12 December 2017

News Flash

पठडीबाहेरचा पूर्णविराम!

हेफ्नरने नियतकालिकांच्या दुनियेतील क्रांती घडविली..

लोकसत्ता टीम | Updated: September 30, 2017 6:56 AM

‘प्लेबॉय’ मासिकाचे कर्ते ह्य़ू हेफ्नर

अमेरिकेला परंपरागत विचारांपलीकडच्या सामाजिक विचारांची ओळख करून घेण्याची  इच्छा नव्हती, तेव्हा हेफ्नरने नियतकालिकांच्या दुनियेतील क्रांती घडविली..

‘आज मी जिथे आहे त्यापेक्षा जास्त आनंददायी आणि उत्तम जागा कुठे असू शकेल असे मला वाटत नाही!’.. आयुष्याचा अर्थ नेमका उमगण्याचे समाधान या वाक्याच्या प्रत्येक शब्दात पुरेपूर भरून राहिले आहे. पण हे केवळ एक वाक्य नाही. ते उच्चारण्याची उंची गाठण्याकरिता कराव्या लागणाऱ्या क्रांतीचे ते एका अर्थाने विजयचिन्ह आहे. तसे पाहिले तर क्रांतीचे वारे प्रत्येकाच्याच मनात असतात. घुसमटून राहिलेले ते वारे उसळी मारून बाहेर पडण्यासाठी आतुरलेलेदेखील असतात. पण त्यांना वाट करून देण्याची हिंमत प्रत्येक मनात असतेच असे नाही. जी मने ती हिंमत दाखवतात, तेथे क्रांती जन्म घेते. मनाच्या कोंडवाडय़ात राहून अस्वस्थ झालेल्या या वाऱ्यांना मोकळेपणा मिळताच ते धसमुसळ्यासारखे सर्वत्र धडका देऊ लागतात. परंपरांना कवटाळणारे विचार या वादळाच्या तडाख्यात सापडले की हेलकावे खाऊ लागतात, आणि एक खूप मोठा संघर्ष जन्म घेतो. या संघर्षांत हे वारे जिंकतात, तेव्हा क्रांतीचा उदय होतो. हा संघर्ष न पेलवल्याने पराभूत झालेले विचार क्रांतीचे मांडलिकत्व स्वीकारतात. बदल हा जिवंतपणाचा स्थायिभाव असतो हे खरे असले तरी हे बदलदेखील सहजपणे घडलेले नसतात, आणि सहजपणे स्वीकारलेही जात नाहीत. त्यासाठी होणाऱ्या संघर्षांत बदलाच्या वाऱ्यांचा विजय व्हावा लागतो. पराभूत होणारे वारे बदल घडवू शकत नाहीत. त्यामुळे, बदल घडविणे हे कमकुवत मनाच्या कोंडवाडय़ात लोळत पडणाऱ्या वाऱ्यांचे कामच नव्हे!. मग क्रांती घडवायची असेल, तर मनांचा कमकुवतपणा पुसणे गरजेचे होते. एकदा मने कणखर झाली, की क्रांती तर घडतेच, पण याच कणखर मनांवर स्वार होऊन ती चारही दिशा व्यापून उरते..

केवळ पाच डॉलरच्या पगारवाढीची मागणी नाकारल्यामुळे ह्य़ू हेफ्नर नावाच्या एका पत्रकाराच्या मनातील घुसमटलेल्या विचारांना क्रांतीच्या वाटा सापडल्या आणि ते वादळासारखे घोंघावत बाहेर पडले. पुढे काही वर्षांनंतर, जेव्हा, ‘प्लेबॉय’ नावाच्या आपल्या क्रांतीने जग जिंकले आहे अशी त्याची खात्री झाली, तेव्हा समाधानाच्या आणि आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून त्याने जगाकडे पाहिले.. सारे जग आपल्याला मानाचा मुजरा करत आहे, आपल्या अद्वितीय यशाचे पोवाडे गात आहे हे त्याला जाणवले, त्याने तो मनापासून सुखावला, तेव्हा त्याच्या तोंडून सहजपणे हे वाक्य उच्चारले गेले.. ‘आज मी जिथे आहे त्यापेक्षा आनंददायी आणि समाधानाची जागा दुसरी कोणतीच असू शकत नाही!’ हे वाक्य कोणासही उच्चारता येईल, पण त्या जागी बसल्यावर हे वाक्य उच्चारण्यातला आनंद, केवळ ह्य़ू हेफ्नरसारख्या मोजक्यांनाच अनुभवता येतो. म्हणून हा माणूस क्रांतिकारी ठरला!

आजपासून ६४ वर्षांपूर्वी, जेव्हा अमेरिकेला परंपरागत विचारांपलीकडच्या सामाजिक विचारांची ओळख करून घेण्याची फारशी इच्छा नव्हती, तेव्हा ह्य़ू हेफ्नरने नियतकालिकांच्या दुनियेतील क्रांती घडविली आणि मनामनांनी कवटाळलेल्या परंपरागत विचारांना धडका देत त्यांची जागाही बळकावली. हा संघर्ष कदाचित तेव्हा फार सोपा नसेलही, पण हेफ्नरच्या प्लेबॉयनेही तो सहज जिंकला. कधी कधी, समाजमनातही काही अस्वस्थ विचारांचे वारे बाहेर पडण्यासाठी उतावीळ झालेले असतात. ते आतल्या आत धडका देत असतात आणि तेथेच चिकटून राहण्याचा हट्ट धरलेल्या विचारांशी त्यांचाही आतल्या आत संघर्ष सुरू असतो. या संघर्षांची असंख्य आवर्तने झाली, की चिकटून राहण्याचा हट्ट धरणाऱ्या विचारांची पकड हळूहळू ढिली होऊ लागते. ते कमकुवत होऊ लागतात. अशा वेळी आतमध्ये संघर्ष करणाऱ्या विचारांना बाहेरून कोणती तरी अनोळखी कुमक मिळते आणि त्या संघर्षशील विचारांना बळ प्राप्त होते. मग विजय सोपा होतो. हेफ्नरच्या प्लेबॉयने नेमकी हीच वेळ साधली असावी. त्यामुळे त्याचा विजयाचा संघर्ष सोपा झाला आणि मनामनातून हुसकल्या गेलेल्या जुनाट विचारांची मोकळी जागा प्लेबॉयने सहज व्यापून टाकली.. म्हणून प्लेबॉय ही केवळ नियतकालिकांच्या दुनियेतीलच नव्हे, तर अमेरिकेच्या विचारविश्वातील घुसमट संपविणारी एक क्रांती ठरली. हेफ्नरच्या प्लेबॉयने घडविलेली क्रांती अमेरिकेत स्थिरावण्यात सात-आठ वर्षे जावी लागली. पण केवळ तेवढय़ा काळात प्लेबॉयने आपले काहीसे वादग्रस्त, तरीही जगाला हादरवून सोडणारे आंतरराष्ट्रीय साम्राज्य प्रस्थापित केले होते. विद्यार्थी समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर त्याने शाळेचे वृत्तपत्र सुरू केले, तेव्हाच आपल्या अंगीच्या पत्रकारितेच्या सुप्तगुणांचा साक्षात्कार त्याला झाला होता. १९४६ मध्ये त्याने मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि लैंगिकतेच्या मानसिकतेवर संशोधन केले. शिकागोमधल्या ‘एस्क्वायर’ नावाच्या एका प्रतिष्ठित नियतकालिकात त्याला कॉपीरायटरची नोकरीही मिळाली. तेथेच काही काळानंतर त्याने मागितलेली पाच डॉलरची पगारवाढ नाकारली गेल्याने त्याने नोकरीला रामराम करून, डोक्यातले क्रांतीच्या विचारांचे वारे सोबत घेऊन न्यूयॉर्क गाठले आणि आठ हजार डॉलरची जमवाजमव करून ‘प्लेबॉय’ नावाच्या मासिकाला जन्म दिला.. १९५०-६० च्या दशकात,  हॉलीवूडपटांनीही सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या, तेव्हा, डिसेंबर १९५३ मध्ये प्लेबॉयच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर, अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या मेरिलीन मन्रोचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र प्रसिद्ध करून हेफ्नरने  वादळ माजविले. या वादळाने परंपरांना कवटाळणाऱ्या विचारांना धडका देण्यास सुरुवात केली, त्या विचारांची कुंपणे खिळखिळी केली आणि अखेर या संघर्षांत विजय मिळवला. प्लेबॉयच्या पहिल्याच अंकाच्या तब्बल ५० हजार प्रती हातोहात संपल्या. या धाडसाला मिळालेली आणि दिवसागणिक वाढत गेलेली अपार लोकप्रियता हे या विजयाचे फलित.. म्हणूनच, या विजयाच्या शिखरावरून त्याने काढलेले ते उद्गार त्याला शोभून दिसतात!

सवंग लोकप्रियतेची शिखरे डळमळीत असतात, त्यावरचे आसन स्थिर नसते, हे ओळखण्याएवढे शहाणपण असलेले शाश्वतरीत्या यशस्वी ठरतात. केवळ लैंगिकतेची भूक भागविणारे नियतकालिक आणून व्यवसायाचा बाजार मांडणे योग्य नाही याचीही त्याला जाणीव होती. म्हणूनच, प्लेबॉयच्या पानांवर जीवनशैली, कला, राजकारण, साहित्य, विज्ञान आणि मानवी हक्कांच्या लढय़ांनाही तेवढेच वजनदार स्थान मिळाले. तेथेही त्याने परिणामांचा विचार न करता परखडपणा दाखविला. वर्णद्वेषाविरुद्ध सशस्त्र लढा देणारा माल्कम एक्स आणि अहिंसात्मक लढाई करणारा मार्टिन ल्यूथर किंग यांच्या विचारांना प्लेबॉयच्या पानांवर स्थान मिळाले. फिडेल कॅस्ट्रोपासून जॉन लेनपर्यंत साऱ्या नेत्यांनी प्लेबॉयकडे आपले मन मोकळे केले.. नग्न, अर्धनग्न स्त्रियांच्या छायाचित्रांची मुखपृष्ठे असलेल्या या नियतकालिकातूनच ‘प्लेबॉय फिलॉसॉफी’ नावाचा हेफ्नरचा एक नवा ‘विचारपंथ’ अमेरिकेत उदयालाही आला . हेफ्नरचे प्लेबॉय क्लब्ज, त्याच्या हॉटेलमधील आतिथ्यशील प्लेबॉय बनीज, ही एका क्रांतीची ओळख बनली.

म्हणून, प्लेबॉय ही केवळ एका नियतकालिकाच्या जन्माची आणि हेफ्नर नावाच्या त्याच्या जन्मदात्याची कहाणी राहात नाही. ती जिद्दीची, धाडसाची, संघर्षांची आणि विजयाची कहाणी ठरते. हेफ्नर हा त्या कहाणीचा नायक असल्याने त्या कहाणीची विजयकथा ही हेफ्नरचीच कथा असते. असंख्य कथा, उपकथा आणि आख्यायिकांचाही नायक बनलेल्या हेफ्नरचे चरित्र एका चौकटीत मावणारे नाही. या चरित्राचे अखेरचे पान दोन दिवसांपूर्वी मिटले. ज्या मेरिलिन मन्रोने प्लेबॉयला पहिल्याच दिवसात अमाप यश दिले, तिच्याच थडग्याच्या बाजूला हेफ्नर नावाची एक धाडसकथा विसावली आहे. कधी कॅलिफोर्नियात जाणे झाले, तर हेफ्नर नावाच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी तेथे जायला विसरू नका. कारण जग जवळ आणण्यात त्याचा मोठा वाटा आहे..

First Published on September 30, 2017 5:11 am

Web Title: the success story of playboy founder hugh hefner