25 September 2020

News Flash

देशाचे दुश्मन

मेंदू ‘चालविणे’ ही एक अत्यंत भयंकर अशी बाब..

मेंदू चालविणेही एक अत्यंत भयंकर अशी बाब.. राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक सत्तांनाही धोकादायक ठरू शकणारी..

कोण आहेत हे लोक? कोठून येतात हे? त्यांना.. म्हणजे त्या बुद्धिजीवींना, पुरोगामी प्रज्ञावंतांना, विचारी उदारमतवाद्यांना गोळ्याच घालावयास हव्यात. भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे हे हार्दिक मत. नशीब चांगले या बुद्धिजीवींचे की आज हे पाटील गृहमंत्री नाहीत. पूर्वी ते मंत्री होते केंद्रात. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या कविमनाच्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद भूषविले आहे त्यांनी. म्हणजे असामी मोठी आहे. आज मात्र कर्नाटकात ते विरोधी बाकांवर आहेत. सत्तेत असते आणि गृहमंत्री असते, तर या बुद्धिजीवींची खैर नव्हती. आज लपूनछपून गोळ्या घातल्या जात आहेत त्यातल्या काहींना. बसनगौडाजी गृहमंत्री असते, तर त्यांनी नक्कीच गोळ्या घालण्याचा ‘जीआर’ काढला असता. खरे सांगायचे तर आज त्याचीच नितांत गरज आहे. याचे कारण – बसनगौडाजी सांगतात, की – हे बुद्धिजीवी या देशात राहतात. आपण ज्याकरिता कर भरतो त्या सर्व सुविधांचा लाभ घेतात आणि हे सर्व करून वर लष्कराविरोधात घोषणा देतात. आपला असा गैरसमज असतो, की या देशाला दहशतवादी, काळाबाजारवाले, तस्कर, भ्रष्टाचारी अशांपासून धोका असतो. परंतु बसनगौडासाहेब सांगतात की देशाला सर्वात जास्त धोका कोणापासून असेल, तर तो या बुद्धिजीवींपासून. परंतु हेच एकमेव कारण नाही. अशी अनेक कारणे आहेत. ती पाहिली तर आपल्याही लक्षात येईल की या बुद्धिजीवींना का गोळ्या घातल्या पाहिजेत? मात्र युद्धापूर्वी शत्रूचे खरे स्वरूप जाणून घेणे अत्यावश्यक असते. त्या नियमानुसार आपणास हे बुद्धिजीवी म्हणजे नेमके कोण असतात हे समजून घ्यायलाच हवे.

ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार इंटेलेक्चुअल वा बुद्धिजीवी म्हणजे कोण, तर जे बुद्धीचा उपयोग करतात ते. आता हे फारच बाळबोध झाले. कारण तसा तर मेंदू नावाचा अवयव अमिबासारखे काही क्षुद्र जीवजंतू वगळता बहुतेक सर्वच प्राण्यांमध्ये असतो. मनुष्यप्राण्यात तर तो असतोच असतो. अर्थात हे माणसांतल्या अमिबांना लागू पडत नाही. ती जातच वेगळी असते. परंतु सर्वसाधारणत माणसाला मेंदू असणे आणि पर्यायाने बुद्धी असणे हा सृष्टीचा नियमच आहे. परंतु मुद्दा नुसता मेंदू आणिा बुद्धी असण्याचा नाहीच आहे. प्रश्न उपयोग करण्याचा आहे. यावर कोणी म्हणेल, की विशुद्ध शारीरिक श्रम नावाची गोष्ट या विश्वात अस्तित्वात नाही. काम कितीही क्षुद्र असो, यांत्रिक पद्धतीचे असो. त्यात कणभर का होईना बुद्धी लागतेच. तेव्हा सर्वच मानवजात बुद्धिजीवी आहे हे बरोबरच आहे. खुद्द अ‍ॅरिस्टॉटलनेही तसे म्हटलेले आहे. त्याच तर्काने पुढे गेलो तर आपणांस हेही दिसेल की कोणाच्या पायी मेंदू अर्पण करणे यातही अखेर बुद्धीचा वापर केला जातोच. म्हणजेच या देशातील अनेक जण या दृष्टीने स्वतस बुद्धिजीवी म्हणवून घेऊ शकतात. पण मग प्रश्न असा येतो की आपल्या बसनगौडाजींना गोळ्या घालायच्या आहेत त्या या ‘हार्डवर्क’वाल्या बुद्धिजीवींना का? तर ते तसे नाही. बुद्धिजीवींची एक वेगळीच जमात त्यांच्यासमोर असून, गोळ्या घालणे आवश्यक आहे ते त्यांना. ज्यांच्याकडे आकलनशक्ती असते, तर्कशक्ती असते, जे मानसिक कृती करतात, बौद्धिक कृतिमग्नता हे ज्यांचे एक व्यवच्छेदक लक्षण असते, अशांना.

