स्वातंत्र्य, समता आणि संवाद ही त्रिसूत्री हाती घेऊन स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने कित्येक कार्यक्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. अजून लढे, संघर्ष संपलेले नाहीत. पण या वाटेवर आता स्त्रियांची खंबीर पावले पडत आहेत..

स्त्रियांच्या वाटचालीचा मागोवा ‘अजून चालतेचि वाट’ या सदरातून घेताना पाहता पाहता एक वर्ष सरत आलं. १८४८ मध्ये स्त्रियांसाठी पुण्यातल्या भिडेवाडय़ात महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेली शाळा आणि तिथे शिकवणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई यांच्या एका साध्या, सरळ, पण अर्थगर्भ विधानाने या वाटचालीची सुरुवात केली, त्याला आता १६५ वर्षे उलटून गेली आहेत. ‘शिक्षणाने मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटते’ या विचारांच्या प्रकाशात पशूतुल्य जीवन जगणाऱ्या स्त्रीच्या आयुष्याने किती खाचाखळगे ओलांडत, अवघड वळणे पार करत, वाटेवरच्या काचा चुकवत मनुष्य म्हणून जगण्यासाठी जो प्रवास करत स्वत:त बदल घडवून आणला, त्याचे एक धावते चित्र या लेखांमधून घडवत आणले.
स्वातंत्र्य चळवळीत बेधडक उडय़ा घेणाऱ्या हजारो स्त्रिया, देशासाठी हौतात्म्य पत्करून फासावर हसत हसत चढलेल्या स्त्रिया; संप, हरताळ, मोर्चे काढून महागाईविरोधात लढणाऱ्या स्त्रिया समाजाच्या मध्यप्रवाहात येऊन आपले अस्तित्व सिद्ध करू लागल्या होत्या. सत्तरीच्या दशकात आदिवासी स्त्रियांनी पिळवणूक करणाऱ्या जमीनदारांबरोबर दिलेला लढा, दारू पिऊन संसाराची धूळधाण करणाऱ्या नवऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी दिलेला सामूहिक चोप हा पुरुषांच्या सत्तेविरुद्ध कृतीने उठवलेला पहिला आवाज होता. स्त्रियांवरचे निर्घृण बलात्कार आणि त्यांची हत्या, पैशासाठी विवाहितांचा बळी घेण्याच्या हुंडाबळीच्या लाखो घटना, स्त्रियांच्या आत्मसन्मानाला सतत डागण्या देणाऱ्या कौटुंबिक छळाचे अनेक प्रकार, लहानसहान कारणे दाखवून घराबाहेर काढल्या जाणाऱ्या हजारो परित्यक्त्या, गर्भातच केली जाणारी स्त्री गर्भाची लाखावारी हत्या. स्त्रियांच्या जीवनावर घोंगावणारी ही हजारो वादळे आणि स्त्री संघटनांनी त्यांच्याशी टक्कर देण्याचे केलेले प्रयत्न, या फूटपट्टय़ा लावून यशापयश मोजण्याच्या गोष्टी नाहीत. स्त्रियांचे आत्मभान जागृत करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. दलित स्त्रिया, ग्रामीण स्त्रिया, मुस्लीम स्त्रिया इत्यादी परिघावरचे जीवन जगणाऱ्या स्त्रियांनीसुद्धा अन्याय, अत्याचाराने हातपाय गाळून न बसता कणखरपणाने आणि एकजुटीने दिलेले लढे हे परिवर्तनाच्या वाटेवरचे पहिले पाऊल आहे.
