08 August 2020

News Flash

आत्मनिर्भर अमेरिका

स्थलांतरित कर्मचाऱ्यास स्थानिक हा पर्याय ठरू लागला तर त्यास अन्य स्थानिकांप्रमाणे मोबदला द्यावा लागेल.

संग्रहित छायाचित्र

 

‘स्थलांतरितांना मिळणारी संधी रोखल्यामुळे अधिकाधिक रोजगार निर्मिती होईल’ या ट्रम्प यांच्या म्हणण्यास ना अमेरिकी इतिहासाची साथ आहे, ना अर्थकारणाची..

स्थलांतरित कर्मचाऱ्यास स्थानिक हा पर्याय ठरू लागला तर त्यास अन्य स्थानिकांप्रमाणे मोबदला द्यावा लागेल. म्हणजे त्यामुळे उद्योगांचेच अर्थगणित बदलेल. याची जाणीव असणाऱ्या अमेरिकी उद्योगांचा ट्रम्प यांच्या धोरणास विरोध आहे..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय आणि शहाणपण यांनी फारकत घेऊन बराच काळ लोटला. आता त्यांच्या पुढच्या निवडणुकीच्या रणदुंदुभी वाजू लागल्या आहेत. म्हणजे अध्यक्षपदाची त्यांची पहिली खेप आता संपत आली. पण तरीही त्यांच्यात काही सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. उलट परिस्थिती अधिकच बिघडू लागली असून उजाडणारा प्रत्येक दिवस कालचा यापेक्षा बरा होता या भावनेलाच जन्म देतो. यामुळे  ट्रम्प आज ना उद्या ऌ1इ व्हिसाच्या मुद्दय़ास हात घालणार आणि हे प्रमाण कमी करणार याची अपेक्षा होती. तीच ट्रम्प यांनी पूर्ण केली. मतदारांसमोर सादर करण्यासारखे हाती काही नसेल तर कोणताही राजकीय नेता लोकानुनयाचा मार्ग चोखाळतो. तसे करणे सोपे असते आणि त्यात बऱ्याचदा बुद्धिगम्यतेचा अभावच असतो. भावनेस हात घालण्याइतके काही असले म्हणजे झाले. निवडणुकांच्या तोंडावर ट्रम्प यांनी आपल्या स्थानिक, त्यातही प्राधान्याने श्वेतवर्णीय, मतदारांच्या लांगूलचालनासाठी हा ऌ1इ व्हिसा बंदीचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर यापुढे उच्चपदांवरील नोकऱ्यांसाठी येऊ इच्छिणाऱ्यांचेच अमेरिकेत स्वागत असेल. याचा अर्थ उद्योग वा अर्थव्यवस्थेच्या उतरंडीत पहिल्या पायरीपाशी असणाऱ्यांना यापुढे तितकी संधी दिली जाऊ नये, असे ट्रम्प यांना वाटते. अमेरिकेत यामुळे अधिकाधिक रोजगार निर्मिती होईल हा त्यांचा यामागील युक्तिवाद.

