पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे आपण स्वागतच करायला हवे.परंतु..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘आपण कोणाची ठेवत नाही, मनात आले की बोलून टाकतो,’’ ही भाषा आणि बाणा नाक्यावरच्या नायकांना शोभून दिसतो. महासत्तेच्या प्रमुखास निश्चितच नाही. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे मान्य नसावे. पाकिस्तानसंदर्भातील त्यांचे ताजे वक्तव्य हे त्यांचे असे नाक्यावरचे नायकत्व दाखवून देणारे आहे. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीसंदर्भातील कोणतेही संकेत ट्रम्प यांना मान्य नाहीत. किंबहुना सगळेच नियम अमान्य असल्याने शक्यता अशी की एखादवेळेस ते स्वत:च स्वत:ला नाकारण्यासदेखील कमी करणार नाहीत. असो. तूर्त त्यांच्या पाकिस्तानविषयक विधानामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची चर्चा करणे गरेजेचे आहे. कारण पाकिस्तानची मदत थांबवण्याच्या अमेरिकी अध्यक्षांच्या या विधानांमागे विद्यमान सरकारचे प्रयत्न आहेत, अशी ट्रम्प यांच्या बौद्धिकबांधवांना शोभेशी विधाने आपल्याकडे उमटू लागली असून अशा वेळी ट्रम्प यांच्या कृतीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा अंदाज येणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे ट्रम्प यांचे हे विधान पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडण्यापेक्षा आधीच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे कथित पाकांधळेपण चव्हाटय़ावर आणण्यासाठी आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाने पाकिस्तानला सतत पाठीशी घातले आणि त्याचा तोटाच अमेरिकेला झाला, असा वास्तवात ट्रम्प यांच्या म्हणण्याचा अर्थ. तोच मुळात खोटा आहे. याआधीही अनेक अमेरिकी सरकारांनी पाकिस्तानची मदत कमी करण्याचा वा थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ट्रम्प आणि त्यांचे पूर्वसुरी यांच्यातील फरक इतकाच की या सगळ्याची जाहीर वाच्यता आधीच्यांनी केली नाही. जे करावयाचे आहे तेच करावयाचे पण आपण हे करीत आहोत हे बोलून तेवढे दाखवायचे नाही, हा मुत्सद्देगिरीतील पहिला नियम. ट्रम्प यांनी तोच मोडला. आणि एकदा का परराष्ट्र संबंधांसारखे गंभीर विषय असे ट्विटरादी समाजमाध्यमांत आले की उभय बाजूंना आपल्या भूमिका अधिक ताठर कराव्या लागतात. तसे करणे अडचणीचेच असते. कारण निर्णय जाहीर झाला की नागरिकांच्या मनात त्या निर्णयाचे दृश्य परिणाम प्रतिमान तयार होते. अशांतून सामुदायिक समाजमनाची म्हणून एक प्रतिक्रिया तयार होते. ती एकदा का तयार झाली की व्यवस्थेस पुढील निर्णय हे त्या प्रतिमेच्या दबावापोटीच घ्यावे लागतात. म्हणून अमेरिकेच्या अनेक माजी अध्यक्षांनी पाकिस्तानविषयक अनेकदा कडक भूमिका स्वीकारली. परराष्ट्रमंत्री असताना हिलरी क्लिंटन यांनादेखील पाकिस्तानविषयी सहानुभूती होती असे नव्हे. १९८५ आणि नंतर लॅरी प्रेस्लर यांनी अमेरिकी प्रतिनिधी सभागृहात मांडलेला ठराव हा पाकिस्तानी मदतीवर नियंत्रण आणणारा होता. या प्रेस्लर नियमामुळे पाकिस्तानची चांगलीच अडचण झाली होती. परंतु म्हणून त्या वेळी कोणा अमेरिकी अध्यक्षाने त्याबाबत जाहीर विधाने केली असे कधी घडले नाही. परंतु इतरांनी शहाणपणाचा भाग म्हणून न केलेली कृत्ये करून दाखवणे असा पणच ट्रम्प यांनी केलेला असल्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी जाहीरपणे इतकी टोकाची भूमिका घेतली. प्रत्येक भारतीयास त्यामुळे आनंद होणे हे साहजिक असले तरी हा आनंद अत्यंत अल्पजीवीच ठरण्याचा धोका अधिक.

