22 January 2019

News Flash

चित्रे इशाराही देतात!

एक ५-६ वर्षांची मुलगी काही केल्या बाबाचा हात सोडत नव्हती. त्याला ऑफिसातही जाऊ देत नव्हती

प्रतिनिधिक छायाचित्र

मुलांची आणखी एक भाषा असते ती चित्रांची. एखाद्या चित्राचा कसा अर्थ मुले लावतात त्यावरून त्याचे भावविश्व वेळेवर समजून घेता येते. कधी या चित्रांतून मी नकोय असा भाव व्यक्त होतो, तर कधी असुरक्षितता, तर कधी लैंगिक शोषणही.. ही चित्रं, त्यातला इशारा वेळीच ओळखायला हवा तरच त्या मुलांना त्यातून बाहेर काढता येईल.

मुलांकडे बघायला, त्यांच्याशी बोलायला घरातले, दारातले कुणालाच वेळ नाही व त्याचे होणारे दुष्परिणाम हा विषय सदर लेखमालेत वारंवार येतो आहे. मुले भाषा वापरून जे सांगतात तेही आपण ऐकत नाही तर अबोल भाषा किंवा बोललेल्या प्रत्यक्ष शब्दांच्या आडचे भाव किंवा वाक्यांमधल्या छुप्या जागा बघितल्या जाणे अशक्यच. प्रत्यक्ष शब्द माध्यमांच्या पलीकडे मुलांचीच काय मोठय़ांचीही भाषा असते. देहबोली, स्पर्शबोली, डोळ्यातून बोलणे, कृतीतून बोलणे इत्यादी ही भाषा समजायला संवेदनशील मन व मुलालाच दिलेला असा वेळ मात्र हवा.

मुलांची आणखी एक भाषा असते ती चित्रांची. त्यांची चित्रे, वापरलेले रंग इत्यादींवरून संवेदनशील कोणालाही अनेक गोष्टी समजू शकतात. एका बालवर्गातील मुलगा मन लावून भरपूर रंग वापरून चित्रे काढीत असे. नंतर मग त्यावर काळ्या रंगाचा ब्रश फिरवत असे. वेडाच आहे, पासून सुरुवात करत, मुले असेही वागतात पलीकडे कोणाचीच मजल गेली नाही. प्रत्यक्षात हा मुलगा प्रचंड शोषणाला सामोरे जात होता व त्याचे रंगीत जग कसे काळे झाले आहे हे व्यक्त करीत होता.

एक ५-६ वर्षांची मुलगी काही केल्या बाबाचा हात सोडत नव्हती. त्याला ऑफिसातही जाऊ देत नव्हती. तिच्या अचानक आलेल्या या असुरक्षिततेचे कारण सापडत नव्हते. तिची चित्राची वही पाहिली. त्यात तिने सर्व कुटुंब घरात आहे व बाहेर पाणीच पाणी आहे व त्यात कोणी तरी बुडते आहे असे दाखवले होते. दूरचित्रवाहिनीवर पुराच्या घटना व त्यात कोणाचे तरी वाहून गेलेले बाबा पाहून तिच्या मनात भीती बसली होती.

‘मासूम’ नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. त्यात सावत्र मुलाला आई स्वीकारत नाही असा काहीसा आशय होता. मुलाने काढलेल्या चित्रात सगळे कुटुंब एकीकडे व तो लांब एका अंतरावर उभा असे दाखवले होते. अशी चित्रे काही विरळा नाहीत. ‘मी नकोय’ ही भावना व्यक्त करणारे हे चित्र. एका शाळेमध्ये गेले असता बालवर्गातील मुलीचे चित्र आम्हाला दाखवण्यात आले. खूप छान रंगीबेरंगी फुले असलेली बाग होती, झोपाळा होता, मधे एक गोल काढून त्यात एक मुलगी झोपली होती व शेजारी त्याच गोलात एक पुरुष होता. मुलगी आनंदी होती, पण तिला गुप्त भागात संसर्ग झालेला आढळला होता. सर्व तऱ्हेने समुपदेशकाने चौकशी केली, पण मुलीकडून काही कळले नाही. मात्र या चित्राबद्दल विचारल्यावर तो गोल एक डब्बा आहे व मी आणि काका त्या बंद डब्यात बसून डॉक्टर-डॉक्टर खेळतो, असे तिने सांगितल्यावर लैंगिक शोषण उघड झाले.

