28 January 2020

News Flash

आमचं ऐकलंत का हो खरंच?

या लेखांना अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा, सर्व वयोगटांमघून, भरभरून प्रतिसाद मिळाला.

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे anuradha1054@gmail.com

फार थोडय़ा मुलांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. खूप काही करण्यासारखे आहे. मुलांचे प्रश्न लोकांपर्यंत नेण्यासाठी, गंमत-शाळेसारख्या उपक्रमातून वंचित मुलांना वेगळी वाट दाखवण्यासाठी, बालसेनेच्या माध्यमातून मुलांचे सबलीकरण करण्यासाठी, अनेक संकल्पना मनात आहेत. प्रयत्न तर आहेत जास्तीत-जास्त मुलांना मदत करण्याचा. पण त्यांना मदत करणाऱ्या हातांची संख्या वाढायला हवी आहे व ते हात सबळही व्हायला हवेत..

वर्षभर चाललेल्या ‘आमचं ऐकताय ना?’ या लेखमालेत मुलांचे एक वेगळे विश्व वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. मुलांना खूप काही सांगायचे आहे. मूलपण नाकारलेली आजची बाळे नको ते भोगत आहेत. त्यांच्या व्यथा मांडायची या लेखमालेच्या निमित्ताने अवचित संधी मिळाली. आपल्याच घरातील, आपल्या परिसरातील/सभोवतालचे वास्तव या निमित्ताने पुढे आणता आले. कदाचित हे आपल्याला माहीत असते, पण तिकडे आपण स्वत:चे मन जपण्यासाठी डोळेझाक करतो.

सर्वच लेखांना भरभरून प्रतिसाद मिळाला. काही विषय मात्र हाताळायचे राहून गेले. जसे सरोगसी, बलात्कारातून जन्माला आलेली मुले, दत्तकाच्या व्यवसायातील प्रचंड फायद्यापोटी मुलांची होणारी तस्करी, त्यासाठी सर्व थरांवरील भ्रष्टाचार किंवा धार्मिक आश्रमांच्या गल्लाभरू प्रमुखांकडून होणारी, बालकामगारांसाठी तसेच वेश्यावृत्तीसाठी होणारी मानवी वाहतूक, बालविवाह, देहविक्रय करणाऱ्यांच्या मुलांचे भीषण जग, असे किती तरी.

‘मुले म्हणजे फुले’ – सगळे थोतांड वाटायला लागले आहे. नवीन जन्माला आलेल्या बाळापासून होणारा लैंगिक अत्याचार, त्यातल्या ६० टक्क्यांच्या वर केसेसमध्ये असे अत्याचार वडिलांकडून होणे व तेही पुन्हा-पुन्हा होणे व त्यावर आईने पांघरूण घालणे, स्वत:ची वैफल्ये मुलांना धोपटून बाहेर काढणे, विकृत अत्याचार- चटके देणे, जाळणे, नाजूक जागी प्रत्यक्ष आईने शिस्तीसाठी जखम करणे, तुझ्याच भल्यासाठी म्हणून आपल्या आकांक्षांचे ओझे मुलांवर लादणे, त्यांचा खेळण्याचा अधिकार हिरावणे आणि त्याला आत्महत्येपर्यंत पोहोचवणे. प्रेम-माया सोडा, आज मुलांशी बोलायलाही आपल्याकडे वेळ नाही. मुले मग कुठेही आधार शोधतात. यांत्रिक गॅजेट्समध्ये पालकांची रिप्लेसमेंट शोधतात. पण प्रत्यक्ष सापडतात लैंगिक शोषण करणारे राक्षस, नेट अ‍ॅडिक्शनचे सतान, पॉर्नच्या चेटकिणी, जे मुलालाच मग अमानवी करू पाहतात. त्याला लैंगिक अत्याचारांच्या, व्यसनांच्या, गुन्हेगारीच्या घसरगुंडीवर नेऊन सोडतात.

