डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे – anuradha1054@gmail.com

घटस्फोटानंतर कौटुंबिक महाभारतात आपणच आपल्यालेकरांचा अभिमन्यू करत असतो याचे भानही पालकांना नसते. यात होणारी ससेहोलपट, येणारी असुरक्षिततेची भावना इवल्याशा लेकरांच्या भावविश्वाच्या चिंध्या करते. मुलांला जन्म दिल्यावर स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून त्याला स्थिर कुटुंबाचे छत्र देणे अपरिहार्य नाही? पण नाही, अनेकदा स्वार्थ व अहंकारापोटी आपण आपल्याच मुलांवर अन्याय करतो आहोत याचे भानही या पालकांना राहात नाही आणि अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.

आई-बाबांना वेळ नाही, मुलांशी तुटलेला संवाद आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न आपण या लेखमालेत पाहात आहोत. आई-बाबा विभक्त होण्याचे भोगही मुलांना भोगावे लागत आहेत ते भीषण आहे. ‘चाईल्डलाइन’ला मुले फोन करतात. ‘‘आई-बाबा बाहेर भांडताहेत, खूप भीती वाटते. ते मला सोडून जातील का?’’ अशासारखे कितीतरी प्रश्न त्या इवल्याशा डोक्यात असतात.

मी शाळा-महाविद्यालयात असताना परदेशी मुलांबद्दल बोलले जायचे- ती कशी एकमेकांत तुझ्या आईचे किती घटस्फोट झाले, बाबांचे किती, अशा चर्चा करीत आणि पुढे जाऊन आमच्यात एकपण नाही, म्हणजे कमतरता! इथपर्यंत गोष्टी पोचत. माझी एक अमेरिकी विद्यार्थिनी होती. आई-वडील घटस्फोटित. आईने दुसरे लग्न केले त्या बाबाशी व सख्ख्या बाबांशी तिचे तितकेच चांगले संबंध होते. किंबहुना सावत्र बाबांशी जास्तच. सख्ख्या आई-बाबांचा मोठा बंगला होता. ख्रिसमसला सख्खे-सावत्र, सावत्रांचे सावत्र असे सगळे आनंदाने या बंगल्यात एकत्र जमत. ही संस्कृती आपल्याकडे येऊ पाहते आहे, पण त्याचा हा संक्रमण काळ मुलांना नक्कीच क्लेशदायक आहे.

‘चाईल्डलाइन’कडे घटस्फोटित किंवा घटस्फोटाच्या वाटेवर असलेल्यांच्या मुलांच्या केसेस वाढत्या प्रमाणात येत आहेत. इथे बहुतेक मुलाच्या ताब्यावरून भांडण असते. न्यायालयाचा निर्णय अमान्य असतो किंवा त्याची अंमलबजावणी तरी. मनात राग असतो, सूड घ्यायचा असतो. ज्याच्या ताब्यात मूल असते तो ते शस्त्रासारखे दुसऱ्या पालकाविरुद्ध वापरत असतो. याशिवाय भेटीच्या दिलेल्या वेळा न पाळणे, भिकाऱ्यासारखे तिष्ठत ठेवणे, खोटी प्रमाणपत्रे देवून भेटी टाळणे असे प्रकार अनेक आया करतात. तर वडील किंवा आईकडे जाताना मूल का आकांडतांडव करते याचा जराही विचार न करता मूल ओरबाडून नेले जाण्याच्या घटनाही घडतात.

