आहे तो काळ चांगल्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी भरून काढणाऱ्यांपैकी शशी कपूर हे सच्चे होते..

मनोरंजनाच्या स्वप्नसृष्टीत कपूर कुलीनतेचे एक वेगळेच महत्त्व अजूनही आहे. मुळात हे घराणे म्हणजे या क्षेत्रातील इष्टदेवता. या देवघराण्याचा प्रमुख पृथ्वीराज कपूर म्हणजे या मनोरंजनी महाभारतातील भीष्म पितामह. साधारण सहा-सात दशकांपूर्वी त्यांनी मुगल-ए-आझमात मारलेली ‘सलीम’ ही खर्जातली हाक ऐकली की आजचे सलीमही उठून उभे राहतात असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांचे तीन चिरंजीव. पण एकाचा दुसऱ्याशी गुणात्मकतेने काहीही संबंध नाही. जणू तिघे काही वेगळ्याच घरांतले असावेत. थोरले राज कपूर, मधले शम्मी आणि तिसरे शशी. वडील बंधूने घराण्याचे नाव पुढे नेताना आपल्या नवनव्या नायिका ओलेत्या राहतील याची शेवटपर्यंत काळजी घेतली. मधल्या शम्मी याने आपल्या अजस्र देहाची घुसळण कशी करता येते ते दाखवून दिले. ती करताना समोरच्या नायिकेच्या देहाचा वापर रवी म्हणून कसा करता येतो याचेही दर्शन भारतीयांना त्यांनी घडवले. तारीफ करू क्या उसकी, जिसने तुम्हे बनाया- हे वस्तुत: त्यांनाच म्हणावे अशी परिस्थिती. यांच्या पाठीवरचे शशी. गुण उधळणाऱ्या दोन वडीलबंधूंच्या पाठीवर इतका सभ्य मुलगा निपजल्याने खरे तर त्या वेळी कपूर कुटुंबीयच लाजून लाल झाले होते, असे म्हणतात. काही व्यक्ती अत्यंत यशस्वी होतात. परंतु तरीही त्यांचे यश लक्षात राहणारे असतेच असे नाही. शशी कपूर हे अशांतील एक. त्यांच्या निधनाने बरेच काही नुकसान झाल्याची भावना अनेकांची झाली. परंतु हे ‘बरेच काही’ म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर अनेकांना देता येणार नाही.

