दू ध एकदा विरजायला सुरुवात झाली की ती प्रक्रिया थांबवताही येत नाही आणि उलटेही जाता येत नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे हे असे झाले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदांतून जी मळमळ बाहेर पडली ती पाहता या दोन्ही पक्षांना यापुढे त्यातून सुगंध येत असल्याचा आभास निर्माण करत आपला संसार सुरू ठेवता येणार नाही. तसा त्यांनी प्रयत्न केलाच तर तो राजकीय व्यभिचारच असेल. खरे तर इतकी वष्रे तो तसाच सुरू होता. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे असे सुचवत आम्ही याही आधी उभय पक्षांतील युती नामक खोटेपणा दाखवून देत आलो. त्या वेळी ‘असे काही नाही, आमचे किती छान,’ असे प्रदर्शन करण्यात दोघेही मनमग्न राहिले आणि जनतेची दिशाभूल करीत राहिले. पण हा खोटेपणा फार काळ आणखी रेटता येणे शक्य नव्हते. तसेच झाले. फडणवीस आणि ठाकरे यांच्या पत्रकार परिषदांतून शुक्रवारी हेच दिसले. आता या दोघांनी आणखी एक करावे.

उघड काडीमोड घ्यावा आणि हा जोरजबरदस्तीचा संसार संपवावा. ती घटिका आता समोर येऊन ठेपली आहे. हे दोन्ही पक्ष आता आणखी नाटक करू शकत नाहीत. केले तर ती महाराष्ट्राशी प्रतारणा ठरेल. ते होऊ देता नये. त्यासाठी ठाकरे यांनी भाजप सरकारातून बाहेर पडावे. इतके वाईट बोलायचे आणि केंद्रात एक भुक्कड मंत्रिपद कवटाळून बसायचे, हे मर्द महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्यांना शोभणारे नाही.

तेव्हा हे दोन पक्ष एकत्र येणार नसतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आणण्याचा काही वावदुकांचा प्रयत्न असल्याचे दिसते. हा पर्याय पहिल्यापेक्षा अनसíगक आणि विकृत असेल. बाबरी मशीद पाडल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांच्या मांडीस मांडी लावून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बसणार काय? या आघाडीचे अध्वर्यू शरद पवार यांनी ‘आम्हाला जनादेश नाही,’ असे विधान केले होते. त्यास त्यांनी जागावे.

तेव्हा अशा परिस्थितीत आधी या दोन पक्षांनी काडीमोड घ्यावा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि फेरनिवडणुका घ्याव्यात. यापेक्षा अन्य कोणताही पर्याय हा लोकशाहीची चेष्टा असेल. ती टाळण्यासाठी इतका खर्च हा काही फार नाही.

जाता जाता : मतदार राजकीय पक्षांना कसे आपटवतात हा सगळ्यांसाठी धडा आहे. ‘सारेच जमिनीवर’ असणे केव्हाही चांगलेच.