08 August 2020

News Flash

मुलांसाठी सुरक्षित स्थानेच नाहीत?

एकूण समाजजीवनात मुले किती असुरक्षित आहेत याबद्दल आपण रोज ऐकतो-वाचतो-पाहतो.

एकूण समाजजीवनात मुले किती असुरक्षित आहेत याबद्दल आपण रोज ऐकतो-वाचतो-पाहतो. या असुरक्षिततेचा एक अभ्यास ‘चाइल्डलाइन’ने अखिल भारतीय पातळीवर हाती घेतला होता. यात मुलांच्या संस्था, रस्ते, बस-रेल्वे स्थानके, पोलीस ठाणे, निवारा देणाऱ्या संस्था अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला गेला. पुढे आलेले वास्तव काही फार आशादायी नाही.

या निमित्ताने विचार करता असे लक्षात आले की काही अशा जागासुद्धा आहेत ज्या अतिसुरक्षित म्हणून इतक्या गृहीत धरल्या आहेत की त्यांचे मूल्यमापन करायचा विचारही मनास शिवणार नाही. मुलाचे पहिले अतिसुरक्षित घर म्हणजे आईचे गर्भाशय. यापेक्षा सुरक्षित काही असूच शकत नाही. वास्तव मात्र वेगळे काही दर्शविते. मातृत्वाचे कितीही गोडवे गायले तरी सामाजिक वा आर्थिक कारणामुळे ही जागासुद्धा सुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही. मुलगी नको म्हणून भ्रूण हत्येचे प्रमाण हाताबाहेर गेलेले सर्वाना माहीतच आहे. पण आधुनिक गर्भनिरोधके उपलब्ध असूनही निव्वळ अपघात म्हणून राहिलेला गर्भ, गर्भपाताच्या कायद्याचा लाभ घेत सर्रास खुडला जातो.

आर्थिक कारणांसाठी जशी गर्भात हत्या होते तसेच आईला योग्य आरोग्य सुविधा न पुरविल्यामुळे गर्भातील सुरक्षित जागा असुरक्षित होत जाते. यात मृत्यू अथवा व्यंग, काहीही संभविते. बाई म्हणून आईची तिच्या स्वत:च्या जन्मापासून झालेली हेळसांडसुद्धा यास जबाबदार असते. दुसरे सुरक्षित स्थान म्हणजे घर. पण नवजात शिशूपासून मोठय़ा मुलांवर होणारे हरतऱ्हेचे अत्याचार पाहिले की खरेच घर सुरक्षित आहे का, असा संभ्रम निर्माण होतो. मुलांना शिस्तीच्या नावाखाली डाग देणे, उपाशी ठेवणे, जन्माची भीती बसेल व विकृती निर्माण होईल अशा प्रकारे कोंडणे, अंधारात ठेवणे, घराबाहेर उभे करणे, अबोला धरणे, शिव्या देणे, चिमटे काढणे, असले अघोरी प्रकारही केले जातात. या शिस्त (?) कार्यप्रणालीत पुष्कळदा प्रौढांच्या वैफल्याचा उद्रेक होत असतो व गुन्ह्य़ापेक्षा शिक्षा अवाजवी दिली जाते.

स्वत:च्या आकांक्षांचे ओझे, पाल्याच्या क्षमता न जाणून लादले जाते. त्यात मुले मोडून पडतात. त्यांची भावनिक व शारीरिक होरपळ होते – अगदी आत्महत्येस प्रवृत्त होईपर्यंत. याच आकांक्षांच्या ओझ्यापायी मुलाचे मूलपण हिरावले जाते. मूल जगले तरी बहरत नाही. सुरक्षित वातावरणात जीव जगविणे गृहीत आहे तसेच तो जोपासणे-फुलविणेही.

आजच्या कुटुंबपद्धतीत मुलांना खूपदा एकटे राहायला लागते. घरगुती अपघातात मदत करायला कोणी नसते. याहीपेक्षा भयंकर म्हणजे घरातच होणारे लैंगिक अत्याचार. ‘चाइल्डलाइन’कडे येणाऱ्या अशा केसेसमधील फार मोठय़ा प्रमाणावर वडीलच असे अत्याचार करीत असतात व आई त्यांना पाठीशी घालीत असते. तसेच असे अत्याचार करणाऱ्यांच्या यादीतील काका-मामा-मावशी-आजी-आजोबा, चुलत/आते/मावस भावंडे, इ. मंडळी घरातीलच असतात.