याचे कारण शशी कपूर यांचा खरा स्वभाव आणि त्याला साजेसेच त्यांचे पडद्यावरचे असणे. काही कलाकार ते प्रतिनिधित्व करतात त्या काळास आकार देतात तर काही कलाकार आहे तो काळ चांगल्या प्रयत्नांनी भरून काढतात. शशी कपूर हे या दुसऱ्या वर्गातील. दोघांचेही महत्त्व तितकेच. हे नमूद अशासाठी करायचे की आपल्याकडे काळास आकार देणाऱ्या, महानायकत्वास पोहोचलेल्यांचेच गोडवे गाण्याची सांस्कृतिक परंपरा आहे. मग ते क्षेत्र क्रिकेटचे असो वा बॉलीवूडचे वा अन्य कोणते. आपल्या नियमिततेने, सातत्याने त्या त्या क्षेत्राचा दिवा तेवता ठेवणाऱ्यांना आपला समाज मोजत नाही. म्हणून शशी कपूर यांचे नक्की मोठेपण काय हे चटकन आपल्याला सांगता येत नाही. पडद्यावरून भारत भूषण, प्रदीप कुमार अशा निर्गुणनिराकारांचा काळ संपलेला. मुळात मधुबाला, मीनाकुमारी अशा केवळ चुकून भूतलावर अवतरलेल्यांच्या सान्निध्यात या निर्गुणींना नांदवण्याचे पाप नक्की कोणाचे, हा प्रश्न चित्रपट रसिकांना पडलेला. अमिताभची उंची पडद्यावरून बाहेर यायची होती आणि राजेश खन्ना यांची आनंद निर्मिती व्हायची होती त्या काळात शशी कपूर पडद्यावर आले. मेहंदी लगी मेरे हाथ, फूल खिले है गुलशन गुलशन, नींद हमारी ख्वाब तुम्हारे.. वगैरे चित्रपटांतून ते जमेल तितके मनोरंजन करीत राहिले. हा काळ साधारण समाजातही शांतता नांदण्याचा. माणसे दहा ते पाच अशा नोकऱ्या प्रामाणिकपणे करीत, वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता यांसह साधारण अडीचशे रुपये मासिक वेतनात संसार सुखाने होत. समाजाला अधिकाची गरज नव्हती आणि ती हाव निर्माण होईल असे आसपासही काही नव्हते. शशी कपूर त्या काळात नायक झाले. आवडले. कारण त्याआधीची राज कपुरी लबाडी खपून जाईल इतके आपण सुंदर नाही, शम्मीसारखा धसमुसळेपणा करणे आपणाला झेपणारे नाही आणि आपण भारत भूषण वा प्रदीप कुमार किंवा गेलाबाजार जॉय मुखर्जी यांच्यासारखे वा इतके कंटाळवाणे नाही हे त्या वेळी अनेकांना कळून चुकले होते. या सगळ्याचा मध्य त्या पिढीतील तरुणांना -आणि अर्थातच तरुणींनाही- शशी कपूर यांच्यामध्ये आढळला. तो लगेच स्वीकारला गेला. म्हणूनच नृत्यकला नाही, शत्रुपक्षाकडच्या दहापाच जणांना लोळवावे अशी शरीरयष्टी नाही आणि भरदार आवाज किंवा तसेच काहीही नाही, तरीही शशी कपूर लोकप्रिय झाले. किंबहुना म्हणूनच ते लोकप्रिय झाले, असेही म्हणता येईल. कारण समाजातला जो सरासरी वर्ग असतो त्याचे ते प्रतीक होते. या सरासरी वर्गातली व्यक्ती ना धनाढय़ असते ना तिच्यावर कधी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करायची वेळ आलेली असते. शशी कपूर हे असे होते. त्यामुळे ते काही भूमिका करूच शकले नाहीत. अत्यंत दारिद्रय़ाच्या भूमिकेत ते कधी दिसले नाहीत. ना कधी त्यांनी मुजोर, धनदांडग्याची कधी भूमिका केली. त्यामुळे ‘दीवार’मध्ये ज्वालामुखीसारख्या खदखदणाऱ्या अमिताभसमोर ते ‘मेरे पास माँ है..’, असे म्हणतात तेव्हा शशी कपूर खरे वाटतात. ‘इजाजत’ मध्ये रेखाच्या पतीच्या एवढय़ाशा भूमिकेत ते हजेरी लावतात, पत्नीला नेण्यासाठी रेल्वेस्थानकावरील विश्रामगृहात ते प्रसन्न अन् निखळ हसतमुखाने प्रवेश करतात व पत्नीचे सामान घेऊन बाहेर पडतात एवढेच काय ते त्यांचे त्या प्रसंगात असणे. याआधी त्याच कक्षात रेखाची माजी पती नसरुद्दीन शहाशी अवचित गाठ पडलेली असते व दोघांतील संवाद व देहबोलीतून एक तणाव निर्माण झालेला असतो. शशी कपूर तो तणाव सहजाभिनयाने हलका करतात, तेव्हादेखील ते तितकेच खरे आणि सच्चे व नैतिक वाटतात. धगधगती रेखाच काय, पण शर्मिला टागोरपासून हेमा मालिनी, परवीन बाबी, नीतू सिंग, झीनत अमान अशा अन्य नायिका मिळूनही हा अभिनेता शालीनच राहिला. सत्यम शिवम सुंदरममधील स्वप्नदृश्ये हा निर्माता- दिग्दर्शक राज कपूरच्या रंगेल रसिकपणाचा भाग, नायक असूनही शशी कपूर केवळ निमित्तमात्रच राहिले. ज्या प्रकारचा रंगेलपणा त्या वेळच्या चित्रपटसृष्टीत खपूनही गेला असता, त्याहीपासून ते अलिप्तच राहिले.

