News Flash

बालपण हरवतंय!

झोपडपट्टीतल्या अथवा खेडेगावातल्या मुली तर घरात पाठचे भावंड आले की घरच्या गृहिणीची जबाबदारी पेलतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

‘चाइल्डलाइन’ला जास्तीत जास्त येणाऱ्या फोनपैकी एक म्हणजे ‘बोअर झालंय.’ एवढीशी पिल्ले, जगात शोध घ्यायला इतक्या गोष्टी असताना बोअर होतातच कशी! याचे साधे उत्तर खेळातून येणारी, संवादातून फुलणारी सृजनशीलता आपण त्यांच्या मानेवर वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून आपल्या आकांक्षांचे ओझे लादून मारून टाकली.

शिस्तीच्या अतिरेकापायी मूलपण तर गुदमरत नाही ना?  हे पाहिलं पाहिजे.

एके काळी शाळा सोडून भंगार वेचणारा आमचा एक माजी विद्यार्थी माझ्याकडे सहज आला होता. त्याला गंमत-शाळेच्या प्रकल्पातून प्रेरणा देत शिक्षण घेण्यास उद्युक्त करण्यात यश आले होते. तो आज पदवीधारक व विशेष प्रशिक्षित असा फोटोग्राफर आहे. त्याला आवडतात म्हणून घरातले काही माझ्या लहानपणीचे फोटो दाखवले. कधी खेळताना, कधी बागेत, कधी आजीबरोबर, भोंडल्याचे.. असे अनेकविध फोटो. ते पाहताच त्याची प्रतिक्रिया मला हलवून गेली. तो म्हणाला, ‘‘असे बालपण असते हे आम्हाला माहीतच नाही.’’

गंमत-शाळेचे आणखी २३ विद्यार्थी तेथे होते. तेही असेच कोणे एके काळी बालकामगार असलेले, भंगार वेचणारे, शाळा सोडलेले, व्यसनांच्या दुष्टचक्रात अडकलेले, बालविवाहाच्या उंबऱ्यावरून परत आणलेल्या मुली.. ते सगळेही म्हणू लागले, खरंच ताई तुमच्यामुळे बालपण मिळाले. पण या सुखद धक्क्यातून धडाही मिळाला की आपण या गोष्टी किती गृहीत धरतो. मात्र बालपणाच्या संकल्पना विशेषत: आजच्या स्पर्धेच्या व बाजारी युगात इतक्या बदलत आहेत की बालपण हे बालपण राहिलेलेच नाही. माझ्या अंगणातल्या झाडाच्या कैऱ्या, आवळे, बोरे, शिल्लक राहतात. आवारात पडली तरी कोणी मुले ढुंकून पाहात नाहीत. समुद्रकिनारी गेले तर शंख-शिंपले शोधायचे असतात हे या मुलांच्या गावीच नसते. गारांचा पाऊस झेलत, चिखल उडवत मनसोक्त पावसात धावणे कल्पनेच्या पलीकडले! साधारण आठ-नऊ वर्षांच्या मुली पूर्वी सरळ चालताना कधी दिसत नसत. हॉप-स्कीप-जंम्प अशी त्या वयाला साजेशी चाल! ‘सरळ रस्ता बघून चाल’, ‘इकडे तिकडे बघू नको’ अशी ताकीद आता मुलांना देण्याची गरजच पडत नाही. हे आणि असेच हरवत चाललेले बालपण!

