मराठीचे भाषासौष्ठव जपणाऱ्या गोविंदराव तळवलकरांकडे भाषिक मर्यादा ओलांडून जाण्याची क्षमता होती आणि त्या त्यांनी ओलांडल्याही..

जवळच्या मित्रमंडळांत त्यांचा उल्लेख लॉर्ड गोविंदराव असा केला जाई इतके ते विचाराने पाश्चात्त्य. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि अर्थातच भारत आदी ठिकाणच्या वाढत्या असहिष्णुतेने ते अस्वस्थ होत. जगभरातली बदलती राजकीय संस्कृती हा त्यांच्या चिंतेचा विषय होता आणि ते ती चिंता उघडपणे व्यक्त करीत. भारतातील अलीकडच्या निवडणुका आणि नंतरच्या काही राजकीय नेमणुका ही त्यांची शेवटची वेदना. या बदलत्या राजकीय विचारधारेशी जुळवून घेणे त्यांना दिवसेंदिवस अशक्यप्राय वाटू लागले होते.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

गोविंदराव तळवलकरांचे आकाश मराठी वर्तमानपत्रांच्या चौकटीत मावेल इतके लहान नव्हते. करकरीत बुद्धिवादी आणि अभिजात सौंदर्यवादी, या बुद्धिवादास साजेशी प्रसंगी कोरडी वाटेल अशी भाषाशैली आणि तरीही उत्तमोत्तम काव्याचा आनंद घेण्यादेण्याइतके हळुवार, जे जे हिणकस, सपक, क्षुद्र असेल त्याचा समाचार घेताना लेखणीने रक्तबंबाळ करण्याची क्षमता आणि तरीही कमालीचे उदारमतवादी हे गोविंदरावांचे लेखनवैशिष्टय़. परंतु केवळ एवढय़ातूनच त्यांच्या मोठेपणाचा परिचय करून देता येणार नाही. ज्या काळात सर्वसाधारण मराठी संपादक साहित्य संमेलनांतील उचापती, वैयक्तिक उणीदुणी, एखाद्या सामाजिक मुद्दय़ाची भावोत्कट मांडणी आदी ग्रामोद्योगांत मग्न होते त्या काळात गोविंदराव मराठी वाचकांना आंद्रे साखारॉव्ह, बोरीस पास्तरनाक, आर्थर कोस्लर, स्टीफन झ्वेग अशा एकापेक्षा एक पाश्चात्त्य रत्नलेखनाची ओळख करून देत. गोविंदराव त्या अर्थाने त्या काळचे आणि त्या वातावरणातलेही नव्हते. त्यामुळे ह. रा. महाजनी, विद्याधर गोखले, दि. वि. गोखले, अनंतराव भालेराव, रंगा वैद्य असे मोजकेच काही सोडले तर गोविंदरावांनी जवळीक साधावी असे तत्कालीन मराठी पत्रकारितेत फार कोणी त्या वेळी नव्हते. त्यामुळे शामलाल, गिरिलाल जैन, निखिल चक्रवर्ती, एन. राम अशा राष्ट्रीय स्तरावरील संपादकांतच ते अधिक रमत. समृद्ध वाचनाने आलेल्या बौद्धिक श्रीमंतीचा गोविंदरावांना अभिमान होता आणि त्यामुळे अशा जातीच्या रावबहादुरी उमरावासारखेच त्यांचे वागणे असे. लोकप्रिय होण्याचा सोस नाही आणि कोणास काय वाटेल याची पत्रास ठेवण्याचे कारण नाही, असा त्यांचा खाक्या. त्याचमुळे फुटकळ मालिका आदी लिहिण्यात धन्यता मानणाऱ्या आणि लेखनबाह्य़ उचापतींसाठीच ओळखल्या जाणाऱ्या संपादकासमवेत व्यासपीठावर बसण्यास त्यांनी नकार दिला होता आणि दुसऱ्या एका संपादकाच्या बहुचर्चित ग्रंथाचे वर्णन त्यांनी ‘बालवाङ्मय’ असे केले होते.

