महाराष्ट्राच्या मातीतल्या पहिल्या भव्य उद्योगाच्या संस्थापकाला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षांनिमित्ताने आदरांजली..

या महाराष्ट्रास संपत्तीनिर्मितीचे महत्त्व नाही. सगळा दीनवाणा आणि कोरडा कारभार. त्यामुळे ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ यासारख्या वचनाचा अर्थ गरिबीशी लावला गेला. म्हणून नकळतपणे का असेना मराठी माणसाने गरिबीचेच उदात्तीकरण केले. मग ते साहित्य असो वा सामाजिक क्षेत्र. गरीब म्हटला की आपल्याकडे अनेकांच्या तोंडास त्याची सेवा करण्यासाठी पाणी सुटते. गरिबाची सेवा या संकल्पनेचा किती विकृत अर्थ आपल्याकडे लावला गेला याचे दिवंगत साहित्यिक जयवंत दळवी यांनी केलेले रसाळ वर्णन अनेकांना स्मरत असेल. असो. मराठी माणसाच्या रक्तात गरिबीस आंजारणेगोंजारणे इतके काही मुरलेले आहे की श्रीमंती ही लुळीपांगळीच असते असे त्यास वाटते. धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती अशा प्रकारच्या म्हणी/ वाक्प्रचार मराठीत रूढ झाले ते या गरिबीच्या दळभद्री उदाहरणांतून. त्यामुळे या राज्याने संपत्तीनिर्मितीचे महत्त्व जाणले नाही. ठेविले अनंते तसेचीच राहावयाचे असल्याने उगाच श्रमायचे कशासाठी असा सोयीस्कर विचार मराठी माणसाने केला. त्यामुळे दरिद्री असूनही चित्ती असो द्यावे समाधान असे तो म्हणू आणि वागू शकला. यात अभिमान बाळगावे असे काही नाही. उलट समाज म्हणून हे लाजिरवाणेच. अशा समाजात लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांना एक उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पडले, हे अजबच म्हणायचे. २० जून १८६९ हा त्यांचा जन्म दिन. महाराष्ट्राच्या मातीतल्या पहिल्या भव्य उद्योगाच्या संस्थापकाचे हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्ष. काल ते सुरू झाले. त्यानिमित्ताने लक्ष्मणरावांच्या कर्तृत्ववान इतिहासाचे स्मरण करणे समयोचित ठरावे.

किर्लोस्करांना उद्योगाची कोणतीही पाश्र्वभूमी होती असे नाही. काही तरी अभियांत्रिकी आणि चित्रकला हे दोन त्यांचे छंद. परंतु लक्ष्मणराव ज्या काळात जन्मले त्या काळात चित्रकलेचे शिक्षण वगैरे घेण्याचा विचार करण्याचीही कुवत मराठी घरांत नव्हती. त्यामुळे त्यांना अखेर बंड करावे लागले आणि ज्येष्ठ बंधू रामुअण्णांच्या मदतीने त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट  येथे प्रवेश घेतला. परंतु दुर्दैव आडवे आले. लक्ष्मणरावांवर काही प्रमाणातल्या रंगांधळेपणाच्या दृष्टिदोषामुळे चित्रकला शिक्षण सोडण्याची वेळ आली. आयुष्यातील अत्यंत आवडत्या दोनपैकी एका क्षेत्रास मुकावे लागणार ही बाब त्यांच्यासाठी दुखद होती. म्हणून त्यांनी आपल्या दुसऱ्या आवडत्या क्षेत्रास जवळ केले. सुरुवातीला मुंबईतील व्हीजेटीआय अभियांत्रिकी संस्थेतून त्यांनी शिक्षण घेतले आणि लवकरच त्या शिक्षणाच्या प्रसारासाठी तेथेच ते काम करू लागले. अभियांत्रिकी हेच आपल्या जीवनाचे श्रेयस आणि प्रेयस हे एव्हाना त्यांना कळून चुकले असावे. चित्रकारी सोडावी लागल्यामुळेही असेल, पण लक्ष्मणराव अभियांत्रिकीस जराही दुरावू शकत नव्हते. परंतु अभियांत्रिकीत करायचे काय याचा अंदाज नव्हता. म्हणून सुरुवातीच्या काळात लक्ष्मणरावांनी चक्क सायकलची एजन्सी घेतली. लक्ष्मणराव मुंबईत सायकली खरेदी करीत आणि बेळगावी आपल्या भावाकडे त्या पाठवीत. पुढे त्या विकण्याची जबाबदारी त्या भावाची. हा भाऊदेखील उद्यमी म्हणता येईल. तो नुसता सायकली विकून स्वस्थ बसला नाही. या सायकल विक्रीच्या बरोबरीने सायकल चालवण्याचा उद्योगही त्याने केला. पुढे लक्ष्मणराव त्यास येऊन मिळाले आणि दोघांनी मिळून सायकल खरेदी-विक्री आणि दुरुस्ती अशा दोन्हींचे दुकान काढले. महाराष्ट्राचे सुदैव हे की त्यांनी आहे त्या परिस्थितीत आनंद मानला नाही आणि सतत नवनवे काय करता येईल याचा शोध ते घेत राहिले. बेळगावातील ते दुकान शेतकऱ्यांच्या येण्याजाण्याच्या वाटेवर होते. बल आणि हातातील अवजारे सांभाळत जाणारे शेतकरी लक्ष्मणरावांच्या दृष्टीस पडत. त्यामुळेही असेल बहुधा. परंतु या शेतकऱ्यांसाठी आपणास काही यांत्रिकी कौशल्य पणास लावता येईल का, असे त्यांच्या मनाने घेतले. हे असे काही विकसित करण्याच्या ध्यासाने लक्ष्मणराव भारले गेले. हळूहळू काय करता येईल याचाही विचार त्यांच्या डोक्यात पक्का झाला.

