रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांचे उत्तराधिकारी म्हणून ऊर्जित पटेल यांची निवड केल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन. या निमित्ताने पहिल्यांदाच या सरकारची गुणग्राहकता दिसून आली. या आधी विविध पदांवर या सरकारने ज्या काही नेमणुका केल्या आहेत, ते पाहता रघुराम राजन यांच्या जागी काय दर्जाची व्यक्ती आणली जाईल याबद्दल साधार चिंता होती. ती आता दूर झाली.

पटेल हे राजन यांच्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाश्चात्त्य संस्थांतील अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. राजन यांच्याप्रमाणेच तेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संबंधित होते आणि राजन यांच्याप्रमाणेच पटेल यांचीही निवड मनमोहन सिंग सरकारने प्रथम केली होती. तेव्हा राजन यांच्यावर पाश्चात्त्य तसेच विरोधी धार्जिणेपणाचा आरोप करणाऱ्यांना पटेल यांच्या निवडीने आनंद होणारा नाही. पटेल हे पतधोरण व्यवहारातील तज्ज्ञ आहेत आणि आताही रिझव्‍‌र्ह बँकेचे नैमित्तिक पतधोरण आखण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. हे अशासाठी नमूद करावयाचे की, या पतधोरणांवरून सरकार अािण रिझव्‍‌र्ह बँक यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

पटेल यांच्याशी संबंधित आणखी एक बाब आवर्जून नमूद करावयास हवी. मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात संयुक्त पुरोगामी सरकारचे १०० दिवसीय कार्यकाळाचे राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले होते. इतकेच नव्हे तर खासगी वाहिन्यांवर मनमोहन सिंग सरकारच्या अर्थधोरणांची भलामण करणारे कार्यक्रमदेखील सादर केले होते. तेव्हा भाजपतील सुब्रमण्यम स्वामीसदृश अनेकांच्या हाती या मुद्दय़ाचे कोलीत मिळू शकेल. त्याचप्रमाणे या पटेल यांनी काही काळ अंबानी यांच्या रिलायन्स समूहातही अध्यक्षपद भूषविले होते. अर्थात हे दोन मुद्दे त्यांच्या गुणवत्तेच्या आड येतील असे आताच मानणे अयोग्य ठरेल. या दोन्हींकडे.. विशेषत: मनमोहन सिंग सरकारसाठी त्यांनी केलेल्या कामाकडे.. दुर्लक्ष करण्याचा मोकळेपणा मोदी सरकारने दाखवला याबद्दलही हे सरकार अभिनंदनास पात्र ठरते. परंतु म्हणूनच पटेल यांचे प्रत्येक पाऊल या पाश्र्वभूमीवर जोखले जाईल.