विजय मल्याने गौप्यस्फोट केल्यानंतर आमचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, हे दाखवण्याची स्पर्धा राजकीय पक्षांत सुरू  झाली असून ती केविलवाणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय मल्या याच्यावरून सध्या जे काही सुरू आहे ते आपल्याकडे उद्योगपती आणि राजकारणी यांतील संबंध कसे अपारदर्शी आणि अप्रामाणिक आहेत याचे निदर्शक आहेत. इंग्लंडला पळून जाण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो, असा गौप्यस्फोट मल्या याने केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नव्याने धुळवड सुरू झाली असून आपला आणि या वादग्रस्त उद्योगपतीचा काहीच कसा संबंध नाही, हे दाखवण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न सुरू आहे. तो अगदीच केविलवाणा म्हणावा लागेल. विजय मल्या हे आपल्याकडचे एक सर्वपक्षीय पाप आहे. अशी सर्वपक्षीय शांत केल्याखेरीज मल्या याच्यासारखी बांडगुळे आपल्या देशात वाढू शकत नाहीत.

मल्यास उद्योगाचे बाळकडू तीर्थरूपांकडून मिळाले. विठ्ठल मल्या हे मूळ उद्योजक. विजय मल्या याच्यासाठी आधी दुभती गाय आणि नंतर दौलतजादा करण्याचे साधन असलेली युनायटेड ब्रुवरीज ही कंपनी त्यांनी स्थापन केली. वडिलांच्या पश्चात ही कंपनी विजय मल्या याच्याकडे आली आणि नंतर त्याचे घोडे चौखूर उधळले. ही कंपनी जरी विजय मल्या याने इमानेइतबारे चालवली असती तरी त्याचे उत्तम चालले असते. कारण भारतीय मद्य बाजारावर या कंपनीची जवळपास मक्तेदारी होती. बीअर आणि अन्य मद्यनिर्मिती हे आपल्याकडे टांकसाळीवर नियंत्रण असल्यासारखे असते. मद्याबाबत एकंदरच उच्च दर्जाची सामाजिक दांभिकता आपल्याकडे असल्याने हा सगळा व्यवहार चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला असा. या कंपनीची किंगफिशर नामक बीअर ही त्या वेळीदेखील ५२ देशांत निर्यात होत असे आणि भारतीय बाजारात निम्म्याहून अधिक वाटा तिचा असे. केवळ उत्पादनाचा आकार या मुद्दय़ावर युनायटेड ब्रुवरीज ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मद्यनिर्मिती कंपनी होती. व्यवहार मद्याचा आणि तो चालवणारा विजय मल्यासारखा रंगढंगी इसम. तेव्हा सगळेच जोमात चालले नसते तरच नवल. विजय मल्या हे नाव प्रकाशात आले ते त्याने शॉ वॉलेस ही तेव्हाची दुसरी एक मद्यनिर्मिती कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर. तो आपल्याकडच्या फेरा नामक परकीय चलन नियंत्रण कायद्याचा काळ. हा कायदा हे काँग्रेसच्या भोंगळ समाजवादी अर्थविचाराचे फळ. त्या कायद्याने परकीय चलनावर नियंत्रण आले आणि ते रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवान्याखेरीज मिळत नसे. परंतु परकीय चलनावर नियंत्रण आहे म्हणून उद्योगपतींना ते मिळत नव्हते असे नाही. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने ते मिळवता येत असे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची मर्जी ही अनेक उद्योगांची गुरुकिल्ली असे. त्यात काही कमीजास्त झाल्यास कारवाई अटळ. विजय मल्यांचा शॉ वॉलेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्या वेळी मनु छाब्रिया या दुसऱ्या वादग्रस्त उद्योगपतीमुळे डोळ्यात आला. त्या वेळी या मल्यास पहिल्यांदा सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईस सामोरे जावे लागले.