याचे कारण यामुळे पाकिस्तानी राज्यकत्रे इस्लामी कट्टरपंथीयांकडे ढकलले जातील. त्यांना तसे करण्याखेरीज दुसरा पर्यायच राहणार नाही. ट्रम्प यांच्या ताज्या विधानांमुळे तेथील सामान्य नागरिकांच्या मनातही अमेरिकेविरोधात भावना तयार होणार असून त्यामुळे अमेरिकेच्या जवळ जाण्याचा कोणताही निर्णय हा लांगूलचालनाच्या भावनेतून पाहिला जाईल. आधीच पाकिस्तानी राजकारणात नेमस्तांची संख्या अत्यल्प. त्यात पुन्हा आयएसआयचे पाक प्रशासनावर, त्यातही विशेषत: लष्करी प्रशासनावर, असलेले नियंत्रण. या घटकांचा कोणत्याही प्रश्नासंदर्भात चर्चा वगरे माध्यमांवर विश्वास नाही. याचे कारण भडक भूमिकांत त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. या संदर्भात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील चच्रेस तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कसा सुरुंग लावला त्याचे कारगिल उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहेच. अशा परिस्थितीत मिळेल त्या मार्गानी त्या देशातील मध्यममार्गीना कसे बळ देता येईल हे पाहण्याची गैरेज असताना ट्रम्प यांनी एकाच ट्वीटद्वारे त्या सर्वाना वाऱ्यावरच सोडले. त्या देशातील आणि त्या देशाच्या धार्मिक परिघातील कट्टरपंथीयांना यामुळे पुन्हा जोर चढणार असून त्यातूनच इस्लामी देशांची अशी एक आघाडी तयार होणार हे उघड आहे. गेल्या महिन्यात या अमेरिकी अध्यक्षाने कोणाची पत्रास न बाळगता, विवेकास रजा देऊन जेरुसलेम हे शहर ही इस्रायलची राजधानी म्हणून एकतर्फी घोषणा केली. त्याची गैरेज नव्हती. पुढे तो निर्णयच संयुक्त राष्ट्र आमसभेने धिक्कारून अमेरिकेचे नाक कापले. संयुक्त राष्ट्रे इतक्या उघडपणे अमेरिकेविरोधात गेल्याचे दुसरे मोठे उदाहरण नाही. हे ट्रम्प यांच्यामुळे घडले. त्याचा दुसरा परिणाम असा की इस्लामी देशांची म्हणून एक अप्रत्यक्ष आघाडी झाली. तिचे नेतृत्व अमेरिकाविरोधी टर्कीचे प्रमुख एर्दोगान यांनी केले. आताही असाच धोका संभवतो. अमेरिकेने पाकिस्तानला असे जाहीर दटावून मदत बंद केली तर हेच इस्लामी देश पुढे येऊन उघडपणे पाकिस्तानची तळी उचलतील. हे सगळे टळेल ही अमेरिकेची आशा एकाच घटकावर अवलंबून आहे. सौदी राजपुत्र सलमान. या परिसरातील इस्लामीकरणास सौदीने नेहमीच मदत केलेली आहे. परंतु नवीन सौदी राजपुत्र सलमान हा तूर्त अमेरिकेच्या प्रभावाखाली असून तो असे अमेरिकाविरोधी काही करणार नाही, असे ट्रम्प यांना वाटते. इतिहासात वरवर डोकावले तरी आपला अरेबिया अंदाज किती चुकू शकतो हे ट्रम्प यांना कळेल. परंतु इतिहास, संकेत, परंपरा, मुत्सद्दीपणा वगरेचे त्यांना तीव्र वावडे असल्याने हे काही त्यांना समजून घ्यावयाचेच नाही, असे दिसते.

परंतु आपण तसे करून चालणारे नाही. याचे कारण अमेरिकेने पाकिस्तानचे नाक दाबले तर त्याची पहिली प्रतिक्रिया ही आपल्या विरोधात असणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तान अमेरिकेविरोधात उघडपणे काही करू शकत नाही. ते त्या देशास झेपणारे नाही. अशा वेळी अमेरिकेविरोधात राग व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानला आपणच सापडणार हे उघड आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे पाकिस्तानच्या आपल्या विरोधातील कारवाया वाढणार. तसे ते वाढवणे हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांसाठी जागतिक पातळीवर सोयीचे आहे. त्या देशातील बलुचिस्तानातील अशांततेस आपली मदत असल्याची कबुली याआधी आपण दिलेलीच आहे. अशा वेळी आपल्या विरोधात रडगाणे गाण्यासाठी पाकिस्तानला या सगळ्याचा उपयोग सहज होणार हे समजून घेणे अवघड नाही. हे काहीही लक्षात न घेता ट्रम्प यांच्या पाकिस्तानविरोधातील आगपाखडीमागे आपली मुत्सद्देगिरी आहे हे आपले विधान निव्वळ हास्यास्पद ठरते. म्हणजे शहाणपणाचा अभाव दर्शवणाऱ्या ट्रम्प यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया त्याच्याच जातकुळीत बसते. पाकिस्तान विरोधात आहे म्हणून आपण आनंदच मानायला हवा हा बालिशपणा त्यातून दिसतो. खरे तर त्या देशात  स्थिर सरकार असणे हे आपल्या हिताचे आहे. ट्रम्प यांच्या जाहीर विधानाने ती शक्यता आता अधिकच धूसर बनते.

म्हणजे पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे आपण स्वागतच करायला हवे. परंतु ते करताना ही मदत बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी मुत्सद्देगिरी दाखवली असती तर त्याचा अपेक्षित परिणाम झाला असता. परंतु ‘आले ट्रम्पोजींच्या मना..’ या कार्यशैलीने घात केला. काय मिरवायचे हे जसे कळावे लागते तसेच काय मिरवायचे नाही हे देखील कळावे लागते.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump threatens to cut pakistan aid donald trump us pakistan relations
First published on: 03-01-2018 at 01:53 IST