13 August 2020

News Flash

आता सहन होत नाही!

सुनीताच्या घरातील पेइंगगेस्टने तिला व्हिडीओ-गेम पाहायला घरात बोलावले आणि तिच्यावर नको तो प्रसंग आणला.

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

आमच्या चाइल्डलाइनमध्ये बाललैंगिक अत्याचाराची प्रकरणे वाढतच चालली आहेत. १५ दिवसांत ३४ अशा केसेस येऊ लागतात तेव्हा खरेच वाटते, आता बस्स! या मुलांवर हे अत्याचार करणाऱ्या विकृत बाप, शिक्षकांवर, इतर अमानुषांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुर्दाडांवर कारवाई व्हायला हवी. समाजाने पुढे येऊन अशा विकृतांना इतकी जबरी शिक्षा करावी की पुढे कोणी वडील/शिक्षक आपला पालनकर्त्यांचा धर्म विसरणार नाहीत आणि कोणी आई म्हणवणारी बाई अशी आईपणाला बट्टा लावणार नाही.

अडीच वर्षांच्या श्रावणीला विचित्र खेळ करताना आईने पाहिले. मोठय़ा मुश्किलीने तिला बोलते केले. तिचे वडील तिच्याशी जे चाळे करीत होते ते ती ‘खेळत’ होती. १३ वर्षांची सोनी बहुविकलांग होती. रोज तिचे वडील तिच्याशी विकृत चाळे करीत होते- ना तिला ओरडता येत होते ना प्रतिकार करता. १० वर्षांच्या सर्वेशचे त्याच्या शिक्षकाने अशा प्रकारे लैंगिक शोषण केले की त्याची परसाकडची वाट कायमस्वरूपी निकामी झाली. शस्त्रक्रियेने दुसरी वाट करून द्यावी लागली. त्याच्या फाटलेल्या मनावर कोणत्या शस्त्रक्रियेचा उपयोग होणार आहे?

सुनीताच्या घरातील पेइंगगेस्टने तिला व्हिडीओ-गेम पाहायला घरात बोलावले आणि तिच्यावर नको तो प्रसंग आणला. लताची आई बाळंतपणासाठी दवाखान्यात गेल्यावर तिच्या वडिलांनी रोज तिला आईची जागा घ्यायला लावली. आईला हे मान्य होते-योग्यच वाटत होते. मिनी उन्हाळ्याच्या सुट्टीत हॉस्टेलवरून घरी आली. वडील रोज बलात्कार करीत होते- तिला दिवस गेले. पुण्याजवळच्या एका आश्रमात धार्मिक शिक्षक सर्वच मुलांबरोबर विकृत चाळे करीत होता. दहशतीमुळे सर्व मुले गप्प होती. मात्र आठ-दहा वर्षांची दोन मुले जेव्हा रक्तबंबाळ झाली तेव्हा प्रकरण बाहेर आले. स्वातीला व तिच्या मत्रिणींना स्पेशल-टय़ूशनच्या नावाखाली शिक्षक शाळेत त्रास देत होता, तर मूकबधिर मंदाला तिचा शिक्षक. अशी अनेकानेक बाळे.

श्रावणी सोडली तर एकाही आईने आपल्या मुलांना साथ दिली नाही. वर उल्लेखित प्रकरणे ही केवळ नमुनादाखल आहेत- सडक्या पालकत्वाची, आपल्याच आजूबाजूला घडलेली. २००१ मध्ये पुण्यातील आमच्या ज्ञानदेवी संस्थेत ‘चाइल्डलाइन’ ही मुलांसाठी २४ तास मदत-सेवा सुरू झाली आणि अशी अनेक प्रकरणे नित्यनेमाने येऊ लागली. आजोबा-आजी, काका-मामा, काकी-मामी-आत्या, भाऊ, शिक्षक आणि अर्थातच वडील या सर्वाची नावं मुले घेतात. तो एक वेगळा विषय आहे. परंतु वडिलांनी असा अत्याचार करावा आणि आईने त्यांना पाठीशी घालावे, हे माणूस म्हणून सहनशक्तीच्या पलीकडचे आहे.

काल-परवाच चार अत्याचारित बहिणींनी मदत मागितली, वय चार ते दहा. चौकशी करायला गेले असता, त्या तोंडावर आईला म्हणाल्या- ‘‘तू पण वडिलांना सामील आहेस. तू काय केलेस आमच्यासाठी?’’ त्यांनी जे अत्याचाराचे वर्णन लिहून दिले ते वाचवत नाही. कसे सहन केले असेल त्यांनी!