अशा कारवाईतून सुटायचे कसे याचेही काही आडाखे आपल्याकडे ठरलेले असतात. त्याप्रमाणे मल्या सुटला आणि पुढे उधळला. मद्य हा व्यवसाय तो करणारा आणि सरकारी नियंत्रक या दोघांसाठी फायदेशीर असतो. कारण त्यावरील अबकारी कर हा मद्य निर्माते आणि सरकारातील संबंधित यांच्यातील सौहार्दाच्या संबंधांचा धागा. मल्या याचे असे सौहार्दाचे संबंध सर्व पक्षीय सरकारांशी होते. त्यातूनच त्याचे प्रस्थ वाढत गेले आणि मल्या बघता बघता गुलछबू, उडाणटप्पू जगण्याचे प्रतीक बनला. फॉम्र्युला वन संघाची मालकी, भूमध्य समुद्री बेटांवरचा दौलतजादा, आयपीएलचा संघ, दक्षिण आफ्रिकेत बडे राजकारणी, उद्योजक आदींच्या साक्षीने रंगवलेल्या रंगिल्या राती आणि एकूणच तृतीयपर्णी जगणे असे मल्याचे आयुष्य. भोगवादाचे विकृत स्वरूप म्हणजे मल्या. तो दिवसेंदिवस वाढतच गेला. कारण आपल्याकडील कुडमुडी भांडवलशाही. हे कमी म्हणून की काय हा गृहस्थ विमानसेवेच्या क्षेत्रात उतरला. मद्यनिर्मिती आणि विमान कंपनी चालवणे हे दोन व्यवसाय परस्परविरोधी गृहीतकांवर चालतात. मद्याच्या क्षेत्रातील उधळपट्टी दामदुप्पट वसूल करता येते. पण विमान कंपनी मात्र पै पै वाचवून चालवायची असते. कारण त्यात नफ्याची उसंत तितकी नसते. मल्याने हा फरक लक्षात घेतला नाही आणि भोजन समारंभात उधळपट्टी करावी तद्वत त्याने विमान कंपनी चालवली. विमानसेवा कंपन्या हा बुडीचा इतिहास आहे. त्यामुळे मल्या याची किंगफिशर एअरलाइन्स बुडू लागली यात काही नवल नाही. परंतु तरीही आपले राजकीय कौशल्य पणाला लावून तो बँकांकडून कर्जे मिळवत राहिला. बँक अधिकाऱ्यांनी मल्या याची मर्जी राखण्यासाठी त्यास कर्जे द्यायची आणि त्या बदल्यात मल्याने राजकारण्यांकडे बँक अधिकाऱ्यांसाठी रदबदली करायची असा हा व्यवहार होता. तो सुरळीत सुरू होता कारण त्याच्या दरबारात सर्वपक्षीय राजकारणी आणि बँक, सरकारी अधिकारी अशा दोघांचीही ऊठबस असे. तो किती प्रभावशाली होता ते त्याच्या राजकीय प्रवासावरून कळावे.

जनता दल, भाजपचे नैतिक राखणदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या जनता पार्टीचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, काँग्रेस आणि देवेगौडा यांच्या निधर्मी जनता दलाच्या पाठिंब्याने राज्यसभा सदस्य आणि नंतर पुन्हा निधर्मी जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्या पाठिंब्याने राज्यसभा खासदारकी असा त्याचा देदीप्यमान राजकीय प्रवास. संसदेत ज्येष्ठांच्या सभागृहाचा सन्मान्य सदस्य असतानाही त्याचे नामांकित तृतीयपर्णी उद्योग सुरूच होते. ते सुरू होते त्या वेळी एकाही पक्षाच्या..यात नवनैतिक भाजपही आला.. एकाही महाभागाने त्याच्या उद्योगावर एकही प्रश्न उपस्थित केला नाही. त्याचे दिवस भरण्यास सुरुवात झाली ती रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्टेट बँकेला दट्टय़ा दिल्यानंतर. बँकेने आपली बुडीत कर्जे जाहीर करावीत यासाठी दडपण आल्यानंतर मल्या याचे आतबट्टय़ाचे उद्योग जगासमोर आले. त्यानंतर तो गाळात जाण्यास सुरुवात झाली. म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेचा दट्टय़ा नसता तर बँकांनी पुनर्रचनेच्या नावाखाली त्याची बुडती कर्जे दडवलीच नसती असे नाही. आता मल्या बुडल्यानंतर मात्र आमचे कसे त्याच्याशी संबंध नाहीत, हे दाखवण्याची स्पर्धा राजकीय पक्षांत सुरू झाली आहे. ती मल्यासारख्या उद्योगपतीपेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या अप्रामाणिकपणाची निदर्शक आहे.

