वाघ स्वत:ला शहाणेच समजतात.. त्यामुळे मारले जातात हे असे..

विदर्भातील जंगलांत अवघ्या ४८ तासांत सहा वाघांचे मरण ओढवले यात आश्चर्य ते काय? यातील काही वाघ तर या पृथ्वीतलावर येऊन काही तासदेखील उलटले नव्हते. आल्या पावली बछडावस्थेतच त्यांना परत जावे लागले. त्यांच्या आईच्या प्रसववेदनाच शहाण्यासुरत्या, मेंदू प्रगतावस्थेत असल्याचा दावा करणाऱ्या माणसास कळल्या नाहीत. स्वत:कडे केवळ अक्कल या नावाचे तकलादू अस्त्र असलेल्या या बहुप्रसवा मानवास वाघाच्या अपत्यास कसे जन्मास घालावयाचे याची मात्र अक्कल नव्हती. हे वाघ परत जंगलातील. या मानवप्राण्यांस पिंजऱ्यातील प्राण्यांच्या प्रसूतीची सवय. जंगलातील प्राण्यांचे बाळंतपण काही त्यास ठाऊक नव्हते. आणि त्यात आपणास जे समजत नाही तेच करावयाचा सांप्रत काळ. त्यामुळेही असेल या मानवाने वाघिणीच्या प्रसवप्रक्रियेची काही माहिती घेतली नाही. काही हडेलहप्पी केली असावी त्याने. त्यामुळे जन्मल्या-जन्मल्या या वाघिणीचे तीन गोंडस बछडे प्राण सोडते झाले. कदाचित इतक्या अज्ञानी माणसांच्या हातून जन्म घेण्यापेक्षा मेलेलेच बरे असाही विचार त्या बछडय़ांनी केला असावा. किंवा जगून तरी काय करा, आज ना उद्या हा नतद्रष्ट माणूस आपल्या पाणवठय़ाच्या वाटेवर खिळे-काटे पसरून ती लहान करणार आणि हळूहळू आपल्याला सापळ्यात पकडून मारणारच. तेव्हा उद्या मरायचे ते आज मेलेले बरे, असेही या शहाण्या प्राण्यास वाटले असावे. किंवा कदाचित उद्या जंगलात आपल्या हातून पोटासाठी गाय वा बछडय़ाची हत्या झाली तर गोवंशाची हत्या केली म्हणून शिक्षाही व्हायची भीती. तेव्हा नकोच ते पृथ्वीतलावर राहणे असा सुज्ञ विचार या बछडय़ांनी केला असावा. ते गेलेच. त्यांना कळले असावे की या भूमीवर वाघांचे काही खरे नाही?

वाघपणात एक मिजास असते. डौल असतो. तो त्याच्या जसा ताकदीतून येतो, तसाच तो त्याच्या ही ताकद कोठे कधी वापरावी या अकलेतूनही येतो. त्यामुळे गरजच लागत नाही तोपर्यंत वाघ कधी आपल्या ताकदीचे, दंडबेटकुळ्यांचे दर्शन घडवीत हिंडत नाही. त्याचे वाघपण त्याला मिरवावे लागत नाही की छातीचा आकार सांगावा लागत नाही. बस्. तो वाघ असतो. माणसाचे तसे नसते. त्याच्याकडे मुळात ताकदच नाही. तेव्हा छाती फुगवून फुगवून तो फुगवणार तरी किती? मग तो मूठभर आकाराच्या डोक्याचा आधार घेतो आणि स्वत:च्या कमकुवतीला कपटाची जोड देतो. त्या कपटाला तो शस्त्रेअस्त्रे जोडतो, गटातटांनी, बहुमतांनी बांधतो आणि जे एकेकटय़ाला जमले नसते ते काम तो समूहाच्या आधाराने करून टाकतो. म्हणजे वाघांना मारणे. तेव्हा या भूमीवर वाघांचे काही खरे नाही.

