शेतकरी, सामान्य ग्राहक यांच्या हिताचे ध्येय बाळगायचे तर वॉलमार्टला यापूर्वीच भारतात येऊ द्यायला हवे होते.

तब्बल १६०० कोटी डॉलर्स मोजून भारतातील फ्लिपकार्ट विकत घेण्याच्या वॉलमार्ट या अमेरिकी कंपनीच्या निर्णयाचे स्वागत करावे की जे झाले त्याबद्दल खेद व्यक्त करावा? किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील जगातील सर्वात बलाढय़ कंपनी भारतात येणार याचा आनंद मानायचा? की वॉलमार्टला भारतात पाऊल टाकू देणार नाही, अशा वल्गना करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हा व्यवहार झाला, याबद्दल स्वदेशी खंत व्यक्त करायची? वॉलमार्टच्या मुद्दय़ावर एके काळी या देशातील स्वदेशींचा प्राण कंठाशी आला होता. आता ही कंपनी भारतात आपली सेवा सुरू करणार याचा या स्वदेशी हितरक्षकांना राग आला असेल का? की ते आपला स्वदेशी आग्रह सोयीस्कर विसरले असतील? एखादी भारतीय कंपनी परदेशी कंपनीने विकत घेण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. परंतु हा पहिलाच इतका प्रचंड व्यवहार. तेव्हा भारतीय कंपनीला इतके मोल आले याबद्दल खूश व्हायचे की जगातील बलाढय़ांसमोर भारतीय कंपनी टिकू शकली नाही, या वास्तवाची वेदना सहन करायची? जगातील सर्वाधिक माहिती तंत्रज्ञान अभियंते हे भारतात तयार होतात, याबद्दल छाती फुगवून घ्यायची? की इतके सर्वाधिक अभियंते तयार होऊनही या क्षेत्रातील एकही चमकदार, यशस्वी कल्पना भारतीय मेंदूतून निघालेली नाही, या सत्याची टोचणी लावून घ्यायची? ही फ्लिपकार्ट कंपनी यशस्वी नाही पण निदान नावाजली या सकारात्मकतेकडे पाहायचे की मुळात ही कल्पनादेखील फ्लिपकार्ट संस्थापकांनी अ‍ॅमेझॉनकडूनच चोरली होती याकडे दुर्लक्ष करायचे? फ्लिपकार्टचे प्रवर्तक हे अ‍ॅमेझॉनमध्ये नोकरीला होते. तेथून बाहेर पडून त्यांनी फ्लिपकार्ट काढली. आपली दुसरी देशी यशस्वी कंपनी ‘ओला’ हीदेखील ‘उबर’ या कंपनीच्या कल्पकतेचीच कॉपी आहे. हे म्हणजे एखाद्या प्रतिष्ठित लेखकाचे लेखनिक असणाऱ्यांनी मूळ लेखकाच्या संहितेवर नाव लावण्यासारखेच. याचा अभिमान बाळगायचा का? अशा वेळी कॉपी करण्यात आपण किती उत्तम आहोत याबद्दल मिशीवर ताव मारायचा की आपण शेवटी जुगाड करणारेच हेच सत्य यातून समोर येते याची वेदना बाळगायची?

असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारता येतील. निमित्त अर्थातच वॉलमार्ट या जागतिक किरकोळ किराणासम्राटाने आपली फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स कंपनी विकत घेतली त्याचे. भारतीय बाजारात या क्षेत्रात दोनच मोठे खेळाडू.. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट. अ‍ॅमेझॉनकडे प्रचंड भांडवलक्षमता असल्याने त्याविरोधात फ्लिपकार्ट चांगलीच धापा टाकू लागली होती. अनेकांनी या कंपनीत भांडवल ओतून तिची धुगधुगी कायम ठेवली, हे कटू असले तरी सत्य आहे. मंत्रा, जबाँग, ईकार्ट, फोनपे आदी फ्लिपकार्टच्याच उपकंपन्या. प्रसारमाध्यमांना हाताशी धरून, मोठमोठे सेल जाहीर करून या सर्वच कंपन्यांनी कमीअधिक प्रमाणात लक्ष वेधून घेतले हे खरे. पण ते तितकेच. यातील एकही कंपनी नफा मिळविण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही, हेही तितकेच खरे. कमीत कमी दर देऊन जास्तीत जास्त ग्राहक आकर्षून घेणे हेच कोणत्याही भारतीय कंपनीचे बलस्थान. मग ते दूरसंचार क्षेत्र असो किंवा ई-कॉमर्स. जे जे मोफत वा किमान किमतीत ते ते पौष्टिक हेच यांचे बाजारपेठ काबीज करण्याचे तत्त्वज्ञान. दर्जा वगैरे मुद्दे नंतर. आधुनिक म्हणवून घेणारी फ्लिपकार्ट अंतत: याच प्राचीन भारतीय मार्गाने निघालेली असल्याने तीदेखील तोटय़ातच होती. अ‍ॅमेझॉनसारख्याशी टक्कर द्यायची तर खिसा गरम असायला हवा. फ्लिपकार्टचा तो नव्हता. तेव्हा ती एका मोठय़ा तालेवार भागीदाराच्या शोधात होती.

