‘हे’ विरुद्ध ‘ते’ हाच ज्यांच्या राजकारणाचा पाया असतो अशा व्यक्ती त्या प्रदेशासाठी विनाशकारीच ठरतात, हे अमेरिकेतील बहुसंख्य मतदारांच्या उशिराने का असेना ध्यानात आले..

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेसारख्या शुद्ध लोकशाहीवादी देशात अध्यक्षपदी निवडले जाणे हाच मुळात एक ‘व्यत्यय’ होता. त्यामुळे तो दूर होणे गरजेचे होते. अमेरिकी नागरिकांनी हा ‘व्यत्यय’ वेळीच ओळखला आणि तो दूर केला. यातून त्या देशातील नागरिकांची लोकशाहीवरील श्रद्धा अजूनही शाबूत असल्याचे दिसते. हे वाचून विचारप्रक्रियेपासून दुरावलेले काही ‘तुमच्या नावडीचे ट्रम्प पराभूत झाले म्हणून तुम्हाला आनंद’ अशा काही बालिश प्रतिक्रिया व्यक्त करतीलही. पण मुळात ‘लोकसत्ता’सह जगातील सर्वच विवेकवाद्यांना ट्रम्प यांच्याविषयी इतका तिरस्कार का होता, ही बाब यानिमित्ताने समजून घ्यावी अशी. चार वर्षे आणि चार दिवसांच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर अखेर जोसेफ रॉबिनेट बायडेन हे अध्यक्षपदी निवडले गेल्याने अमेरिकेच्या.. आणि जगाच्याही.. सुदैवाने डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमधून बाहेर पडावे लागेल. जागतिक राजकीय प्रवाहास नवी दिशा देण्याचे सामथ्र्य असलेल्या या घटनेचे अन्वयार्थ आता पुढील अनेक दिवस लावले जातील. त्या आधी मुळात ट्रम्प हा एक व्यत्यय का होता, हे या मुहूर्तावर समजून घेणे गरजेचे आहे. कारण त्याखेरीज या घटनेचा आवाका लक्षात येणार नाही. एकाच वेळी ट्रम्प पराभूत होणे, सहिष्णुवादी बायडेन महासत्तेच्या प्रमुखपदी निवडले जाणे आणि कमला हॅरिस त्यांच्या उपनेत्या असणे या साऱ्याचेच महत्त्व घोटून घोटून लक्षात घ्यावे असे.

ट्रम्प यांच्याविरोधात विवेकवादी माध्यमांनी सातत्याने टीकेचा सूर लावला तो काही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाविषयी नावड आहे म्हणून नव्हे. या पक्षाने अमेरिकेस अब्राहम लिंकन, थिओडोर रुझवेल्ट ते ड्वाइट आयसेनहॉवर असे अनेक आदरणीय अध्यक्ष दिले. त्यामुळे या पक्षाविषयी आकस असल्याचा आरोप इतिहासाविषयी अनभिज्ञ असलेलेच करू शकतील. दुसरा मुद्दा ट्रम्प यांच्या पक्षीय बांधिलकीचा. ट्रम्प काही सच्चे रिपब्लिकन म्हणावेत असे नाहीत. या पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळणे सोपे जाईल हे पाहून ते रिपब्लिकनवादी झाले. हाच ट्रम्प यांच्याविषयीचा अत्यंत आक्षेपार्ह मुद्दा. ट्रम्प यांच्यासारख्या व्यक्ती कोणाच्याच नसतात. सर्व काही स्वांतसुखाय आणि आत्मकेंद्री. ‘मी माझा’ ही अशांची कार्यशैली. विविध कारणांनी अत्यंत अशक्त झालेल्या आणि तगडे नेतृत्व नसलेल्या रिपब्लिकन पक्षाने आपली पक्षीय गाय त्यामुळे ट्रम्प यांच्या गोठय़ात बांधू दिली आणि या विकृत गृहस्थाने तिच्या दुधावर फक्त स्वत:चे पोषण केले. ट्रम्प यांना असे करू देताना रिपब्लिकन पक्षाने या माणसामुळे आपल्या पक्षास बरे दिवस येतील असा विचार केला असणार. त्यात त्या पक्षाचे काही चुकले असे नाही.

