पाळी हा स्त्रीच्या जीवनातील अत्यंत खासगीचा अनुभव आहे. त्या काळात स्त्रीला अपवित्र मानण्याची आणि विटाळाची प्रथा बदलत्या काळानुसार बदलत चालली आहे. या काळात अगदी देवळात जाणाऱ्या, कर्मकांड करणाऱ्या तरुणीही दिसू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘स णवार आले की त्याचा ताणच जास्त येतो मला.’’ दीपा म्हणाली. सणासुदीच्या दिवसांत कामाचा जास्त ताण येतो म्हणून ती असं म्हणाली असावी असं वाटलं, पण तीच म्हणाली, ‘‘कामाचं नाही हो काही वाटत, पण आपल्याकडे ना, प्रत्येक सण बरोबर महिन्याच्या अंतरावर असतात. एकदा का गणपतीत पाळी आली की, पुढे दसरा, दिवाळी प्रत्येक महिन्यात येते.’’
‘‘पण तू कुठे बाजूला बसतेस?’’
‘‘बाजूला नाही बसलं तरी देवाचं नाही करता येत.’’
सुमेधाकडे गणपतीत आरतीला गेले होते. आरती झाल्यावर फुलं वाहायला जाऊ नकोस म्हणून ती नुकत्याच वयात आलेल्या सोहाला सारखी खुणावत होती. सोहाने जाणूनबुजून किंवा अजाणता आईकडे दुर्लक्ष केले आणि ती गणपतीला फुले वाहून आली. ‘‘या हल्लीच्या मुलींना काही ऐकायला नको.’’ सुमेधा नाराजीने माझ्या कानात कुजबुजली. त्या वेळी पन्नास वर्षांपूर्वीचा एक प्रसंग माझ्या डोळ्यापुढे आला. आईचा काही तरी निरोप सांगायला मी ‘त्या’ अवस्थेत माझ्या मावशीकडे गेले होते. तिच्याकडे सोळा सोमवारच्या उद्यापनाची आरती चालू होती. तिनं शंकराला वाहायला माझ्या हाती फुलं दिली. एक तर मी सगळ्यांमध्ये मिसळून उभी होते आणि आता फुलं नाही वाहायची म्हणजे? काय करावं मनात द्वंद्व सुरू झालं, पण मावशीनं हाक मारली तशी पुढे झाले. फुले वाहून तीर्थप्रसाद घेतला. केलं ते बरोबर की चूक, असा डोक्यात प्रचंड गोंधळ माजला. त्याच दिवशी येताना सायकलवरून पडले, तेव्हा मनातलं मळभ अधिकच दाट झालं, मात्र आईशी पुढे मोकळेपणाने बोलल्यावर आकाश मोकळं झालं आणि पुढे या दोन गोष्टींचा मी कधी एकमेकांशी संबंध जोडला नाही.
पाळी हा स्त्रीच्या जीवनातील अत्यंत खासगीचा अनुभव आहे. स्त्रीच्या गर्भाशयात तयार होणारे रक्ताचे आवरण, अंडे फलित झाले नाही, तर दर महिन्याला ते चार-पाच दिवसांत पूर्ण गळून पडते. प्रत्येक स्त्रीच्या बाराव्या-तेराव्या वर्षांपासून ते साधारण पंचेचाळिसाव्या वयापर्यंत गर्भारपण व बाळंतपणातला एक वर्षांचा कालावधी सोडला, तर हे चक्र अव्याहतपणे चालू असते. ही घटना पूर्ण शारीरिक असूनही याला धार्मिक व सांस्कृतिक संदर्भ का चिकटले असावेत? पाळीमध्ये होणारा रक्तस्राव अशुद्ध व म्हणून ती स्त्री अपवित्र मानण्याची प्रथा जवळजवळ सर्व जातीधर्मात रूढ होती. हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथांत वेद, उपनिषदे, पुराणांमध्ये बाजूला बसण्याच्या नियमांचा उल्लेख आढळत नाही. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात रजस्वला होती, म्हणून तिची शोकात्मिका अधिक गहिरी होते. या लोकरीती- विशेषत: उच्चवर्णीय समजल्या गेलेल्या समाजात कर्मकांडाचे प्रस्थ वाढल्यानंतर सुरू झाल्या असाव्यात आणि स्त्रीला हीन समजण्याची वृत्ती या धार्मिक आचारविचारातून रुजून स्थिर झाली असावी. नवरात्रात आठ वर्षांखालील कुमारिकेची पूजा करण्याची चाल तिची पाळी सुरू झाली नाही, म्हणून तिला शुद्ध आचरणाची समजण्याच्या वृत्तीतून आली असावी. पाळी येण्यापूर्वी मुलीचा विवाह करण्याची पद्धत
१९ व्या शतकापर्यंत रूढ होती. पाळी आल्यावर मखरात बसवून मुलीला भेटवस्तू देण्याची चाल होती. चौथ्या दिवशी न्हाऊन मग तिची सासरी रवानगी होई. त्यानंतर गर्भधान विधीने तिला शुद्ध करणे किंवा नवव्या महिन्यात अंठागुळ करणे या प्रथा तिला अशुद्ध मानण्याच्या कल्पनेतूनच आल्या आहेत. बाळंतिणीला दहा दिवस न शिवण्याची प्रथा काही फक्त स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीतून आलेली नाही. पाळीतील रक्तस्रावाला विटाळ मानल्याने स्त्रीच्या गर्भात नऊ महिने वास करणारा मुलगाही आठव्या वर्षी मुंजीबंधनातून मंत्रोच्चारातून ‘द्विज’ म्हणजे दुसऱ्यांदा जन्माला येतो. समाजाची धारणा करण्यासाठी वंशवृद्धी करण्याचे महान कार्य निसर्गाने जिच्यावर सोपवले तिच्याबद्दलच्या- तिला हीन लेखण्याच्या या भावनांचे आश्चर्य वाटते. वंशवृद्धीसाठी, घरकामासाठी, उपभोगासाठी स्त्री तर हवी, पण तिला सर्व प्रकारच्या पापाची खाण आणि मोक्षमार्गावरची धोंड समजली गेली.
जपानमध्ये ‘अशा’ स्त्रियांना बुद्ध मंदिरात जाण्यास बंदी आहे. जपानमधील शिंटो धर्मातदेखील परंपरेने स्त्रियांना डोंगरावरील धार्मिक मंदिरात जाण्यास एरवीही बंदी आहे आणि अनेकदा आव्हान देऊनही ही परंपरा अजून अबाधित आहे. आपल्याकडील कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात स्त्रियांनी काही वर्षांपूर्वी प्रवेश मिळवला, पण अजूनही महाराष्ट्रातील काही देवस्थानांत स्त्रियांना आतपर्यंत प्रवेश नाही. ‘बायकांना तरी काय करायचंय आत जाऊन?’ असा प्रश्न अनेक जण विचारतात, पण प्रश्न गाभाऱ्यापर्यंत जायचेच कशाला हा नसून घटनेने बाईला दिलेल्या समानतेच्या तत्त्वाचा आहे.
अनेक आदिवासी समाजात मात्र पाळीच्या रक्तस्रावाबरोबर अनेक विधायक संदर्भ जोडले आहेत. अशी स्त्री पवित्र आणि शक्तिमान समजली जाई. आपल्या मानसिक इच्छेच्या बळावर ती आजार बरा करते असे समजले जाई. चेरोकींमध्ये रक्तस्राव हे स्त्री शक्तीचे प्रतीक मानण्यात येई. मॉर्मान लोक पाळी असणे शुभ समजत, कारण पाळी येणे ही स्त्रीच्या तारुण्याची खूण आहे आणि ती पुष्कळ मुलांना जन्म देऊ शकते याची सूचना आहे.
