26 November 2020

News Flash

आईबाबांचं लक्ष वेधण्यासाठी

संवाद घडू दे. असे तर ही मुले सांगत नाहीत ना?

संवाद तुटल्यामुळे तसेच वेळ न दिल्यामुळे पळून जाणे, स्वत:च्याच अपहरणाची नाटके रचणे असे उपद्व्याप मुले करतात. वयात येताना प्रेमप्रकरणे, मुलांच्या फसव्या भूलथापा यातही मुली फसतात. रागवा, ओरडा, मारा, पण त्या निमित्ताने तरी आमचे अस्तित्व मान्य करा व आमच्याकडे लक्ष द्या. शिव्यांचा का होईना, संवाद घडू दे. असे तर ही मुले सांगत नाहीत ना?

अलीकडे एका घटनेमध्ये एका सुखवस्तू घरातील चौथीत शिकणारा मुलगा हरविल्याची तक्रार आली व नंतर ते अपहरण असल्याचे समजले. मात्र प्रत्यक्षात त्या मुलानेच आईवडिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा बनाव केला होता, असे चौकशीअंती निष्पन्न झाले. ‘तू असे का केलेस’ असे विचारल्यावर ‘आईबाबांना माझ्यासाठी वेळच नसतो, त्यांचे माझ्याकडे लक्ष जावे म्हणून मला मित्रांनी असे करायला सुचविले,’ असे त्याने कबूल केले.

काही दिवसांपूर्वी एका १२/१३ वर्षांच्या मुलाचा ‘चाईल्डलाईन’ला फोन आला, मी घरातून निघून आलो आहे. २३ दिवस धार्मिक कार्यक्रमात जेवलो. आता राहण्याची सोय करा. मला घरी जायचे नाही, असे म्हणत होता. वडिलांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यांना कळताच ते धावत आले. खूप रडत होते. मुलाला समजावून घरी पाठवले. पण हा मुलगा वारंवार पळून जातो. नैराश्येतही जातो. याचे कारण आई-वडिलांशी तुटलेला संवाद व त्याबरोबरच आई-वडिलांचा एकमेकांमधील तुटलेला संवाद. स्वत:साठी जगताना त्याचा मुलांवर काय परिणाम होत आहे याचा विचार होत नाही, मग असे प्रसंग ओढवतात.

एका आईला तिच्या २३ र्वष बेपत्ता असलेल्या मुलाचा अचानक फोन आला. तो मुंबईमध्ये असल्याचे कळत होतं, पण बोलताना मी उस्मानाबादला आहे असे सांगत होता. मुलगा काही सापडला नाही, पण त्याच्यामागे पळून गेलेले त्याचे काही मित्र परत आले व हाती लागले. त्यांच्याकडून कळले की या मुलाचे वडील दुसऱ्या स्त्रीबरोबर घर सोडून गेले होते. याचे पोरवय होते. आईकडे मुलाशी बोलायला वेळ नव्हता. अशात तो चित्रपट/मालिका पाहून पळून गेला व सध्या एका चोरांच्या गँगमध्ये काम करतो. गुंडांनी कदाचित ब्रेनवॉश केले म्हणून किंवा एकुणातच विकृत आदर्श समोर आहेत म्हणून या मुलाची आयुष्यातील महत्त्वाकांक्षा आहे की होर्डिगवरच्या सोन्याने लादलेल्या दादासारखा मोठा लीडर व्हायचं व स्वत:ची गँग बनवायची. आपल्यापकी बहुतांशी प्रत्येकजण कधी ना कधी अशा अवस्थेतून जातो की घरातून पळून जावेसे वाटते- घरात झालेले भांडण, घरातील सहन न होणारे कलह, पौगंडावस्थेतील संभ्रम.. अशाच मानसिक अवस्थेतून जात असलेल्या इतर मुलांना हा मुलगा गँगमध्ये खेचतो असेही समजले. आईवडिलांच्या तुटलेल्या संवादामुळे वेळेवर मार्गदर्शन न मिळणे, याचे हे असे बळी.

आमच्या ‘गंमत शाळा’मध्ये एक १० वर्षांचा मुलगा होता. प्रत्येक कार्यक्रमात त्याला घेतलेच पाहिजे हा त्याचा अट्टहास होता. छोटीशी भूमिका असली तरी चालेल पण नाटकात, नाचात, समूहगीतात तो असलाच पाहिजे! वडील सोडून गेले होते. आईचे मानसिक खच्चीकरण झाले होते. अतिरेकी कष्टाने ती थकलेली असे. वाढत्या वयाच्या २ मुलांशी तिची संवादाची भाषा एकच- जबरदस्त मारहाण. हा मुलगा सुरुवातीस सर्व मुलांना विक्षिप्त त्रास देत असे. नंतर मात्र सुधारला. आईच्या मायेचा भुकेला, आसुसलेला होता. मलाच आई म्हणायला लागला. गंमत शाळेत गेले की, तो काहीतरी असे करे की चिरडीला येऊन स्वभाव नसूनसुद्धा मी ओरडावे. अशी मी वैतागून ओरडले की तो खुदकन हसे व सार्थक झाल्यासारखा खेळायला जाई. याचे गौडबंगाल उलगडायला मला वेळ  लागला. त्याच्या सर्व कृतींमधून माझ्याकडे बघा, माझ्याशी बोला ही एकच भूक होती.

