18 November 2017

News Flash

क्षमस्व, तात्याराव!

तात्याराव, शतश: क्षमस्व. परंतु आमच्या दृष्टीने तुम्ही म्हणजे आता ‘महापुरुष’ आहात..

लोकसत्ता टीम | Updated: April 22, 2017 3:43 AM

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

तात्याराव, शतश: क्षमस्व. परंतु आमच्या दृष्टीने तुम्ही म्हणजे आता महापुरुषआहात..

शेवटी आम्हालाही राजकारण आहे. हिंदूंची तर मोठीच काळजी आहे. त्यांचे संघटन करायचे तर तुमचा तो बुद्धिवाद कसा कामास येणार? तुमचा बुद्धिवाद, तुमचा राष्ट्रहितैषी उपयुक्ततावाद सोडला, की मग बाकी उरणारे तुम्ही आम्हाला व्यवस्थित मिरवताही येता..

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.. तुम्ही खरे तर आता आम्हांला कायमची क्षमाच करावयास हवी. तुम्हांला थेट ‘महापुरुष’च करून टाकले की आम्ही. असे कोणा थोर पुरुषांना महापुरुषाच्या श्रेणीत नेऊन बसविले की बरे असते. त्यांना प्रात:स्मरणीय ठरविता येते. त्यांच्या आरत्या गाता येतात. सत्तेत आपलीच माणसे असली, की हवे तिथे महापुरुषांचे नाव देता येते. अशा नामकरणाने म्हणे महापुरुषांच्या स्मृती कायम राहतात. राहतही असतील बापुडय़ा, आद्याक्षरांत बसतील तेवढय़ा. त्यांच्या नावाने संस्था काढणे हे तर मग आद्यकर्तव्यच ठरते आमचे. त्यातून तुम्ही तर भाषाप्रभू, विचारवंत, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर. पण तुम्ही पडलात हिंदुत्ववादी. त्यामुळे आजवर बरे वाचलात यातून खरे तर. कारण तुमचा हिंदुत्ववाद येथील बहुसंख्य हिंदुत्ववाद्यांनाही तसा झेपणारा नव्हताच. तो तुमच्या विरोधी मतांच्या सरकारांना कसा मानवणार? तेव्हा तुम्ही आजवर महापुरुष होता होता राहिलात. पण आता मनु पालटलाय, तात्याराव. हिंदुत्ववादी सरकार आलेय सत्तेवर. तेव्हा तुम्हाला ‘महापुरुष’ बनणे भागच होते. पण हे असे रूपांतर साधे नसते, सावरकर. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नसते असे म्हणतात. थोर पुरुषांना तर ते सोसावेच लागतात. पदोपदी. जिवंतपणी आणि त्याहून अधिक मेल्यानंतर. जिवंतपणी तुम्ही तर काळे पाणीही सोसले. टीका का कमी झाली तुमच्यावर? गांधीहत्या कटाचा आरोपही झाला तुमच्यावर. पण पुरून उरलात तुम्ही त्या सगळ्याला. आता तुम्ही नाही आहात आमच्यात. पण टाकीचे घाव हे सोसावेच लागतील. देवपण देतोय ना आम्ही तुम्हाला. कुणाचे असे दैवतीकरण करणे हा बाकी आमचा आवडता छंद. छान असते ना. डोळे झाकून पूजा करायची. श्रद्धा अपरंपार ठेवायची. बुद्धीचा संबंध येतोच कुठे मग त्यात? गांधी, आंबेडकर हे तुमचे वैचारिक विरोधक. त्यांचेही असेच केले आम्ही. आता तुमची पाळी..