अनेकदा खूप छोटी बोलताही न येणारी मुले लैंगिक शोषणाचे बळी म्हणून आमच्याकडे येतात. त्यांच्याकडून प्रत्यक्ष शोषणाची पडताळणी करणे व पुढील कारवाई करणे व पुरावा गोळा करणे खूप महत्त्वाचे पण अत्यंत अवघड असते. कधी कधी कागद, पेन्सिल दिली व तुझे चित्र काढ सांगितले की, मानवाकृती काढतात. त्या आकृतीच्या साहाय्याने विचारल्यावर चित्रावर रेघोटी मारून कोणी कुठे काय केले हे दर्शवितात. उदाहरणार्थ त्याने कुठे हात लावला असे विचारल्यावर छातीवर बोट ठेवतात. त्यावर रेघोटय़ा मारतात किंवा ‘शू’च्या जागेपासून छातीपर्यंत सरळ व जोरात रेघ मारून संबंधित व्यक्तीचे नाव घेतात. ही जबानी ते कधीही बदलत नाहीत. जसे चित्र काढून व्यक्त होतात तसे चित्र बघूनही व्यक्त होतात. त्यामुळे एखाद्या चित्राचा कसा अर्थ मुले लावतात त्यावरून त्याचे भावविश्व वेळेवर समजून घेता येते.

लैंगिक शोषणापासून स्वत:चा बचाव करण्याबाबत अनेक ठिकाणी अनेक वयोगटांच्या मुलांसाठी कार्यशाळा घेण्याचा योग येतो. पहिली ते चौथी इतक्या छोटय़ा मुलांशी काय व कसे बोलावे, हा नेहमीच प्रश्न पडतो. त्यांना जर नावडत्या माणसाचे चित्र काढा, असे सांगितले तर ते भुताच्या रूपात किंवा मोठमोठे दात असलेले/िशग असलेले अशा प्रकारचे असते. पुष्कळदा त्यावर फुलीपण मारलेली असते. हे कोण, असे विचारल्यावर अत्याचार करणाऱ्याचे नाव पुढे येते.

एक ८-१० वर्षांची बलात्कारित मुलगी ‘चाइल्डलाइन’कडे आणली होती. अशा मुलींच्यात असलेली अस्थिरतेची लक्षणे तिच्यातही होती. तिच्या आईशी बोलत असताना निव्वळ तिला एका जागी बसवायचे म्हणून कागद-पेन्सिल चित्र काढायला दिले. चित्र पाहून आम्ही थक्क झालो. शब्दाने फारसे न बोलणारी ही मुलगी चित्रातून व्यक्त झाली होती. कागदाचे तिने रेघ मारून दोन भाग केले होते. एका बाजूला तिने घर दाखवले होते. घरात कपाट होते. कपाटामागे गादी, इथे आम्ही झोपलो म्हणाली. दुसऱ्या भागात फक्त चड्डी घातलेला, बाकी उघडा मुलगा होता. विशेष म्हणजे फक्त चड्डी मुलाच्या अंगावर होती आणि शूच्या जागी, चड्डीच्या खाली एक परत परत गिरवलेला त्रिकोण होता. तो टाटा करून परत चालला होता.