पण ट्रम्प यांनी तंबूतल्या उंटाप्रमाणे फक्त स्वत:चे हातपाय पसरले आणि पक्षास बाहेर काढले. आज रिपब्लिकन हा पक्ष म्हणून ट्रम्प यांच्या दावणीला बांधला गेला आहे. इतका की, आपल्या नेत्याची आचरट विधाने लक्षात येऊनही त्याविरोधात जाहीर भूमिका घेण्याची हिंमत त्या पक्षातील नेत्यांत नाही. म्हणून आत्मकेंद्री नेत्यांहाती पक्षाची धुरा देणे नेहमीच घातक असते. अशा व्यक्ती पक्षातील अन्य समर्थाचे खच्चीकरण करतात. परिणामी पक्षात आपल्या पायावर उभा राहू शकेल असा नेताच शिल्लक राहात नाही. कोणत्याही पक्षाचे नेतृत्व जेव्हा इतके व्यक्तिवादी होते तेव्हा त्या पक्षावर अशी वेळ येणे अपरिहार्य असते. धार्मिक आणि विज्ञानविषयक काही मूल्ये वगळता रिपब्लिकन्स हे पक्ष म्हणून इतके भिकार नाहीत. त्यांच्यावर ही वेळ ट्रम्प यांनी आणली. हा पक्ष जागतिकीकरणवादी होता आणि स्थलांतरितांविषयी त्यांनाही ममत्वच होते. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही ट्रम्प यांची घोषणा. ती उत्तमच. पण हे महानत्व साध्य करण्याचा त्यांचा मार्ग हा द्वेषाच्या खिंडीतून जाणारा होता. कोणाला तरी खलनायक ठरवल्याखेरीज आपणास नायकत्व मिळू शकत नाही असे वाटणारे नेते आणि पक्ष यांचे आजकाल ठिकठिकाणी पेव फुटले आहे. ट्रम्प हे अशांचे प्रतीक, प्रवक्ते, प्रणेते आणि अंतिमत: प्राक्तन. म्हणून या मार्गाने जाताना आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची धोरणे फेकून दिली अन् केवळ आणि केवळ दुहीचेच राजकारण केले. अमेरिकेतील वंशवादी, गौरवर्णीय आणि तुलनेने विपन्न अशा वर्गास जवळ करण्यासाठी त्यांनी बहुसंख्याकवाद जोपासला. ‘हे’ विरुद्ध ‘ते’ हाच ज्यांच्या राजकारणाचा पाया असतो अशा व्यक्ती त्या प्रदेशासाठी विनाशकारीच ठरतात. ट्रम्प हे अमेरिकेसाठी असे होते. त्या देशातील बहुसंख्य मतदारांच्या ध्यानात, उशिराने का असेना, ही बाब आली. अर्थात तरीही ट्रम्प यांच्यामागे असलेला जनमताचा आवाका दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही, हे मान्यच. पण हे असे होते. याचे कारण बहुसंख्य अल्पविचारी जनतेस फुकाचा आक्रमक, आढय़तेखोर असा नेता नेमस्तांपेक्षा नेहमीच अधिक आकर्षून घेतो. या आपल्या आवडीनिवडीची किंमत कोण, कशा पद्धतीने मोजेल हे कळण्याइतके भान त्यांना नसल्याने अशा आगलाव्या नेत्यांचे काही काळ फावते. अशा वेळी समाजातील समंजसांनी विचारींच्या मागे आपली ताकद उभी करायची असते. अमेरिकेत तेच घडले म्हणून आकाराने सर्वात मोठी नसली तरी परिणामकारकतेच्या मुद्दय़ावर त्या देशातील लोकशाही प्रामाणिक ठरते.

तथापि, लोकशाही मूल्यांच्या रक्षणास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या अमेरिकेच्या या समंजस स्वरूपाबाबत संपूर्ण अनभिज्ञता दाखवत आपण ट्रम्प या व्यक्तीत नको इतकी गुंतवणूक केली. जग करोनाच्या विळख्यात शिरत असताना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अहमदाबादमधील ‘नमस्ते ट्रम्प’ आणि त्या आधीच्या सप्टेंबरात अमेरिकेतील ‘हाऊडी, मोदी!’ हे उत्सव केवळ हास्यास्पद, बालिश नव्हते, तर मुत्सद्देगिरी कशी नसावी याचा उच्च दर्जाचा वस्तुपाठ होते. भारत असो वा अमेरिका; अलीकडे आंतरराष्ट्रीय संबंधांत संस्थात्मक उभारणी करण्याऐवजी या देशांचे नेते परस्परांतील दोस्तीच्या आणाभाकांना महत्त्व देतानाच दिसतात. यातूनच उत्तर कोरिया वा चीनच्या मुद्दय़ावर अमेरिकेचे नाक कापले जाते आणि चीनच्या प्रश्नावर आपले हसे होते. अमेरिका-भारत संबंधांतही हेच झाले. आपले प्रेम अध्यक्षांच्या स्वागतापुरते ऊतू गेले असते तरी एक वेळ ठीक. ‘अतिथी देवो भव’ म्हणत ते सहन करता आले असते. पण तेवढय़ावरच थांबण्याइतका विवेकाचा अभाव. त्यामुळे अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यास हजर राहून आपल्या पंतप्रधानांनी ‘अगली बार ट्रम्प सरकार’ची केविलवाणी हाक दिली. असे करताना भारतात समजा काँग्रेस वा अन्य कोणा सरकारच्या काळात अमेरिकी अध्यक्षांनी येथे येऊन असा ‘अगली बार’चा नारा दिला असता तर आपल्या पक्षाची प्रतिक्रिया काय असती याचाही विचार नरेंद्र मोदी यांनी केला नाही. आता नव्याने ‘आवजो जो’ उत्सवाची तयारी आपल्याकडे सुरू करावी लागेल. पण त्यातून आपली धोरणशून्यता आणि अपरिपक्वता यांचेच दर्शन घडते.