परंतु हे आजच सुरू आहे असेही नाही. म्हणजे हेच पाहा ना. तुमचे नाव काढले की एकदम आठवतो तो तुमचा तो तुरुंगातील छळ, तुमचे ते सेल्युलर जेलच्या भिंतीवर कोळशाने कविता लिहिणे, तुमचे ते बॉम्बचे प्रयोग आणि ती गाजलेली उडी. त्या वेळी सावरकरांनी योगबलाने शरीराचे आकुंचन घडवून आणले असले पाहिजे अशा गोष्टी लिहून आम्ही तर तुम्हांला महायोगीच ठरविले. आणि एकदा का तुमची मूर्ती स्थापून पत्रंपुष्पंतोयं अर्पून पूजा करायची सोय लावून दिली की मग तत्त्वज्ञान, विचार अशा फुटकळ शीणकारक गोष्टींकडे छान डोळेझाक करता येते. तुमच्या त्या जाज्वल्य बुद्धिवादाचे, त्या राष्ट्रहितैषु उपयुक्ततावादाचे आम्ही हेच केले. करणे भागच होते. ते केले नसते, तर तुम्हाला पळवता कसे आले असते तुमच्यापासूनच? क्षमस्व, सावरकर, पण शेवटी आम्हालाही राजकारण आहे. हिंदूंची तर मोठीच काळजी आहे. त्यांचे संघटन करायचे तर तुमचा तो बुद्धिवाद कसा कामास येणार? तुम्ही व्रत-वैकल्यांना विरोध करता. तुम्हांला जातिभेद संपवायचा असतो. वेदान्त हे रिकामटेकडय़ांचे उद्योग असे तुम्ही मानता. कसे बसवायचे हे आमच्या साध्वी आणि योगींच्या हिंदू राष्ट्रात? राष्ट्राच्या बाबतीत लोकसंख्येचे गरजेनुसार नियोजन करावे, ही तुमची संततिनियमनाबाबतची भूमिका. आणि आम्हांस तर काळजी हिंदूंच्या संख्येची. हिंदू मातांना, अष्टपुत्राच नव्हे, तर दशपुत्रा भव असे म्हणून पुत्रजन्माचे कारखाने चालविण्याचा आशीर्वाद देणे भाग पडते आम्हास. त्यात तुमच्या विचारांचा विचार कसा करणार? तुम्ही भलेही सांगता, की केवळ आर्थिक दृष्टीनेच गाईंकडे पाहा. किती अभद्र बोलता हो तुम्ही या विषयावर. ‘खरोखर आज कुठे भागवतातील गोकुळ पृथ्वीवर नांदत असेल, तर तो गोमांसभक्षक असताही गाईस एक उपयुक्त पशू मानूनच काय ती तिची जोपासना करणाऱ्या गोपालक अमेरिकेत होय,’ हे तुम्ही म्हटले ते त्या काळी आणि तुम्ही हिंदुत्ववाद सांगत होता म्हणून ठीक. अन्यथा तुम्हांला पुन्हा एकदा काळ्या पाण्यावर जावे लागले असते. तसे तेव्हाही तुम्हांला आमच्या हिंदुत्ववादी नेत्यांनी काही सोडले नव्हते. बुद्धिवादासाठी गोहत्या क्षम्य मानण्याची मुर्दाड शिकवण देता कामा नये, असे तुम्हांला खडसावण्यात आले होतेच. आता तेव्हाही तुम्ही गाईला माता मानण्याला खुळचटपणा म्हणत असताना, हिंदूना खिजविण्यासाठी मुसलमानांनी गाई मारणे याला दुष्टपणाच म्हणत होता. ‘अन्नधान्याची, दाण्यागोटय़ाची नि चारापाण्याची टंचाई असताना निरुपयोगी, म्हाताऱ्या व भाकड गाईंचे खिल्लार आपण पोसावे हे मला कधीच मान्य होणार नाही,’ असेच सांगत होता. तुमच्या या अशा बुद्धिवादामुळेच सावरकर, तुम्ही तेव्हाही आम्हांला अप्रिय होता. संघ म्हणूनच तुमच्यापासून चार हात लांब राहत होता. आमच्या सनातनी धर्मपरिषदेने तर तेव्हा एका अधिवेशनात