पोलादाचा नांगराचा फाळ ही त्यांची कल्पना. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या नांगराचा फाळ लाकडी असे. लाकडाच्या स्वतच्या अशा काही मर्यादा असतात. पाण्यात अतिभिजले की ते कमकुवत होत जाते. आणि आपली शेती तर पूर्णच पावसातली. त्यामुळे हे फाळ लवकर झिजत. पिचत. त्यामुळेच नांगराचा फाळ लोखंडी असावा असे त्यांच्या मनाने घेतले. तसा लोखंडी फाळ त्यांनी बनवलाही. पण कोणीही तो वापरेचनात. तो वाटत होता तितका वजनाने अजिबात जड नव्हता. त्याचे आयुष्यमान अर्थातच अधिक असणार होते. त्याचे महत्त्वही शेतकऱ्यांना कळू लागलेले. पण तरीही त्याचा वापर शून्य. का? तर वसुंधरेच्या पोटात पोलादाचा फाळ खुपसणे हे काही तरी पाप आहे आणि त्या लोखंडाचे अंश जमिनीत उतरून जमीन नापीक होण्याचा धोका आहे हे समज काही शेतकऱ्यांच्या डोक्यातून जाता जाईनात. हे असे काही नाही हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात लक्ष्मणरावांची दोन वर्षे गेली. यथावकाश शेतकऱ्यांना या नांगराचे महत्त्व पटले. मग पुढचा प्रश्न. या नांगराचे व्यावसायिक उत्पादन करायचे कसे? जागा कोठे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी भांडवल आहे कोठे?

हा पेच औंधच्या द्रष्टय़ा राजाने.. पंतप्रतिनिधी.. यांनी सोडवला. त्या काळात, म्हणजे १९०९/ १९१० च्या सुमारास सातारा जिल्ह्यातील समृद्ध राजाने लक्ष्मणरावांना तब्बल १७ हजार रुपयांचे कर्ज दिले. भांडवलाचा प्रश्न मिटला. कारखान्याची जागा? पंतप्रतिनिधींच्या इच्छेमुळे असेल किंवा  सोय,लक्ष्मणरावांना उद्योगासाठी जागा बेळगाव, कोल्हापूर परिसरातच हवी होती. परत रेल्वे वा अन्य मार्गानेही सोयीची हवी. अन्यथा उत्पादित मालाची वाहतूक कशी करणार हा प्रश्न. परत लक्ष्मणरावांचे स्वप्न लहान नव्हते. केवळ कारखाना काढून नफ्याची बेरीज करीत बसणे इतकाच त्यांचा विचार नव्हता. त्या काळी त्यांनी युरोपातील औद्योगिक वसाहतींसंदर्भात वाचले होते. कारखाना आणि आसपास लगेच त्यात काम करणाऱ्यांच्या जगण्याची सोय. लक्ष्मणरावांना असे औद्योगिक निवासी शहर हवे होते. सांगली जिल्ह्यत तशी जागा त्यांना सापडली. कुंडल. १९१० सालच्या मार्च महिन्यातील टळटळीत दुपारी हे भांडवल, तीन सहकारी आणि डोळ्यात स्वप्न घेऊन लक्ष्मणराव कुंडल स्थानकात उतरले आणि कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही. कारण ते झाले किर्लोस्करवाडी.

महाराष्ट्रातील एका बलाढय़ उद्योगसमूहाची ती मुहूर्तमेढ होती. हे फार मोठे काम होते. लक्ष्मणराव हे महाराष्ट्राच्या मर्यादित पण प्रभावशाली अशा उद्योगपीठाचे स्वयंभू कुलपती. यानंतर जवळपास चार दशकांनी बेळगावातले नीलकंठ कल्याणी यांनाही अशीच उद्योगप्रेरणा झाली आणि मूळचे गुजराती पण सोलापुरात वाढलेले वालचंद हिराचंद यांना थेट विमाने बनवण्याचा कारखाना काढावासा वाटला. पुढे लक्ष्मणरावांच्या खांद्यावरची उद्योगधुरा शंतनुरावांनी घेतली आणि विक्रमी घोडदौड केली. ते अमेरिकेत जाऊन शिकून आलेले. मॅसेच्युसेट्स विद्यापीठातील ते पहिल्या भारतीय पदवीधरांतील एक. त्यांना दृष्टी होती आणि वडिलांचा वारसा होता. त्यांच्या काळात किर्लोस्कर समूह शब्दश: हजारो पटींनी वाढला. ऐंशीच्या दशकात राजीव गांधी यांच्या सरकारचे अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी किर्लोस्करांवर घातलेल्या अगोचर धाडी हा त्यांच्या मार्गातला एकमेव अडथळा. पण त्यातून उलट सिंग यांचा अर्धवटपणा उघड झाला आणि किर्लोस्कर अधिकच झळाळून निघाले.

कोणत्याही प्रांतास अभिमान वाटावा असे हे कर्तृत्व. परंतु आजच्या महाराष्ट्रास त्याची किती जाणीव आहे याची शंका यावी अशी परिस्थिती. मराठी संस्कृतीच्या शिलेदारांनाही लक्ष्मणरावांचे विस्मरण व्हावे हेदेखील तसे कालसुसंगत. या मराठी उद्योगमहर्षीस ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.