मराठीस बुद्धिवादाची एक समृद्ध परंपरा आहे. गोविंदरावांच्या रॉयवादामुळे या परंपरेस वेगळीच धार आली. त्या वेळी महाराष्ट्रात मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तर्कवादाचे पाईक असे अनेक थोर होऊन गेले. ह. रा. महाजनी, गोविंदभाई परिख, इंदुमती परिख, व्ही. एम. तारकुंडे आणि अशा सगळ्यांचे अग्रणी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे गोविंदरावांचे निकटवर्ती. ही एकापेक्षा एक व्यासंगी मंडळी. तर्ककठोरता हा त्यांच्या विचारांचा गाभा. कोणत्याही विषयाचे विश्लेषण करावयाचे ते भावनेस चार हात दूर ठेवून हे या सगळ्यांचेच वैशिष्टय़. गोविंदरावांत हे गुण संपादक या नात्याने पुरेपूर मुरलेले होते. त्यामुळे विषय आंतरराष्ट्रीय असो की राष्ट्रीय. वॉटरगेटसारखे प्रकरण असो की आचार्य विनोबा भावे यांच्यासारख्या आदर्शाच्या वर्तनाची चिकित्सा असो. गोविंदरावांच्या बुद्धिवादास भावनेने कधीही आडकाठी आणली नाही. त्याचमुळे आणीबाणीची भलामण करणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांचा समाचार गोविंदराव ‘सूक्ष्मातील विनोबा, स्थूलातील आपण’ अशा अग्रलेखाद्वारे घेऊ शकले. रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांनी संघाच्याच ऑर्गनायझर साप्ताहिकात समान नागरी कायद्यास विरोध करणारी मुलाखत दिली. गोविंदरावांनी त्यावर भाष्य करताना तत्कालीन सरसंघचालकांना ‘लीगबंधू गोळवलकर’ असे संबोधले. सत्तरच्या दशकात दलित चळवळ हा मोठा नाजूक आणि प्रक्षोभक विषय होता. देशात दलितांविरोधात काहीही घडले की त्याचे पडसाद सर्वदूर उमटत आणि समस्त दलित आणि त्यांना सहानुभूती देणारे नेतृत्व समाजास वेठीस धरत असे. दलित लेखक, नेते यांच्यावर टीका करणे हे त्या वेळी जवळपास दुरापास्तच होते. परंतु गोविंदरावांनी त्या विषयावर ‘सत्याग्रह की आततायीपणा?’ असा थेट प्रश्न विचारण्याचे धाडस त्या वेळी दाखवले. यातील अनेक व्यक्ती गोविंदरावांच्या व्यक्तिगत स्नेहातील होत्या. परंतु हा व्यक्तिगत स्नेह गोविंदरावांच्या व्यावसायिक कर्तव्याच्या आड कधीही आला नाही. रामराव आदिक वा देवकांत बारुआ यांच्यावरील गोविंदरावांचे अग्रलेख याचे उदाहरण ठरावे. आदिक हे वैयक्तिक आयुष्यात गोविंदरावांचे चांगले मित्र होते. परंतु जर्मनीतून परतताना विमानात रामराव आदिक यांच्या हातून काही नको ते घडले. त्याचा इतका कडवा समाचार गोविंदरावांनी घेतला की आदिक यांच्या शत्रूसदेखील हे साध्य झाले नसते. बारुआ यांचेही तसेच. या माणसाचा ग्रंथसंग्रह अचंबित करणारा होता आणि ते गोविंदरावांच्या ग्रंथस्नेही वर्तुळातील होते. परंतु काँग्रेसप्रमुख या नात्याने बारुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ असे लांगूलचालनी विधान केले आणि गोविंदरावांनी त्यांना झोडपले. परंतु आपल्या ग्रंथविषयक पुस्तकात याच बारुआ यांच्या महाप्रचंड ग्रंथसंग्रहाविषयी त्यांनी कौतुकानेही लिहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील त्यांच्या वैयक्तिक स्नेहींपैकी. इतके की १९९५ साली सेना भाजपची सत्ता आली असता बाळासाहेबांनी मुख्यमंत्री कोणास करावे यावर गोविंदरावांशी चर्चा केली होती. परंतु म्हणून सेनेच्या राजकारणावर कोरडे ओढताना गोविंदरावांनी कधीही हात आखडता घेतला नाही.