लैंगिक शोषणाप्रमाणेच मारकुटे आई-बाबा, शिक्षक यांचीपण प्रतीकात्मक चित्रे मुले काढतात. त्या माध्यमातून व्यक्त होतात. मनातली मळमळ बाहेर काढतात; पण आपण सुजाणपणे चित्र वाचत नाही. मुलांना अर्थ विचारत नाही. एका ८ वर्षांच्या मुलाने आई काढली. तिने त्याचा हात धरलेला होता. मात्र धरलेल्या जागी फुली मारली होती. का विचारल्यावर आई मारकुटी आहे असे कळले. चित्र काढून त्यापुढे ‘मामी छान, मामा घाण’ अशा प्रकारेही लिहिलेले आढळते. याची सखोल चौकशी केल्यावर शारीरिक/ मानसिक/ लैंगिक शोषण पुढे येते.

निरीक्षणगृहातील बालगुन्हेगारांमध्ये, उपचारात्मक म्हणून काही दिवस गंमतशाळा राबवली. यात एक दिवस गोलात बसून आवडत्या व्यक्तीची चित्रे काढा, असे सांगितले व नंतर त्याच कागदाच्या मागे नावडत्या व्यक्तीचे काढा, असे सांगितले. माझ्या शेजारी एक खुनाच्या गुन्ह्य़ात अटक झालेला १० वर्षांचा मुलगा बसला होता. ब्लँक झाला. मग म्हणाला- ‘‘तुम्ही कोणाचे चित्र काढता?’’ मी आई-आजीचे नाव घेतले. ते पाहून तो मन लावून त्याच्या आईचे चित्र काढू लागला. तुमचे ओठ बघू, डोळे बघू, असे म्हणत चित्र मन लावून रंगवत गेला. नंतर नावडत्या व्यक्तीचे चित्र काढताना एका पुरुषाचे चित्र काढले. आईचे चित्र काढताना शरीराच्या रोमारोमांतून प्रेम, जिव्हाळा ओथंबलेला दिसत होता, तर पुरुषाचे काढताना प्रचंड राग. ते चित्र काढल्यावर त्याच्या शेजारी त्याने एक चाकू काढला व पुरुषाच्या चित्रावर कागद फाटेस्तोवर फुल्या मारल्या. मग म्हणाला- हा माझा सावत्र बाप आहे. आईला खूप मारतो, त्याचा ‘हाफ मर्डर’ करून इथे आलो आहे. बाहेर जाऊन ‘फूल मर्डर’ करणार आहे.

भावविश्व व्यक्त करणारी जशी चित्रं असतात तशीच त्यात निरागसताही भरलेली असते आणि सखोल निरीक्षण असते. झाडाचे चित्र काढा म्हटले तर मुले झाड काढून विविध प्रकारची पाने, फुले, घरटे, घरटय़ात पिल्ले हे तर काढतातच पण मुळेही दाखवतात. मोठय़ांना हे चित्र काढायला सांगितले तर मुळे क्वचित दाखवली जातात. आपण मुलेही सखोल बघत नाही. झाडाला कधी गहिरे निळे, काळे रंगवलेले असते, तर कधी नािरगी. संध्याकाळचे झाड, रात्रीचे झाड असे त्याचे स्पष्टीकरण असते. दिसते तसे मुले काढतात. आपण मात्र त्यांची सर्जनशीलता साच्यात बसवू पाहातो. त्याचबरोबर एकच झाडाचे इतक्या प्रकारे दर्शन होते यामागे तो काही सांगू पाहातो का याचा विचार करत नाही.

एकुणात शाब्दिक, आंगिक, कायिक याबरोबरच मुलांच्या या अन्य भाषा खूप काही सांगून जातात, धोक्याच्या सूचना देऊन जातात, उपचारही सुचवून जातात; पण ते समजून घेण्यासाठी वेळ मात्र दिला पाहिजे. त्याचबरोबर तेवढी संवेदनशीलता व आपले ‘मोठेपण’ विसरून मुलाच्या जगात जाण्याचे कौशल्यही.

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com 

First Published on March 24, 2018 1:01 am

Web Title: article about sensitive images impact on kids