प्रश्न असांजची नजरकैद, संभाव्य अटक आणि आरोप एवढाच नाही.. असांजसारख्याचे काय होते हाही आहे..
ज्या ज्या व्यक्ती व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहतात त्यांना नमवण्याचा, संपवण्याचा हरतऱ्हेचा प्रयत्न व्यवस्था करते. चारित्र्यहनन हा या प्रयत्नांचाच एक भाग असतो..
सध्या जगभर गाजत असलेला सायबरयोद्धा, विकिलिक्स या संकेतस्थळाचा मुख्य संपादक ज्युलियन असांज याला इक्वेडोर या देशाच्या लंडनमधील दूतावासात गेल्या तीन वर्षांपासून राहणे भाग पडले आहे, ते ब्रिटनने त्याला दिलेल्या अटकेच्या धमकीमुळे. एका अर्थी ही ब्रिटनची नजरकैदच. मनमानी पद्धतीने केलेली. आजवर हे असांजच्या पाठीराख्यांचे म्हणणे होते. त्यावर संयुक्त राष्ट्रांच्या एका कार्यगटाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. मनमानी पद्धतीने नजरकैद केल्याबद्दलच्या तक्रारींची चौकशी करून एखादा देश अटकेबाबतच्या आंतरराष्ट्रीय विधिबंधनांचे पालन करतो की नाही हे पाहण्याचे काम हा कार्यगट करतो. त्याचा अहवाल कोणत्याही देशावर कायद्याने बंधनकारक नाही. त्यामुळे असांजचे इक्वेडोरच्या दूतावासातील वास्तव्य ही नजरकैदच असल्याचे या कार्यगटाने स्पष्ट केले असले, तरी त्यामुळे असांजला लागलीच दूतावासाबाहेरील हवा सुखाने खाता येईल असे नाही. किंबहुना त्याने दूतावासाबाहेर पाऊल ठेवताच त्याला अटक करण्यात येईल असे ब्रिटनने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आज जनभावना कितीही असांजच्या बाजूने असली, त्याला सर्वसामान्यांची कितीही सहानुभूती असली, तरी ब्रिटनचे सरकार त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. याचा अर्थ स्पष्ट आहे, असांजवरील संकटाचे सावट दूर झालेले नाही. हे सावट आणि त्याचा कार्यकारणभाव जाणून घेणे आवश्यक आहे.
असांजवर अशी देशोधडीला लागण्याची वेळ आली त्याचे कारण तसे सर्वज्ञात आहे. त्याने विकिलिक्स या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रामुख्याने अमेरिकी सरकारची प्रचंड गोपनीय माहिती जागतिक चव्हाटय़ावर आणली. त्यात अमेरिकेच्या जगभरातील दूतावासांनी पाठविलेले संदेश, पत्रे, लष्कराच्या कारवायांचे- प्रामुख्याने इराक आणि अफगाणिस्तानातील- अहवाल अशी अत्यंत स्फोटक सामग्री होती. अमेरिकी सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे या स्फोटातून जसे विविध राष्ट्रप्रमुखांना, मुत्सद्दय़ांना समजले, तसेच हे सरकार आपल्या नागरिकांच्या डोळ्यांवरही प्रचाराच्या पट्टय़ा बांधून त्यांना उल्लू बनवत असल्याचे उघड झाले. कोणत्याही सरकारला अशा प्रकारे दिगंबर होणे हे न आवडणारेच. परिणामी असांज हा अमेरिकेचा पहिल्या क्रमांकाचा गणशत्रू बनला. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन यांनी त्याला जाहीरपणे हायटेक दहशतवादी म्हटले आहे. तेव्हा त्याला नामशेष करणे हे अमेरिकी सरकारसाठी राष्ट्रकर्तव्य ठरले. असांजला ही सर्व माहिती ज्याने पुरविली त्या ब्रॅडली तथा चेल्सी मॅनिंगला अडीच वर्षांपूर्वीच ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता पाळी असांज व त्याच्याबरोबरच एडवर्ड स्नोडेन या अशाच एका जागल्याची आहे. स्नोडेनला रशियाने आश्रय दिला असून, पुतिन यांचे पाश्चात्त्य जगताशी फाटले आहे. त्यामुळे सध्या तरी स्नोडेन सुरक्षित आहे. असांजला इक्वेडोर या दक्षिण अमेरिकी छोटेखानी राष्ट्राने तीन वर्षांपूर्वी लंडनमधील स्वतच्या दूतावासात आश्रय दिला. इक्वेडोरचे हे धाडसच म्हणायचे. पण त्यामुळे असांज अद्याप अमेरिकी तुरुंगाबाहेर आहे. मात्र त्याला तेथून बाहेर पडता येऊ नये याची पुरेपूर खबरदारी ब्रिटनने घेतली आहे. इक्वेडोरच्या दूतावासाबाहेर अहोरात्र ब्रिटिश पोलिसांचा पहारा आहे. येथे प्रश्न असा येतो की ब्रिटनला असांजच्या अटकेची एवढी काळजी का? त्याचे एक कारण म्हणजे असांजवर युरोपियन अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. त्याच्यावर स्वीडनमध्ये दोन तरुणींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. खरेतर त्यास ‘संभाव्य आरोप’ असेच म्हटले पाहिजे. कारण स्वीडनच्या कायद्यानुसार आरोपीच्या जबाबाविना आरोपनिश्चिती करता येत नाही. आणि स्वीडनने अद्याप असांज याचा जबाब नोंदविलेला नाही. तरीही त्याला अमेरिका, ब्रिटन आदी देशांची सरकारे बलात्कारी मानून चालली आहेत. आणि अशा बलात्कारी दहशतवाद्याला अटक करून संबंधित देशाच्या ताब्यात देणे हे आपले वैधानिक कर्तव्य असल्याचे ब्रिटनच्या सरकारला वाटत आहे. ब्रिटिश सरकारची ही न्यायप्रियता प्रशंसनीयच म्हणावी लागेल. यात कळीचा मुद्दा असा, की असांजची अटकेला ना नाही. स्वीडनने ताब्यात घेण्यास ना नाही. बलात्काराच्या खटल्यास ना नाही. त्याचे म्हणणे एवढेच आहे, की स्वीडनने त्याला अमेरिकेच्या हवाली करता कामा नये. त्या सरकारने तसे आश्वासन द्यावे. स्वीडनची मात्र त्याला तयारी नाही. असांजला अमेरिकेहाती देण्यासाठीच हा अवघा कुटाणा चाललेला असल्याचे यातून स्पष्ट होते. येथे प्रश्न असा येतो की बलात्कारासारखा घृणास्पद आरोप असलेल्या व्यक्तीने अशा अटी घालणे योग्य आहे का? विविध राष्ट्रे करीत असलेल्या कायदेभंगांचे पितळ उघडे पाडण्यासाठी आपण गोपनीय माहिती फोडतो असे म्हणणाऱ्याने स्वत कायद्यापासून दूर पळणे योग्य आहे का? प्रश्न रास्त आहे. पण त्यात एक खुबी आहे. ती म्हणजे त्या प्रकरणाची सत्यासत्यता.