एक दीड-दोन वर्षांची मुलगी अशीच ओरबाडली जायची. शनिवार-रविवार बाबाला मुलीला नेण्याची मुभा होती. पण बाबा न्यायला आला की प्रचंड गोंधळ घालायची. बाबाने कडेवर घेताच हातपाय झाडायची. स्वत:चे केस उपटायची. पण बापही तिच्या कलाने न घेता जबरदस्तीने घेऊन जायचा. परत आली की मुलगी एकदम कोशात गेलेली असायची. एका रात्री ती बाहुलीबरोबर लैंगिक स्वरूपाचे खेळ करताना आईने पाहिले. ‘तू काय करते आहेस’ असे विचारल्यावर ‘‘तू बघू नकोस, आमची गंमत आहे,’’ असे मुलीने सांगितले. चक्रावून गेलेल्या आईने चोरून सर्व प्रकार पाहिला, रेकॉर्ड केला. माहिती काढल्यावर वडील व आजी घाणेरडे प्रकार तिच्याबरोबर करत असल्याचे कळले. ते सुप्रतिष्ठित/वजनदार घराणे होते. त्यामुळे आई मुलीला घेऊन आत्महत्या करायला निघाली होती. मुलगी जेव्हा ‘चाईल्डलाइन’मध्ये आली व नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तिला नेले तेव्हा तिचे ते निरागस रूप आणि तिची रेकॉर्डेड हकिकत ऐकून सगळेच भावनाविवश होत होते. कुटुंब न्यायालयाच्या नियमानुसार ऑर्डर आहे पण या वास्तवाचे काय करायचे? या चिमुरडीने सर्व पुरुषांची इतकी भीती घेतली होती की शाळेत कोणाचाही बाबा आला की, ‘‘बाबा नको, बाबा नको’’ म्हणून ती िधगाणा करी. या लेकराचे आकांत तांडव वेळेतच विचारात घेणे गरजेचे नव्हते का?

याउलट ताबा मिळाला म्हणून घेऊन गेलेली आई स्वत:च्या मस्तीत जगताना मुलीची इतकी आबाळ करताना पाहिली की ४-५ वर्षांचे ते मूल हसायचेच विसरले व कुपोषित, आजारी झाले. पण पुन्हा अहंकार! सांभाळण्यासाठी बापाकडे मुलगी द्यायला आई तयार नव्हती. कदाचित पुढचे अन्न मिळेल की नाही या भीतीमुळे ‘चाईल्डलाइन’मध्ये ती मुलगी आली तेव्हा दिलेली बशीभर बिस्किटे एकदमच खाऊन टाकली. बापावर व सासरच्यांवर सूड घ्यायला असाच एका आईने मुलाचा ताबा आपल्याकडे ठेवला. ती व तिची बहीण मुलाची अडगळ वाटते म्हणून त्या मुलाला प्रचंड पीडित होत्या- चटके देणे, उपाशी ठेवणे, मारहाण करणे वगैरे. बापाकडे आल्यावर तो मुलगा २४ तास झोपे म्हणून तपासणी केल्यावर तो कुपोषित असल्यामुळे व घरातील सर्व कामे करत असल्यामुळे दमवणुकीमुळे असे होत असल्याचे निष्पन्न झाले. वय वर्ष आठ फक्त!

पुढच्या सुनावणीसाठी पुरावे तयार करण्यासाठी मुलाला खोटे-नाटे पढवून पोलीस, सीडब्ल्यूसी, मीडिया ‘चाईल्डलाइन’ अशांकडे नेले जाते. यात प्रेम/जिव्हाळा यापेक्षा स्वत:चा अहंभाव, दुसऱ्यावरचा सूड आणि जय-पराजय भावना अधिक प्रबळ असते. एक वडील आपल्या ८-१० वर्षांच्या मुलाला घेऊन आले. शनिवार-रविवारी मुलाचा ताबा त्यांच्याकडे असे. किडकिडे मूल, अंगावर जखमांच्या अनेक खुणा, बापाचे म्हणणे की आई मारहाण करते व डबा देत नाही. त्यामुळे मित्र आपला डबा याला देतात. संशय आल्यामुळे मुलाला वेगळे बोलावून विचारले असता मुलाने दुजोरा दिला. गृहभेटीत मात्र दिसून आले की आई खूपच चांगली होती. शेजारी-पाजारी तिचे कौतुकच करत होते. अंगणात खेळणाऱ्या मुलाला विचारले तर म्हणाला- ‘‘मी सगळं बाबाने सांगितले तसे खोटे बोललो. आई छान आहे, रोज डबा देते.’’

नियमाप्रमाणे सहसा मुलीचा ताबा आईकडे व मुलाचा ताबा वडिलांकडे जातो. पण आर्थिक स्थिती पलीकडे काही पहावे लागते. एका केसमध्ये मुलगी असल्यामुळे आईकडे ताबा होता, परंतु आई पूर्ण दारूच्या आहारी गेलेली व ड्रग्सची सवय असलेली होती. मात्र मुलीचा ताबा सोडायला तयार नव्हती. याबरोबर मुलांना ज्यांच्याकडे ताबा असेल त्या पालकाच्या नवीन सहचराशी जुळवून घ्यावे लागते व भेटीच्या काळात दुसऱ्या. हे दोघेही नवे आई-बाबा नीट वागतीलच असे नाही. शिवाय त्यांच्याबद्द्ल आणि सख्ख्या आई-बाबांबद्दल आकस भरवून देणारे आजी-आजोबा,  कुटुंबीय असतातच.