तो एकाच वेळी हास्यास्पद आणि केविलवाणा असा दोन्ही आहे. हास्यास्पद अशासाठी की त्यातून ट्रम्प यांना अमेरिकेच्या निर्मितीचा इतिहास आणि वर्तमान माहीत नसल्याचे दिसून येते. अमेरिका हा स्थलांतरितांचा देश आहे. वेगवेगळ्या कारणांनी हे स्थलांतरित अमेरिकेस घर मानू लागले आणि शेकडो वर्षांच्या या सांस्कृतिक, धार्मिक घुसळणीतून हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावाचा सहिष्णू, अत्यंत लोकशाहीवादी आणि अंगात जन्मत:च वैश्विक जनुके असलेला प्रदेश आकारास आला. तेव्हा स्थलांतरित हा अमेरिकेचा कणा आहे. जगातील प्रत्येक देशातील स्वप्नाळूंना अमेरिका खुणावत असते ती त्या देशाच्या रक्तात असलेल्या लोकशाहीवाद आणि गुणग्राहकता या वैशिष्टय़ांमुळे. अंगी कर्तृत्व आणि कामसू वृत्ती असेल तर आपल्या देशातील पिचलेल्यांना ज्याप्रमाणे मुंबई खुणावत असते त्याप्रमाणे जागतिक पातळीवरील स्थलांतरेच्छुकांना अमेरिका भुरळ पाडत असते. यातील सर्वच काही आपापल्या देशात चार घास सुखाने मिळत नाहीत, म्हणून अमेरिकेच्या दारी गेलेले नसतात. अल्बर्ट आइन्स्टाइन ते अरनॉल्ड श्वार्झनेगर असे बौद्धिक आणि शारीरिक कर्तृत्वाच्या विविध टप्प्यांतील असणारे अनेक अमेरिकेत जातात ते प्रगतीच्या संधींमुळे. पण याचा अर्थ हे सर्व गरजू असतात आणि अमेरिकेस त्यांचा भार वाहावा लागतो, असा नव्हे. या स्थलांतरितांना सामावून आपले म्हणण्याच्या गुणामुळे अमेरिकाही मोठी होत असते हे विसरून चालणारे नाही. अमेरिकेत गेल्यामुळे हे स्थलांतरित जसे मोठे झाले तसेच हे सर्व आल्यामुळे अमेरिकाही मोठी झाली आणि अजूनही होत आहे, याकडे कसे दुर्लक्ष करून चालेल?

अध्यक्ष ट्रम्प नेमके तेच करू पाहतात. त्यांच्या मते या आणि इतक्या साऱ्या स्थलांतरितांमुळे स्थानिकांच्या पोटावर गदा येते. त्यांच्या रोजगाराच्या संधी कमी होतात. हा युक्तिवाद अत्यंत फसवा आहे आणि त्यामुळे अनेकांना तो रास्त वाटण्याचा धोका आहे. याचे कारण अमेरिकेत रोजगाराच्या संधी आहेत म्हणून स्थलांतरितांचा ओघ त्या देशाकडे असतो, असे नाही. वास्तव बरोबर याच्या उलट आहे. ते असे की इतके सारे स्थलांतरित त्या देशास घर मानण्यास उत्सुक असतात म्हणून तितक्या साऱ्या रोजगारसंधी अमेरिकेत तयार होतात. हा मुद्दा समजून घेण्यासाठी मुंबई/ दिल्ली/ चेन्नई/ बेंगळूरु/ कोलकाता यांचे उदाहरण रास्त ठरेल. आंध्र, छत्तीसगड वा बिहार/ उत्तर प्रदेश आदी राज्यांतील स्थलांतरित इतका प्रवास करून या शहरांतच का येतात? ते आगरतळा वा पाटणा वा भुवनेश्वर किंवा तत्सम शहरांत का जात नाहीत? याचे साधे उत्तर महानगरांची रोजगार आणि प्रगतीच्या संधी तयार करता येण्याची क्षमता हे आहे. अशा संधी ज्याप्रमाणे महानगरांतच तयार होतात त्याप्रमाणे जागतिक पातळीवर अशा संधी युरोपीय देश, अमेरिका आदी ठिकाणी तयार होतात. म्हणून हे देश आणि त्यांचे अर्थकारण यांचा थेट संबंध हा स्थलांतरितांशी आहे. ज्या क्षणी हे देश स्थलांतरितांसाठी दरवाजे बंद करू लागतील त्या क्षणी त्या देशांच्या आर्थिक स्थैर्यास आव्हान मिळेल. ही बाब ट्रम्प यांना उमगणे हे त्यांच्या राजकीय क्षमतेपलीकडील ठरते.