काळ बदलत जातो, तसे रूढीचे काच कमी होत जातात. पूर्वी एकत्र कुटुंब असताना घरात चार-पाच स्त्रिया असत. त्या वेळी तीन दिवस बाजूला बसणे, घरात कोणत्याही गोष्टीला हात न लावणे, चटईवर झोपणे, चौथ्या दिवशी तिला कुणी तरी डोक्यावरून आंघोळ घालणे वगैरे गोष्टी सहज शक्य होत्या; पण विसाव्या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकापासून स्त्रिया शिकू लागल्या, पुढच्या काळात नोकरी करू लागल्या, घरापासून साताठ तास दूर राहू लागल्या. खेडय़ातून नोकरदार माणसे शहरात आली. ‘हम दो हमारे दो’ असा छोटय़ा कुटुंबाचा जमाना आला. चाळीतून, वाडय़ातून एक-दोन खोल्यांच्या घरात माणसे राहू लागली. अशा वेळी स्त्रीने बाजूला बसणे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे परिस्थितीच्या रेटय़ाने का होईना, पण अनेकींनी बाजूला बसणे बंद केले. सोयीच्या दृष्टीने आपल्या कपडय़ात बदल केला. नऊवारी नेसणाऱ्या पूर्वीच्या बायका अंतर्वस्त्रे वापरत नसत. नऊवारीची रचनाच पाळीच्या काळात सुरक्षित वाटे. पुढे स्त्रिया पाचवारी नेसू लागल्या. जुन्या साडय़ांच्या घडय़ा धुऊन पुन:पुन्हा वापरण्याची प्रथा होती. मग वापरायला अतिशय सोपे, सुरक्षित व टाकून देण्याजोगे सॅनिटरी पॅड सर्रास वापरले जाऊ लागले. त्यामुळे पंजाबी ड्रेस, जीन्स वगैरे कपडे वापरताना केवढी मोठी सोय झाली. प्रवास, खेळ, नृत्य, जिम वगैरे शारीरिक हालचाली करताना स्त्रियांना भय उरलं नाही.
भाषेच्या बाबतीतही मोकळेपणा आला. पूर्वी पाळीचे नाव उच्चारणेही शिष्टसंमत नव्हते. ऋतुप्राप्ती, नहाण येणे, कावळा शिवणे, बाजूला बसणे वगैरे आडवळणाने सूचना दिली जाई. आता ‘पीरियड’ या इंग्रजी शब्दाने हा सर्रास उल्लेख होतो व नवऱ्याशी वा मैत्रिणीशी बोलताना याबद्दल बोलणे वज्र्य समजले जात नाही.
ज्यांनी काही विचाराने व त्यामागील शास्त्रीय सत्य समजून स्वत:त बदल घडवून आणले, त्या स्त्रिया देवधर्माच्या भीतीतून मुक्त झाल्या, पण आजही मानसिकदृष्टय़ा अनेक स्त्रिया भीतीपासून मुक्त नाहीत. मध्यंतरी मुंबईतील सुशिक्षित, प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनीअर्स वगैरे स्त्रियांचे सर्वेक्षण केल्याची एक बातमी आली होती. त्यात ९० टक्के स्त्रियांनी पाळीच्या काळात आपण देवळात जात नाही व प्रत्यक्ष धार्मिक कार्यात भाग घेत नाही, असे सांगितले होते. परंपरेचा प्रभाव आपल्या मनावर अजून खोलवर आहे. काही कामवाल्यांशी बोलले, तर त्या म्हणाल्या की, आम्ही या काळात कामावर येतो, पण घरात विटाळ पाळावा लागतो. त्यातल्या काही सुधारक महिला म्हणाल्या की, आम्ही देवघरावर पडदे टाकतो व तीन दिवस पूजा बंद ठेवतो. विश्रांतीचा विषय काढल्यावर शेतावर काम करणाऱ्या महिलांनी सांगितले की, घरात शिवायचे नाही, पण शेतीची कामे करावी लागतात, धुणंभांडीही सुटत नाहीत, वरून पाणी घालून नाही तर वाळवून घेतात.
समाजात होणारे बदल अतिशय धिम्या गतीने होत असतात. स्त्रियांच्या बाबतीत तर ही गती आणखी कमी असते. त्यामुळे पिढय़ान्पिढय़ा ज्या चालीरीती चालत आल्या, त्या पटकन सोडून देता येत नाहीत. कधी त्यामागे धाक असतो, कधी भीती, कधी अपरिहार्यता, कधी अंधश्रद्धा, कधी अज्ञान, कधी परंपरांचे मूकपणे पालन करण्याची वृत्ती. परिस्थितीचा रेटा आणि विचार करून स्वतंत्र निर्णय घेण्याची कुवत जसजशी येत जाईल तसतशी ही बंधने सैल होत जातील अशी आशा करू या.
ashwunid2012@gmail.com

मराठीतील सर्व अजून चालतेचि वाट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women periods phase and changing indian culture
First published on: 05-12-2015 at 01:03 IST