तुम्हांला ‘स्वेच्छाचारप्रवर्तक’ आणि ‘धर्मभावनाविघातक’ अशा  उपाध्याच दिल्या होत्या. आजही आम्ही या उपाध्यांचे सर्रास वाटप करीत असतो. या अशा बुद्धिवादाला विरोध तर करावाच लागणार ना, तात्याराव? अन्यथा आज संपूर्ण भारतात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अभयारण्य बनविण्याची गरज असताना, आम्ही गाईंसाठी राज्याराज्यांत अभयारण्य बनविण्याचा विचार तरी कसा करू शकणार? गोवंशहत्याबंदी हा आज आमच्या दृष्टीने राष्ट्रनिर्मितीचा कार्यक्रम आहे. त्यासाठी तुम्ही आम्हांला बैलोबा म्हटले तरी चालेल. आणि तसेही तुमच्या विचारांना विचारतो कोण?  कालपासून ठाण्यात सावरकर साहित्य संमेलन  सुरू झाले. तेथे तुमच्या विचारांचे प्रदर्शन केले जाईल, हे खरे. परंतु त्याने आमचे सावरकरप्रेम दिसेल हो. आणि तेवढेच पुरेसे आहे आम्हांस दाखविण्यासाठी. शिवाय तुमचा बुद्धिवाद, तुमचा उपयुक्ततावाद सोडला, की मग बाकी उरणारे तुम्ही आम्हाला व्यवस्थित मिरवताही येता. तुमचा तो सद्गुणविकृतीविरोध, ती गांधी-नेहरूंवरील टीका, ते मुस्लिमांबाबतचे कडक धोरण, शस्त्रसज्जतेबाबतचे विचार, ते हिंदुत्व हेच तर आज महत्त्वाचे. हा आमचा उपयुक्ततावाद म्हणा हवे तर. आता तुम्ही तर राष्ट्रधारणा करणारे साधन म्हणून कोणत्याही धर्माकडे पाहत नव्हता. ‘खरे राष्ट्रीयत्व तेच की जे हिंदू व मुसलमान असा भेदाभेद न करता सर्वाना सारखेच लेखते नि मानते,’ असे सांगत होता. आणि भारत हे हिंदुराष्ट्र आहे याचा अर्थ तुमच्या दृष्टीने एवढाच होता, की येथे हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून ते हिंदुराष्ट्र आहे. थोडक्यात तुम्ही बहुसंख्याकत्व हेच राष्ट्रीयत्व मानत होता. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर हे इतरांना मुसलमान नसण्याचा हक्क मागत होते. तुम्ही हिंदू असण्याचा हक्क मागत होता. एकाच नाण्याच्या दोन बाजू या. पण हे मान्य केले, तर याच्या पुढे हिंदू नसण्याचा हक्कही येतो हे विसरला तुम्ही. आम्ही ते कसे विसरू? तुम्ही ब्रिटिश लोकशाहीची तत्त्वे रुजवू पाहात होता. ‘कोणताही एखादा पक्ष सर्वस्वी बरोबर नि पूर्ण असणार नाही,’ असे सांगत मतभिन्नता मान्य करीत होता. आज विरोधी पक्षमुक्त भारताच्या धोरणात हे आम्हांला कसे बसवता येईल? पण अर्थातच तुमच्या या विचारांकडे लक्ष देतो कोण? दिले तर आम्ही म्हणूच, की सावरकर काय तुम्हांला एवढेच दिसतात काय?

तेव्हा क्षमस्व, तात्याराव, शतश: क्षमस्व. परंतु आमच्या दृष्टीने तुम्ही म्हणजे आता ‘महापुरुष’ आहात. एक पुतळा आहात. अनेकांतला एक पुतळा. असे पुतळे सत्तेसाठी आवश्यक असतात. स्वातंत्र्यवीर, आता तुम्हांला यापासून स्वातंत्र्य नाही!

First Published on April 22, 2017 3:43 am

Web Title: the history of vinayak damodar savarkar