असांजवरील बलात्काराचे हे सगळेच प्रकरण संशयास्पद आहे. ज्या तरुणींचे लैंगिक शोषण वा बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यांपैकी एकीने तर तसे काहीच घडले नसल्याचे समाजमाध्यमांतून जाहीर केले होते. ते किती विश्वासार्ह आहे हे आपण व्यवस्थेच्या कोणत्या बाजूला उभे आहोत त्यावर ठरणार आहे. इतिहासाची साक्ष मात्र याहून वेगळी आणि निष्पक्षपाती आहे. ज्या ज्या व्यक्ती व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहतात त्यांना नमवण्याचा, संपवण्याचा हरतऱ्हेचा प्रयत्न व्यवस्था करते. चारित्र्यहनन हा या प्रयत्नांचाच एक भाग असतो, हे इतिहासानेच नव्हे, तर वर्तमानानेही आपणांस दाखविले आहे. चारित्र्यहननासाठी संशयाचा एक धागाही पुरेसा असतो. ते सूत हाती दिले की लोक त्यावरून सहजी स्वर्ग गाठतात. ते सूत मग कधी विवाहबाह्य़ संबंधांचे असते, कधी पैशांच्या अफरातफरीचे असते, तर कधी विनयभंग वा बलात्काराच्या आरोपाचे. या आरोपांमुळे माणसाची प्रतिमा मलीन केली, त्याच्या पायाखालून जनसहानुभूतीचा आधार काढून घेतला की मग सारेच सोपे होते. नंतर त्याला फासावर चढविले तरी लोकांना न्याय झाल्यासारखे वाटून जाते. असांजच्या बाबतीत हाच खेळ खेळला जात असावा असा संशय घेण्यास मोठाच वाव आहे. त्याचे प्रत्यार्पण करणार नाही असे आश्वासन देण्यास स्वीडन तयार नाही ही एक गोष्टच बरेच काही सांगून जाणारी आहे.
सध्या तरी असांजमागील ससेमिरा कायम आहे. आज ना उद्या त्याला जेरबंद केले जाईल किंवा तो स्वतहूनही शरण जाईल. व्यवस्थेविरोधातील लढा कधीही सोपा नसतो आणि लढून टिकणे हा भाग तर त्याहून अवघड असतो. असांज यांची प्रवृत्ती लढाऊ असली तरी त्यांना यापुढे प्रकृती किती साथ देईल हाही प्रश्न आहे. कदाचित या लढय़ात त्यांचा पराजयही होईल. पण येथे मुद्दा एकटय़ा-दुकटय़ाच्या हारजितीचा नाही. तो व्यवस्थेविरोधात उभे राहण्याचा आहे. व्यवस्थेविरोधात इरेने उभे ठाकणे, तिला आव्हान देणे याचा अर्थ ती उलथवून टाकण्याचाच प्रयत्न करणे असा होत नसतो. त्यामागे हेतू व्यवस्था सुधारण्याचा, अधिक चांगली करण्याचाही असू शकतो. हे नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. अन्यथा समाजहितैषुलाच समाजद्रोही मानला जाण्याचे कृत्य समाजाच्या हातून होऊ शकते. किंबहुना अशा व्यक्तींना समाजद्रोहीच मानले जावे अशीच व्यवस्थेची इच्छा असते. या इच्छेतूनच मग एखाद्या सरकारवर केलेली टीका ही देशावरील टीका मानली जावी, एखाद्या नेत्यावरील आरोप हा जात, धर्म वा राष्ट्रावरील आरोप मानला जावा असे प्रयत्न केले जात असतात. असांजला समाजघातकी देशद्रोही ठरविण्याचा तेथील सरकारचा आणि कर्मठ उजव्यांचा प्रयत्न हा याच भावनिक काळ्या सौदेबाजीचा भाग आहे. ही व्यवस्थेने सर्वसामान्य नागरिकांवर घातलेली असांजभूलच म्हणायची. असांजबाबतच्या ताज्या घडामोडींतून ही भूल कशी घातली जाते हे जरी लक्षात आले, तरी खूप झाले.

What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय