03 August 2020

News Flash

आंतरजालाचा ‘न्यूड’ सापळा

एक दिवस मित्राने फोन केला असता मत्रीण अंघोळ करीत होती. फोटो पाठव असे म्हणाला.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

पूर्वी मुलींमध्ये अपराधी भाव तरी होता, परंतु आता मात्र जे चित्र दिसू लागलं आहे ते खूपच भयावह आहे. न्यूड-सेल्फी पाठवली, मित्र पुढची मागणी करतो आहे, काय करावं, असा सल्ला मागितला जातो. सगळ्याच मित्रमत्रिणी हे करतात, मी केलं तर बिघडलं कुठं असंही विचारलं जातं. वयोगट असतो १३ ते १७. या समस्येचा अभ्यास करताना नग्न सेल्फीजची देवाणघेवाण ही जागतिक फॅशन असल्याचं निदर्शनास आलं. आपल्या मुलांशी याबाबत मोकळेपणाने बोलणं हा एकच मार्ग यावर असू शकतो.

नेट-अ‍ॅडिक्शनचा भस्मासुर आज आपल्या सर्वानाच गिळंकृत करू पाहात आहे. विषेशत: मुलांना! नेटमध्ये वेड लावणारं असं आहे तरी काय? सहज उपलब्धता, पालकांचं दुर्लक्ष, भावनिक सुरक्षिततेची गरज ही प्राथमिक कारणं आहेत. काही रासायनिक कारणंही आहेत. डोपोमाइन हा मेंदूला आनंदाची अनुभूती देणारा/उत्तेजना देणारा पदार्थ त्याच्यामुळे आपण आनंददायी अनुभव घेण्यास प्रेरित होत राहतो. मादक पदार्थही अधिकाधिक डोपोमाइनच्या निर्मितीला कारणीभूत ठरतात, परत-परत व्यसनासाठी उद्युक्त करतात. मित्राचा संदेश/गोष्ट/ माहिती/ विनोद वगैरे प्रत्येक वेळी मिळत असल्यामुळे डोपोमाइनची निर्मिती वाढती राहते, आनंदित करत जाते व व्यक्ती त्याच्या दुष्टचक्रात सापडते.

पूर्वी सायबर-कॅफेमध्ये जाऊन लागलेल्या नेट-गेम्स अथवा पॉर्न बघण्याच्या व्यसनाच्या, त्यासाठी केल्या जाणाऱ्या चोऱ्यांच्या केसेस आमच्यापर्यंत येत. आता स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप इत्यादींमुळे हे व्यसन पुरविणं म्हणजे हातचा मळ झाला आहे. कित्येक मुलं सांगतात की मध्यरात्री पाणी प्यायला उठलं तरी फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप तपासल्याशिवाय परत झोपत नाहीत.  ‘बोअर’ झालंय हा वयाच्या विविध टप्प्यांतील परवलीचा शब्द. आपण सगळेच यातून गेलो आहोत. बोअरचा अर्थ मेंदूला नव्या चेतनेची आवश्यकता आहे हे कदाचित दर्शवतो. पूर्वी असे ‘बोअरचे’ बरेच फोन यायचे. यात खासकरून ८ ते १५ वयोगटांतील मुलं जास्त असायची. वयानुसार बोअरची कारणं वेगळी असली तरी सोबतीचा अभाव हे त्यात प्रमुख. एकुलतं-एक असणं, पालकांशी तुटलेला संवाद, खेळायला मित्रपरिवार/जागा नाही, मग करायचं काय? बोअर झालेली मुलं मग भलत्या दिशेने जात. नेटची साधनं उपलब्ध झाली तशी ही मुलं त्याच्या व्यसनाला साहजिकच चटकन बळी पडली. पालकांनीही स्वत:च्या नसण्यावर उपाय म्हणून मुलांची सर्जनशीलता संपवणारी खेळणी/टॅब,स्मार्टफोन आणून द्यायला सुरुवात केली. आता मित्रपरिवाराशी संवाद अगदी समोर बसूनसुद्धा नेटवरूनच होऊ लागला आहे.

