विराटने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये खोऱ्याने धावा केल्याच, पण आपले नेतृत्वगुणही सिद्ध केल्याने त्याची दखल आयसीसीला घ्यावीच लागली..

वर्षांतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, वर्षांतील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू, वर्षांतील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू असे तिन्ही पुरस्कार विराट कोहलीने एकाच वर्षी जिंकून इतिहास घडवला. दरवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून इतर पुरस्कारांची घोषणाही होतच असते. यंदा हे इतर (खरे म्हणजे तितकेच महत्त्वाचे) पुरस्कार कोणी जिंकले, असे विचारल्यावर भलेभले क्रीडा पत्रकारही गुगलकडे वळतील! याचे प्रमुख कारण विराटचे कर्तृत्व आणि त्याच्याविषयीच्या आकर्षणाने माध्यमविश्व (नवमाध्यमांसह) पूर्णपणे झाकोळले गेले आहे. विराट कोहलीचे चाहते जगभर प्रचंड संख्येने आहेत आणि जगभर मोठय़ा संख्येने चाहत्यांचा आणि क्रिकेटपटूंचा तो  नावडताही आहे. त्याच्या या अफाट प्रभावाचा परामर्श जरा नंतर घेऊ. सुरुवातीला क्रिकेटपटू विराटविषयी थोडेसे.

२०१८ या कॅलेंडर वर्षांत विराटने १३ कसोटी सामन्यांमध्ये ५५.०८च्या सरासरीने पाच शतकांसह १३२२ धावा केल्या. याशिवाय १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३३.५५च्या सरासरीने त्याने सहा शतकांसह १२०२ धावा जमवल्या. केवळ फलंदाजीतली ही कामगिरी विराटला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी असलेला गारफील्ड सोबर्स पुरस्कार बहाल करण्यास पुरेशी ठरली. आजच्या घडीला कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०च्या वर सरासरी असलेला तो एकमेव फलंदाज आहे. २०१८ मध्ये कोहलीने जमवलेल्या धावा का मोलाच्या, तर विराटने त्या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध त्यांच्याच मैदानांवर बहुसंख्येने जमवल्या, म्हणून. या तीन पुरस्कारांसह विराट आयसीसी कसोटी संघ २०१८ आणि आयसीसी एकदिवसीय संघ २०१८ या काल्पनिक संघांचा कर्णधारही ठरला. म्हणजे एकीकडे धावा जमवत असताना, विराटच्या नेतृत्वगुणांची दखलही आयसीसीला घ्यावी लागली. विराटच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३९ शतके आता जमा झाली असून, सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रम तो मोडेल, अशी दाट शक्यता आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने आतापर्यंत २५ शतके झळकावली आहेतच. मोजक्याच भारतीय कर्णधारांच्या नावावर काही लक्षणीय पहिलेवहिले विजय नोंदवले गेले आहेत. मन्सूर अली खान पतौडी (पहिल्यांदा परदेशी भूमीवर कसोटी मालिका विजय, वि. न्यूझीलंड १९६९), अजित वाडेकर (पहिल्यांदा वेस्ट इंडीज आणि इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत कसोटी मालिका विजय, १९७१), कपिलदेव निखंज (पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक विजय, १९८३), सौरव गांगुली (पहिल्यांदा पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या भूमीवर कसोटी मालिका विजय, २००४) महेंद्रसिंग धोनी (पहिल्यांदा टी-२० विश्वचषक विजय, २००७) या यादीमध्ये आता विराट कोहलीचे नावही दाखल झाले आहे. गेल्या ७२ वर्षांमध्ये भारताला कधीही साधला नव्हता, असा ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका विजय त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने यंदा साकारला. गेल्या वर्षभरात भारताच्या तीन परदेशी कसोटी मालिकांपैकी विराटला सर्वाधिक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनेच झपाटले होते. त्यातही ऑस्ट्रेलियाचे दोन प्रमुख क्रिकेटपटू – कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर- चेंडू खरवडल्याप्रकरणी वर्षभरासाठी निलंबित झाल्यानंतर कमकुवत झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाला नेस्तनाबूत करण्याची संधी विराट सोडणार नव्हता. ही मालिका जिंकल्यानंतर विराटने जी विधाने केली, त्यात त्याच्या कसोटी क्रिकेटविषयीच्या भावना अधोरेखित झाल्या.