हे त्या काळचेच एका अर्थाने वैशिष्टय़. अलीकडे ज्याचा उच्चार शिवीसारखा केला जातो त्या उदारमतवादी, म्हणजेच लिबरल, विचार घराण्याचे गोविंदराव पाईक. या मुद्दय़ावरही गोविंदरावांचा परीघ हा त्या वेळच्या मराठी संपादकांपेक्षा किती तरी मोठा होता. मिनू मसानी, नानी पालखीवाला, बॅ. तारकुंडे अशी अनेक एकापेक्षा एक मातबर मंडळी त्यांना कार्यालयात भेटावयास येत. वास्तविक हे आणि असे सर्वच मराठी वाचक असण्याची शक्यता कमीच. परंतु या भाषिक मर्यादा ओलांडून जाण्याची क्षमता गोविंदरावांत होती आणि त्या त्यांनी ओलांडल्याही. आणीबाणीच्या काळात भूमिगत असताना जॉर्ज फर्नाडिस काही काळ गोविंदरावांच्या घरी राहिले होते. एस. एम. जोशी, मधु लिमये, मधु दंडवते असे अनेक साथी गोविंदरावांच्या स्नेहवर्तुळातील. पण तरीही त्यांनी समाजवाद्यांची यथेच्छ टिंगल केली. आर्थिकदृष्टय़ा गोविंदराव उजवे होते परंतु सांस्कृतिकदृष्टय़ा ते डाव्यांत बसत. याचा अर्थ भांडवलशाही व्यवस्थेत समाजाचे भले आहे असे ते ठामपणे मानत आणि भांडवलशाही वर्तमानपत्रांचे संपादक म्हणून हिणवणाऱ्यांचा ते कठोर समाचार घेत. परंतु त्याच वेळी सांस्कृतिक आणि धार्मिक उजवेपण यांचा गोविंदरावांना कमालीचा तिटकारा होता. रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेले दि. वि. गोखले, सावरकरवादी विद्याधर गोखले,   स. ह. देशपांडे, म्हैसाळ प्रयोगकर्ते मधुकर देवल अशा अनेकांशी त्यांचा व्यक्तिगत संबंध होता. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशीही त्यांचा चांगला दोस्ताना होता. परंतु असे काही सन्माननीय अपवाद वगळता उजव्यांच्या कर्कश, तर्कशून्य आणि मागास राजकारणाचे ते वाभाडे काढीत. या देशात मध्यममार्गी भूमिका घेतल्याखेरीज सर्वसमावेशक राजकारण करताच येणार नाही, असे ते मानत. विचाराने आधुनिक असलेल्या गोविंदरावांना नेहरूवादाचे आकर्षण नसते तरच नवल. पं. नेहरूंच्याही आधीचे मोतीलाल, चक्रवर्ती राजगोपालाचारी आदींच्या स्वराज पक्षाशी गोविंदरावांची वैचारिक नाळ जुळती होती. गोविंदराव कमालीचे नास्तिक होते आणि वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांनीही त्यांना कधी देवभक्त वगैरे बनवले नाही. अमेरिकेत स्थायिक झाल्यावर अनेकांना देवधर्माचा पुळका येतो. गोविंदरावांचे शेवटपर्यंत तसे झाले नाही. आपण बरे आणि आपले वाचन बरे, असेच त्यांचे वर्तन होते. याचा अर्थ समाजात मिसळण्यास त्यांचा विरोध होता असे नाही. परंतु टवाळ्या करीत निर्थक हिंडणे त्यांना मंजूर नव्हते. जवळचे वैयक्तिक गुरू ह. रा. महाजनी, मित्र विद्याधर गोखले यांच्या आग्रहासाठी पिला हाऊसमध्ये विठाबाईची लावणी असो वा म्हैसाळ प्रकल्प असो. गोविंदरावांनी आवश्यक भेटीगाठीस कधीच नाही म्हटले नाही. अगदी अलीकडे अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्य़ूस्टन येथून ओहायोमधील क्लीव्हलँड येथे स्थलांतर करताना वाटेत वाकडी वाट करून गोविंदराव थॉमस जेफरसन यांचे घर आणि ग्रंथसंग्रह पाहण्यासाठी गेले. इतकी ज्ञानलालसा त्यांच्या ठायी होती.