कोणत्याही प्रदेशातील दरवडेखोरी ही जशी त्या प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांच्या छुप्या पाठिंब्याखेरीज चालूच शकत नाही तसेच बँका लुटणे आणि नंतर सुखेनैव पळून जाणे हे सरकारी आशीर्वादाखेरीज केवळ अशक्य ठरते. मल्या याची बँकिंग पापे निश्चित काँग्रेसच्या काळातील. परंतु त्यास सुखरूप पळून जाऊ देण्याचे पाप तितकेच निश्चित भाजपचे. त्याची बँकलुटी ही जशी तत्कालीन काँग्रेसच्या काणाडोळ्यामुळेच शक्य झाली तसेच त्याचे पळून जाणे नि:संशय विद्यमान सत्ताधीश भाजपच्या पाठिंब्यानेच घडून आले यात शंका नाही. १० मार्च २०१६, १२ मार्च आणि १४ मार्च अशा तीन वेळा जेटली यांना संसदेत मल्याच्या पलायनासंदर्भात विचारले गेले. त्या तीनही वेळी काँग्रेसच्या काळात ललित मोदी वगैरे कसे पळाले हे सांगण्यातच त्यांनी धन्यता मानली. नंतर पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान मोदी यांनाच या संदर्भात विचारले गेले. मल्या पळून जाण्याआधी जेटली यांना भेटला याची माहिती जेटली यांनी पंतप्रधानांना दिली का, हा प्रश्न होता. त्याही वेळी भाजपचा प्रतिसाद होता काँग्रेसच्या काळात कोण कोण पळाले हे विचारणे. अशा अनेक प्रकरणांत काँग्रेसने किती पापे केली, हे देश जाणतोच. तेव्हा मल्याच्या मुद्दय़ावर खरे तर आपण वेगळे काय केले हे जेटली आणि भाजप यांनी सांगणे अपेक्षित होते. विशेषत: मल्याच्या मागावर असणाऱ्या तीनपैकी दोन यंत्रणा थेट जेटली यांच्या नियंत्रणात आहेत. तेव्हा जेटली यांनी वकिली चातुर्य दाखवत हा विषय टाळण्याऐवजी नैतिकतेचे दर्शन घडवले असते तर भाजप हा काँग्रेसपेक्षा वेगळा आहे हे सिद्ध झाले असते. भाजपने ही संधी गमावली. कारण ती त्यांना साधायचीच नव्हती. कारण त्यासाठी आवश्यक तो प्रामाणिकपणाच भाजपकडे नाही. पुढे केंद्रीय गुप्तचर खात्याने त्याच्याविषयी पातळ केलेला इशारादेखील हेच दर्शवतो. अवघड जागी, नको त्या उद्योगात पकडले गेल्यावर एखाद्याने ‘मी नाही त्यातला, दरवाजा लावा आतला’ असा कांगावा करावा तसे भाजपचे झाले आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या तोंडास येणारी किंगफिशरची दरुगधी कितीही मुखवास खाल्ला तरी लपणारी नाही.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya arun jaitley
First published on: 17-09-2018 at 01:59 IST