वेश्यावस्तीत अल्पवयीन मुलींना सोडवायला गेले की लक्षात येते, यातील बहुतेक मुलींना वडिलांनीच विकलेले असते आणि आईला हे माहीत असते. एका गावातील वेश्यावस्तीतून सोडविले तर दुसऱ्या गावातील लालबत्ती विभागात त्यांना वडीलच पुन्हा विकतात. किंबहुना ही त्यांची ‘चीज’ असते, कित्येकदा स्वत:च आधी वापरलेली. बसव्वाला आम्ही सोडविले. तिच्या वडिलांनीच ती पळविली गेल्याची तक्रार केली होती. मग कळले नवीन दलालाशी जास्त फायद्याचा व्यवहार झाला म्हणून केलेली ही एक खेळी होती आणि ही सर्रास वापरली जाणारी पद्धत होती.

माझ्या लहानपणी एकदा घराजवळ डुकराची पिल्ले पाहिली. वयानुरूप स्वाभाविकपणे म्हटले, ‘‘अय्या किती गोड!’’ आजी ऐकत होती. म्हणाली लांबूनच पाहा. पिल्लांजवळ गेलात तर डुकरीण अंगावर येईल. इतकी ढोली-संथ डुकरीण, ती काय चपळता दाखविणार? पण एक धिप्पाड कुत्रा जेव्हा तिच्या पिल्लांजवळ गेला तेव्हा ज्या वेगाने उठून, ज्या त्वेषाने ती त्याच्यावर प्राणांची पर्वा न करता धावून गेली त्याने आई म्हणजे काय त्याची प्रचीती आली. एक डुकरीण आपल्या पिल्लांचे, स्वत:च्या सुरक्षिततेचा, समोरच्या त्या मोठय़ा धोक्याचा विचार न करता अशा प्रकारे रक्षण करते तर माणसाची आई अशी कशी? ती कवितेतील, गोष्टीतील महान आई स्वार्थापोटी मुलांचे भक्ष्य नराधमांपुढे कसे टाकते?

वर उल्लेखित श्रावणीचे उदाहरण वगळता प्रत्येक आईने वडिलांना पाठीशी घातलं, का? तर त्यांना शिक्षा झाली तर माझे काय? यातील ९० टक्के वडिलांवर कुटुंब किंवा आई खरे तर बिलकूल अवलंबून नव्हते. ही काही सगळी अशिक्षित घरे नाहीत की गरीब नाहीत. आई संरक्षण करायला तयार नाही. वडिलांना शिक्षा होणार कशी? असे गलिच्छ वडील व वडिलांसमान शिक्षक विकृत खरे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्या आया, शालेय प्रशासन, समाज, तितकाच विकृत नव्हे का?

या अशा अनेक मुलांना ‘चाइल्डलाइन’ने वाचविले, संरक्षण दिले. परवाच एका अजून नीट बोलताही न येणाऱ्या मुलीला सोडवायला आमचे कार्यकत्रे गेले. तिचे वडील तिला जाऊ देईनात, आईची मन:स्थिती सुरुवातीस द्विधा तर नंतर अत्याचारी वडिलांच्या बाजूची होती. पण त्या चिमुरडीला काय कळले न कळे. तिने पटकन पिशवी भरली आणि कार्यकर्त्यांबरोबर निघाली. कार्यकर्तीचा ती हातच सोडेना, आईकडे परत जाईना.

शिक्षकांनी जेव्हा अत्याचार केले तेव्हा इतर शिक्षक म्हणाले, ‘‘आम्हाला माहीत आहे. तो १५-२० वर्षे असे प्रकार करतो आहे.’’ ‘‘मग तुम्ही गप्प का?’’ ‘‘कोण पडणार दुसऱ्याच्या फंदात.’’ हे उत्तर. विकृत तो एकटा शिक्षक कसा म्हणायचा?

एका सुप्रसिद्ध शाळेच्या बसमध्ये चार-पाच वर्षांच्या चिमुरडय़ांवर अत्याचार झाला. पालक म्हणतात, ‘‘डोनेशन दिलंय, शाळा बदलायची कशी!’’ मुख्याध्यापक म्हणतात, ‘‘ट्रस्टी बघतील.’’ आपण सगळे गेंडय़ाच्या कातडीचे झालो आहोत का?

चुकून केस कोर्टात उभी राहिली तर कायदाप्रणालीत लागणारी लांबड व समाजाची भीती म्हणून अत्याचारित मुलीला ‘काही’ झाले नाही म्हणून सांगायला पालक पढवतात. मी स्वत: बाल न्याय मंडळावर असता, सामूहिक बलात्कार झालेली एक मुलगी कोर्टासमोर आली. झालेल्या दिरंगाईमुळे एव्हाना तिचे लग्न लावून दिले होते. झाला प्रकार सासरी माहीत नव्हता. कोर्टासमोर तिने काहीच झाले नाही असे सांगितले. तिला वेगळ्या खोलीत घेऊन गेल्यावर तिने घटनेचे इत्थंभूत वर्णन केले. स्वत: बालगुन्हेगारांनी आपला त्या कृतीतला सहभाग सांगितला. पण कार्यपद्धतींच्या मर्यादांमुळे गुन्हेगार निर्दोष ठरले.

