वैज्ञानिक समुदायाकडे सामान्यजनांचे दुर्लक्ष होत असल्याची खंत दिल्लीतील महत्त्वाच्या परिसंवादात तिघा वैज्ञानिकांनीच मुखर केली..

आपण मुलांना शाळांमध्ये सामान्य विज्ञान शिकवितो. पण विज्ञानामागील विचारांपासून मात्र चार हात लांबच ठेवतो. त्यामुळे अखेर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ही मुले बनतात ती सेवेकरीच. त्यांना ना प्रश्न पडत, ना प्रश्न विचारता येत. त्यांच्या हातून कोणत्याही क्षेत्रातील मूलभूत काम होणार कसे? अशा प्रकारे घडलेल्या पिढीचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच विकृत उपयुक्ततावादी असा राहतो..

तीन वैज्ञानिक. विल्यम ई मोएर्नर, हेरॉल्ड व्हर्मस आणि सर्गी हॅराशे. तिघेही नोबेल पुरस्कार विजेते. आपापल्या क्षेत्रातील मातब्बर. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत एका कार्यक्रमात एकत्र होते. अशा व्यक्तींचे बोल ऐकण्यास लोक खरे तर उत्सुक असतात. पण ते म्हणतात, की हल्ली वैज्ञानिक समुदायाचे कोणी ऐकतच नाही. व्हर्मस यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवडय़ांपासून हे फारच दिसू लागले आहे. व्हर्मस यांचे वास्तव्य अमेरिकेतील असल्याने त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. पण वैज्ञानिकांचे म्हणणे कानाआड टाकण्याचे प्रकार गेल्या काही आठवडय़ांपासूनच होत आहेत असे नाही. ते फार पूर्वीपासून घडत आलेले आहे. तिसऱ्या जगात तर असे शतकानुशतके चालले आहे. तेव्हा या तीन शास्त्रज्ञांनी जी खंत व्यक्त केली आहे ती काही आजची नाही आणि ती केवळ त्यांचीही नाही. जगातील सर्वच जाणत्यांना, विवेकवाद्यांच्या मनात हा सल फार पूर्वीपासून आहे. लोक वैज्ञानिक समुदायाचे ऐकत नाहीत. पण ऐकत नाहीत म्हणून काय झाले? हे वैज्ञानिक असे कोण टिक्कोजीराव लागून गेले की त्यांचे बोल लोकांनी कानांत साठवून ठेवावेत? प्रश्न रास्तच आहेत. आजच्या काळात तर ते अधिकच टर्रेबाज झालेले आहेत. तेव्हा त्यांची उत्तरे समजून घेणे आवश्यक आहे. कारण त्यातून आपले आपल्यालाच व्यवस्थित तपासता येईल.

त्याकरिता आधी मोएर्नर, व्हर्मस आणि हॅराशे यांना नेमके काय म्हणायचे आहे हे समजून घेतले पाहिजे.