वास्तविक संशोधन असं दाखवतं की बोअर होणं, कंटाळणं हे माणसाला गरजेचं आहे. कारण त्यातूनच पर्याय शोधले जातात. म्हणजेच सृजन होतं. व्यसनाची पुढची पायरी म्हणजे नेटशिवाय करमणूक होतच नाही. एक प्रकारे इंटरनेट हे मादक पदार्थापेक्षाही प्रभावी ड्रग आहे. कारण मादक पदार्थाची आनंदाची अनुभूती सवयीने कमी होत जाते मात्र नेटवर प्रत्येक वेळेस नवनवीन अनुभव मिळत राहतात. दारू किंवा इतर मादक पदार्थसेवनावर अनेक तऱ्हेच्या मर्यादा आहेत, ती मिळवणंही अवघड असतं. तुलनेत इंटरनेटचं व्यसन हे फारसं धोकादायक परिणाम दाखवणारं नाही. मित्रमंडळी किंवा कुटुंबीय त्यात फारसं पडत नाहीत. झोपेचं खोबरं व त्यामुळे एकूण शरीरावर/शारीरिक क्षमतेवर होणारा दुष्परिणाम, डोळ्यांचा त्रास अशी काही लक्षणं सोडली तर या व्यसनांमुळे कोणी मोठय़ा प्रमाणावर आजारी पडल्याचं ऐकिवात नाही. सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर ज्ञानाच्या कक्षा नक्कीच रुंदावतात. मात्र सातत्याने एकमेकांशी नेटवर जोडले जाण्याची सगळ्यांना सवय लागल्यामुळे जर एखाद्याने तसं न करायचा निर्णय घेतला तर तो ग्रुपच्या बाहेर फेकला जातो. मित्रपरिवाराचा पगडा व महत्त्व ज्या वयात मोठे असते अशा वेळेस याचा मुलांवर विपरीत मानसिक परिणाम होऊन कित्येकदा समुपदेशनाची गरज पडते. मित्रही विकृतपणे ‘सूड’ घेतात. माझ्याकडे आलेल्या एका केसमध्ये मत्रीण सोशल मीडियावर यायला टाळते म्हणून तिचं विकृत चित्र बनवून मत्रिणीने ते अपलोड केलं. त्यावर इतरांकडून गलिच्छ प्रतिक्रियाची चढाओढच लागली. यामुळे ही मुलगी नराश्यात गेली.

नेटमुळे लक्ष केंद्रित करण्याची कुवत अधिकच कमी होत चालली आहे. नेटवर एखादी गोष्ट शोधत असताना काही सेकंदात न सापडल्यास लगेच दुसरीकडे शोधण्याचा उतावीळपणा असतो. फास्ट फॉरवर्डचे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे नको असलेली गोष्ट टाळून पुढे जाण्याची अधीरता असते. या सगळ्याचा अध्ययन क्षमतेवर विपरीत संभवतो. वाचन, मनन आणि आकलन हे अध्ययनाचे महत्त्वाचे टप्पे. पण या उतावीळ संस्कृतीत मननासाठी संयम नाही. त्यामुळे आकलन होऊन खरी ज्ञानवृद्धी किती हा संशोधनाचा विषय होईल.

