कंपनीने नवीन क्षेत्रे पादाक्रांत करावीत, यासाठी प्रयत्नशील असतानाच सिक्का यांना जाणे भाग पाडल्याने आता इन्फोसिसचीच कोंडी होणार आहे..

एके काळी काळाच्या पुढे असणारे प्रवासात एका जागी थांबले की कसे मागे पडतात आणि इतरांनाही कसे मागे ओढतात याचे ‘मूर्ती’मंत उदाहरण म्हणजे नारायण मूर्ती. इन्फोसिस या त्यांनी स्थापित केलेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी मूर्ती यांच्या निवृत्त्योत्तर लुडबुडीस कंटाळून अखेर राजीनामा दिला. इन्फोसिसवर ही अशी वेळ येणार हे दिसतच होते. तीन दशकांपूर्वी मूर्ती, नंदन निलेकणी, शिबुलाल आदींनी भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पहिली स्वतंत्र महाकंपनी स्थापन केली. त्या वेळी मध्यमवर्गीय आर्थिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या मूर्ती, निलेकणी यांनी आपापली पुंजी एकत्र करून भागभांडवल एकत्र करून इन्फोसिस घडवली. त्या वेळची ती मोठी घटना. याचे कारण त्या वेळी भारतात उद्योगपती कोणी व्हावे याची एक चौकट असे. उद्योगचक्र मारवाडी, उद्योग घराण्यात जन्मलेला वा पारसी कर्तृत्ववान आदींपुरतेच फिरत असे. पहिल्या पिढीचे उद्योजक त्यामुळे आपल्याकडे कमी तयार होत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने हे सारे बदलले आणि उद्योगविश्वाचे लोकशाहीकरण केले. ही अर्थसांस्कृतिकदृष्टय़ा अत्यंत मोठी घटना. केवळ कल्पना हेच भांडवल या संकल्पनेच्या विकासाची ती सुरुवात होती. ती रुजवण्याचे श्रेय निर्विवाद मूर्ती आणि निलेकणी आदींचे. त्या अर्थाने ते द्रष्टे ठरतात.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

पण तेवढेच. हे असे म्हणण्याचे कारण इन्फोसिसचा वृक्ष वाढू लागल्यावर त्याला आहे तसा वाढू देण्यापलीकडे या मंडळींनी काही केले नाही. अन्यत्र, विशेषत: अमेरिका, इस्रायल आदी देशांत नवनव्या कल्पनांचे रूपांतर मोठय़ा प्रमाणावर उत्पादनांत होत असताना इन्फोसिस ही केवळ सेवा देणारीच कंपनी राहिली. बँकिंग व्यवहारासाठी वापरले जाणारे एखादे सॉफ्टवेअर वगळता इन्फोसिसने फक्त अन्यांचे घर, उद्योग, व्यवहार आदी सांभाळण्याचेच काम केले. ती आकाराने वाढली असेल. तिची उलाढाल प्रचंड असेल. तिचा लौकिक उत्तम असेल. पण हे सारे एका मर्यादेपलीकडे गेले नाही. इन्फोसिसच्या यशाने प्रेरित होऊन तरुण अभियंत्यांच्या दोन पिढय़ा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळल्या. या तरुणांना इन्फोसिसने रोजगार निश्चित दिला. एरवी गडय़ा आपुला गाव बरा.. अशा वृत्तीच्या कुटुंबांतील हजारो तरुण/ तरुणींना अमेरिका आदी पाश्चात्त्य देशांत पाठवले. अलीकडे प्रस्थापित सुसंस्कृत घरात डॉलर हा चर्चेचा विषय असतो. अशा घरांतील तीर्थरूप डोक्यावर रंगीबेरंगी टोप्या, बम्र्युडा, डोळ्यांवर रेबॅनचे गॉगल आणि मातोश्री पायांत तीनचतुर्थाश विजारी आणि वरच्या टीशर्टखाली आपले मंगळसूत्राचे सांस्कृतिक संचित लपवत आपल्या चिरंजीवांचे वा सुकन्येचे अमेरिकीपण मिरवत असतात. याचे श्रेय अर्थातच इन्फोसिस आदी कंपन्यांना. या यशामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची साखळीच आपल्याकडे उभी राहिली आणि तरुणांच्या तीन पिढय़ा देशाच्या सीमा ओलांडून गेल्या. हे इन्फोसिस या कंपनीचे यश. आणि हीच इन्फोसिसच्या यशाची मर्यादा. याचे कारण या क्षेत्राच्या बदलाच्या अफाट क्षमतेचा कोणताही वापर नारायण मूर्ती आणि संबंधितांनी केला नाही. ते सेवा एके सेवा हेच करीत बसले. त्यामुळे गुगल, फेसबुक, ट्विटर, अ‍ॅमेझॉन, याहू अशांतील एकही भारतात जन्मले नाही. या आणि अशा सर्व कंपन्यांच्या सेवा सांभाळण्याचे काम तेवढे इन्फोसिस आणि अन्यांनी इमानेइतबारे केले. पण स्वत:ची काहीही निर्मिती केली नाही. म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चाकर तयार करण्यापलीकडे या कंपन्यांच्या हातून काहीही भव्य घडले नाही. हे मूर्ती आणि मंडळींचे थांबणे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची गती बेफाम आहे. या क्षेत्रातील वर्ष हे तीन वा चार महिन्यांचे असते आणि बदलाचा वेग मती दिपवणारा असतो. हे लक्षात न घेता या सर्वानी इन्फोसिस ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्यांची गिरणी बनवून टाकली.

