अमेरिकी परराष्ट्र धोरणाला अनेक नवी वळणे देणारे झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की यांना आदरांजली वाहायला हवी, असा मुक्तपणा त्यांच्या विचारांत होता..

आपल्या कामाचा डिंडिम स्वत:च छाती पिटत सांगण्यास मुत्सद्देगिरी मानण्याच्या काळात आणि देशात झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की यांच्या निधनाचे वृत्त दुर्लक्षित राहणे तसे साहजिकच. ब्रेझिन्स्की हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे सुरक्षा सल्लागार होते, ऐंशीच्या दशकात जागतिक राजकारणात झालेल्या अनेक उलथापालथींचे साक्षीदार वा निर्माते होते आणि ज्यांच्याविषयी अतिशय आदर बाळगावा असे अभ्यासक/ लेखक होते. हा झाला त्यांचा वरवरचा परिचय. परंतु ब्रेझिन्स्की या पलीकडे बरेच काही होते. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासक/ निरीक्षकांना हे ‘बरेच काही’ असलेले ब्रेझिन्स्की या शतकातील वर्तमानाचे इतिहासात रूपांतर होत असताना अनेक टप्प्यांवर आढळतात आणि विस्मयचकित करतात. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे वयाच्या ८९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अशा बुद्धिमान मुत्सद्दय़ास आदरांजली वाहताना त्याच्या कार्याची उजळणी केल्यास ‘लोकसत्ता’च्या सुजाण आणि सजग वाचकांना हे व्यक्तिमाहात्म्य समजू शकेल.

अमेरिकेतील अनेक कर्तृत्ववानांप्रमाणे ब्रेझिन्स्की हेदेखील स्थलांतरित. त्यांचे वडील पोलंडमधील उमराव होते. कॅनडात राजनतिक जबाबदारीसाठी त्यांची नियुक्ती झाली असता पोलंडमधे राजकीय उलथापालथ झाली. आधी जर्मनीने त्या देशाचा लचका तोडला आणि नंतर कम्युनिस्ट सोविएत युनियनने त्या देशाच्या अस्तित्वावर घाला घातला. परिणामी ब्रेझिन्स्की कुटुंब परत पोलंडात आलेच नाही. त्यांनी अमेरिकेत आश्रय घेणे पसंत केले. एव्हाना तरुण झिबिग्न्युने कॅनडात पदवी प्राप्त केली होती. नंतर अमेरिकेत स्थलांतर झाल्याने ब्रेझिन्स्की यांनी हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. तेथे तत्कालीन सोविएत रशियाचे गाढे अभ्यासक मर्ल फेन्सोड हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्यामुळे नकळतपणे ब्रेझिन्स्की यांचाही रशिया हा अभ्यासाचा विषय बनला. पुढे तेथेच आणि नंतर कोलंबिया विद्यापीठात ब्रेझिन्स्की यांनी अध्यापन सुरू केले. या काळात त्यांचे सोविएत रशियाविषयक नमित्तिक लिखाण सुरूच होते. त्यामुळे ब्रेझिन्स्की रशिया विशेषज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. हा त्यांचा लौकिक बराच पसरला. यातूनच अत्यंत महत्त्वाच्या ‘कौन्सिल ऑफ फॉरिन रिलेशन्स’ या संस्थेत ते कार्यरत झाले. या संस्थेच्या प्रकाशनांतील त्यांचे लिखाण हे त्याही वेळी चच्रेचा विषय होते. ब्रेझिन्स्की कमालीचे कडवे साम्यवादविरोधक होते आणि अलीकडे संकुचितांच्या टीकेचा विषय झालेली आणि म्हणूनच महत्त्वाची असलेली वैचारिक मुक्तता त्यांच्या ठायी पुरेपूर होती. दांडगा अभ्यास असल्याने वाद घालायची त्यांना नेहमीच खुमखुमी असे. कोलंबिया विद्यापीठात सोविएत रशियावर अध्यापन करीत असताना एका विद्यार्थ्यांने त्यांना त्यांच्या लिखाणाविषयी टोकले. तुम्हाला निकिता ख्रुश्चेव यांच्या उचलबांगडीचे काही भाकीत वर्तवता आले नाही, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. त्यास भर वर्गात उत्तर देताना ब्रेझिन्स्की म्हणाले ख्रुश्चेव यांच्या हकालपट्टीचा अंदाज ख्रुश्चेव यांनाही नव्हता. तेव्हा तो मला कसा असणार? हजरजबाबी वक्तृत्व हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय विषयांवरील परिषदांत त्यांची उपस्थिती सुखावणारी असे. १९६५ साली अशाच एक परिसंवादात सोविएत रशियाविषयी भाष्य करताना ब्रेझिन्स्की यांनी ‘पीसफुल एंगेजमेंट’ असा शब्दप्रयोग केला. नंतर एका लेखात म्हणजे काय, हे त्यांनी स्पष्ट केले. ‘आपल्या शत्रूला निष्प्रभ करण्यासाठी त्याला प्रेमाने कवेत घेणे हादेखील प्रभावशाली मार्ग असू शकतो,’ हे त्यांचे त्यावर स्पष्टीकरण. मिठी मारली की स्पर्धकही हतबल होतो, हे त्यांचे निरीक्षण शीतयुद्धाच्या तप्तकाळात वेगळा मार्ग दाखवणारे होते. म्हणूनच तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी हा शब्दप्रयोग आपल्या परराष्ट्र धोरणासाठी जसाच्या तसा उचलला आणि ब्रेझिन्स्की यांचे महत्त्व अचानक वाढले. त्या वेळचे उपाध्यक्ष हुबर्ट हम्फ्रे यांनी तर ब्रेझिन्स्की यांना थेट अध्यक्षीय निवडणुकांसाठीचा सल्लागार नेमले. परंतु हम्फ्रे पराभूत झाले. त्या वेळी तयार झालेल्या गोतावळ्यात एकाचा समावेश व्हावा अशी शिफारस ब्रेझिन्स्की यांनी केली.