आज या सगळ्या वाटचालींकडे दृष्टिक्षेप टाकताना जुन्या आणि नव्या स्त्रीमध्ये झालेले आमूलाग्र बदल चटकन नजरेत भरतात. नऊवारीतून पाचवारीत मग पंजाबी ड्रेस, जीन्स टी शर्ट, स्कर्ट ब्लेझर ही कपडय़ातली स्थित्यंतरं वरवरची दिसली, तरी अनेकींना या बदलांसाठी लढा द्यावा लागला आहे. केवळ फॅशन म्हणून असे बदल होत नाहीत, सोय, सुटसुटीतपणा, रुबाबदारपणा, व्यवसायाची गरज अशी अनेक कारणे त्यामागे असतात. सोवळ्याने स्वयंपाक, सोवळ्याने वाकून जेवण वाढणे, सर्व लहानथोर पुरुषांचे जेवण झाल्यावर स्त्रियांनी जेवणे, चटण्या-कोशिंबिरीपासून साग्रसंगीत स्वयंपाक, निवडणं, वाटणं, घाटणं, दळणं, कांडणं, पाणी शेंदणं याच कष्टात दिवसभर बुडलेली स्त्री आपली आजी, पणजीच होती. स्वयंपाकाला उभ्याचा ओटा आला; चूल, शेगडी, स्टोव्हच्या जागी गॅसची शेगडी आली, पाट-रांगोळ्यांची जागा जेवणाच्या टेबलाने घेतली, नळातून पाणी मिळू लागलं आणि स्त्रियांचं जीवन सुटसुटीत सोयीचं झालं. नोकरी करणारी स्त्री नुसती पोळीभाजी करून, डबे भरून नोकरीला जाऊ लागली. अधूनमधून हॉटेलचे जेवण, तयार अन्नाची पाकिटे, देशपरदेशातील विविध चवींचे जेवण! स्त्रीच्या केवळ ‘अन्नपूर्णा’ या भूमिकेतसुद्धा आमूलाग्र बदल झाला आणि स्त्रियांनी तो झटपट स्वीकारला. यामागे काळाची गरज होती, परिस्थितीचा रेटा होता तशी तंत्रज्ञानाने दिलेले बदल चटकन स्वीकारून परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याची स्त्रीची वृत्तीही होती. परंपराप्रिय पुरुषांनी हे बदल चटकन स्वीकारले असे घडले नाही. नोकरी करण्यासाठी, कामासाठी, मिळणाऱ्या पैशावर स्वत:चा हक्क ठेवण्यासाठीही कित्येकींना झगडे करावे लागले, अजूनही करत आहेत. हे बदल वरवरचे वाटले तरी आंतरिक बदल करण्यासाठी स्त्रीला यातूनच शक्ती मिळते.
घराण्यात चालत आलेल्या कित्येक रूढी-परंपरा पटल्या नाहीत, तरी त्यांना ओलांडून पुढे जाणे, म्हणजे कधी कुटुंबाशी, तर कधी स्वत:शीच संघर्ष, कारण त्यांचा संबंध पापपुण्याशी, देवाधर्माशी इतका अतूटपणे पिढय़ान्पिढय़ा मनावर इतका घट्ट रुजवला जातो, की त्यांना मोडायचा विचारसुद्धा भय आणि धास्ती निर्माण करणारा आहे. जगण्यातल्या अशा चकमकींना खंबीरपणे तोंड देत काही स्त्रिया यामध्ये आपल्याला पटेल तो बदल घडवून आणतात. एक साध्यासुध्या वाटणाऱ्या बाई एकदा म्हणाल्या की, तुम्ही मुकाटय़ाने सहन करत गेलात, तर समोरचा तुम्हाला सतत नामोहरम करण्याची संधी घेतो, पण तुम्ही जर नेटाने आपले म्हणणे सतत लावून धरले तर विरोधाची धारसुद्धा बोथट होते. आपले स्वत्व जपण्याकरिता अशा प्रथांना खतपाणी घालायचे नाही, हा निश्चय झाल्यावर अनेक कुप्रथांना विरोध करण्याचे धैर्य त्यांना आले. अनघाताई कधी हळदीकुंकू, संक्रांत वाण देत नाहीत. भोगीला घरच्या घरी मोलकरणीला आणि स्वयंपाकीणबाईंना त्या स्वत:च्या हाताने गरमागरम स्वयंपाक करून वाढतात. चैत्रातले हळदीकुंकू नसते, पण सगळ्या आप्तेष्ट, मित्रमैत्रिणींना बोलावून डाळ कैरी, पन्ह आणि मोगऱ्याचा गजरा देतात. त्यात विधवा, परित्यक्त्या, पुरुष स्नेही वगैरे सगळी मंडळी असतात. विधवा स्त्रीने कुंकू लावावे की नाही, यावरून काही घरांत अजून वादंग होतात. कामाच्या ठिकाणी लोकांचं हमखास लक्ष जातं, म्हणून चार यत्तासुद्धा न शिकलेल्या आमच्या कामवाल्या संगीताबाई मंगळसूत्र, बांगडय़ा वगैरे गोष्टी नवरा गेल्यावरही पूर्वीसारख्या वापरतात. यासाठी धिटाई तर हवीच, पण त्याहीपेक्षा त्यांना यामुळे जास्त सुरक्षित वाटते ते अधिक महत्त्वाचे.
लग्नानंतर पाच-सहा वर्षांनी त्यांच्या बहिणीचा नवरा गेला, तर तिच्या सासरच्यांनी तिला पांढऱ्या पायाची ठरवून घराबाहेर काढल्यावर या बाईने त्यांना चांगले सुनवून तिला घरात घ्यायला लावले. आजकाल वेळ पडली तर बऱ्याच मुली सासरच्यांचा विरोध पत्करूनही आपल्या आईवडिलांचा म्हातारपणी सांभाळ करताना दिसतात. भाऊ नसेल तर बहिणीही आईवडिलांचा अंत्यसंस्कार करायला मागेपुढे बघत नाहीत. या सगळ्या उदाहरणांत आपल्याला पटेल, योग्य वाटेल तेच करण्याचा निर्णय घेणे आणि तो तडीस नेणे हे अधिक महत्त्वाचे.