एरवी समाजात आयुष्यात बाकी काही करण्याची धमक नसल्याने नीतिवान राहिलेल्यांची संख्याच जास्त असते. शशी कपूर हे अशा सोयीस्कर आणि सक्तीच्या नीतिवानांतील नव्हते. मुळात कपूरकुलीन असल्याने त्यांच्याकडून अशी सभ्यतेची अपेक्षाच कोणी केली नसती आणि म्हणून अपेक्षाभंगाचे दु:खही झाले नसते. राज आणि शम्मी ही त्या अर्थाने चाहत्यांच्या क्षमाशीलतेचीच उदाहरणे. शशी कपूर मात्र या कर्पूरगौरव परंपरेस सन्माननीय अपवाद असे. विख्यात ब्रिटिश अभिनेते जेफ्री केंडल यांची कन्या जेनिफर ही त्यांची काश्मिरी देवाब्राह्मणांच्या साक्षीने झालेली पत्नी. शशी कपूर तिचे ऋण आणि मोठेपण आयुष्यभर मानीत. तोपर्यंत कपूर घराण्यात पत्नी ही आपल्या नावाने कोणास तरी कुंकू लावता यावे यासाठीची सोय मानली जात असे. शशी कपूर यांनी ही परंपरादेखील तोडली. या जेनिफर अनेकांना ‘३६, चौरंगी लेन’ या खऱ्या चित्रपटासाठी आठवतील (या चित्रपटात वडील जेफ्री यांनी जेनिफरच्या भावाची भूमिका साकारली होती.). या चित्रपटाचे निर्माते शशी कपूर होते. एखाद्या कपुराने चित्रपटाचा निर्माता व्हावे, दिग्दर्शन अपर्णा सेन यांच्यासारखीस द्यावे आणि मध्यवर्ती भूमिकेत त्याची पत्नी असावी हे सगळेच कपूर कुलासाठी अगोचर वाटावे असे होते. पण ते शशी कपूर यांनी केले. त्यांचे वडील पृथ्वीराज आणि सासरे जेफ्री केंडल यांचे खरे प्रेम रंगभूमीवर. आज आपल्या प्रयोगशील पावित्र्यासाठी ओळखले जाणारे पृथ्वी थिएटर ही जेनिफर यांची निर्मिती. त्या लवकर निवर्तल्या. शशी कपूर त्यानंतर हळूहळू मिटत गेले.

कपूर घराण्याची आणखी एक परंपरा त्यांनी तोडली. या घराण्यातल्या पुरुषांच्या आकारमानाचा उतारवयात गुणाकार होऊ लागतो. शशी कपूर यांची मात्र बेरीजच झाली. शेवटी काही वर्षे ते चाकाच्या खुर्चीत आणि आपल्या पत्नीने उभारलेल्या पृथ्वी थिएटर्सच्या परिघातच असत. काही चांगल्या नाटकांना ते आवर्जून हजेरी लावत. पृथ्वी थिएटर्स ही त्यांची सर्वश्रेष्ठ कलाकृती. पत्नी जेनिफरच्या साह्य़ाने जन्मास आलेली. हेदेखील तसे अप्रूपच.

राज, शम्मी, ऋषी, रणधीर, रणबीर वगैरे अनेक कपुरांप्रमाणे शशीदेखील तसे यक्षच वाटावेत असे. पण अन्यांसारखे दुष्प्राप्य मात्र ते कधीच नव्हते. त्यांच्या निधनाने हा आपल्या आवाक्यातला यक्ष काळाच्या पडद्याआड गेला. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना आदरांजली.