पण उद्योगजगताच्या धुरिणांना मात्र या ‘बंद दरवाजा’ धोरण परिणामांचा अंदाज लगेच आला. म्हणूनच गूगल प्रमुख सुंदर पिचाईंसह अन्य अनेकांनी ट्रम्प यांच्या या क्षुद्र राजकारणाचा तीव्र निषेध केला. तसा निषेध करण्याची सोय अमेरिकेत आहे. म्हणून त्या देशातील उद्योग मरतडांना देशप्रमुखास काय वाटेल याची चिंता करीत मन मारावे लागत नाही. हेच त्या देशाचे मोठेपण. या उद्योग धुरिणांना ट्रम्प यांचा निषेध करावासा वाटला याचे कारण स्थलांतरामागील अर्थकारणात आहे. या अर्थकारणात निवडणुकांक्षी ट्रम्प यांना रस नाही. ते राजकारण्यांच्या एकूणच मर्यादित दृष्टिकोनातील वर्तनाप्रमाणे झाले. पण उद्योगांना तसे असून चालत नाही. केवळ पाच वर्षे इतकाच त्यांचा विचार परीघ नसतो. म्हणून ऌ1इ व्हिसा मर्यादांवर त्यांनी आवाज उठवला. उद्योगांसाठी स्थलांतरितांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्थानिकापेक्षा स्थलांतरित हा अर्थातच तुलनेने कमी मोबदल्यात आपली श्रम/ बुद्धी सेवा देण्यास तयार असतो. मग तो स्थलांतरित बिहार/ उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेला असो वा आपल्या महानगरांतून अमेरिकेत गेलेला असो. ही अशी घुसळण होत असते म्हणून उद्योगांना हवे तितके मनुष्यबळ मिळत राहते. तथापि स्थानिकांच्या रोजगार संधीसारख्या फसव्या कारणांमुळे ट्रम्प यांच्यासारखे राजकारणी त्यावर गदा आणतात तेव्हा अर्थचक्रच अडखळण्याचा धोका निर्माण होतो.

तो आता अमेरिकेत झाला आहे. स्थलांतरितांना बंदी केल्यामुळे स्थानिकांना ते रोजगार मिळतील, असे ट्रम्प म्हणतात. ते अर्ध सत्य. कारण ट्रम्प यांच्या इच्छेनुसार हे रोजगार जर समजा स्थानिकांकडे गेले तर ते संबंधित उद्योगांनाच परवडणारे नसेल. तात्पुरत्या परवान्यावर बाहेरून आलेला कामगार आणि त्याच बौद्धिक दर्जाचा स्थानिक यांना द्यावा लागणारा मेहनताना हा भिन्नच असणार. यात बदल होऊन स्थलांतरित कर्मचाऱ्यास स्थानिक हा पर्याय ठरू लागला तर त्यास अन्य स्थानिकांप्रमाणे मोबदला द्यावा लागेल. म्हणजे त्यामुळे उद्योगांचेच अर्थगणित बदलेल. याची जाणीव असल्यामुळेच अमेरिकी उद्योगांनी ट्रम्प यांच्या स्थलांतरित नको या धोरणास विरोध केला आहे.

याचा अर्थ असा की आत्मनिर्भरता ही भावनिक पातळीवर कितीही रास्त असली तरी व्यवहारात काही कामे इतरांसाठी सोडण्यातच शहाणपण आणि अर्थकारण असते. महिला रोजगारासाठी अधिकाधिक बाहेर पडू लागल्यावर लोणची/ पापडाचे, तयार खाद्यान्नाचे, गृहसेविकांचे व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर वाढले. यातून दोन्ही बाजूंच्या महिलांची सोय झाली आणि अर्थकारण सुधारले. पण आत्मनिर्भरतेच्या हट्टापोटी अशा नोकरी करणाऱ्या महिलेस लोणची/ पापडही तूच करायचे आणि रोजचा स्वयंपाकही तूच करायचा हे सांगणे जितके अन्यायकारक आणि सामाजिक/ आर्थिकदृष्टय़ा मागास तितकाच ट्रम्प यांचा अमेरिका फक्त अमेरिकींचा हा आत्मनिर्भर निर्धार अन्यायकारक. म्हणून तो अयोग्य. तथापि हे कळण्याइतका सुज्ञपणा अमेरिकी समाजात किती आहे हे या नोव्हेंबरात कळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2020 12:04 am

Web Title: us suspends h1b visa trump says move to help americans abn 97
Next Stories
1 परंपरेचा परीघ!
2 शैक्षणिक स्वैराचार
3 महाबलीपुरम
Just Now!
X