पोलिसांवरील हल्ले हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा चिरीमिरी प्रश्न न मानता त्याकडे वाढत्या सामाजिक अनारोग्याचे लक्षण म्हणून पाहिले पाहिजे.

गुन्हेगार नसलेली माणसेही किरकोळ कारणावरून जेव्हा पोलिसांवर हल्ले करतात तेव्हा मात्र अशा घटना पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत असतात. या प्रश्नचिन्हाला कारणीभूत आपली राजकीय व सामाजिक व्यवस्था आहे हे नीट लक्षात घेतले पाहिजे.

पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या मृत्यूने अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे केले असून, त्यांचा थेट संबंध सामाजिक सुव्यवस्थेशी आहे. आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम करणारे जे अनेक घटक असतात त्यांत सामाजिक सुव्यवस्थेचा मोठा वाटा असतो. म्हणूनच त्याविषयीचे प्रश्न हे जगण्या-मरण्याचे समजून ते नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. विलास शिंदे हे वाहतूक पोलीस होते. आपले कर्तव्य बजावत असताना, म्हणजे शिरस्त्राण न घालता दुचाकी चालवीत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला त्यांनी हटकले, म्हणून त्यांच्यावर त्या मुलाच्या भावाने हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर घाव घातले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यास हत्याच म्हणावे लागेल. ही अत्यंत वेदनादायी अशी घटना असून, त्याबद्दल समाजातील सर्व स्तरांतून शोकसंताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेकरिता सरकारला जबाबदार धरण्यात येत आहे व त्यातून साधता येईल तेवढे राजकारण साधण्याची प्रत्येक पक्षाची धडपड आता सुरू झाली आहे. याचे कारण मुंबई पालिकेची आगामी निवडणूक. त्यात आपल्या हाताला अधिक काही लागावे याकरिता विलास शिंदे मृत्यू प्रकरणानिमित्ताने धार्मिक भावना भडकावण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे दिसत आहे. यास शुद्ध मराठीत टाळूवरचे लोणी खाणे असे म्हणतात. येत्या काही दिवसांत त्या लोण्याच्या हंडय़ा फोडण्याची स्पर्धा रंगात येईल यात शंका नाही. अशा गोष्टींमधून शिंदे यांच्या मृत्यूने निर्माण झालेले प्रश्न मात्र दुर्लक्षित राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. या प्रश्नाची एक बाजू ही कायदा आणि सुव्यवस्थेची आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे, असा एक सूर दिसतो. त्यात कितपत तथ्य आहे ते आकडेवारीनिशी तपासता येईल व आकडय़ांचे अर्थ काढून त्यावर वादही घालता येईल. परंतु पोलिसांवर हल्ले होतात याचे कारण त्यांचा वचक कमी झाला, दरारा संपला, अशीच समाजमनातील भावना आहे आणि जेथे पोलीसच असुरक्षित आहेत तेथे सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित असणार अशी लोकांच्या मनातील भयशंका आहे. गुन्हे घटल्याच्या आकडेवारीने ती दूर होणारी नाही. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून ही बाब गृहखात्याने हाताळणे गरजेचे आहे. परंतु समस्या एवढय़ापुरतीच मर्यादित नाही.

पोलिसांचा दरारा संपला असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे लक्षात घेतले पाहिजे. साधा पोलीस हा आपल्या व्यवस्थेत नेहमीच टिंगलटवाळीचा विषय राहिलेला आहे. राज्य सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर सध्या जो अंतर्गत सुरक्षा कायदा आहे, त्याच्या मसुद्यात पोलिसांचे सोंग काढणे हा गुन्हा ठरविला आहे तो त्यामुळेच. परंतु हे आजचेच आहे असे नाही. पूर्वीही पोलिसांच्या पाठीमागे त्यांची टिंगल केली जात असे. पोलिसांना पांडू हवालदार म्हणून हिणविले जात असे. पण तेव्हा त्या पांडू हवालदाराच्या हातातील दंडुक्याचा भीतीयुक्त दरारा गुंडांच्या, समाजकंटकांच्या मनात असे. आज हातात बंदूक असलेल्या पोलिसांचा आदर, वचक वाटेनासा झाला आहे. मुंबईत आझाद मैदानात रझा अकादमीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये पोलिसांवर हल्ले करण्यात आले, महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला. मध्यंतरी ठाण्यामध्ये एका उद्दाम राजकीय कार्यकर्त्यांने एका महिला पोलिसास भररस्त्यात मारहाण केली. विलास शिंदे यांना अशाच एका हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे आणि त्याकरिता कोणत्याही नागरिकावर कारवाई करण्याची शक्ती ज्यांच्या हाती आहे अशा पोलिसांवर आपण हात टाकू शकतो असे कोणालाही वाटू लागले आहे याचीच ही काही उदाहरणे. त्याबद्दलच्या बातम्या संतापजनक खऱ्या, परंतु जोवर या घटनांची जबाबदारी निश्चित होत नाही, तोवर असा संताप हा वांझच ठरणार आहे. येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे स्वरूप. पोलिसांवर गुंड हल्ले करतात. मात्र असे हल्ले होतात म्हणून पोलिसांबद्दलचा आदर कमी झाला आहे असे कोणी म्हणणार नाही. त्यांच्यावर एरवी सराईत गुन्हेगार नसलेली माणसेही किरकोळ कारणावरून जेव्हा हल्ले करतात तेव्हा मात्र अशा घटना पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत असतात. या प्रश्नचिन्हाला कारणीभूत आपली राजकीय व सामाजिक व्यवस्था आहे हे नीट लक्षात घेतले पाहिजे. या व्यवस्थेत पोलिसांना आपले बटीक मानणारे राजकारणी जसे येतात, तसेच चिरीमिरीसाठी प्रत्येकापुढे हात पुढे करणारे पोलीसही येतात. पोलिसांबाबतचा आदर नाहीसा होण्याचे सर्वात मोठे कारण हे पोलीस दलात फोफावलेली चिरीमिरी संस्कृती हे आहे. पोलिसांना पगार कमी असतात, म्हणून ते लाच खातात असे म्हणणे म्हणजे नैतिकता ही भरल्या पोटाने बाळगण्याचा हौसेचा मामला आहे असे मानण्यासारखे झाले. पोलीस दलातील भ्रष्ट प्रवृत्ती या तर राजकारण्यांच्या फायद्याच्याच असतात. तेव्हा त्यांचे व्यवस्थित साटेलोटे चाललेले असते आणि त्यातून सर्वच पोलिसांच्या प्रतिमेवर परिणाम होत असतो.