हे चित्र बदलवण्याची धमक विशाल सिक्का या व्यक्तीत होती. मूर्ती यांच्यानंतर इन्फोसिसच्या संस्थापक सदस्यांकडे या कंपनीचे वडिलोपार्जित पद्धतीने प्रमुखपण आले. त्यात नंदन निलेकणी यांचा अपवाद वगळता अन्यांचे नेतृत्व या क्षेत्रातील आव्हानांच्या तुलनेत सुमार होते. म्हणून इन्फोसिस स्थितीवादी होत गेली. यानंतर तीन वर्षांपूर्वी कंपनीची सूत्रे सिक्का यांच्या हाती दिली गेली. संस्थापक सदस्यांखेरीज अन्य कोणाची या पदावर नेमणूक होण्याचा हा पहिलाच प्रसंग. सिक्का हे रअढ या जर्मन कंपनीच्या संचालक मंडळावर होते. त्या कंपनीचे संभाव्य मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. तेथून ते इन्फोसिसमधे आणले गेले. मूळ जर्मन पण खऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीतून एका भारतीय आणि फक्त भौगोलिकदृष्टय़ाच बहुराष्ट्रीय कंपनीत येणे हा त्यांच्यासाठी सांस्कृतिक बदल होता. तसाच तो इन्फोसिससाठीही होता. सिक्का पंजाबी आणि इन्फोसिसचे मूर्ती आणि प्रवर्तक दाक्षिणात्य भद्रलोकीचे. पंजाबी वृत्तीत एक रांगडा उधळा बेफिकीरपणा असतो आणि आव्हाने पेलण्याची आणि नसली तर तयार करण्याची मूलत:च रग असते. ती सिक्का यांच्यात होती. ती त्यांच्या कार्यशैलीतून जाणवत होती. हे मूर्ती आदींच्या शैलीशी पूर्णत: विसंगत होते. अशा वेळी खरे तर या दुढ्ढाचार्यानी सिक्का यांना आणि त्यांच्या बदलत्या संस्कृतीस समजून घेणे आवश्यक होते. ते झाले नाही. मूर्ती यांचे रूपांतर दरम्यानच्या काळात एका किरकिऱ्या, मध्यमवर्गीय म्हाताऱ्यात झालेले असल्याने ते सिक्का यांच्या प्रत्येक मुद्दय़ावर आक्षेप घेऊ लागले. सिक्का यांचे कॅलिफोर्निया येथून बंगलोरस्थित कंपनी हाकणे, कंपनीच्या विमानातून हिंडणे, सहकाऱ्यांना भरघोस वेतन देणे, छोटय़ामोठय़ा कंपन्या विकत घेणे आदी सारे मूर्ती यांना झेपले नाही. ते झेपणारे नव्हतेच. अशा वेळी कालाय तस्मै नम: असे म्हणत हा बदल दूरवरून पाहण्यात शहाणपणा होता. त्याच्या अभावामुळे मूर्ती ज्यात-त्यात लुडबुड करीत गेले. त्यांनी भले काटकसरीने कंपनी उभी केली असेल, परंतु म्हणून पुढच्या पिढीनेही कंदिलात रात्र घालवणे अपेक्षित नाही. ते तसे नसते. मूर्ती यांना ते समजले नाही. आपण स्थापन केलेल्या कंपनीचे हे काय होते आहे.. असे म्हणत ते गळा काढत राहिले आणि सिक्का यांच्यासाठी अडचणी निर्माण करीत गेले. इन्फोसिसच्या कार्यालयात, कंपनीत गालिच्यांची निवड करण्यापासून स्वत:चे स्वच्छतागृह स्वत:च स्वच्छ करण्यापर्यंत सर्व काही मूर्ती स्वत: करीत. परंतु पुढच्या पिढीनेही हे असेच वागायला हवे ही अपेक्षा बाळगणे हे शंभर टक्के चूक. आपल्याकडे मुळात या साधेपणा नावाच्या भोंगळ गुणाचे अवडंबर जरा जास्तच माजवले जाते. मूर्ती यांनी ते अतिच केले.

