19 March 2019

News Flash

शेक्सपियर आणि शोकांतिका

कलाकाराचे मोठेपण त्याने जनसामान्यांना किती रिझवले इतक्यापुरतेच मर्यादित नसते.

शेक्सपियर हा अनेकांगांनी, विविध रूपांनी काळाला पुरून उरणारा, अभिजाततेची आस असलेल्या प्रत्येक कलाकारास मोहविणारा कलाकार.. 

कलाकाराचे मोठेपण त्याने जनसामान्यांना किती रिझवले इतक्यापुरतेच मर्यादित नसते. ही कामगिरी दुय्यम दर्जाचे कारागीरही उत्तमपणे पार पाडत असतात. ते कलाकार नव्हेत आणि मोठे तर निश्चितच नव्हेत. अन्य कलाकारांना एखादा कलाकार किती प्रेरणा देता झाला हा कोणत्याही कलाकाराच्या मोठेपणाचा आणि त्यामुळे काळावर पुरून उरण्याच्या क्षमतेचा मापदंड. तो लक्षात घेतला तर जगात एकही भाषा नसेल की ज्यामधील लेखक, कवी यांस शेक्सपियरने भुरळ घातली नाही आणि जगात एकही असा कलाकार नसेल की ज्यावर शेक्सपियरच्या लेखणीतून अजरामर झालेल्या भूमिकांचे गारूड झाले नसेल. वाङ्मय आणि रंगभूमीसंदर्भात जे जे अभिजात मानले जाते त्या साऱ्याशी काही ना काही प्रकारे शेक्सपियर कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेला आहेच आहे. तसेच अभिजाततेची आस असलेल्या प्रत्येक कलाकारास शेक्सपियरने मोहवले आहे. मग तो व्हॉल्टेअर, चार्ल्स डिकन्स, मिल्टन, कीट्स वा अमेरिकी लेखक विल्यम फॉक्नर असो किंवा आपले गोपाळ गणेश आगरकर, नाना जोग असोत, नानासाहेब फाटक, वि. वा. शिरवाडकर असोत, राजीव नाईक असोत की गुलजार असोत; विजय केंकरे असोत, मकरंद देशपांडे अथवा विशाल भारद्वाजसारखे नव्या दमाचे काही मांडू पाहणारे नाटय़/ चित्रपट निर्माते असोत. इंग्रजी रंगभूमीवरील जॉन गिलगुड, लॉरेन्स ऑलिव्हिए, राल्फ रिचर्डसन यांच्यापासून ते लिओनार्दो डिकाप्रिओ अशा अनेकांना शेक्सपियरची कोणती ना कोणती भूमिका जगून पाहायलाच हवी असे वाटत आले आहे. शेक्सपियर अशा प्रत्येक कलाकाराच्या मनात रुजलेला आहे. आणि इतक्या साऱ्यांनी सामावून घेतल्यानंतरही तो बराचसा शिल्लक आहे. म्हणून आजही प्रत्येकास शेक्सपियर करावासा वाटतो.