एका आईने दुसरे लग्न केले. नवीन बाबा मुलीचे खूप लाड करी. हनिमूनला तिला घेऊन गेले. दोघांच्यामध्ये प्रेमाने नव्या बाबाने झोपविले. मात्र तिच्याबरोबर त्याने नको ते चाळे करायला सुरुवात केली. आधीच्या बाबाच्या अतिरेकी वागण्याने पीडित ही छोटी नव्या बाबाच्या प्रेमाने सुखावली होती. त्याच्यावर विसंबली होती. तेवढय़ात विश्वासघाताचा असा फटका बसला. आणखी एका छोटय़ाचे आई-बाबा आपल्या अहंकारापायी शस्त्र म्हणून एकमेकांविरुद्ध वापरत होते. ४-५ वर्षांचं ते मूल! आईबरोबर आला की बाबाच्या तक्रारी आणि बाबाबरोबर आला की आईच्या तक्रारी, असे वर्षभर चालले होते. एकदा मला बालकल्याण समितीच्या कार्यालयात भेटला. त्याला जवळ घेतला. वयसुलभ आनंदी हसरे पोर पार मिटून गेले होते. वयाला न शोभणारा असा स्थितप्रज्ञ भाव चेहऱ्यावर तर होताच पण स्पर्शातूनही जाणवला. त्याने मी आंतरबाह्य़ ढवळून निघाले. पुढचे तर आणखी भीषण होते. मला म्हणाला- ‘‘आता मी काय करतो, बाबाविरुद्ध खोटंनाटं आईला, आणि आईविरुद्ध बाबाला  सांगतो, मग मला हवा तो खाऊ, खेळणी, कपडे मिळतात’’ आई-बाबांचे शस्त्र असे त्यांच्यावरच वार करत होते व स्वार्थाची गुरुकिल्ली वापरायला शिकले होते.

अशा कौटुंबिक महाभारतात आपणच आपल्या लेकराचा अभिमन्यू करत असतो याचे भानही नसते. यात होणारी ससेहोलपट, येणारी असुरक्षिततेची भावना त्या इवल्याशा लेकराच्या भावविश्वाच्या चिंध्या करते. त्याला उद्ध्वस्त करते. मुलाला जन्म दिल्यावर स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून त्याला स्थिर कुटुंबाचे छत्र देणे अपरिहार्य नाही? या सगळ्या प्रकरणात आजी-आजोबा/अन्य कुटुंबीयांचा विचार होणेही गरजेचे आहे. मुलाचा वापर करून होणाऱ्या सूडनाटय़ात ही सर्वच मंडळी होरपळतात. परदेशात अशा परिस्थितीतील मुलाला आई-बापाच्या ताब्यातून काढून घेऊन सरळ फॉस्टर-केअरमध्ये दिले जाते. परंतु फॉस्टर पालक बदलत असल्यामुळे मुलाची अवस्था भरकटलेल्या पतंगासारखी होऊ शकते.

आपल्याकडेही आई-बाप मुलाचा गैरवापर करीत असल्यास, त्यांना अयोग्य पालक ठरवून मुलाचा ताबा काढून घेण्याची कायदेशीर तरतूद आहे. कोणी सुहृदांनी तक्रार पोलीस/ बालकल्याण समितीकडे/ ‘चाईल्डलाइन’कडे केल्यास, शहानिशा करून, मुलाचा ताबा सरकारकडे दिला जातो व पुनर्वसनाचे मार्ग म्हणून सरकारी निवाऱ्यात ठेवणे किंवा सुयोग्य नातेवाईकांच्या ताब्यात मूल सांभाळण्यास देणे, हे पर्याय असू शकतात. अनेकांना हे माहीत नसते म्हणून इथे निर्देश करीत आहे. कौंटुबिक न्यायालयाच्या नियमानुसार भेटण्याच्या अधिकारात दिलेल्या वेळांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, यावरही अंकुश हवा आहे. पुण्यासारख्या ठिकाणी यामुळे होरपळलेल्या बाबांचा सपोर्ट ग्रुप तयार झाला आहे, याचाही इथे मुद्दाम उल्लेख करीत आहे.

chaturang@expressindia.com