त्याच वेळी वॉलमार्ट हा वैश्विक किराणासम्राट भारतीय बाजारपेठेचे दार ठोठावत होता. फिलिपिन्स, मेक्सिको, चीन अशा अनेक देशांत या वॉलमार्टने बाजारपेठेत होत्याचे नव्हते करून टाकले. परंतु किरकोळ किराणा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक येऊ द्यावी की न द्यावी यावरील आपला गोंधळ गेल्या १५ वर्षांत सुटण्याऐवजी अधिकच वाढलेला असल्याने या वॉलमार्टचे करायचे काय, याचा निर्णय होत नव्हता. खरे तर वॉलमार्टविरोधात वातावरण निर्माण करण्यात येथील किराणा क्षेत्र स्वत:च्या मुठ्ठीत घेऊ पाहणारे काही होते. वास्तविक वॉलमार्टच्या भारतीय बाजारपेठेतील प्रवेशात दोन घटकांचा फायदा होता. एक म्हणजे ग्राहक आणि दुसरे अन्नधान्य उत्पादक. अधिक स्पर्धेमुळे ग्राहकांचे भले झाले असते आणि अन्नधान्य साठवण क्षमता निर्माण करण्याच्या वॉलमार्ट कौशल्यामुळे अन्नधान्य उत्पादकांचे. पण येथील काहींनी हे होऊ दिले नाही. दरम्यानच्या काळात ई-कॉमर्सच्या माध्यमातून किरकोळ विक्रीचा नवाच मार्ग अ‍ॅमेझॉनने आपणास दाखवला. फ्लिपकार्टने तो अंगीकारलाच, पण असंख्य भारतीयांनीदेखील त्याचे स्वागत केले. तेव्हा यात नफा आहे हे निश्चित. स्वस्त विरोधात अतिस्वस्त याच सूत्राने हे होणार असेल तर माध्यमांतील उलाढालीचा आकार भव्य हवा. आपला तो आहे असे आपल्याला वाटते. पण वास्तव तसे नाही. संपूर्ण भारताची ऑनलाइन व्यवहारांची गतसालाची उलाढाल जेमतेम २७०० कोटी डॉलर्स इतकी आहे. त्याच वर्षांत चीनमधील अशा व्यवहारांचा आकार आहे १ लाख ११ हजार कोटी डॉलर्स इतका. यावरून आपले स्थान काय हे कळावे. अशा वेळी अ‍ॅमेझॉनशी टक्कर घेईल असा कोणी तगडा खेळाडू भारतात येणे आवश्यक होते. वॉलमार्ट ती उणीव भरून काढेल. आतापर्यंत वॉलमार्टचा भर हा प्रत्यक्ष महादुकाने काढण्याकडे आहे. ऑनलाइन व्यवहारात ही कंपनी मोठय़ा प्रमाणावर नाही. भारताने ती संधी दिल्यामुळे वॉलमार्टची ही उणीव दूर होईल. जगभरात आज वॉलमार्टची तब्बल सहा हजारांहूनही अधिक दुकाने आहेत. भारतात ते होणारे नाही. परंतु तरीही वॉलमार्टचा संचार सर्वत्र असेल. म्हणजे ज्या कंपनीला आपण भारतात पाऊल टाकू देणार नव्हतो ती कंपनी पाऊल न टाकताही भारतीय घराघरांत जाऊ शकेल.

अशा वेळी आपण आपल्या आर्थिक धोरणांचाच फेरविचार करण्याची गरज आहे. ही धोरणे कोणासाठी आखली जातात? शेतकरी, सामान्य ग्राहक यांच्यासाठी हे जर त्याचे उत्तर असेल तर आपण वॉलमार्टला आधीच भारतात येऊ द्यायला हवे होते. ते झाले नाही. परंतु आता तरी निदान आपण या व्यवहाराचे स्वागत करायला हवे. याचे कारण विविध कंपन्या, आर्थिक विचारवादी यांचे दबावगट यांच्या नादाला लागून आपण आधीच आपले बरेच नुकसान करून घेतले आहे. झाले ते झाले. परंतु येथील शहाण्या जनतेने आता तरी निदान अधिक शहाणपणा दाखवावा. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट यांच्यातील या व्यवहाराने भारतीय अर्थधोरण विचाराच्या मर्यादा जागतिक चव्हाटय़ावर आणल्या आहेत.

याचे कारण यापुढे भारतीय बाजारपेठेवर नियंत्रण असणाऱ्या दोन्ही कंपन्या अमेरिकी असतील. अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्ट. एका बाजूला यात आक्षेपार्ह वाटावे असे काही नसले तरी त्यामुळे स्वदेशी वगैरे बाता किती पोकळ होत्या हेच यातून दिसून येते. तेव्हा हा पोकळपणा मान्य करण्याचा प्रामाणिकपणा दाखवून यापुढची धोरणे तरी आपण ग्राहकस्नेही आखायला हवीत. इतका प्रांजळपणा जोपर्यंत आपण दाखवीत नाही तोपर्यंत वॉलमार्टचा भारतीय बाजारातील प्रवेश म्हणजे आपल्या अर्थधोरणांना वाकुल्याच असणार.