कारण माणसाला वाघ आवडत नाहीत. ते कळप करून राहत नाहीत. आपल्याच डौलात असतात. दिसतात राजस. अंगािपडाने मजबूत असतात आणि बुद्धीनेही चपळ. सकाळच्या सोनेरी उन्हात पाहिले तर ते सोन्यातूनच घडवल्यासारखे दिसतात. गोल चेहरा, भेदक डोळे, प्रमाणबद्ध शरीर. किती डौल असतो त्यांच्या वागण्यात. आणि या विरुद्ध तो माणूस. काटकुळा, पोटाळलेला, जाडाभरडा, आवाजात सातत्य नाही, कसले रूप नाही की काही नाही. अशा वेळी या माणसांना वाघ कसा आवडणार? आणि तसे पाहायला गेल्यास वाघांचा काही उपयोगही नाही. कळपच करीत नसल्याने त्यांची उपयुक्तता माणसांच्या जगात काही नाही. या अशा एकटय़ादुकटय़ांचा काय उपयोग समाजाला? आणि परत या असल्या एकटय़ादुकटय़ांपासून आणखी एक संकट असते. हे असे एकटेदुकटे, कोणत्याच कळपात न जाणारे विचार वगैरे करतात. खरे तर काय गरज आहे या असल्या विचारा बिचाराची. कळपाचा नेता जे काही सांगतो ते निमूटपणे ऐकण्यात किती आनंद, स्वास्थ्य आणि सुरक्षितता असते, ते या एकटे एकटे राहायची सवय झालेल्या वाघांना कळणार तरी कसे? बरे वाघ एकवेळ नुसतेच विचार करणारे असते तरी चालले असते. पण नाही. ते विचार करतात ते करतात आणि वर तो व्यक्तही करतात. काय गरज असते हे असे व्यक्त होण्याची? यातले काही तर अतिशहाणे. ते आणखी पुढे जातात. विचार करतात, व्यक्त करतात आणि दुसऱ्यांच्या विचाराला चूक ठरवतात. तेव्हा किती सहन करायचे हे कळपात राहणाऱ्यांनी? कळपाला कमी लेखणाऱ्यांना शिक्षा ही मिळायलाच हवी. म्हणून या वाघांचे काही खरे नाही!

शिवाय कळपात राहिल्याने आणखी एक भले होत असते. हा कळप विरुद्ध तो कळप अशा संघर्षांत आपला कळप जिंकला तर त्याचे किती तरी फायदे मिळतात. अशा जिंकलेल्या कळपाचा प्रमुख कळपातल्या सदस्यांना किती सवलती देतो. त्यांची काळजी घेतो. आता त्या बदल्यात त्या कळपाचा जयजयकार तेवढा करायचा. काय गैर आहे त्यात? कोणी तरी आपल्यातला ओरडतो.. अमुक तमुक की..  ते ऐकलं की आपण जय म्हणून ओरडायचं. किती सोप्पं काम! पण आपण हे करणार नाही ही वाघांची मिजास. का करायचे असे हा त्यांचा प्रश्न. पण मंदिराच्या सावलीच्या सुखासाठी साक्षात परमेश्वरालाही थोडी तडजोड करावी लागतेच ना. आणि आपण तर साधे जीव. या असल्या तडजोडींचा कशाला बाळगायचा कमीपणा? पण हे वाघ स्वत:ला शहाणेच समजतात. त्यामुळे मारले जातात हे असे. तेव्हा या भूमीत वाघांचे काही खरे नाही.

परंतु ते तसे कधीच नव्हते. पशू-पक्ष्यांवर प्रेम करा वगैरे केवळ सांगावयाच्या गोष्टी. त्या केवळ बालपणी वाचायच्या वा कोणी सांगितल्या तर ऐकायच्या (आताशा अशा गावंढळ मराठी गोष्टी कोण सांगतो म्हणा. हल्ली ते डोरेमॉन वगैरे चालतात.). आणि मोठे झाल्यावर त्या विसरून जायच्या. कारण तोपर्यंत एक वैश्विक सत्य आपल्याला ज्ञात झालेले असते. ते म्हणजे आपण सोडून प्रेम कधीही कोणावरही करायचेच नसते. करायचे ते नाटक. प्रेमाचे. पण ते करताना आपले खरे प्रेम फक्त आपल्यावरच आहे हे कधीही विसरायचे नाही. आणि चुकून कधी याचा विसर पडलाच तर कळपातले अन्य सदस्य आठवण करून द्यायला असतात ना. आता वाघ कळपात राहिलेच नाहीत तर हे त्यांना कळणार तरी कसे? या पृथ्वीतलावर बहुमत आहे ते कळपवाल्यांचे. आणि ज्याचे बहुमत असेल त्याचे राज्य असा कायदाही आहे येथे. एखाद्यास अमुकतमुक आवडत नसेल परंतु ते बहुमतास आवडत असेल तर ते त्या एखाद्याने आवडून घ्यायला हवे. तसेच या एखाद्यास एखादी बाब वर्ज्य असेल आणि बहुमतास ती तशी नसेल तर या एखाद्याने बहुमताचा आदर करावयास हवा. नाही केला, तर शिक्षा आहेच. ही अशी शिक्षा भोगत असल्यानेच पृथ्वीवर या वाघांचे काही खरे नाही.

खरे तर वाघ हे फक्त निमित्त आहे. कळपधार्जिण्या माणसाचा खरा विरोध आहे तो या वाघपणास. त्याचा प्रयत्न आहे तो पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवजंतूतील हे वाघपण नष्ट व्हायला हवे. मग ते कोणत्याही प्राण्यांत असो. द्विपाद वा चतुष्पाद. एकदा का वाघपणास तिलांजली दिली की आसपासची व्यवस्था अशांस आपले म्हणते. पण वाघांना हे तूर्त तरी मान्य नाही. म्हणूनच वाघ हे मान्य करीत नाहीत तोपर्यंत ते असेच मरणार. म्हणून या वाघांचे काही खरे नाही!