‘सायबर बुलिंग’ म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून त्रास देणं, हा नेटवरील आणखी एक धोका! सोशल मीडियाच्या अगदी सुरुवातीच्या काळात ‘ऑर्कुट’सारखी माध्यमं मुलांच्यात लोकप्रिय झाली होती. त्या काळात एक नैराश्येत गेलेल्या पाचवीतल्या मुलीची केस माझ्याकडे आली होती. मी पाहिलेली सायबर बुलिंगची ही पहिली केस म्हणता येईल. तिचं फेक प्रोफाइल बनवून तिच्याच वर्गातील मुलं ती कशी कुरूप आहे अशा स्वरूपाचं लिहीत असत. त्यामुळे जाता-येता तिच्याकडे बघून इतर मुलं हसत व शेवटी ती एकटी पडत गेली. सायबर बुलिंगमध्ये नेट/सोशल-मीडिया वापरून एखाद्या मुला/मुलीबद्दल चेष्टामस्करी केली जाते, खोटी हानीकारक माहिती, मॉर्फ केलेले विकृत फोटो पाठवले जातात किंवा त्या व्यक्तीलाच अश्लील संदेश पाठवले जातात. यामुळे मुलांच्या वर्तणुकीत नकारात्मक बदल दिसतात. असे बदल दिसताच तातडीने त्याची कारणं शोधणं व उपाययोजना करणं गरजेचं आहे. हे स्वत: टाळू नये व मुलांनाही लपवू नका म्हणून शिकवावं. पोलिसांच्या सायबर सेल अशा केसेसमध्ये पूर्ण गोपनीयता पाळून खूप चांगली मदत करू शकतात. अलीकडेच एका मुलीने मत्रिणीसाठी आमच्याकडे मदत मागितली. तिचा नेटवरील कोणत्या तरी सोशलसाइटवरील फोटोचा वेगळ्याच देशातील कोणी अनोळखी व्यक्तीने गैरकामासाठी वापर केल्याचं आढळलं. कुटुंबाची बेअब्रू होईल म्हणून ती मुलगी बोलत नव्हती, नराश्यात गेली होती, आत्महत्येच्या विचारापर्यंत पोचली होती. वास्तविक त्या देशात ती कधीच गेली नव्हती. पण हाच नेमका आंतरजालाचा सापळा आहे. सायबर सेलच्या मदतीने १५ मिनिटांत तो फोटो काढला गेला व पूर्ण गोपनीयता बाळगून हे काम झालं.

सायबर सुरक्षेबाबत मुलांना प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं झालं आहे. यात विशेषत: आपली स्वत:ची वैयक्तिक माहिती, फोटो, शाळेचं नाव, फोन नंबर हा चॅटिंग करताना कधीही न देणं. त्याचबरोबर कोणत्याही पॉप-अप मेसेजला उत्तर न देणं हे जसं महत्त्वाचं आहे तसंच ऑनलाइन ओळख झालेल्या कोणत्याही व्यक्तीला पालकांच्या माहितीशिवाय भेटू नये हेही पटवणं गरजेचं आहे. फेसबुकसारख्या माध्यमांवर किती मित्रपरिवार आहे ही एक प्रतिष्ठेची बाब होऊ लागली आहे. परंतु अनोळखी व्यक्तींची फ्रेण्ड रिक्वेस्ट मान्य करणं धोक्याचं ठरू शकतं.