आपल्या घरात तर अशी कुणी मुले नाहीत ना? रागवा, ओरडा, मारा, पण त्या निमित्ताने तरी आमचे अस्तित्व मान्य करा व आमच्याकडे लक्ष द्या. शिव्यांचा का होईना, संवाद घडू दे. असे तर ही मुले सांगत नाहीत ना? संवाद तुटल्यामुळे  मुलांचे पळून जाणे, स्वत:च्याच अपहरणाची नाटके रचणे असे उपक्रम होतात. वयात येताना प्रेमप्रकरणे, मुलांच्या फसव्या भूलथापा यातही मुली फसतात. आई-वडिलांशी लहानपणापासून संवाद झाला तर मोकळेपणाने अशा गोष्टींची चर्चा झालेली असते. आई अथवा कुटुंबीय अलगदपणे न दुखावता डोळ्यावरचा हा गुलाबी चष्मा उतरवू शकतात व पुढील धोके टळतात.

बोलायला घरात कुणालाच वेळ नाही. ‘ऐकून ऐकणारे’ (शांतपणे ऐकून घेणारे) कोणी नाही म्हणून नको त्या व्यक्तींशी संवाद निर्माण होतो. अशा अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. त्यांच्या गोड बोलण्याचे किंवा निव्वळ नेहमी उपलब्ध असण्याचे आकर्षण अशा पालकांच्या संवादासाठी आसुसलेल्या मुलांना वाटले तर नवल नाही. मुलगी म्हणून आधीच नाकारलेल्या/दुजाभाव सहन केलेल्या आपल्या समाजातल्या मुलींना असा एक थेंबही प्रेमाचा पुरतो. पण त्याचाच गरफायदा घेऊन त्यांना फसवले जाते आणि मग लग्नाच्या आमिषाने फसवले, प्रेमाच्या भूलथापांनी फसली अशा बातम्या आपण वर्तमानपत्रात नित्य वाचतो. अलीकडे इंटरनेटवरूनही यामुळेच मुली भलत्या मार्गाला लागतात. नेटवरून दोस्त शोधले जातात. यात पुष्कळदा वेबकॅमचाही वापर असतो. समोरची व्यक्ती मुलांची नेमकी गरज- एकटेपणा, कुणी बोलायला नसणे, याचा फायदा घेतात. अलगदपणे जाळ्यात ओढतात, या माणसांशी मत्री टिकावी म्हणून मुली/मुले वाट्टेल ते करायला तयार होतात. पण याबद्दल सविस्तर स्वतंत्र लेखात चर्चा करू. इथे मुद्दा हा की पालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बाहेर प्रतिपालक शोधले जातात. ते मारक ठरतात.

खूप पसा आहे, सुखवस्तू जीवन आहे, भरपूर पॉकेटमनी आहे, अशा घरातील एका एकुलत्या एक मुलीवर काही टग्यांनी, ती घरात एकटीच असते म्हणून हेरून बलात्कार केला अशी तक्रार पुणे ‘चाईल्डलाईन’कडे आली. घरी जाऊन पाहिले, चौकशी केली, वैद्यकीय परीक्षा करवली तर मुलगी सांगे त्याप्रमाणे अंगावर ओरबाडल्याच्या खुणा, चाकू लागल्याच्या खुणा दिसत होत्या. पण बलात्कार सिद्ध झाला नाही. तिने दाखवलेल्या ‘गुंडाना’ पोलिसांनी उचलल्यावर बाहेर आली ती माहिती आश्चर्यचकित करणारी होती. त्या मुलांनी काहीच केले नव्हते. तिचे आई-वडील कधीच घरी नसतात. करिअर, पार्टीज इत्यादीमध्ये दिवस-दिवस भेटी होत नाहीत. म्हणून तिने मत्रिणींना बोलवून घरात मौजमजा करायला सुरुवात केली. पुढे मत्रिणी कंटाळल्या, मग या नाक्यावरच्या सहज ओळख झालेल्या मुलांना बोलावले. त्यांना जेव्हा लक्षात आले की हे धोकादायक होऊ शकते तेव्हा त्यांनीही जाणे बंद केले. मग आपले बिंग फुटेल असे वाटल्यावरून आणि आई-वडिलांना धडा शिकवायचा म्हणून त्या मुलीने स्वत:च जखमा करून हे नाटक रचले. हे का घडले? हे असे नसते घडले तर पर्यायी धोका किती मोठा होता, हे करिअरमध्ये बुडालेले आई-बाप याचा विचार करतील का?

एकुणात सुरुवातीस उल्लेखित अपहरणाचे नाटक रचणारा असो वा इतर अशीच मुले. आई-बाबांचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा हा एक आततायी पण धोक्याचा इशारा देणारा प्रयत्न म्हणावा लागेल.

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 4:48 am

Web Title: lack of conversation between mother father and son
Next Stories
1 आम्हाला खूप काही सांगायचंय!
Just Now!
X