सध्या जे काही सुरू आहे त्याची तुलना जंगलबुकशी नव्हे तर ॅनिमल फार्म या कथानकाशी करावी, असे या क्षेत्रातील ज्येष्ठांचे म्हणणे..

प्रत्येकाने आपापल्या प्रतिमासृष्टीप्रमाणे टीका केल्यावर त्याच भाषेत उत्तर देणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवश्यक होते. पण त्यांची चांगलीच पंचाईत झाली..

savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Loksatta entertainment The movie Mahaparinirvana will release on December 6
‘महापरिनिर्वाण’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प
rupali chakankar jitendra awhad
“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”

वातावरण व्यक्तीला कलात्मक बनवते. आल्प्स पर्वतराजी आणि आसपासचा नितळ परिसर किंवा स्कॉटलंडमधील ग्लेन नदी वा हायलॅण्ड किंवा वेल्श परगण्यातील लेक डिस्ट्रिक्टमधील अनाघ्रात सौंदर्य हे कोरडय़ातील कोरडय़ा व्यक्तीच्या मनात काव्य ओलावा तयार करू शकते. आपल्याकडील काश्मीर वा हिमाचलातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स परिसरांतदेखील मानवी मनांत असे कलात्मक भरते आणण्याची क्षमता आहे. त्यासाठी मनास एक उसंत असावी लागते. सामान्य माणसे ही उसंत शोधू शकतात. परंतु राजकीय धकाधकीत गळ्यापर्यंत अडकलेल्यांना ती शोधू म्हणता मिळत नाही. त्यात हे राजकारणी महाराष्ट्रासारख्या दुष्काळप्रवण राज्यांतील आणि अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशातील असले तर पाहायलाच नको. एका बाजूला कोरडेठक्क प्रदेश आणि दुसरीकडे मुंबईसारखी घामाने बारमाही ओली करणारी शहरे. तेव्हा राजकारणातील या त्रस्त मनांना विरंगुळ्याचे चार क्षण मिळतात ते फक्त नागपूर मुक्कामी. करारानेच बांधून दिलेल्या नियमानुसार देशातील या सर्वात प्रगत राज्यात वर्षांतील एक तरी अधिवेशन राज्याच्या या उपराजधानीत घ्यावेच लागते. त्यासाठी मोठय़ा चातुर्याने वर्षअखेरच्या अधिवेशनाची निवड केली गेली आहे. ऐन डिसेंबराचा महिना, शिशिरागमनामुळे असेही एकेक पान गळावया लागलेले असते, माहोलात आगामी सुटय़ांचा गंध भरू लागलेला असतो, म्हटले तर आणखी एक वर्ष संपल्याची रुखरुख असते आणि त्याच वेळी आणखी एक नवीन वर्ष पाहावयास मिळणार याचाही उत्साह असतो. अशा वातावरणात येणार येणार म्हणता म्हणता नागपूर अधिवेशनची पूर्वसंध्या मावळावयास लागते. लोकप्रतिनिधींना स्थानिक यजमानांकडची हुरडा पाटर्य़ाची सोनेरी निमंत्रणे खुणावू लागलेली असतात आणि परावर्तित प्रकाशात स्वत:ला उजळून घेणाऱ्या काही माध्यमवीरांत या निमंत्रणांत स्वत:ला सामावून कसे घ्यायचे याचे खल सुरू झालेले असतात. अशा वेळी लोकप्रतिनिधींच्या प्रतिभेला बहर फुटला नाही तरच नवल.

या प्रतिभाबहराचाच प्रत्यय रविवारच्या वामकुक्षोत्तर सायंकाळी रात्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या माध्यमवीरांना सर्वप्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे आला. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे डोरेमॉन असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि राज्याची जनता बिचाऱ्या नोबितासारखी असल्याच्या भावनेने त्यांचे हृदय कळवळून गेले. बालमनांच्या प्रतिमासृष्टीतील डोरेमॉन हा नायक स्वप्नरंजनासाठी मशहूर आहे. त्याचा मित्र नोबिता याला तो नेहमी एकापेक्षा एक स्वप्नाळू स्वप्ने दाखवून वास्तवाची झळ पोहोचणार नाही, याची काळजी तो घेत असतो. तेव्हा त्या डोरेमॉनप्रमाणे फडणवीस हे महाराष्ट्रीय जनतेस स्वप्ने दाखवून वास्तवापासून दूर ठेवत आहेत, असे विखे पाटील यांचे म्हणणे. कोणत्याही माणसाची कल्पनाशक्ती ही त्यास परिचित असलेल्या प्रतिमासृष्टीवर आधारित असते. म्हणजे भुताखेतांच्या कहाण्यांत रमणारे बोलताना जसे देवचार, समंध वगैरे उपमा देत असतात तसेच हे. या न्यायाने विखे पाटील यांना फडणवीस यांच्यावरील टीकेसाठी डोरेमॉन, नोबिता यांचा आधार घ्यावा लागला असेल तर त्यावरून त्यांचे बालवाङ्मयावरील प्रेमच दिसून येते. कोणाला काय आवडावे याचे काही नियम नसतात. त्याचमुळे धाकटे विखे हे डोरेमॉनच्या स्वप्नाळू डोळ्यांची किंवा अशक्य गॅजेटची आठवण काढत असताना त्यांचे विरोधी पक्षीय सहकारी धनंजय मुंडे यांना थेट ‘शराबी’ चित्रपटातील ‘नौ लाख के हार के लिए १२ लाख के आँसू’ हा संवाद आठवला. असे का झाले, या प्रश्नाचे उत्तर एकच. प्रत्येकाची आपापली प्रतिमासृष्टी. आता इतकी जहरीली टीका झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवश्यक होते. पण त्यांची चांगलीच पंचाईत झाली.

कारण त्यांचे लहानपण लाल-निळ्या रंगातील चांदोबा वाचण्यात गेले आणि बौद्धिके ऐकत राष्ट्रनिर्मितीच्या शपथा घेण्यात त्यांना तारुण्य व्यतीत करावे लागले. त्यांना डोरेमॉन, नोबिता कुठले ठाऊक असायला? त्यामुळे आपला सर्व जनसंपर्क जामानिमा कामाला लावून हा डोरेमॉन नक्की आहे तरी कोण, हे शोधून काढण्यात फडणवीस यांचा बराच वेळ गेला. मनोरंजन म्हणजे काय हेच ठाऊक नसल्याने आणि त्याचा थोडाफार परिचय ‘केसरी गुहेकडे मत्त हत्ती चालला’ हे वा तत्सम पद्ये म्हणण्यापुरताच असल्याने या डोरेमॉन आरोपाने फडणवीस यांची मुळातच कमी मिळणारी झोपच उडवून टाकली. यातील अधिक चिंतनीय बाब म्हणजे त्यांच्या कार्यालयातील विशेष अधिकाऱ्यांनाही ही असामी नक्की कोण हे सुरुवातीस समजले नाही. अखेर ‘वर्षां’वर मुंबईत संपर्क साधला गेल्यावर कु. दिविजा फडणवीस हिने मार्ग दाखविला. तेव्हा कुठे हे फडणवीस आणि कार्यालयास डोरेमॉन आणि नोबिता ही व्यंग कल्पनाचित्रे आहेत, याची जाणीव झाली. तेव्हा अशा आरोपास उत्तरही व्यंगात्मक हवे असे सर्वानुमते ठरले. पण विरोधकांच्या आरोपांना तोंड देण्यासाठी त्यांच्याप्रमाणे विदेशी व्यक्तीचा आधार घेऊन चालणारे नव्हते. त्यामुळे प्रत्युत्तरासाठी देशीच व्यंगरेखेचा शोध सुरू झाला. फडणवीस यांच्या सहकाऱ्यांची मजल ‘छोटा भीम’च्या पलीकडे काही जात नव्हती. परंतु विखे पाटील यांना ही उपमा दिल्यास आपल्या पक्षातील संस्कृतिरक्षकांचे पित्त खवळेल याची जाणीव झाल्याने फडणवीस यांनी अखेर मोगली याचा आधार घेतला. वास्तविक ही व्यंगरेखाही परदेशी लेखकाचीच आहे हे त्यांना लक्षात आणून दिले गेले होते. पण, लेखक परदेशी का असेना त्याने ही व्यंगरेखा भारतातच जन्माला घातलेली आहे, हे लक्षात आल्यानंतर डोरेमॉन या आरोपास प्रत्युत्तर म्हणून मोगली या व्यंगरेखेस उभे करण्याचा निर्णय झाला. माध्यमांनीही लगेच डोरेमॉन विरुद्ध मोगली असे वृत्त देऊन आपापल्या परीने जंगलबुक चितारण्याचा प्रयत्न केला.

परंतु या क्षेत्रातील धुरंधरांच्या मते हे जे काही सुरू आहे त्याची तुलना करण्यास जंगलबुक पुरेसे नाही. याचे कारण त्यांच्या मते जंगलबुकातील हिंस्र श्वापदेदेखील लडिवाळ आहेत आणि ती एकमेकांवरच काय पण मानवावरही प्रेम करतात. तेव्हा या उद्योगास या धुरंधरांच्या मते एकच उपमा योग्य ठरते. अ‍ॅनिमल फार्म. याचे कारण या कल्पनाविश्वातील पात्रे मुख्यत: चतुष्पाद आहेत आणि तरी त्यांचे वर्तन मात्र द्विपादांसारखे आहे. त्यामुळे या कथानकातील पात्रे ही आपल्याशी साधम्र्य सांगणारी असून तशीच कपटी, क्रूर आणि बनेल आहेत. खेरीज ‘सर्व प्राणी समान आहेत, परंतु काही अधिक समान आहेत,’ हे चिरंतन सत्य हे चतुष्पाद प्रामाणिकपणे मान्य करतात. या कथानकात ओल्ड मेजर या रानडुक्कर शेतप्रमुखाचे निधन झाल्यावर स्नोबॉल आणि नेपोलियन या दोन तरुण वराहांकडे शेतवस्तीचे नियंत्रण येते. त्यावरून वास्तविक मानवी कथानकाप्रमाणे प्राण्यांच्या विश्वातही कोणा हाती सत्ता जाऊ शकते याचा प्रत्यय येतो. पुढे सत्ता हाती आल्यावर स्नोबॉल आणि नेपोलियन हे दोन वराह प्राणी संघटना स्थापन करून क्रांतीचा प्रयत्न करतात त्याचे प्रत्ययकारी चित्रण म्हणजे अ‍ॅनिमल फार्म. सबब, सध्या जे काही सुरू आहे त्याची तुलना ‘जंगलबुक’शी नव्हे तर ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कथानकाशी करावी, असे या क्षेत्रातील ज्येष्ठांचे म्हणणे. असे करणे कितपत योग्य याचा योग्य तो निर्णय ज्याने-त्याने आपापल्या सदसद्विवेकबुद्धीने घ्यावा, असे आमचे सांगणे. उगाच विधिमंडळाचा अवमान का करा?