या एका लेखकाने भाषा घडवली आणि काळास आकार दिला. शेक्सपियरचा जन्म १५६४ आणि मृत्यू १६१६ सालचा. म्हणजे आपले शिवाजी महाराज जन्मास येण्याआधी १४ वर्षे शेक्सपियर या भूतलावरून गेलादेखील. हा काळ युरोप खंडासाठीच नव्हे तर समस्त मानवजातीसाठी महत्त्वाचा. कारण मानवी प्रतिभेला नवनवे धुमारे फोडणारा आणि या प्रतिभेचे नवनवे आविष्कार दाखवणारा प्रबोधनकाळ – रेनेसाँ – याच कालखंडातला. तो कालखंड भाग्यवंत अशासाठी की त्या काळातील महानांच्या कृतींचे महानपण आजतागायत टिकून आहे. मायकलँजेलो ते लिओनार्दो द िवची सारे याच काळातले. ज्या काळात व्हॅटिकनच्या सिस्टीन चॅपेलच्या छतावर मायकलँजेलो अवाढव्य चित्र साकारत होता, ज्या काळात लिओनार्दो द विंचीसारख्यास विमानाचे स्वप्न पडत होते तो हा प्रबोधनकाळ. या चित्रकारांनंतर शतकभराच्या आत शेक्सपियर मानवी नातेसंबंधांतील तितक्याच भव्य विभ्रमांचे विविध कोनांतून शब्दचित्रण करीत होता. ते सगळेच अजरामर झाले. पण शेक्सपियर अधिक. कारण नातेसंबंधांतील कमालीची गुंतागुंत, मानवी मनाचा विविध स्तरांवरचा संघर्ष आणि नियती नावाच्या अदृश्य व्यक्तिरेखेची गूढ भूमिका यांमुळे शेक्सपियरचे सारे कथानकच प्रत्येकास आपलेच वाटे. अजूनही वाटते. दुख असो वा आनंद. लेखक शेक्सपियर त्या सगळ्याकडे तटस्थपणेही पाहत असे. त्यामुळे ते त्याचे लिहिणे स्वतपुरतेच राहत नाही. इतरांचेही होते. शेक्सपियर कायद्याचा अभ्यासक होता. त्यामुळे त्याच्या पात्रांचे नाटकातील युक्तिवाद कायदेशीर असतात. र्मचट ऑफ व्हेनिसमधल्या शायलॉकचा पराभव करणारी पोर्शिया हे त्याचे उत्तम उदाहरण. खेरीज त्याची मॅक्बेथ, हॅम्लेट आदी पात्रे त्यांच्या पूर्वसूरींप्रमाणे खोटी जगत नाहीत. स्वतची आदर्शवादी प्रतिमा उभारण्याच्या फंदात पडत नाहीत. मानवी आयुष्यात आदर्शवाद असलाच तर तो तात्कालिक असतो. याचा अर्थ एखादी व्यक्ती एखाद्या बाबतीत आदर्शवादी असली तरी सर्वच बाबतीत सबंध आयुष्य ती आदर्शवादी जगलेली नसते. त्याचप्रमाणे समाजाच्या मते गुन्हेगार ठरवलेली व्यक्ती काही बाबतीत आदर्शवादी असूही शकते. हा मानवी मनांतील शक्याशक्यतांचा संघर्ष कलात्मकतेने उलगडून दाखवण्याचे सामथ्र्य असलेला कलावंत म्हणजे शेक्सपियर. तो जेव्हा शौर्यकथात्मक काही लिहितो तेव्हा राजसत्ता उलथून पाडल्यामुळे वा परकीय आक्रमणामुळे समाजजीवन विस्कळीत होते किंवा प्रेमकथा लिहितो तेव्हा प्रेमीजन प्रेमात पडतात, एखादा संघर्ष उभा ठाकतो आणि ते विलग होतात. त्याच्या सुखान्त लिखाणात प्रेमीजन पुन्हा भेटतात आणि शोकात्म असेल तर नायकाचे निधन होते वा तो मारला जातो. या अपरिहार्य शेवटापर्यंतच्या विलक्षण नाटय़ात्म प्रवासातील अगतिक माणसे आणि स्वतच्या कृतीचे त्यांच्याकडून होणारे समर्थ युक्तिवाद म्हणजे शेक्सपियरचे लेखन. शेक्सपियरचे मोठेपण म्हणजे या लेखनप्रवासात त्याचे युक्तिवाद कोठेही असत्य वा भाबडे, नाटकी वा कृत्रिम होत नाहीत. खरी असती तर शेक्सपियरच्या नाटकातील त्या त्या प्रसंगातील ती ती माणसे तशीच बोलली/ वागली असती. हे त्याचे चिरंतनत्व.

या लेखकाने इंग्रजीही घडवली. त्याचा लेखनकाल हा इंग्रजी भाषेच्याही जडणघडणीचा काळ. मिडल इंग्लिश वा अर्ली मॉडर्न इंग्लिश म्हणून ओळखली जाणारी भाषा ही शेक्सपियरची देणगी. ती देताना शेक्सपियरने पूर्णपणे स्वतची अशी शब्दकळा जन्माला घातलीच पण त्याच वेळी अनेक क्रियापदांना नाम रूप देत शब्दांची नव्याने बांधाबांधही केली. या लेखकाचे म्हणून किती शब्द असावेत आजच्या इंग्रजीत? तब्बल १७००. इंग्रजीचे या लेखकावर इतके प्रेम की त्याने वापरलेल्या वा जन्मास घातलेल्या शब्दांचे अनेक कोश उत्तम ग्रंथ दुकानांत आजही हिरिरीने विकले जातात. Advertising, Bedroom, Addiction, Assassination, Cold-Blooded, Eventful, Dis-hearten, Fashionable, Inaudible, Manager … असे किती दाखले द्यावेत. हे सारे शेक्सपियरने जन्मास घातलेले शब्द.