थोडक्यात जे आपला मेंदू चालवितात त्यांना. कारण मेंदू ‘चालविणे’ ही एक अत्यंत भयंकर अशी बाब आहे. शासन व्यवस्थेला – मग ती धार्मिक असो, राजकीय असो वा सामाजिक – मोठाच धोका संभवतो या क्रियेतून. यातील मौज अशी, की या संस्थांच्या सर्जनातही बुद्धिजीवींचा मोठा वाटा असतो. परंतु कालांतराने त्या संस्था स्थितिवादी बनतात. जडपण येते त्यांच्यात. आधुनिकतेचे भय वाटू लागते. सत्तेची ओढ तर असतेच. अशा वेळी नव्याने मेंदू चालवणारे, नव्या संकल्पना मांडणारे, बदल घडवून आणू पाहणारे आणि प्रस्थापित व्यवस्थेला नाकारणारे नकोसे होतात. हे आजचे नाही. सर्वच काळांत हे घडलेले आहे. सॉक्रेटिस, गॅलिलिओ, ज्ञानोबा, तुकाराम हे तेव्हाचे बुद्धिजीवी, पुरोगामीच. असे असंख्य विचारवंत, सुधारक तेव्हाच्या व्यवस्थेला धोकादायकच वाटत होते. त्यातील काहींच्या प्राणावर बेतले, काहींचे छळावर निभावले एवढेच. आज मात्र आपल्याला ती चैन परवडणारी नाही. कारण आता बुद्धिवादाची आवश्यकताच राहिलेली नाही. जो काही सद्विचार, जे काही चांगले तत्त्वज्ञान आहे ते आता मांडून झालेले आहे. आपल्याकडे तर प्राचीन काळीच त्याची मांडणी झाली होती. आज आपल्याला केवळ तीच विंधन विहीर उपसून ते विचारजल प्राशन करायचे आहे. अशा वेळी समाजातील या बुद्धिजीवींना जिवंत ठेवणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेणे. तेव्हा या देशाच्या दुश्मनांना सुळावर चढविलेच पाहिजे.

हे सत्कार्य काहीसे अवघड आहे हे खरे. याचे कारण या बुद्धिजीवींचा एकच एक असा वर्ग नसतो. ते समाजाच्या सर्वच स्तरांत असतात. ते साहित्यिक असतात, विचारवंत असतात. शिक्षक, पत्रकार, उद्योजक, व्यावसायिक, संगणकतज्ज्ञ, वैज्ञानिक, शेतकरी एवढेच नव्हे तर सैनिकही असतात. त्या त्या क्षेत्रात ते नवे काही घडवत असतात, जुन्याला धक्के देत असतात. सर्वात भीतीदायक म्हणजे ते प्रश्न विचारीत असतात. प्रश्न विचारण्यास तशी व्यवस्थेची, सत्ताधाऱ्यांची ना नसते. पण ते प्रश्न सकारात्मक हवेत. कविमनाने विचारले जावेत. परंतु हे बुद्धिजीवी स्वतस शहाणे समजतात. काहीही विचारतात. कोणालाही, म्हणजे अगदी लष्करालाही विचारतात. हे कोण कसे सहन करणार? अखेर लष्कर म्हणजे गंगेप्रमाणे निर्मळ. त्याचा पावित्र्यभंग करणे हा देशद्रोहच नाही का? सरकारला सवाल करणे हा राष्ट्रद्रोहच नाही का? अशा लोकांची काय पूजा करायची का? त्यांना झुंडीच्या पायाखालीच दिले पाहिजे.

हे मात्र गोळ्या घालण्यापेक्षा नक्कीच सोपे आहे. एक तर हे बुद्धिजीवी म्हणजे अतिशहाणे असतात. लोकांचा विचार करतात म्हणे ते. पण लोकांमध्ये नसतात. एकेकटे राहतात. एकेकटे विचार करतात. त्यातील एकेकाला वेचून झुंडीच्या पायाखाली दिले तरी बाकीचे बुद्धिजीवी हूं की चूं करत नाहीत. आणि केले तरी विचारतो कोण त्यांना? अखेर संख्याबळ महत्त्वाचे. ते काही या प्रज्ञावंतांकडे नसते. कोणत्याही समाजात अल्पसंख्याकच असतात ते. मग भले ते समाजाचा गाडा चालवत असेनात. संस्कृतीची पालखी त्यांच्या खांद्यावर असेल. पण एकदा पुढे जायचेच नाही असे ठरले, पुरोगामी म्हणजे समाज-धर्म-देश यांचे द्रोही असे नक्की झाले, की मग या गाडय़ाची आणि पालख्यांची गरजच काय? त्याऐवजी सत्तेचे रथ ओढले जावेत. त्याकरिता बुद्धीची नव्हे, तर निर्बुद्ध ‘हार्डवर्करां’ची आवश्यकता असते. त्या फौजा वाढवत न्याव्यात. ते बसनगौडाजींसारखे आपले नेते करीतच आहेत. त्याच देशकार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे देशाचे दुश्मन ठरवून या बुद्धिजीवींना संपविणे. अर्थात हे सारे आपण समजून घेण्याचीही आवश्यकता नाही. कारण त्यासाठी बुद्धीचा उपयोग करण्याचे महापातक करावे लागेल. त्याला आहे का आपली तयारी?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 2:00 am

Web Title: would have got intellectuals shot if i were home minister bjp mla basanagouda patil yatnal
Next Stories
1 रंगीला रतन
2 झाले तेवढे पुरे
3 तेजातुनी तिमिराकडे
Just Now!
X