‘चाइल्डलाइन’ला वारंवार जास्तीत जास्त येणाऱ्या फोनपैकी एक म्हणजे बोअर झालंय. एवढीशी पिल्ले, जगात शोध घ्यायला इतक्या गोष्टी असताना बोअर होतातच कशी! याचे साधे उत्तर खेळातून येणारी, संवादातून फुलणारी सृजनशीलता आपण त्यांच्या मानेवर वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून आपल्या आकांक्षांचे ओझे लादून मारून टाकली. सहा वर्षांची पिंकी मोठय़ा बाईसारखे सर्व शिस्तीत, वेळेत व घालून दिलेल्या घडीनुसार नसले तर या वयातही चिडचिड करते हे कशाचे द्योतक आहे? शिस्तीच्या अतिरेकापायी मूलपण तर गुदमरत नाही ना? ‘चाइल्डलाइन’कडे एका काकाने फोन केला माझ्या पुतणीला वाचवा म्हणून. ही सहा वर्षांची चिमुरडी आईने घाण्याला जुंपली होती. सकाळी ६.३० वाजता शाळेसाठी रिक्षा यायची. अर्धवट झोपेत बळेच पाजलेले दूध पिऊन ती शाळेत जायची. दुपारी ३ वाजता घरी आली की आधी गृहपाठाची चौकशी, बाईंनी दिलेल्या शेऱ्यांवर बौद्धिके, मग जेवण-ज्यावरची एव्हाना वासनाच गेलेली असायची. मग ती खेळू पाहील तर तिला टय़ूशनला पाठवले जायचे. त्यानंतर टय़ूशन-टीचरच्या शेऱ्यांवर बौद्धिके, शाळेचे आणि टय़ूशनचे गृहपाठ. एव्हाना रात्र झालेली असायची. दमलेले पिल्लू कसेबसे जेवायचे आणि झोपायचे. रविवारी व सुट्टय़ांमध्ये स्पेशल-क्लास, नाचाचा क्लास, बॅडिमटन, शिबिरे वगैरे. ती मुलगी संपूर्ण भावनाशून्य चेहऱ्याने आमच्यासमोर उभी होती. या मुलीच्या चेहऱ्यावर कोणतीही निरागसता तर सोडाच पण बालपणाच्या खुणाही नव्हत्या. वर आई म्हणते तिच्याच चांगल्यासाठी हे चालले आहे. ही कथा विरळा नाही. खूप कुटुंब आहेत अशी. यातील काही मुले पळून जातात तर काही आत्महत्या करतात. पण दोन्हीचे धाडस न होणारी बालपण हरवून बसलेले असतात.

झोपडपट्टीतल्या अथवा खेडेगावातल्या मुली तर घरात पाठचे भावंड आले की घरच्या गृहिणीची जबाबदारी पेलतात. एका वस्तीमध्ये कडेवर धाकटे भावंड घेऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरणारी मुलगी पाहिली. तिला गंमत-शाळेत आणावी म्हणून तिच्या घरी गेले तर अजून चूल सारवायची आहे, मसाला वाटायचा आहे, शिवाय पाळण्यातल्या भावाला कोण सांभाळणार. अशी कारणे देऊ लागली. आमच्या गंमत-शाळेत ६ वी, ७ वीतील एक मुलगी होती. आई वारली म्हणून आजीकडे शाळेसाठी राहात होती. नाटकात काम करायची. उत्तम गायिका होती. स्पर्धेसाठी तयारी करताना १० वेळेला आजी बोलवायला यायची. ‘‘२ घागरी पाणी आणून दे, मग कुठे उलथायचे ते उलथ, मला दोन भाकऱ्या टाकून दे, मग तुझं नाटक-बिटक..’’ अशा स्वरूपाचे सर्व चालायचे. यावर एक उपाय त्या मुलीनेच काढला की माझ्याच घरात प्रॅक्टिस करू या. त्यातही एक दिवस ती आजी आली. जेवण कुठंय म्हणाली. ही चिमुकली मला म्हणते, ‘‘ताई, दोनच मिनिटे बसा. मी पट्कन जेवण करते.’’ तिने खरोखरच पटापट दोन भाकऱ्या चुलीवर टाकल्या. त्याच तव्यात भाजी टाकली आणि भांडय़ात एक अंडे उकडायला टाकले व पुन्हा प्रॅक्टिसला उभी राहिली. दोन वर्षांनंतर मात्र तिची मावशी तिला गावाकडे न्यायला आली. त्या वर्षी तिने गंमत-शाळेच्या सर्व कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला. जाताना म्हणाली- ‘‘ताई संपलं सारं, पण गंमत-शाळेने दिलेले हे बालपणाचे क्षण मला आयुष्यभर पुरतील.’’ खूप वर्षांनी भेटली. लग्न झाले होते. पदरी एक मूल होते. म्हणाली, ‘‘मला मिळालेले गंमत शाळेतील बालपण वाट्टेल ते झाले तरी या मुलाला देईनच.’’