हे त्यांचे आणखी एक वेगळेपण. गोविंदरावांसाठी संपादकपद हे नैमित्तिक होते. पण ग्रंथवाचनाचे तसे नाही. गोविंदराव पूर्णपणे ग्रंथोपजीवी. नगरपालिकेच्या शाळेत शिकून पुढे विविध क्षेत्रांत पांडित्य गाठणाऱ्यांची एक पिढी आपल्याकडे होऊन गेली. गोविंदराव त्या पिढीचे. शब्दश: शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे वाचन सुरू होते आणि नवनवीन पुस्तके मिळवून वाचण्याची त्यांची इच्छा कायम होती. वयाच्या नव्वदीत साधारणपणे आता काय राहिले आपले.. असा सूर असतो. गोविंदरावांच्या वाटय़ास तो सूर कधीही गेला नाही. भाषेविषयी कमालीचे संवेदनशील हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय़. त्यांच्या अग्रलेखांच्या मथळ्यांवरून त्यांच्या भाषासौष्ठवाचा अंदाज यावा. ‘विचारवंतांचे योगवाशिष्ठ’, ‘ग्रंथपाल की शिशुपाल?’, ‘शालिनीबाईंची खंडणी’, ‘अखेर गाढव उकिरडय़ावर गेले’, ‘नमन नटवरा’, ‘कडा कोसळला’, ‘मोहिते यांचे जांभुळझाड’, ‘यशवंतराव वीसकलमे’, ‘पुण्यश्लोक नामजोशी’, ‘समाजवादी लक्षभोजने’ अशी किती उदाहरणे द्यावीत! या अशा संवेदनशील भाषाजाणिवेमुळे गोविंदराव स्वत:चे लेखन छापून येताना कमालीचे साशंक असत. भाषेची हेळसांड त्यांना खपत नसे आणि ते करणारी व्यक्ती त्यांच्या नजरेतून कायमची उतरत असे.

गोविंदराव आयुष्यभर पाश्चात्त्य उदारमतवादाचे पूजक राहिले. तेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान. जवळच्या मित्रमंडळांत त्यांचा उल्लेख लॉर्ड गोविंदराव असा केला जाई इतके ते विचाराने पाश्चात्त्य होते. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि अर्थातच भारत आदी ठिकाणच्या वाढत्या असहिष्णुतेने ते अस्वस्थ होत. जगभरातली बदलती राजकीय संस्कृती हा त्यांच्या चिंतेचा विषय होता आणि ते ती चिंता उघडपणे व्यक्त करीत. भारतातील अलीकडच्या निवडणुका आणि नंतरच्या काही राजकीय नेमणुका ही त्यांची शेवटची वेदना. या बदलत्या राजकीय विचारधारेशी जुळवून घेणे त्यांना दिवसेंदिवस अशक्यप्राय वाटू लागले होते. स्टीफन झ्वेग हा त्यांच्या आवडत्या लेखकांपैकी एक. सुरुवातीला अनेकांना आवडणारा राष्ट्रवाद पुढे कसा फॅसिस्ट वळण घेतो याचा तो भाष्यकार. हिटलरच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रसार पाहून तो ऑस्ट्रिया सोडून ब्रिटनच्या आश्रयाला जातो आणि एकंदरच नाझीवादाचा प्रसार पाहून अमेरिका आणि मग ब्राझीलमधे स्थलांतर करतो. तेथून युरोपकडे पाहताना वातावरणातील वाढती असहिष्णुता त्यास अस्वस्थ करते. या वातावरणात उदात्त आणि उदारमतवादी युरोपचे काय होईल या विचाराने त्यास इतके नैराश्य येते की तो आपले आयुष्य संपवतो. मृत्यूसमयी त्याने लिहून ठेवलेले पत्र वाङ्मयात अजरामर झाले आहे. ‘बौद्धिक आनंद आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा उपभोग घेता येत आहे, त्याच वेळी निघालेले बरे. आता वेळ झाली,’ हे झ्वेग याचे शेवटचे शब्द होते. एका अस्वस्थ क्षणी प्राण त्या थकलेल्या कुडीचा निरोप घेत असताना गोविंदरावांना झ्वेग आठवला असेल का? त्यांचा लाभलेला स्नेह सांगतो की या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल. या मनस्वी प्रकांड विद्वानास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.