सायबर बुलिंगचा आणखी एक प्रकार म्हणजे वेबकॅमवरून स्काइपसारख्या माध्यमातून दोस्ती करून अशा काही कृती करायला सांगणं किंवा ‘डेअर’सारख्या खेळातून त्या कृती करायला मानसिक दबाव आणणं हा होय. यात सगळ्यात जास्त दिसणारी गोष्ट म्हणजे स्वत:च्या शरीराला अश्लील स्पर्श करायला सांगणं, अंगप्रदर्शन करायला सांगणं इत्यादी. याचा वापर पुढे काही मागण्या पूर्ण करण्यासाठी ब्लॅकमेलिंग शस्त्र म्हणून होतं. एक बॉयफ्रेण्ड-गर्लफ्रेण्ड जोडी होती १३-१४ वर्षांची. छान गुलाबी चष्मा डोळ्यांवर चढला होता. फिल्मी आणाभाका झाल्या होत्या. एक दिवस मित्राने फोन केला असता मत्रीण अंघोळ करीत होती. फोटो पाठव असे म्हणाला. तिने नकार दिला पण आणाभाकांच्या विश्वासावर ‘फक्त तुलाच’ म्हणून तो पाठवला. जवळच बसलेले मित्र कुतूहलाने दाखव म्हणाले. या मुलाने विश्वास सार्थ ठरवत नकार दिला. पण काही कामासाठी तो उठून गेला असताना मित्राला कुतूहल आवरलं नाही त्याने फोन बघितला. मग ‘फक्त तुलाच’ म्हणून आणखी एकाला दाखवला ‘फक्त तुलाच’ची ही साखळी पसरत गेली. परिणामस्वरूप ती मुलगी आत्महत्येपर्यंत पोहचली. ‘चाइल्डलाइन’कडे काही वर्षांपूर्वी अशा प्रकारे मित्राला नग्न सेल्फी पाठवला, तो आता त्याचा उपयोग ब्लॅकमेलिंगसाठी करतो आहे असे फोन येऊ लागले. ‘माझ्याशी संबंध ठेव’पासून सुरू झालेली मागणी ‘मित्रांशी पण संबंध ठेव’पर्यंत जात असे, अन्यथा न्यूड-सेल्फी नेटवर टाकण्याची धमकी असे. यात मुली आत्महत्या करत. निदान येथे अपराधी भाव तरी होता, जो कदाचित पुढील घसरगुंडीला अवरोध करत होता. परंतु आता मात्र जे चित्र दिसू लागले आहे ते खूपच भयावह आहे. न्यूड-सेल्फी पाठवली, मित्र पुढची मागणी करतो आहे, काय करावं असा सल्ला मागितला जातो. समुपदेशनाच्या प्रक्रियेत लक्षात येतं की यात अपराधी भाव बिलकूल नसतो, फक्त पुढे जाण्याबाबत संभ्रम असतो. संवादादरम्यान सगळ्याच मित्रमत्रिणी हे करतात. मी केलं तर बिघडलं कुठे असंही विचारलं जातं. वयोगट असतो १३ ते १७. हे कुठे तरी धोकादायक होऊ लागलं आहे असं वाटतं कारण एक तर पुष्कळदा सल्ला विचारणाऱ्या मुली ज्याला फोटो पाठवला व ज्याच्याबरोबर पुढे जायचं तो प्रत्यक्ष कधीही भेटला नसून नेटवरील मित्र असल्याचं सांगतात. या समस्येचा अभ्यास करताना सेक्स्टिंग (Sexting) म्हणजेच नग्न सेल्फीजची देवाणघेवाण ही एक जागतिक फॅशन असल्याचं निदर्शनास आलं. आपल्या मुलांशी याबाबत मोकळेपणाने बोलणं हा एकच मार्ग यावर असू शकतो. या वयात नको सांगितलं की मुली/मुलं हमखास ती गोष्ट मुद्दाम करतात. मला जेव्हा असे फोन येतात, तेव्हा जाऊ का पुढे, तर जा की असं म्हणत धोके दाखवत जाते. बहुतेक वेळेला असे आठ-दहा दिवस फोन झाल्यावर ती मुलगी मी पुढे जायचं नाही असं ठरवलं आहे असं सांगते व आभारही मानते हा अनुभव आहे.

आंतरजालाच्या चक्रव्यूहात बाहेर येण्याचं कौशल्य असल्याशिवाय शिरूच नाही. आपलं लेकरू ‘अभिमन्यू’ होऊन बळी तर जात नाही ना?  याची प्रत्येक पालकाने, शिक्षकाने काळजी घेणं गरजेचं आहे.

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 4:39 am

Web Title: bold selfie craze selfie obsession in teenage girls
Next Stories
1 पोर्नोग्राफीचे वाढते व्यसन
2 बंध जोडणारी परंपरा हरवतेय..
3 बेचिराख बालपण
Just Now!
X