लोक वैज्ञानिक समुदायाचे ऐकत नाहीत असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ वैज्ञानिकांचा एखादा गट वगैरे असा नसतो. वैज्ञानिकांमध्येही गट-तट असतात. सर्वसामान्यांत ज्या आणि जेवढय़ा मानवी भावभावना असतात, त्या त्यांच्यातही असतात. त्यांची मते, विचार भिन्न असू शकतात. पण त्यांतील खऱ्या वैज्ञानिकांचे एक सामायिक वैशिष्टय़ असते. ते म्हणजे त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन. अशा व्यक्तींचे लोक ऐकत नाहीत, याचा अर्थ लोक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार करीत नाहीत, असा असतो. या तिघाही शास्त्रज्ञांना सांगायचे आहे ते हेच. स्वीडनच्या ‘नोबेल मीडिया’ आणि आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका परिसंवादात त्यांनी हेच मत मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडे पाश्चिमात्य देशांत एक विज्ञानविरोधी चळवळ फोफावू लागली आहे. लोक शास्त्राऐवजी किश्शांवर विश्वास ठेवू लागले आहेत. म्हणजे एखाद्या घटनेबाबत, एखाद्या आजाराबाबत विज्ञान काय म्हणते यापेक्षा आपल्या परिचिताने सांगितलेल्या माहितीवर, किश्शांवर ते अधिक विश्वास ठेवू लागले आहेत. तथ्यांपेक्षा मिथकांना, सत्योत्तराला महत्त्व येऊ लागले आहे. हे सगळे भावनांना जवळ जाणारे. तेव्हा भावना चाळविणारे जे जे, ते ते सारे सत्यम् आणि शिवम् मानून चालणारा समाज तयार होताना सर्वत्रच दिसतो आहे. हा समाज केवळ तिसऱ्या जगातच आहे असे मानण्याचे कारण नाही. अमेरिकेसारख्या, ज्याला आपण भौतिकतावादी म्हणून हिणवतो, अशा देशातही आज हे पाहावयास मिळत आहे. पाकिस्तानातील तालिबान्यांनी पोलिओ लसीकरण मोहिमेस हिंसक विरोध केल्याच्या बातम्या सर्वानाच माहीत आहेत. परंतु २०१५ साली अमेरिकेतील कॅलिफोर्नियासारख्या राज्यात जेव्हा गोवराची साथ आली होती, तेव्हा तेथे अनेक पालकांनी लस टोचून घेण्यास विरोध केला होता. आपल्याकडेही जे जे आधुनिक, जे जे संकरित ते ते आरोग्यास हानिकारक असे एक मिथक लोकप्रिय होऊ लागले आहे. त्यामागील कारणे अत्यंत अतार्किक अशीच होती; परंतु त्यांवर त्या नागरिकांचा विश्वास होता. हे केवळ आधुनिक विज्ञानाला विरोध म्हणून घडत नसते. ते घडते याचे कारण त्यामागे असतो तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. असा अभाव असणे हेच आजच्या काळात प्राचीन शहाणपणाचे लक्षण मानले जात असून, हाच विचार पुनरुज्जीवनवादाला, धार्मिक अस्मितावादाला खतपाणी घालताना दिसतो आहे. यातून तंत्रज्ञानाचे सर्व फायदे लुटतानाच, त्या तंत्रज्ञानाची मुळे ज्या विज्ञानात असतात, त्याच्यावरच घाव घातले जात आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजू का शकला नाही? भारतीय संविधानाने तर नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे हे राज्याचे एक कार्य सांगितले असतानाही, असंख्य भारतीयांना तो आपलासा का वाटत नाही? त्याचे उत्तर सापडेल आपल्या शिक्षण व्यवस्थेत. आपण मुलांना शाळांमध्ये सामान्य विज्ञान शिकवितो. पण विज्ञानामागील विचारांपासून मात्र चार हात लांबच ठेवतो. त्यामुळे अखेर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ही मुले बनतात ती सेवेकरीच. त्यांना ना प्रश्न पडत, ना प्रश्न विचारता येत. त्यांच्या हातून कोणत्याही क्षेत्रातील मूलभूत काम होणार तरी कसे? अशा प्रकारे घडलेल्या पिढीचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच विकृत उपयुक्ततावादी असा राहतो. त्याचे परिणाम जीवनाच्या अन्य क्षेत्रांतही पाहावयास मिळतात. विज्ञान हे कोणत्याही समस्येचे केवळ तर्कशुद्ध उत्तर देऊ शकते. आपण सांगतो ते त्रिकालाबाधित सत्य असा त्याचा दावा कधीही नसतो. तो प्रांत श्रद्धेचा. तेथे उत्तरे हवी तशी मिळू शकतात आणि ‘सत्य’ही जो जे वांच्छिल तो ते लाहो अशा पद्धतीने भेटू शकते. तेथे फक्त प्रश्न विचारायचे नसतात. ते सोपे. प्रश्न विचारण्याकरिताही डोके शिणवावे लागते. विषय माहिती करून घ्यावा लागतो. अभ्यासावा लागतो. हे करण्यापेक्षा डोके अर्पण करणे अधिक सुलभ. अशा डोक्यांची संख्या वाढताना दिसत आहे हीच खंत या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. परंतु हे झाले समस्येचे निदान. त्यावर उपाय काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

वैज्ञानिक हे केवळ प्रश्न मांडत नसतात. ते त्याच्या उत्तराकडे जाण्याचा प्रयत्नही करीत असतात. समाजातील विज्ञानविरोधी विचार नेस्तनाबूत करण्यासाठी मोएर्नर, व्हर्मस आणि हॅराशे यांनी तीन उपाय सुचविले आहेत. ते म्हणजे लोकसंवाद, लोकशिक्षण आणि प्रोत्साहन. यातील सर्वात महत्त्वाचा उपाय आहे तो शिक्षणाचा, लोकांना प्रश्न विचारण्यास शिकविण्याचा, त्यांना सवालदार करण्याचा, त्यास प्रोत्साहन देण्याचा. तशी संस्कृती, तसे वातावरण तयार करण्याचा. ते खचितच अवघड आहे. आजच्या काळात भिंतीवरील दूरचित्रवाणी संचापासून हातातील फोनपर्यंत सगळीकडून माहितीच्या वळीवधारा कोसळत असताना, डोके गहाण पडण्याची शक्यता अधिक. पुरवल्या जाणाऱ्या माहितीची तर्कनिष्ठ पडताळणी करण्यापेक्षा, तिच्याशी झगडण्यापेक्षा अविज्ञानातून सहज सुख मिळत असेल, तर ते कोण नाकारणार? मानसिकता बदलायची असेल तर ही. हे बदलणे आवश्यक असल्याचे या तिन्ही विज्ञाननिष्ठांचे सांगणे आहे. ते न ऐकल्यास आपण वीण वाढवीत राहू ती वैचारिक तालिबान्यांची, त्यांच्या तालावर रपेट करणाऱ्या होयबा यंत्रमानवांची. तसे भावनाभारित यंत्रमानव आता ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. त्यांना विवेकाच्या रस्त्यावर आणण्यासाठी आधी आपण सर्वानीच सवालदार बनणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संवर्धनासाठी ते आवश्यक आहे.