ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्याशी थेरेसा मे यांची तुलना होत असली तरी यापुढे त्या दोघींत साम्य आढळण्याचीच शक्यता अधिक..

पंतप्रधान कॅमेरून यांच्याप्रमाणेच थेरेसा यादेखील ब्रिटनने युरोपीय संघातच राहावे याच मताच्या होत्या. त्याच मुद्दय़ावर त्यांनी ब्रेग्झिट प्रचारात हिरिरीने भाग घेतला. परंतु आता मात्र त्या कडव्या युरोपीय घटस्फोटवादी बनल्या आहेत.

ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर शोभा झाल्याने ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. तो बुधवारी प्रत्यक्षात येईल आणि त्यांच्या राजीनाम्याने रिकाम्या होणाऱ्या पंतप्रधानपदी थेरेसा मे या आसनस्थ होतील. संपूर्ण युरोप खंडाच्या अखंडतेच्या मुद्दय़ावर झालेले हे पहिले सत्तांतर. ते ब्रिटनसंपूर्ण युरोप खंडाच्या अखंडतेच्या मुद्दय़ावर झालेले हे पहिले सत्तांतर.मध्ये घडले कारण त्या देशाच्या पंतप्रधानांनी एका राजकीय अजागळक्षणी युरोपीय संघात राहावे की बाहेर पडावे हा निर्णय जनमताने घेण्याचे ठरवले. स्वत: युरोप संघात राहावे या मताचे असताना पंतप्रधान कॅमेरून यांच्यावर युरोपीय संघातून बाहेर पडावे या जनमताच्या वास्तवास तोंड द्यायची वेळ आली. तेव्हा राजीनामा जाहीर करण्याखेरीज कॅमेरून यांच्यासमोर काहीही पर्याय राहिला नाही. त्यांनी तशी घोषणा केल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड सुरू झाली. या पदाच्या दावेदारांत दोन्ही महिला होत्या. दोघीही कॅमेरून यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्य. ऊर्जामंत्री आंद्रिया लिड्सॉम आणि गृहमंत्री थेरेसा मे. दोघींतही हुजूर पक्षाच्या सदस्यांकडून जास्तीतजास्त पाठिंबा मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. गत सप्ताहात या स्पर्धेत आंद्रिया एकदम मागे फेकल्या गेल्या. कारण त्यांनी थेरेसा यांच्याविषयी काढलेले अनुचित उद्गार. थेरेसा यांच्यापेक्षा ब्रिटिश पंतप्रधानपदासाठी मीच जास्त लायक आहे कारण थेरेसा यांना मातृत्वाचा अनुभव नाही, असे अत्यंत अशोभनीय विधान आंद्रिया यांनी केले आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ती अर्थातच रास्त होती. त्यातून आंद्रिया पंतप्रधानपदी बसण्याच्या योग्यतेच्या नाहीत असा समज झाला. समाजमन इतके विरोधात गेल्यावर त्यांचा पक्ष आंद्रिया यांच्या मागे उभा राहण्याची शक्यता नव्हती. तसेच झाले आणि आंद्रिया स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेल्या. आता बुधवारपासून थेरेसा मे १० डाउनिंग स्ट्रीट पत्त्यावरील या जगद्विख्यात निवासस्थानाच्या रहिवासी होतील. त्या घरात पाऊल टाकणाऱ्या त्या दुसऱ्या महिला पंतप्रधान. पहिलेपणाचा मान मार्गारेट थॅचर यांच्याकडे जातो.

त्याचमुळे या पुढील काळात मे यांना थॅचर यांच्याबरोबर होणाऱ्या अपरिहार्य तुलनेस तोंड द्यावे लागेल. पंतप्रधानपदी आरूढ व्हायच्या आधीच अशी तुलना सुरू झाली असून या दोघींतील बलस्थाने आणि अन्य साम्यस्थळे माध्यमांतील चर्चेचा विषय ठरली आहेत. यातील पहिली बाब म्हणजे थॅचर आणि मे या दोघीही हुजूर पक्षाच्या. दोघांचीही पाश्र्वभूमी मध्यमवर्गीय. मार्गारेट यांचे वडील किराणा व्यापारी तर थेरेसा यांचे चर्चचे पदाधिकारी. यातील आणखी एक योगायोग असा की थेरेसा यांच्याप्रमाणे मार्गारेट यांचे वडीलही स्थानिक चर्चशी बांधले गेलेले स्वयंसेवक होते. फरक इतकाच की थेरेसा यांचे वडील चर्चचे पदाधिकारी होते तर मार्गारेट यांचे वडील कार्यकर्ते. या पाश्र्वभूमीमुळे थेरेसा यांचे बालपण अत्यंत जागरूक मूल्यसंस्कारात गेले आणि त्यामुळे चांगल्या-वाईटाचा एक अंगभूत समज त्यांच्यात निर्माण झाला. तो आजही कायम आहे. गेली ३० वर्षे राजकारणात असूनही वातावरण, प्रचलित समज/गैरसमज आदींना बळी न पडता थेरेसा या स्वत:च्या बऱ्यावाईटाच्या चष्म्यातून आसमंताकडे पाहतात. त्याबद्दल त्यांना तीव्र टीकाही सहन करावी लागली आहे. परंतु तरीही थेरेसा यांच्या वर्तनात आणि कार्यशैलीत बदल झालेला नाही. लोकप्रिय परिभाषेत यास आडमुठेपणा असे म्हणतात. थॅचर यादेखील याच गुणासाठी विख्यात होत्या. थॅचर यांचे शिक्षण रसायनशास्त्राचे तर थेरेसा भूगोलाच्या पदवीधर. दोघीही लब्धप्रतिष्ठितांच्या सहभागासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या स्नातक. दोघींचेही अनेक सहाध्यायी राजकारणात आले आणि पुढे दोघींनाही पंतप्रधानपदी आसनस्थ होण्याची संधी मिळाली. आणखी एक विलक्षण साधम्र्याचा मुद्दा म्हणजे युरोपीय संघाच्या मुद्दय़ावर दोघींच्या भूमिका. थॅचर यांच्या राजकीय कारकीर्दीस उतरण लागली, कारण युरोपीय सामायिक चलनात ब्रिटनने सहभागी होऊ नये म्हणून. थॅचर यांना या सामायिक चलनाची कल्पना मान्य होती. परंतु ठाम वेळापत्रकास त्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांचे उपपंतप्रधान जेफ्री होव यांनी पंतप्रधान थॅचर यांच्याविरोधात तोफ डागत राजीनामा जाहीर केला आणि दुसऱ्या दिवशी थॅचर यांच्या हुजूर पक्षाचे मायकेल हॅझलटाइन यांनी थॅचर यांच्या नेतृत्वास आव्हान दिले. त्यातून थॅचर यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली आणि त्यांचे अर्थमंत्री जॉन मेजर हे पंतप्रधान झाले. अशाच पण बरोबर उलट परिस्थितीत पंतप्रधानपदाची माळ आता थेरेसा मे यांच्या गळ्यात पडणार आहे.