मुले म्हणताहेत, ‘तुम्ही ऐकून ऐकत नाही’ त्यांना हवा आहे थोडासा त्यांचाच असा वेळ आणि पालकांशी संवाद. पाठीवर हवाय मायेचा आणि डोक्यावर आश्वस्त करणारा हात. पण जगण्याच्या धावपळीचे निमित्त सांगत, मोठय़ा कौतुकाने घरात आणलेल्या बाळासाठी एवढेही आपण करू शकत नाही. उलट त्याने हा हक्क मागितल्यास मारझोड, शिव्याशाप याचा खुराक मिळतो. स्वत:ची जागा व्हर्च्युअल जगाला दिली जाते. आपल्या भांडणात मुलांचा शस्त्र म्हणून वापर होतो. कधी लाडाकोडाची मुले, नवीन सामाजिक पद्धतीतून जन्मलेली मुले नाकारली जातात. त्यांना आश्रमांचा आसरा घ्यावा लागतो. तेथील भीषण वास्तवसुद्धा पुढे आणण्याचा प्रयत्न या लेखमालेत केला. मुले अनेक पद्धतीने व्यक्त होतात- संवादातून, चित्रातून, नाटय़ीकरणातून, खेळातून.. मात्र वेळ नसलेल्या पालक-शिक्षक-समाजाला, आपल्याच आकांक्षाचे गाठोडे मुलांच्या डोक्यावर त्याची क्षमता न पाहता देवू पाहणाऱ्या या मंडळींना, याचे कुठले भान! गर्भापासून ते घर, शाळा, बाहेरील जग काहीच मुलांसाठी सुरक्षित नाही. बालकामगार/ भिकारी/ वेश्या म्हणून मुले सर्रास ‘विकली’ जातात. आजही बालविवाह होतात. पालकांनी अव्हेरलेल्या, नातेवाईकांचा संबंध तुटलेल्या, स्मार्टफोन/इंटरनेटच्या जगात, मुले पॉर्न, धोकादायक खेळ इत्यादीचे आसरे शोधतात. स्वैर आयुष्यात मित्रांच्या नादाने व्यसनांच्या, आंतरजालाच्या सापळ्यात सापडतात. अनियंत्रित पौगंडावस्थेत लागलेला गुलाबी चष्मा भलतीकडेच घेऊन जातो. या सगळ्यातून उन्मार्गी शिक्का घरातूनच मिळत गुन्हेगारीकडे प्रवास केव्हा व कसा सुरू झाला हे कळतही नाही. मग या सगळ्यावर उतारा म्हणून एकदिवस बालदिन साजरा होतो. आपल्याच अपराधीभावाला आपणच असे खोटे मलम लावतो.

या लेखांना अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा, सर्व वयोगटांमघून, भरभरून प्रतिसाद मिळाला. बहुतेक प्रतिक्रिया भावनिक होत्या तर खूप जणांनी लहानपणी झालेल्या अजूनही भळभळणाऱ्या अत्याचाराच्या जखमा भरण्यास मदत झाली सांगत, आभार मानले. आम्हालाही मदत करा, आमचीही बाजू मांडा म्हणून अनेक नातवंडांपासून तोडलेल्या आजी-आजोबांनी व मुलाच्या ताब्यावरून वडील लोकांनी तळतळून मागणी केली. अनेकांनी स्वत:साठी अथवा मुलांसाठी मदत मागितली. शक्य तिथे ती पुरविल्याचे समाधान आहे. आवश्यकतेनुसार स्थानिक मदत-स्रोतांशी जोडून दिले. समुपदेशनाचा उपयोग झाल्याचे अनेकांनी कळविले. अनेकांनी नुसताच उद्वेग व्यक्तकेला तर अनेक हात आर्थिक मदतीसाठी पुढे आले. मात्र सगळ्यांचाच भावविभोर प्रश्न एकच ‘खरेच असे असते का हो?’ हो, अगदी! आम्ही रोज पाहतो ते हिमनगाचे टोक हेही तेवढेच खरे. ‘त्रास होत नाही का?’ या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे? कितीही वस्तुनिष्ठ व्हायचे ठरविले तरी भावनिक गुंतवणूक होतेच. झोप उडते. अ‍ॅसिडिटी तर जन्माची सोबतीण होते. कधी कधी कार्डियालॉजिस्टकडेही जावे लागते. जेवणाखाण्याच्या वेळा कधीच पाळता येत नाही. एखाद्या समारंभाला गेले तरी केसेस ऐकवल्या जातात. पण सुटका केलेल्या मुलाची मिठी, बोलताही न येणाऱ्या, आत्यंतिक वेदनेत असलेल्या बाळाचे जणू काही आभारासाठीचे स्मित, या सर्व वेदनांवरचा उतारा असते. शाळा सोडून भंगार वेचणारी, भीक मागणारी, गुन्हेगारीकडे वळलेली लेकरे, बालविवाहाच्या गत्रेतून खेचून आणलेल्या मुली जेव्हा स्वकष्टाने उच्चशिक्षित होतात, मिळालेले संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविताना दिसतात, जुगाराच्या अड्डय़ांवरून गंमत-शाळेत आणलेली मुले आज वस्तीचे कार्यकत्रे बनून असे अड्डे मोडून काढतात, तेव्हा भरून पावते. जिथे काम केले त्या वस्त्यांतून दारू, जुगार, आईला मारहाण हद्दपार होते, स्टेशनवरची बेघर मुले, निरीक्षणगृहातील मुले आमच्यात आईची माया शोधतात आणि ती मिळाली म्हणून व्यसने सोडतात तेव्हा कष्टाचे चीज झाल्यासारखे नक्कीच वाटते.