कसोटी क्रिकेट हाच सर्वाधिक महत्त्वाचा आणि खेळाडूची खऱ्या अर्थाने कसोटी पाहणारा प्रकार असल्याचे विराटने ठासून सांगितले. या क्रिकेटचा सन्मान भारतीय क्रिकेटपटूंनी करायलाच हवा. तसे झाल्यास कसोटी क्रिकेट नुसतेच जगवणे नाही, तर पुन्हा एकदा लोकप्रिय करण्याची भारताची आर्थिक ताकद आणि चाहतेव्याप्ती आहे, ही त्याची भूमिका कसोटी क्रिकेटच्या चाहत्यांना सुखावणारी ठरली. हे केवळ शब्द नव्हेत. भारतीय संघ आज जगात कुठेही कसोटी क्रिकेट खेळत असला, तरी मैदानांमध्ये सर्वाधिक चाहते भारतीय वंशाचे असतात. त्यामुळे त्या-त्या क्रिकेट मंडळांनाही तिकीटविक्रीची चिंता भेडसावत नाही. नाही तरी भारतीयांना उद्योग काय असतो किंवा क्रिकेटशिवाय भारतीयांना काय आवडते वगैरे फुटकळ, बालिश कोटय़ांची दखलही घेण्याची गरज नाही. हे प्रेक्षक तिथे जातात, कारण त्यांना जिंकणाऱ्या भारतीय संघाची सवय लागली आहे. ही सवय त्यांना विशेषत्वाने गेल्या दशकात सचिन-सौरव-राहुल-सेहवाग-झहीर-कुंबळे यांच्या पिढीने लावली हे नि:संशय. कारण त्या दशकात भारतीय संघाने परदेशी मैदानांवर जितके विजय मिळवले, तितके ते इतर कोणत्याही दशकात मिळवले नव्हते. ते सातत्य धोनीच्या संघाला बाळगता आले नाही, कारण मुख्यत्वे त्याला तितक्या प्रतिभेचे फलंदाज मिळेनासे झाले. पण फलंदाज (अजूनही) मिळत नसले, तरी प्रतिस्पध्र्याचे २० गोलंदाज गारद करू शकतील, असे गोलंदाज हेरणे, मिळवणे, त्यांना प्रोत्साहन देणे यावर कोहलीने लक्ष केंद्रित केले. हे करताना काही स्वातंत्र्य आणि मोकळीक आवश्यक होती.

या काळात कोहलीच्या पथ्यावर पडलेली आणखी एक बाब म्हणजे, बऱ्याच अवधीनंतर भारतीय क्रिकेट मंडळावर एखादा सर्वशक्तिमान पूर्णवेळ अध्यक्ष नाही! भारतीय क्रिकेटचा कारभार सध्या प्रशासकांमार्फत चालवला जातो. त्यामुळे कर्णधार किंवा व्यवस्थापकावर विशिष्ट खेळाडूचा आग्रह वगैरे धरण्याचा कोणताही दबाव नाही. यातूनच कोहलीला अनिल कुंबळेऐवजी रवी शास्त्री असा पसंतीचा प्रशिक्षक/व्यवस्थापक लाभला. त्या वेळी त्याच्यावर भरपूर टीका झाली. परंतु अशा प्रकारे कर्णधार किंवा संघातील प्रमुख क्रिकेटपटूंना मानवणारा प्रशिक्षक मिळणे (जॉन राइट, गॅरी कर्स्टन) किंवा नावडत्या प्रशिक्षकाला नारळ मिळणे (ग्रेग चॅपेल) भारतीय क्रिकेटसाठी नवी बाब नाही. विराटचा प्रभाव आणि आग्रहामुळेच रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमरा, ऋषभ पंत, कुलदीप यादव असे टी-२० क्रिकेटमध्ये सुरुवातीला दाखल झालेले क्रिकेटपटू आज कसोटी संघातून खेळण्यासाठी धडपडतात आणि कसोटी क्रिकेटमधील कर्तृत्व अभिमानाने मिरवतात. हे होत असताना इशांत शर्मा आणि चेतेश्वर पुजारा अशा निव्वळ कसोटीच खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या प्रतिष्ठेशी प्रतारणा होणार नाही आणि तेही तितक्याच समरसतेने खेळत राहतील यासाठी ड्रेसिंग रूम आणि मैदानावर वातावरणनिर्मिती करण्याची महत्त्वाची जबाबदारी विराट पार पाडतो. क्षेत्ररक्षण करताना सर्वानी सावध आणि सजग राहिले पाहिजे, याविषयी तो हट्टाग्रही असतो. क्षेत्ररक्षण, सजगता, परदेशी मैदानांवर चांगली कामगिरी, डावपेचातले बारकावे हे गुण एकवटल्यामुळेच आज अजिंक्य रहाणे हा कसोटी संघात कायम असतोच, शिवाय विराटचा पहिल्या पसंतीचा उपकर्णधारही असतो. टी-२० आणि विशेषत: आयपीएल किंवा ऑस्ट्रेलियातील बिग बॅशसारख्या लीग्जच्या जमान्यात विराटचे हे वागणे विलक्षण आहे. टी-२०मुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटला घरघर लागली असून, कसोटी संघासाठी चांगले ११ जण जमवणेही तेथे दुरापास्त झाले आहे. तशी धूळधाण भारतीय कसोटी क्रिकेटची उडाली नाही, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. आज टी-२०, एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटला भारतात स्वतंत्र अस्तित्व, प्रतिष्ठा आणि भवितव्य आहे हा विराट कोहलीचा महिमा ठरतो. या तिन्ही प्रकारांमध्ये विराट स्वत: निष्णात आहेच, पण त्यातही कसोटी क्रिकेटविषयी (‘टी-२० पिढी’तला असूनही) त्याला विशेष ममत्व आहे. केवळ ट्रॉफ्या जिंकून नव्हे, तर परदेशी मैदानांवर सातत्याने कसोटी मालिका जिंकूनच भारतीय क्रिकेट गतकाळातील वेस्ट इंडीज किंवा ऑस्ट्रेलियन संघांप्रमाणे अढळपदाला पोहोचू शकते, हे तो बजावतो. शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य, सबुरी, चिकाटी आणि जिंकण्याची भूक या गुणांची सर्वाधिक कसोटी लागते, म्हणून ते ‘कसोटी’ क्रिकेट! येथे जो टिकेल, तो कुठेही खेळेल हा नियम विराटइतक्या तन्मयतेने कोणीही पाळताना आणि राबवताना दिसत नाही.