हे असे झाले याचे कारण आपल्या शब्दाखातर अमेरिकेतील भारतीय ट्रम्प यांच्या पारडय़ात आपली मते टाकतील असा आपल्या नेत्यांचा भ्रम. वास्तव हे आहे की, अमेरिकेतील निकाल बदलू शकतील इतक्या संख्येने मुळात भारतीय त्या देशात नाहीत. जे आहेत त्यातील सर्वच हिंदू ‘मोदी शब्दप्रमाण’ मानणारे नाहीत. ज्यांना अमेरिकावासी होऊन कित्येक वर्षे झाली, त्यांना त्या देशातील लोकशाही मूल्याची जाणीव आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यासारख्यांचा धोका त्यांना एव्हाना लक्षात आला असेल. खेरीज अमेरिकावासी भारतीयांत मोठय़ा प्रमाणावर ख्रिस्तीधर्मीय आहेत. भारतातील सत्ताधाऱ्यांच्या इच्छेनुसार तेही मतदान करण्याची शक्यता शून्य.

हीच बाब आता कमलादेवी हॅरिस यांच्याबाबत आपल्या अनुभवास येईल. मुळात ज्या बालसुलभ उत्साहाने ‘भारतीय’ म्हणून त्यांची आरती केली जाते, त्या उत्साहाचा अंशही कमला हॅरिस यांच्या प्रतिसादात नाही. त्या स्वत:स ‘आफ्रिकी अमेरिकन’ वा फारच झाल्यास ‘दक्षिण आशियाई अमेरिकी’ मानतात. आपल्या भारतीयत्वाचे प्रदर्शन त्यांनी अजिबात केलेले नाही ही बाब आपण लक्षात घ्यावी अशी. दुसरे असे की, मानवी हक्क, काश्मीर या प्रश्नांवर त्यांची मते सर्वश्रुत आहेत. आपले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा अमेरिका दौरा आणि त्यातील डेमोक्रॅट्स लोकप्रतिनिधींच्या सहभागावरून आपली अलीकडेच झालेली अडचण अनेकांना स्मरत असेल. तेव्हा बायडेन यांच्याकडून कमला यांना दिले जाणारे महत्त्व लक्षात घेता, आपल्या सत्ताधाऱ्यांना आता त्यांच्या नावातील ‘देवी’पणास साद घालावी लागेल.

अमेरिकी निकालाच्या अन्वयार्थातील शेवटचा मुद्दा ट्रम्प या प्रवृत्तीचा. लोकशाही पद्धतीतील अशक्त दुवे हेरून हुकूमशाही वृत्तीचे घोडे दामटले जाण्याची प्रवृत्ती अलीकडे अनेक देशांत बोकाळलेली दिसते. ट्रम्प हे तिचे प्रणेते. ब्राझीलमधील बोल्सेनारो असोत की टर्कीतील एर्दोगान वा अन्य देशातील कोणी अन्य; ट्रम्प हे अशांचे उगम आणि प्रेरणास्थान. अमेरिकेचे अनुकरण जग करते. अमेरिकेत जे घडते त्याचे पडसाद जगात उमटतात. ट्रम्प यांच्या पराभवाने जगभरातील लोकशाहीच्या हुकूमशाहीकरणास खीळ बसू शकेल आणि लोकशाहीचे घसरलेले चाक पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल. अमेरिकी निकालात जगातील विवेकवाद्यांसाठी हे आश्वासन आहे.

समर्थ रामदासांनी शिवराज्याभिषेक प्रसंगी वर्णिलेल्या ‘आनंदवनभुवना’त ‘बुडाला औरंग्या पापी’ म्हणून संतोष व्यक्त केला होता. ट्रम्प यांच्या पराभवाने ‘आनंदवनभुवन’ साकारेल इतका भाबडेपणा बाळगण्याचे कारण नाही आणि ट्रम्प हे  औरंगजेबाच्या ‘दर्जाचे’ही नाहीत. पण महासत्तेच्या अध्यक्षपदावरील त्यांची उपस्थिती मात्र तितकीच नुकसानकारक होती. हे नुकसान कमी होण्यास बायडेन यांच्या विजयाची मदत होईल. म्हणून ट्रम्प पराभवाचा आनंद.