तेव्हा सिक्का यांना पायउतार होण्याखेरीज पर्यायच राहिला नाही. तरीही त्यांचे मोठेपण हे की त्यांनी कधीही मूर्ती यांच्याबाबत टीकेचे अवाक्षरही काढले नाही. मूर्ती यांची लुडबुड असह्य़ होत आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वत:च पदत्याग केला. त्यामुळे मूर्ती यांचे लहानपण अधिक मोठे झाले. यातील महत्त्वाची बाब अशी की या प्रकरणात इन्फोसिसचे संचालक मंडळ हे पूर्णत: सिक्का यांच्या बाजूने उभे राहिले. त्या सर्वानी झाल्या प्रकरणाबाबत मूर्ती यांनाच दोष दिला. तरीही मूर्ती यांना आपण चुकलो असे वाटत नाही. सिक्का यांनी इन्फोसिसच्या संस्कृतीवर घाला घातल्याची टीका ते करताना दिसतात. तो घालायलाच हवा होता. कारण संस्कृती ही प्रवाही असते. ती बदलती राहायलाच हवी. ती प्रवाही नसेल तर तिचे डबके होते. म्हणूनच इन्फोसिसने नवनव्या क्षेत्रात प्रवेश करावा असा सिक्का यांचा स्तुत्य प्रयत्न होता. यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता ही ती नवीन क्षेत्रे. त्या दिशेने कंपनीचा रोख बदलण्यास त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यास यश येताना दिसत होते.

पण मूर्ती यांच्या दळभद्री वृत्तीने आता त्यास खीळ बसेल. त्यामुळे होणारे नुकसान एकटय़ा इन्फोसिसचे नाही. ते भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे आहे. पिढीच्या संघर्षांत पुढच्याऐवजी मागच्या पिढीचीच सरशी होत असेल तर ते या क्षेत्राला मागे नेणारे आहे. सिक्का यांच्या जाण्यामुळे इन्फोसिसचीच कोंडी होणार असून तिला ना कोणी प्रयोगशील प्रमुख भेटेल ना आता कंपनी बदलण्याचा प्रयत्न होईल. हे दुर्दैवी आहे. याची पुनरावृत्ती रोखायची असेल तर प्रत्येक क्षेत्रातील दुढ्ढाचार्याचे वारंवार मूर्तिभंजन व्हायला हवे. मूर्तिपूजेतून स्थितीवादीच तयार होतात. प्रगतीसाठी मूर्तिभंजनास पर्याय नाही.