नोकरी-व्यवसायात तर अशी आव्हाने स्त्रियांसमोर पावलोपावली उभी असतात. पुरुषप्रधान संस्कृती, बॉसचा वरचष्मा, स्त्रियांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याची प्रवृत्ती, भ्रष्टाचार, तत्त्वहीन वागणुकीला मिळणारी प्रतिष्ठा अशा शेकडो अपप्रवृत्ती मध्य प्रवाहात आल्यावर स्त्रियांना कळू लागतात. आपल्यावर अन्याय झाला तर त्यासाठी तक्रार करणे, कोणी छेडछाड केली तर वेळीच त्याचा संघटित प्रतिकार करणे, कोणी पैसे देऊन काम करण्याची गळ घातली, तर त्याला ठाम नकार देणे, आपली प्रतिष्ठा, आपला आत्मसन्मान आपणच आपल्या वागणुकीतून जपणे, स्त्री म्हणून कोणी फायदा घेत असेल किंवा स्त्री म्हणून जादा सवलती देत असेल तर अशांचा आंतरिक हेतू समजून त्यांना दूर ठेवणे, अशी सगळी तारेवरची कसरत किती तरी स्त्रिया करत असतात, त्यात जरा तोल गेला तर खाली घसरण व्हायला वेळ लागत नाही. आपली बाजू सत्याची आहे, आपला लढा नैतिक अधिष्ठानावर उभा आहे याचा आत्मविश्वास असेल, तर पायात बळ येते. शिक्षणाचे वा घरचे संस्कार पूर्ण ताकदीनिशी लढण्याची शक्ती देतात.
पूर्वसूचना न देता फीवाढ केलेल्या शाळेविरुद्ध मुंबईच्या एका स्त्री पालकाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. एका डॉनचा शाळेत सत्कार करण्याच्या प्रसंगाला एका शिक्षिकेने प्राण पणाला लावून विरोध करत तो समारंभ रद्द केला. एका मोठय़ा परीक्षेत उघडपणे चालू असलेल्या कॉपीला एका तरुण मुलीने विरोध करून तक्रार केली. सर्व गुणवत्ता असून प्रमोशन केवळ स्त्री म्हणून नाकारल्याने एका बँकेतील बाईंनी दहा वर्षे लढा देऊन विजय मिळवला. अशा किती तरी कहाण्या आहेत, जेव्हा स्त्री म्हणजे भित्री हे समीकरण या स्त्रियांनी खोडून काढले आहे. अशा लढय़ांमध्ये हार-जीत या शब्दांना अर्थच नसतो; पण स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले हीच घटना त्यांचे सामथ्र्य दाखवणारी असते.
सार्वजनिक जीवनातही पुढे पाऊल टाकण्यासाठी भांडणाला खंबीर तोंड देण्याची तयारी ठेवावी लागते. रस्त्यात कोणी कचरा टाकला म्हणून त्याला/तिला हटकणे, एकेरी मार्गावरून दुसऱ्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकाला रोखणे, कर्णकर्कश आवाजाच्या भिंती दिवस-रात्र चालू ठेवणाऱ्यांना समज देणे, धक्का मारून जाणाऱ्या वाहनांबद्दल पोलिसांकडे तक्रार करणे अशा अगदी एरवी छोटय़ा वाटणाऱ्या लढायासुद्धा काही जागरूक स्त्रिया लढत असतात. काही वेळा भांडाभांडीला तोंड द्यावे लागते, धमकावले जाते, अंगावर हातसुद्धा उगारला जातो, पण हे सर्व धोके पत्कारून बाणेदारपणे केलेला विरोध त्या स्त्रियांचे धैर्य दाखवणारा असतो.
२१ व्या शतकाची १५ वर्षे उलटली. स्त्रियांनी आज कित्येक अनवट क्षेत्रांत धडाडीने मुसंडी मारली आणि स्त्री म्हणजे अबला नव्हे, तर सबला हे सिद्ध केले. स्वातंत्र्य, समता आणि संवाद ही त्रिसूत्री हाती घेऊन स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने कित्येक कार्यक्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. अजून लढे, संघर्ष संपलेले नाहीत. मागे राहिलेल्या अनेकींना हात धरून पुढे आणण्याचे मोठेच आव्हान आहे, पण दगडधोंडय़ांच्या वाटा सुकर आणि सुभग करण्यासाठी कष्ट घेण्याची स्त्रीची तयारी आहे, म्हणूनच ती इथवर पोहोचली आहे. वाटा संपत नाहीत, क्षितिज जसे नेहमी लांबच राहते, तसा मुक्काम नेहमी दूरच असतो, म्हणून या वाटेवर निर्भयपणे चालत राहणे हेच एक आव्हान असते.

ashwunid2012@gmail.com
(सदर समाप्त)