13 August 2020

News Flash

बंध जोडणारी परंपरा हरवतेय..

आधुनिक बाळंतपणाच्या पद्धतीत बाळ जन्मत:च त्याला न धुता पुसता आधी आईच्या छातीवर ठेवले जाते.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

आपल्या परंपरांचा शोध घेतला तर लक्षात आले की सहवासाच्या संधी निर्माण करणे, स्पर्शाची संधी देणे व त्यानिमित्ताने जबाबदारी टाकणे हे आपल्या रीतिरिवाजात गोवलेले आढळते. संस्कारांव्यतिरिक्त काही हौसेच्या म्हणून परंपरा आपल्याकडे आहेत. ज्यात आरोग्याबरोबरच सामाजिकरणाचा भाग येतो. आयुष्यभर न तुटणारे बंध निर्माण करत आश्वस्त करणाऱ्या या परंपरा आज कुठे तरी तुटताहेत असं वाटतं, हरवताहेत असं वाटतंय..

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, असे म्हटले जाते. माणूस एकलकोंडा किंवा एकटा जगू शकत नाही. आज मुलांचे सगळ्यात मोठे दु:ख हे एकलकोंडेपणा आहे. त्यातून कंटाळा येणे, दिशाहीन होणे, कोणाचाच आधार नसल्याची भावना अशा अनेक गोष्टी निर्माण होतात व त्याचे दुष्परिणाम व्यक्तिश: त्या मुलावर तर होतातच, पण समाजावरही होतात. जन्माला आल्यापासून मुलाची सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुरू होते. आई, मग कुटुंब, विस्तारित कुटुंब, नातेवाईक, शेजारी, शाळा, पाळणाघर, परिसर असे सामाजिकीकरणाचे टप्पे. या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत काही पांरपरिक रूढींचा मोठा हात होता. जो आधुनिकीकरणाच्या नावाखाली हरवतोय असे वाटते. सहज अशा रूढींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात लक्षात आले की, मुलांशी विविध बंधने जोडण्याचे यातील बरेचसे रिवाज आहेत. परदेशात ‘गॉडफादर’ किंवा ‘गॉडमदर’ नेमण्याची प्रथा आहे. आपला एखादा जवळचा नातेवाईक/ मित्र-मैत्रीण यांना हा बहुमान दिला जातो. संकल्पना अशी की, दुर्दैवाने आई-वडिलांना काही झाले तर मुलाची संपूर्ण जबाबदारी घेण्यास ही मंडळी बांधील असतात. म्हणूनच अत्यंत विचारपूर्वक ही जबाबदारी दिली जाते व स्वीकारली जाते.

आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धतीत सगळेच असे गॉडफादर-गॉडमदर गृहीत असतात. एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने खेडेगावातून, वाडय़ा-वस्त्यातून फिरत होते. बरोबर मेडिकल टीम असायची. एका घरात आजी-आजोबा, बऱ्याच जावा असे मोठे कुटुंब होते. तिथे बागडणारे मूल आई म्हणून काकूला बिलगत होते. तर जावेचे बाळ रडायला लागले म्हणून दुसरीच जाऊ पाजत होती. सर्वेक्षणापोटी नर्सने एकेकीला तुला मुले किती, असे विचारल्यावर प्रत्येक जणच सात/आठ असा आकडा सांगत होती. शंका आल्यावरून यातली तुझी कुठली? असे विचारल्यावर त्या सगळ्या जणी भयंकर भडकल्या व आजीने तर आम्हाला हाकलूनच दिले. इथे सगळीच मुले सगळ्यांचीच होती. तुझे-माझे असे काही नव्हते. काकू आई होती आणि आई काकू, अगदी एकमेकींच्या मुलांना अंगावर पाजण्याइतकी. खूप नशीबवान ती मुले! पण आज शहरी विभक्त कुटुंबपद्धतीत सख्खे आई-वडीलही उपलब्ध नाहीत. आत्या, मामा सुट्टीपुरते पाहुणे म्हणूनही नको असतात व त्यांनाही आपल्या घरात ढवळाढवळ चालत नाही. त्यामुळे ज्या जुन्या परंपरा नकळत बंध निर्माण करीत होत्या ते शोधावसं वाटलं. भावनेचे बंध जुळतात ते आल्यागेल्याने, स्पर्शाने, सहवासाने.

