच्या अशक्तपणापलीकडे जाणार नाही, याची खबरदारी घेतो.

कारण ‘पक्ष म्हणजे त्याचे नेतृत्व’ हेच बिंबवणे हा यामागील हेतू. वास्तविक भाजप हा जसा केवळ एक पक्ष नाही, तसाच काँग्रेस हादेखील केवळ पक्ष नाही. ती विचारधारा आहे. परंतु त्या पक्षाबाबतची सारी चर्चा नेतृत्व या मुद्दय़ाभोवतीच फिरती ठेवल्याने विचारधारा हा मुद्दाच चर्चेस येत नाही. अशा वातावरणात काँग्रेस पक्षास स्वत:चे पुनरुज्जीवन करायचे असेल, तर त्यास नेतृत्वाबरोबर स्वत:च्या विचारधारेचेही पुनरुज्जीवन करावे लागेल. स्वत:च्या नेतृत्वावर त्या पक्षाचा विश्वास असेल नसेल, पण स्वत:च्या विचारधारेवर तो आहे याची जाणीव स्वत:स होऊन ती इतरांनाही करून देण्याचे आव्हान त्या पक्षासमोर आहे. ते पेलायचे असेल, तर आपले आख्यान (म्हणजे ‘नॅरेटिव्ह’) योग्यच आहे; ते सांगण्याची पद्धत कदाचित चुकली असेल असा विश्वास त्या पक्षाने आधी स्वत:त निर्माण करावा. पक्षाच्या पहिल्या फुटीचा सुवर्णमहोत्सव हे त्यासाठी योग्य निमित्त ठरते.