पण पोलीस चिरिमिरी खातात, भ्रष्टाचार करतात, निरपराधांना छळतात म्हणून त्यांची ‘इज्जत’ राहिलेली नाही आणि म्हणून त्यांच्यावर हल्ले केले जातात असे म्हणणे हे या प्रश्नाचे अतिसुलभीकरण झाले, हेही ध्यानी घेतले पाहिजे. नाकाबंदीदरम्यान एखाद्या वाहतूक पोलिसाने गाडी अडवताच, ती सरळ त्याच्या अंगावर घालणे हा केवळ पोलिसांबद्दलच्या अनादरातून वा द्वेषातून घडणारा प्रकार नसतो. ते पोलिसांना दिलेले आणि म्हणून राज्यव्यवस्थेला दिलेले आव्हान असते. गल्लीतल्या टपोरी तरुणांमध्येच नव्हे, तर क्वचितप्रसंगी सर्वसामान्य गणल्या जाणाऱ्या माणसांमध्येही असे आव्हान देण्याचे धाडस कोठून येते हा खरा प्रश्न आहे. आजकाल सर्वच व्यवस्थांचे जे सुमारीकरण आणि बकालीकरण सुरू आहे त्यातून तर माणसे अशी व्यवस्थेप्रति हिंस्र बनत नाहीत ना हे तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे. समाजातील सर्वच व्यवस्थांना आतून रीतसर सुरुंग लावले जात असताना रोजच दिसत आहे. त्यात न्यायपालिकांपासून माध्यमांपर्यंत आणि कायदेमंडळापासून नागरी समाजापर्यंतच्या विविध संस्थांचा समावेश आहे. या सर्व संस्थांच्या विश्वासार्हतेवर आतून आणि बाहेरून डाके घालण्यात येत आहेत. एकदा समाजाच्या हमामामध्ये अशा रीतीने सगळ्यांनाच नंगे म्हणून सादर केले, की मग कोण कोणाला बोल लावणार? अशा प्रकारे एकदा सर्व समाजाचेच लुंपेनीकरण झाले की मग त्यावर सत्ता गाजविणे सोपे असते. ज्यांना हे करण्याची मनीषा आहे त्यांच्याकरिता अशा घटना अधिकाधिक घडणे हे पोषकच. त्यांच्याआडून सत्तेचा खेळ खेळता येतो. परंतु त्यात जाणारे तर जिवानिशी जातात, उरलेल्यांचे वर्तमान आणि भविष्यही काळेकुट्ट होऊन जाते. यापासून स्वत:ला वाचविणे हे त्या-त्या व्यवस्थेतील व्यक्तींचेच काम आहे. पोलीस दलालाही स्वत:लाच हे काम करावे लागणार आहे. याबाबत समाजाची शक्तीही पोलिसांच्या मागे उभी राहणे आवश्यक आहे. कारण त्यातच समाजाचा, तुमचा-आमचा स्वार्थ आहे. म्हणूनच पोलिसांवरील हल्ले हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा चिरीमिरी प्रश्न न मानता त्याकडे वाढत्या सामाजिक अनारोग्याचे लक्षण म्हणून पाहिले पाहिजे. व्यवस्थांच्या खच्चीकरणातून निर्माण होणारे हे अनारोग्य आहे, हे समजून घेतले पाहिजे. अन्यथा पोलीस चिरीमिरी खातात म्हणून त्यांचे ‘पांडुकरण’ झाले म्हणून किंवा एखाद्या समाजातील गुंड माजले आहेत म्हणून पोलिसांवर हल्ले होतात एवढय़ा निवाडय़ातच हा मुद्दा संपेल आणि तरीही खरा प्रश्न मात्र कायमच राहील.