बाललैंगिक शोषणाबाबत काही वर्षांपूर्वी पालकांना सावधान करण्यासाठी एक लेख लिहिला होता. अखिल महाराष्ट्रातून फोनचा पाऊस पडला. अनेकांनी मदत मागितली तर अनेकांनी आपल्यावर लहानपणी झालेल्या अशा अत्याचारांच्या अजूनही भळभळणाऱ्या मनावरच्या जखमांच्या कहाण्या सांगितल्या. नको नको ते ऐकायला लागले.

‘चाइल्डलाइन’कडे अशी प्रकरणे वाढतच चालले आहेत. पण हे एका मोठय़ा हिमनगाचे टोक आहे. वर्तमानपत्रातूनही रोज अशा बातम्या येणे हे काही चांगले लक्षण नाही. पण १५ दिवसांत ३४ अशा केसेस येऊ लागतात तेव्हा खरेच वाटते, आता बस्स! या विकृत बाप, शिक्षकांवर, इतर अमानुषांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुर्दाडांवर कारवाई व्हायला हवी. समाजाने पुढे येऊन अशा विकृतांना इतकी जबरी शिक्षा करावी की पुढे कोणी वडील/शिक्षक आपला पालनकर्त्यांचा धर्म विसरणार नाहीत आणि कोणी आई म्हणवणारी बाई अशी आईपणाला बट्टा लावणार नाही.

खरेच सहन होत नाही!

राजकीय कारणांसाठी अलीकडे काही मुलींच्या बलात्काराची मोठी चर्चा झाली. बेकायदेशीर असून पीडित मुलीचे फोटो सगळीकडे झळकले. आता रिपोर्ट येत आहेत बलात्कार झालेलाच नाही. या राजकीय ‘पालनकर्त्यांचे’ काय करू या? मला ठिकठिकाणहून मोर्चामध्ये सामील होण्याची आव्हाने आली. मी अजिबात गेले नाही. हे मोच्रे म्हणजे निव्वळ दांभिकता. माझा विषयांतर्गत व्याख्यानांत एक नेहमीचा प्रश्न असतो. निर्भया प्रकरणासारख्या घटनेत किती जण मोर्चाला येणार? १०१ टक्के होकार! पण दोन-तीन वर्षांची असताना बलात्कार झालेल्या पीडित मुलीशी लग्न कोण करणार? ९९.९ टक्के नकार. समाजातील आधुनिक युवक, सामाजिक कार्यकत्रे, डॉक्टर, पोलीस -सगळ्या स्त्री-पुरुषांचे हेच उत्तर. मग अशा मोर्चात सामील होण्याचा नतिक अधिकार यांना दिला कोणी? अगदी महिला चळवळीतील महिलांनीसुद्धा बलात्कारित बाळाला घरात घेण्यास ठाम नकार दिला आहे.

सुदैवाने अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा सरकारने आता सूचीत केली आहे. यावर अनेक माध्यम प्रतिनिधींनी मत विचारले. रोज अशी पीडित बालके पाहणारी आमची अख्खी टीम म्हणते, ‘‘नुसती फाशी नाही, हालहाल करून फाशी द्या या नराधमांना.’’ फाशीची शिक्षा येताच मानवी अधिकारवाले, काही धार्मिक नेते यांना गुन्हेगाराचा प्रचंड पुळका नेहमीप्रमाणे आला आहे. सामाजिक भानावर असलेले बुद्धिवादी म्हणविणाऱ्यांनी अंमलबजावणी न होण्याचा ‘पण’ आणला आहे. मान्य! कायदाप्रणाली ढिली आहे, असंवेदनशील आहे, पण या ‘पण’ला मोडीत काढण्याची चळवळ समाजाने उभारायला हवी आहे. किंबहुना ‘ज्ञानदेवी-चाइल्डलाइन’ने उभारली आहे आणि पुण्याच्या उच्च पोलीस अधिकाऱ्यांचा त्याला पाठिंबाही मिळविला आहे. ‘नो टॉलरन्स फॉर चाइल्ड सेक्शुअल अब्युज अ‍ॅण्ड नो टॉलरन्स फॉर दिरंगाई’ असे ठरवून पुढे जायला हवे आहे. या! आपल्या लेकरांसाठी या चळवळीत सामील व्हा.

 (सर्व नावे बदलली आहेत.)

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2018 12:36 am

Web Title: article on child sexual abuse cases
Next Stories
1 शिबिरांचे तुरुंग
2 संस्कारांचे वास्तव
3 दु:ख पचविण्याची ताकद
Just Now!
X