आधुनिक बाळंतपणाच्या पद्धतीत बाळ जन्मत:च त्याला न धुता पुसता आधी आईच्या छातीवर ठेवले जाते. त्याचप्रमाणे बाबानेही बाळंतपणाच्या वेळेला उपस्थित राहावे असे सांगितले जाते. जन्मत:च मूल बाबाकडे दिले जाते. हे सर्व बंध दृढ करण्यासाठीच. आई बाळाला अंगावर पाजते तेव्हाही तिच्या व बाळामध्ये एक अतुलनीय बंधन तयार होते. अंगावर पाजण्याचे दिवस जसजसे कमी होत आहेत तसतशी मुले ही संधी गमावत आहेत. परकीयांसारखे छोटय़ा बाळाला स्वतंत्र झोपवणे हाही आधुनिकतेच्या नावाखाली मुलांवर होणारा अन्याय. स्पर्शाची जादू, कुशीत झोपण्याची महती वेगळी सांगायची गरज नाही. मांडीवर तासन्तास घेऊन बसणाऱ्या आज्या, आया हरवल्या आहेत.

आपल्या परंपरांचा शोध घेतला तर लक्षात आले की, सहवासाच्या संधी निर्माण करणे, स्पर्शाची संधी देणे व त्यानिमित्ताने जबाबदारी टाकणे हे आपल्या रीतिरिवाजात गोवलेले आढळते. बाळ पोटात असताना डोहाळजेवण केले जाते व नातेवाईकांना पोटातल्या बाळाशी ओळख करून देण्याबरोबरच आपले त्याच्याशी नाते काय हे सांगितले जाते. आता तू काका/आत्या/ मावशी/आजी.. होणार सांगितले जाते. चेष्टा-मस्करीतून न जन्मलेल्या बाळाशीही आपली नाळ जुळते. बारशाच्या प्रसंगी आत्याला नाव ठेवायचा तर दोन्ही आज्यांना बाळाला जोजवून पाळण्यात घालण्याचा मान दिला जातो. जावळाच्या अथवा कान टोचण्याच्या विधीत परत आत्याला बाळाशी जोडले जाते तर मामाच्या मांडीवर केस कापण्यासाठी बाळाला दिले जाते. उष्टावणात पहिला घास भरवतो तोही मामाच. शाळेची ओळख करून देताना आई-बाबा, घरचे वडीलधारे आणि शिक्षक यांच्याशी नाते जोडले जाते तर शाळेत प्रथमच घराच्या बाहेरचा समाज मित्र म्हणून गवसतो. ज्या समाजात मुंज होते, त्यात विद्यारंभ वडिलांच्याकडून मंत्र घेऊन होतो व त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या आधाराने गुरूकडे जाऊन विद्या कमावण्याची दीक्षा मिळते.

संस्कारांव्यतिरिक्त काही हौसेच्या म्हणून परंपरा आपल्याकडे आहेत. ज्यात आरोग्याबरोबरच सामाजिकीकरणाचा भाग येतो. तान्ह्या बाळाचा होळीच्या आसपास ‘शितळशिमगा’ केला जाते. बाळाच्याच वयाची पाच बाळे बोलवून त्यांना मऊ-शुभ्र कापडाची झबली घालून त्यावर केशर िशपडले जाते, गालाला लावले जाते. द्राक्षाची माळ व गाठी घालून खोबऱ्याच्या वाटीत करदोटा दिला जातो. इतक्या लहान वयापासून मित्रपरिवाराची ओळख होते. निसर्गाशी नाते जोडले जाते. बसायला लागलेल्या मुलाचे बोरनहाण केले जाते. पुन्हा एकदा मित्रपरिवार जोडला जातो. नवरात्रात भोंडला तर दिवाळीनंतर भातुकली असे सामाजिकीकरणास उपयुक्त समवयस्कांच्या बरोबरच हौसेपायी शेजारी-पाजारी, नातेवाईक यांना जोडून घेणाऱ्या या परंपरा. यामध्ये हरतालिका, गणपती यांसारख्या सणांच्या रूपाने शेजारी, नातेवाईक याचबरोबर सार्वजनिक जीवनातील इतर व्यक्तींशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या संधी उपलब्ध होतात. पूर्वी मी जिथे राहत होते त्या सोसायटीमध्ये कानडी, मराठी, तामीळ, काश्मिरी, मल्याळी अशी बहुविध कुटुंबे होती. सोसायटी तुटली पण या अशा कार्यक्रमांमुळे घट्ट झालेली नाती १५/२० वर्षांनंतरही अबाधित आहेत. घरातील जवळच्या नातेवाईकांचा वाटणार नाही इतका आधार या मंडळींचा आजही वाटतो. कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगात ती देश-परदेशात विखुरली असूनही धाऊन येतात.