जिमी कार्टर ही ती व्यक्ती. ब्रेझिन्स्की यांनी कार्टर यांना मुख्य प्रवाहात आणले आणि नंतर अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यावर कार्टर यांनी त्याची परतफेड ब्रेझिन्स्की यांना सुरक्षा सल्लागार नेमून केली. त्या निवडणुकीत कार्टर यांचे प्रतिस्पर्धी होते तत्कालीन अध्यक्ष जेराल्ड फोर्ड आणि फोर्ड यांचे परराष्ट्रमंत्री होते हेन्री किसिंजर. हेदेखील ब्रेझिन्स्की यांच्याप्रमाणेच निर्वासित. ब्रेझिन्स्की पोलंडचे तर किसिंजर हे मूळचे जर्मनीचे. दोघेही समकालीन. अनेकांना माध्यमस्नेही वृत्ती आणि वागण्यामुळे किसिंजर माहीत असतात. पण ब्रेझिन्स्की अपरिचितच राहतात. या काळात ब्रेझिन्स्की आणि किसिंजर ही अमेरिकेच्या परराष्ट्र राजकारणास दिशा देणारी प्रभावी जोडी होती. १९७९ साली अमेरिकेचे चीनबरोबर राजनतिक संबंध प्रस्थापित झाले. ही ऐतिहासिक घटना. तीमागे ब्रेझिन्स्की यांचा सक्रिय सहभाग होता. त्याच वर्षी जगाचा इतिहास बदलणाऱ्या आणखी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. अयातोल्ला रुहल्ला खोमेनी हे फ्रान्समधील विजनवासातून इराण या आपल्या मायदेशात परतले तर त्याच वर्षांच्या अखेरीस सोविएत रशियाच्या फौजांनी अफगाणिस्तानात घुसखोरी केली. इराणचे त्या वेळचे सत्ताधीश शहा महंमद रझा पहलवी यांना खोमेनी यांच्या विरोधात मोठी कुमक देऊन उभे करण्यामागे ब्रेझिन्स्कीच होते आणि अफगाणिस्तानात सोविएत रशियाचे ‘व्हिएतनाम’ करण्याची संधी आहे हे अमेरिकी अध्यक्षांना समजावणारे ब्रेझिन्स्की हेच होते. इराणात त्यांची खेळी चुकली. इस्लामच्या रेटय़ासमोर शहा महंमद रझा पहलवी टिकले नाहीत. त्यांना परागंदा व्हावे लागले. कर्करोगग्रस्त शहा यांना त्या वेळी अमेरिकेने आश्रय दिला. या काळात ब्रेझिन्स्की यांनी अध्यक्ष कार्टर यांच्यासाठी पश्चिम आशियासाठीचे संपूर्ण धोरणच तयार केले. या परिसरात हातपाय पसरणाऱ्या साम्यवादी सोविएत रशियाला रोखायचे असेल तर पूर्व युरोप आणि पश्चिम आशियातील मुस्लीम बहुल देशांतील नेत्यांची कमान (आर्क ऑफ इस्लाम) बांधावी ही मसलत ब्रेझिन्स्की यांचीच. या संदर्भात त्यांनी त्या वेळी विस्तृत लिखाण केले. ते आजही तितकेच वाचनीय आहे. इराणात खोमेनी यांनी अमेरिकी दूतावासावर हल्ला करून अमेरिकी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्यानंतर लष्करी मोहीम आखण्यातही ब्रेझिन्स्की याचा पुढाकार होता. ही मोहीम फसली, कारण अमेरिकेचे एक विमान वाळवंटी वादळात कोसळले. यात कार्टर यांची चांगलीच नाचक्की झाली. इतकी की त्यातून ते परत उभे राहू शकले नाहीत. रोनाल्ड रीगन यांच्याकडून ते अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाले.