हे असे अनेकांगांनी, विविध रूपांनी काळावर पुरून उरणे फारच कमी कलाकारांच्या वाटय़ास येते. आधुनिक मानवी इतिहासात असे सर्वात प्रबळ भाग्य लाभलेला लेखक म्हणजे शेक्सपियर. ज्याप्रमाणे लोलकातून दिसणारे आकार कधी संपत नाहीत, तसेच शेक्सपियरच्या लिखाणातून उभे राहणारे मानवी विभ्रम ना कधी संपतात ना कधी त्यांच्याकडे पाहणे कंटाळवाणे होते.

त्या तुलनेत मराठी रंगभूमी खूपच अलीकडची. मराठी रंगमंचावरचे पहिले अजरामर नाटक म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल ते संगीत शाकुंतल लिहिणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्करांचा जन्म झाला त्या वर्षी, म्हणजे १८४३ साली, सांगलीत विष्णुदास भावे यांच्या सीतास्वयंवराच्या निमित्ताने मराठी रंगभूमीचा जन्म झाला. खुद्द अण्णासाहेब किर्लोस्करांचे शाकुंतल १८८० साली रंगमंचावर आले. त्या वेळी त्यात जवळपास १९८ पदे होती. दुसरे अजरामर नाटक म्हणजे सौभद्र. ते १८८२ सालचे. म्हणजे अ‍ॅलन ह्य़ुम, पिरोजशहा मेहता, गणेश वासुदेव जोशी, सर नारायण गणेश चंदावरकर आदींच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पक्षाची स्थापना होण्यापूर्वी अवघी पाच वर्षे आधी संगीत शाकुंतल जन्माला आले. या दोन्ही नाटकांनी घडवलेला इतिहास अद्यापही ताजा आहे. परंतु तरीही एक बाब प्रामाणिकपणे मान्य करावयास हवी की ही नाटके लोकप्रिय झाली ती प्राधान्याने त्यातील पदांमुळे आणि त्यांच्या चालींमुळे. खुद्द बालगंधर्व हयात असतानाही या नाटकाच्या जाहिरातीत ‘आज बाळकोबा नाटेकर दिंडय़ा चाली बदलून म्हणणार’ असा उल्लेख प्रेक्षकांना आकर्षति करण्यासाठी केला जात असे. तेव्हा या कलाकृती विख्यात झाल्या त्या त्यातील नाटय़ासाठी वा अभिनयासाठी नव्हेच. तर गाण्यासाठी. पुढे तर अनेकांना केवळ गाणे येते म्हणून या नाटकांत पाहण्याचा दुर्धर प्रसंग रसिकांवर ओढवला. असो. या सगळ्याचे आताच स्मरण करण्याचे कारण काय?

कारण बुधवारपासून मुंबईत मराठी नाटय़ संमेलन सुरू झाले. ‘‘ आपले  सौभद्र असताना शेक्सपियर हवाच कशाला’’, असा प्रश्न या नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांना अलीकडेच पडला. जरा काही बेरीज-वजाबाक्या करता येणाऱ्याने कोण हा आइन्स्टाइन असे विचारावे इतकी ही मोठी शोकांतिका. विल्यम हॅझलीट हा विख्यात तत्त्वज्ञ म्हणतो : मानवी प्रतिभेचे अलौकिकत्व समजून घ्यायचे असेल तर त्याने शेक्सपियर वाचावा. आणि या प्रतिभेचे क्षुद्रत्व आणि संदर्भशून्यता पाहावयाची असेल त्यांनी शेक्सपियरच्या भाष्यकारांकडे वळावे.

First Published on June 14, 2018 2:38 am

Web Title: william shakespeare 2