स्पर्शाचे महत्त्व बॉडिंगसाठी खूप आहेच. आपल्याकडे बाळाला पायावर घेऊन अांघोळ घालण्याची तसेच दिवसातून दोनदा मांडीवर/पायावर घेऊन अर्धा-अर्धा तास मसाज करण्याची पद्धती होती- खूप मोलाची गोष्ट. घरातल्या बायका बाळाला मांडीवर डोलवत ‘डोलबाई डोलाची’ किंवा उभे धरून ‘एक पाय नाचिव रे गोिवदा’ यांसारखे खेळ खेळत. बऱ्याच जणींना आठवत असेल की, मुलांना हे किती हवे असते. तेल लावायच्या वेळेला ती बरोबर रडतात. पायावर घेताच आनंदाने हुंकारतात. स्वत:च पायावर बसून डोलतात व डोलव म्हणून आवाज करतात. मांडीवर झोपवणे, कपाळावर, डोक्यावर हात फिरवत, गुणगुणत झोपविणे हे तर मुले म्हातारी झाली तरी विसरत नाहीत. निरीक्षणगृहातील गुन्हेगार मुलांना असा हात फिरवला तरीसुद्धा तो आई, आजीचा वाटतो यातच सगळे आले. उन्हाळा सुरू होताना बाधू नये म्हणून झळवणी घालवण्याची पद्धत होती. तांब्याच्या कळशीत उन्हात पाणी तापवून, मुलांच्या अंगाला कैरीचा गर आणि हळद याचे मिश्रण चोळून या पाण्याची अंघोळ घालत. याची वैज्ञानिक चर्चा कोणी करेल पण मला घातलेल्या अशा अंघोळीमुळे आजीची दिसलेली माया मी आजही विसरू शकत नाही. असे सोहळे ‘माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठीच, माझी प्रेमाची माणसे काही तरी करीत आहेत’ ही भावना जगायला मोठा आधार देतात. म्हणूनच वेगवेगळ्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, मित्रपरिवाराला मुलाशी जोडणाऱ्या आयुष्यभर न तुटणारे बंध निर्माण करत आश्वस्त करणाऱ्या या परंपरा तुटू नाहीत असे वाटते. मात्र कॉन्ट्रक्ट देऊन याचा इव्हेंट करू नये. नाही तर गाभाच हरवेल.

माणसाबरोबरच निसर्गाचाही आधार लागतो. निसर्गचक्राप्रमाणे आपल्याला ढाळता येण्याची गुरुकिल्ली सापडावी लागते. आपल्या अनेक परंपरा त्याचाही लाभ मुलाला करून देतात. चांदण्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकविणारी कोजागरी असो वा चांदण्यांबरोबरच देवांशी नाते जोडणारी त्रिपुरारी पौर्णिमा. मातीशी आणि इतिहासाशी नाते जोडत, सर्जनशीलता जपत किल्ला बनविण्याची पद्धत तर एकेका नात्याशी बंधने घट्ट करणारी दिवाळी, नवरा-बायकोचा पाडवा (आई-बाबांचे घट्ट नाते-जे आजकाल दुर्मीळ झाले आहे – मुलांना खूप आश्वस्त करते), बहीण-भावाची भाऊबीज, गोमातेशी नाते जोडणारे वसुबारस..

या सगळ्या परंपरांमध्ये सगळ्यात सोपी आणि हरवलेली परंपरा म्हणजे सकाळ-संध्याकाळ देवाला व घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे किंवा कोणी काही दिले तर आभाररूपी नमस्कार करणे. आज मात्र नमस्कार केला तरी डोक्यावर हात ठेवून अथवा पाठीवर हात फिरवून दिला जाणारा आशीर्वाद हरवला आहे.

आधार व आशीर्वाद सगळ्यांचाच लागतो. मातीचा, अवकाशाचा, आई-बाबांचा, नातेवाईकांचा, गुरूंचा, समाजाचा. मात्र तो मिळविण्यासाठी भावनेचे बंध निर्माण करण्याचे काम झाले पाहिजे. ते मग परंपरागत रूढीतून होवोत अथवा आधुनिक पद्धतींतून.

आज मुलांची स्थिती दोरा तुटलेल्या, आकाशात दिशाहीन भरकटलेल्या पतंगासारखी झाली आहे. तो दोरा पुन्हा एकदा कोणी तरी घट्ट पकडायला हवा आहे. आई-बाबा, आजी-आजोबा, आत्या, मावशी-मामा, काका-काकू ऐकताय ना!

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2018 1:01 am

Web Title: author anuradha sahasrabudhe article on indian traditions
Next Stories
1 बेचिराख बालपण
2 मुलांसाठी सुरक्षित स्थानेच नाहीत?
3 आता सहन होत नाही!
Just Now!
X