त्यानंतर ब्रेझिन्स्की हे विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था/संघटनांसाठी सल्लागाराचे काम करीत. या संदर्भात आपली मते ते नि:संदिग्धपणे मांडत. २००३ साली अमेरिकेने इराकमध्ये केलेल्या घुसखोरीस त्यांचा तीव्र विरोध होता. त्यातून ते जॉर्ज बुश यांचे कडवे टीकाकार बनले. बराक ओबामा यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ब्रेझिन्स्की यांनी त्यांच्यावरही टीकेचे आसूड ओढले. वास्तविक ब्रेझिन्स्की हे ओबामासमर्थक. परंतु ते प्रत्यक्ष कृती करण्यात साशंक आहेत असे दिसल्यावर ब्रेझिन्स्की यांनी ओबामा यांनाही सोडले नाही. नंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे तर ते जहाल टीकाकार. परराष्ट्र संबंध आणि मुत्सद्देगिरी म्हणजे काय हे या माणसाला कळते काय, असे विचारण्याचे धाडस त्यांनी दाखवले. ट्रम्प हे अमेरिकी मूल्यांना पायदळी तुडवत असल्याबद्दल ब्रेझिन्स्की अस्वस्थ होते. या संदर्भात जगजागृती करण्यासाठी समविचारी लोकशाहीवाद्यांनी एकत्र यायला हवे, असा त्यांचा प्रयत्न होता. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अशा गटाच्या स्थापनेची तयारी सुरूही झाली होती. या गटाची पहिली बठक लवकरात लवकर व्हावी असे ब्रेझिन्स्की यांना वाटत होते. त्याचे निमंत्रणही त्यांनी अनेकांना पाठवले. त्यानंतर चारच दिवसांत ते गेले. मिठीचे माहात्म्य मानणाऱ्या या मुत्सद्दय़ाचे मरण सांप्रतकाळी महत्त्वाचे ठरते.

  • चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे असो, अफगाणिस्तानात तत्कालीन सोविएत रशियाचे ‘व्हिएतनाम’ करण्याची संधी शोधणे की ‘आर्क ऑफ इस्लाम’ बांधून कम्युनिस्टांना काबूत ठेवण्याचे स्वप्न असो; नव्या कल्पना ब्रेझिन्स्की यांनी सकारण मांडल्या. युद्धखोरीला विरोध कायम ठेवून ‘पीसफुल एंगेजमेंट’चा पुरस्कार अमेरिकेच्या या माजी सुरक्षा सल्लागाराने केला..