आता यापुढे हे साम्य कितपत राहते हा औत्सुक्याचा विषय असेल. ते साम्य न आढळण्याचीच शक्यता तूर्त तरी अधिक दिसते. याचे कारण थेरेसा यांनी आपल्या राजकीय भूमिकांत केलेला बदल. पंतप्रधान कॅमेरून यांच्याप्रमाणेच थेरेसा यादेखील ब्रिटनने युरोपीय संघातच राहावे याच मताच्या होत्या. त्याच मुद्दय़ावर त्यांनी ब्रेग्झिट प्रचारात हिरिरीने भाग घेतला. परंतु आता मात्र त्या कडव्या युरोपीय घटस्फोटवादी बनल्या आहेत. ब्रेग्झिट इज अ ब्रेग्झिट असे उद्गार त्यांनी अलीकडेच काढले आणि कोणत्याही प्रकारे या मुद्दय़ावर फेरजनमत घेण्याची वा घेण्यात आलेल्या जनमतावर फेरविचाराची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. या आधी सुरुवातीच्या काळात त्या ब्रिटनमधून स्थलांतरितांना मायदेशी पाठवून द्यायला हवे या मताच्या होत्या. त्याबाबत त्या इतक्या आग्रही होत्या की त्यांनी खास रवानगी वाहने- गो होम व्हॅन्स- बनवून घेतल्या. कल्पना ही की या वाहनांनी नियमबाह्य निर्वासितांना हुडकून काढून त्यांची मायदेशी रवानगी करावी. ही अशी वाहने हा त्याही वेळी टिंगलीचा विषय होता आणि आता पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यावर त्यास समाजमाध्यमे आदींतून उजाळा दिला जात आहे. त्या वेळी या मोहिमेतून फक्त ११ निर्वासित परत पाठवले गेले. परंतु या मोहिमेमुळे झालेले नुकसान हे अधिक मोठे होते. अलीकडे गृहमंत्री या नात्याने त्यांनी स्थलांतरितांच्या जोडीदारास ब्रिटनमध्ये येण्याची अनुमती देण्यासाठी किमान वेतनाची अट घातली. म्हणजे ब्रिटनमध्ये स्थलांतरित होणाऱ्याची पत्नी वा पतीचे वेतन निर्धारित रकमेपेक्षा कमी असेल तर त्यास स्थलांतराची परवानगी नाकारली जाऊ लागली. या निर्णयामुळेही थेरेसा यांच्यावर टीकेची झोड उठली. परंतु त्या बधल्या नाहीत. सध्या या मुद्दय़ावर आता न्यायालयीन लढाई लढली जात असून सर्वोच्च न्यायालयात त्यावर निकाल लागणे अपेक्षित आहे. शिक्षणशुल्काच्या मुद्दय़ावरही त्यांचा भूमिकाबदल हा टीकेचा धनी ठरला होता. सत्तेत नव्हत्या त्या वेळी थेरेसा यांचे मत विद्यापीठ पातळीवर शुल्कवाढ करण्याविरोधात होते. परंतु मंत्री झाल्यावर त्यात बदल झाला आणि शुल्कवाढ व्हायला हवी असे त्या म्हणू लागल्या. समलिंगी संबंधांबाबतही काळाच्या ओघात त्यांच्या भूमिकेत बदल झाला. चर्चच्या पाश्र्वभूमीमुळे असेल परंतु त्यांचा अशा संबंधांस आणि अर्थातच विवाहास विरोध होता. अलीकडे काही वर्षे मात्र त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि एकमेकांचे एकमेकांवर प्रेम असेल तर त्यांच्या एकत्र येण्यास केवळ ते समलिंगी आहेत म्हणून विरोधाचे काही कारण नाही, असे त्या म्हणू लागल्या. हे झाले तुलनेने सोप्या मुद्दय़ांबाबत.

युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय आणि त्याची प्रतिक्रिया ही इतकी सोपी नाही. कायदेशीर कज्जेखटले, लिस्बन कराराचा वेढा आणि संभाव्य आर्थिक परिणाम या साऱ्यातून थेरेसा मे यांना ब्रिटनचे नेतृत्व करावयाचे आहे. त्यांच्या निर्णयाचे परिणाम फक्त ब्रिटनपुरतेच मर्यादित राहणार नाहीत. ते जागतिक असतील. तेव्हा ही नवी ‘मे’लडी कोणती सुरावट घेऊन येते याकडे साऱ्या जगाचे लक्ष असेल.