आईने शाळेतून काढून मोलकरीण म्हणून कामाला लावलेली नीता मोठय़ा मुश्किलीने स्पॉन्सर मिळवून देऊन शाळेत घातली. गंमत-शाळेची नियमित विद्यार्थिनी. तिच्यातले अभिनयगुण ओळखून ते फुलवले. इतके की तिला व्यावसायिक रंगभूमीवरून मागणी आली. या मुलांची मनोगते आम्ही ध्वनिमुद्रित केली आहेत. त्यात तिने आपला अनुभव सांगितला आहे की, ‘‘आमच्या वस्तीत गंमत-शाळा सुरू झाली आणि आम्हाला शिबीर आहे म्हणून सांगितले. खूप भीती वाटली. शिबीर म्हणजे काय असते? घरापासून दूर काय होईल असे अनेक प्रश्न मनात होते. त्यामुळे पहिला अर्धा दिवस आम्ही चिडीचूप बसून होतो. मग उडय़ा मारणे वगैरे खेळ, भावलीनाटय़ कसली मज्जा! हे विश्वच आम्हाला माहीत नव्हते.’’

पुण्यामध्ये गरवारे बालभवनच्या माध्यमातून दरवर्षी बालभवन आणि वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था एकत्रित बालदिन साजरा करतात. उत्साही तरुण ताई खेळ, क्राफ्ट इत्यादींचे स्टॉल्स नियोजित करतात व कशा प्रकारे मुलांचे गट पाडून या स्टॉल्सवर त्यांना न्यायचे हेही शिस्तबद्ध नियोजन असते. या प्रांगणात घसरगुंडय़ा, झोपाळे, मोठे मदान, चढायला झाडे, सॅण्डपीट असे खूप काही आहे. दरवर्षीचा अनुभव हा की मुलांना हे स्टॉल्स वगैरे प्रकार अजिबात नको असतात. एकेक जण गटातून सटकत झोपाळे, सॅण्डपीट इत्यादी खेळाकडे धूम ठोकतात. काही तर नुसतीच मदानात पळत राहतात. पकडापकडी खेळतात. गाणी वगैरे घेण्यासाठी बसतात ती बांधून घातल्यासारखी. या वर्षी त्यांना खरोखरच मोकळे सोडले तेव्हा विषेशत: वंचित समाजातील मुले, ‘‘ताई आम्ही इथेच राहू का? इथे किती छान वाटतंय असे विचारत होती.’’ यात आईच्या संसाराला जुंपलेल्या छोटय़ा मुलींचा भरणा जास्त.

माझी एक मुलांसाठी काम करणारी मत्रीण तिच्या छोटय़ा नातीचे पराक्रम नेहमी फेसबुकवर टाकत असते. खूप दिवसांत काही गोष्ट आली नाही म्हणून विचारले तर म्हणाली, ‘‘सध्या तिने हट्ट करून उच्छाद आणला आहे.’’ त्यावर माझी प्रतिक्रिया होती की, ‘‘हा तिचा हक्क आहे. तिचा तो खेळ आहे. आपल्याला तो उच्छाद वाटतो.’’ हल्ली मुले उशिरा होतात. त्यामुळे आजी-आजोबा खरेच म्हातारे झालेले असतात. मात्र छोटय़ा नातवंडांना आई-बाबा दिसतच नसल्यामुळे त्यांच्याशी खेळायचे असते. आजीचे वय साठीच्या पुढचे, पण

पाच वर्षांच्या नातीला तिने आपल्याबरोबर नाचावे, धिंगाणा घालावा असे वाटते आणि आजीने हे लाड पुरविले तर तिला ती आपल्याच वयाची वाटायला लागते. असे आजीबरोबरचे बालपण भोगायलाही भाग्यच लागते. माझ्या स्वत:च्या आजीने क्रिकेटचा आनंद घेण्यापासून सिनेमा, नाटक, बाहुलीचा वाढदिवस, भातुकली, गाणे-नृत्य, तऱ्हे-तऱ्हेच्या वस्तू जमविणे, कवडय़ा/पट/पत्ते अशा अनेक गोष्टींमध्ये बरोबरीने भाग घेऊन वेड लावल्यामुळे व आई-मामा अशांच्या यातील सहभागामुळे, बालपण तर समृद्ध झालेच, पण वृद्धत्वही या पुरेपूर मिळालेल्या बालपणामुळे आनंददायी होत आहे व इतरांना बालपण मिळवून देणे शक्य होत आहे. बालपणचा आठवणीचा ठेवा म्हणजे आयुष्यासाठी संजीवनी. ही बाळगुटी हिरावू नका रे!

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:01 am

Web Title: dr anuradha sahasrabuddhe article about childhood period
Next Stories
1 अज्ञानाचा ताण
2 ‘नाही’ म्हणण्याची किंमत
3 आंतरजालाचा ‘न्यूड’ सापळा
Just Now!
X