हे जरी खरे असले, हे समाधान अतुलनीय असले तरी व्यावहारिक जीवनाचे वास्तव नाकारता येत नाही. एखाद्या लैंगिक शोषित लेकराला सोडवायचे, रस्त्यावरील खरजेने भरलेल्या, गलिच्छ झालेल्या, आजारी मुलाला निवारा शोधायचा, औषधपाणी करायचे आणि त्याचे घर शोधायचे, त्यांना समुपदेशन करायचे यासाठी लागणारा वेळ/ पसा, गुंड/ राजकीय पुढारी यांच्यापासून असलेला धोका, येणारा दबाव, कायदेशीर कारवाईतील दिरंगाई, सामाजिक दबाव या सगळ्यातून आमचे कार्यकत्रे ३६५ दिवस कार्यरत असतात. त्यांचेही संसार असतात, लहान लेकरे घरी वाट पाहत असतात. बाई म्हणून सामाजिक बंधने असतात. या कामाला सुट्टी नाही! दसरा-दिवाळी घरी राहता येत नाही. सकाळी सुरू झालेली प्रक्रिया कधी रात्री २-३ वाजेपर्यंत चालू शकते. स्वत:चा आणलेला डबा सोडविलेल्या पिल्लांना दिला जातो. समर्पित कार्यकर्त्यांविना हे काम शक्य नाही. मात्र सरकारी अनुदानामध्ये अशा उच्चशिक्षित, समर्पित कार्यकर्त्यांना अशिक्षित स्वच्छता कामगारांपेक्षाही कमी पगार निर्देशित आहेत. त्याला संबंधित स्वयंसेवी संस्था स्वत:च्या गंगाजळीतून आधार देऊ पाहील तर सरकारी अनुदान हे नेहमीच वर्ष-दीड वर्ष दिरंगाईने येते. चांगले काम हवे तर चांगले कार्यकत्रे हवेत. त्यांना योग्य मानधन मिळायला हवे. ‘चाइल्डलाइन’चे संचालक विनामोबदला २४ तास डय़ुटीवर असतात. आम्ही एक पसा मानधन न घेता आनंदाने हे काम करतो. वयाला ६० वर्षे होऊन गेली, आता निवृत्त व्हावे म्हटले! पण आप्तस्वकीय सांगतात, ‘बाई गं तुला निवृत्ती नाही.’ खरे आहे! हे सतीचे वाण स्वीकारले तर आहे. मदत मागणाऱ्यांना ती नाकारणे पटत नाही. संस्कार तसे करू देत नाहीत. सुट्टीवर असले तरी रात्रीच्या कोणत्याही प्रहरी, देशात-परदेशी-कुठेही सुटका नाही. मुलांसाठीच नाही तर स्वत:साठीही स्त्रिया, पालक अशी मंडळी कधीही फोन करतात. नकार देण्याचा स्वभाव नाही, मनाचा पोलीस-आत्म्याचा पहारेकरी तसे करू देत नाही.

फार थोडय़ा मुलांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत याची पूर्ण जाणीव आहे. खूप काही करण्यासारखे आहे. मुलांचे प्रश्न लोकांपर्यंत नेण्यासाठी, गंमत-शाळेसारख्या उपक्रमातून वंचित मुलांना वेगळी वाट दाखवण्यासाठी, बालसेनेच्या माध्यमातून मुलांचे सबलीकरण करण्यासाठी, अनेक संकल्पना मनात आहेत पण आर्थिक पाठबळाशिवाय त्याला खूपच मर्यादा आहेत. पुण्यातील काही सुहृदांनी या कामासाठी एक मोठा कॉरपस (निधी) उभारावा असे सुचवत, त्यासाठी साह्यही सुरू केले आहे. या लेखमालेमुळे देश-परदेशातून मदतीचे हात पुढे येत आहेत. प्रयत्न तर आहेत जास्तीत-जास्त मुलांना मदत करण्याचा. पण त्यांना मदत करणाऱ्या हातांची संख्या वाढायला हवी आहे व ते हात सबळही व्हायला हवेत.

या लेखमालेत मुलांच्या सध्याच्या भीषण विश्वाबद्दल अनेकदा उल्लेख आले पण प्रत्येक लेखानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता आपल्या समाजाने आपल्या भोवती एक रेशमी कोश विणलाय हे पुन्हा जाणवले. आपण त्या मऊसूत सुरक्षित कोषात अल्लद जगत असतो. कदाचित त्या कोषालाच मी वर्षभर धक्का लावत होते. छान मुलायम सुंदर जगातून बाहेर आणत वास्तवाचे दर्शन घडवत होते. क्षमस्व! पण हे व्हर्च्युअल वर्ल्ड फसवे आहे. आपणच आपल्याभोवती आपल्या सोयीचा रेशमी कोष विणला आहे हे नक्की. नाकारून गांधारीचे व्रत घेऊन सत्य नाकारता येत नाही आणि सत्य कळल्याशिवाय, मानल्याशिवाय उपाययोजना करता येत नाही.

हे मुलांचे अनोळखी विश्व वाचकांसमोर आणण्याची संधी ‘लोकसत्ता-चतुरंग’ने स्वत:हून दिली याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. त्याचबरोबर या लेखमालेला सजवणाऱ्या चित्रकाराचे ऋण हेही अनमोलच.

(सदर समाप्त)

chaturang@expressindia.com

First Published on December 29, 2018 2:51 am

Web Title: dr anuradha sahasrabuddhe article on empowerment for children
Next Stories
1 बालपण आहे, पण बाल्य नाही
2 आम्ही असे हरवतो!
3 आधारगृहे की शोषणगृहे?
Just Now!
X