मुलींना वेश्याव्यवसायासाठी विकणे, बालकांना भीक मागायला लावणे, बालकामगार करणे, बालविवाह हे घरातूनच होणारे इतर अत्याचार. बापाच्या व्यसनापायी अनेक मुला-मुलींना शाळा सोडून काम करावे लागते. आपले बालपण गमवावे लागते. स्वार्थापायी मुले वाऱ्यावर सोडून देणारेही कमी नाहीत. असुरक्षित वातावरण, घरातील सततचे कलह, मायेची/प्रेमाची न भागलेली भूक, अशा कारणांनी अनेक मुले घर सोडून पळून जातात व आणखी संकटात सापडतात. यात भर म्हणून देवस्कीसाठी मुले वापरली/मारली जातात.

घराला पर्याय म्हणून, विशेषत: काम करणाऱ्या स्त्रियांसाठी पाळणाघरे पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यांना कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे अथवा त्यांच्यावर देखरेखीची परिपूर्ण सुविधा नसल्यामुळे, त्यांची स्थिती दयनीय आहे. छोटय़ाशा घरात खूप मुले, अपुऱ्या सुविधांत एकत्र ठेवली जातात. संसर्गजन्य आजार असलेली मुले वेगळी ठेवायची सोय नसते. मुलांच्या वयाला योग्य आकाराची शौचालये, सिंक्स ही संकल्पनाच आपल्याकडे नाही. यातून अपघात घडू शकतात किंवा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम संभवतात.

तिसरी हक्काची व निश्चित सुरक्षित मानण्यात यावी, अशी जागा म्हणजे शाळा. पण तेथे परिस्थिती घरापेक्षा वेगळी नाही. शाळेत जाताना बस किंवा रिक्षात होणाऱ्या चेंगराचेंगरीपासून ते वाटेवर चेष्टा करणाऱ्या, धक्काबुक्की करणाऱ्या गुंडांचा त्रास विशेष मुलींना सहन करायला लागतो. शाळेत ज्ञानवृद्धीपूरक उपक्रम कमी आणि मारहाण, शिक्षा, शिवीगाळ, लैंगिक शोषण, आवडता-नावडता त्याचा गुणांवर परिणाम, असल्या प्रकारांना सुद्धा अनेक मुलांना तोंड द्यावे लागते.  वयास अयोग्य प्रकारांच्या आकारांच्या बठक व्यवस्थेमुळे शरीरावर होणारे परिणामही भोगतात.

दप्तरांच्या ओझ्याबद्दल तर वेगळे बोलायलाच नको. खेळातून शिक्षण हे ज्या के.जी.चे ब्रीद असायला हवे त्या शाळेतील छोटय़ांच्या पाठीवर पाठीपेक्षा दीडपट मोठी दप्तरे आणि शाळा सुरक्षित पाणी देऊ शकत नाही म्हणून गळ्यात अडकविलेली किमान एक लिटर पाण्याची बाटली पाहिली की फार त्रास होतो.

दप्तराचे ओझे वागवायचे असे ट्रेनिंग वयाच्या चौथ्या वर्षांपासून मिळते पण ज्ञानाच्या नावाने अनेक ठिकाणी आनंदच दिसतो, नाही तर दहावीतील मुलाला साधे बेरजेचे गणित येत नाही अथवा आपल्या देशाचे पंतप्रधान कोण किंवा गंगा नदी उत्तरेत आहे की दक्षिणेत हे सांगता येऊ नये असे झाले नसते. तात्पर्य- आयुष्याचे रोजचे ६-७ तास म्हणजेच १२ वर्षांत सरासरी किमान १८४८० तास शाळेत घालवून तयार झाली उत्तम ओझी वाहणारी, कदाचित पाठीच्या कण्यावर विपरीत परिणाम झालेली, पण बौद्धिक विकास बेताचाच झालेली ओझ्याची गाढवे! या असुरक्षिततेत भर पडते ती अनारोग्यपूरक सुविधांची. अस्वच्छ/संख्येने कमी स्वच्छतागृहे, जेवणास जागा नसणे, अळ्या झालेला, अर्धा कच्चा, अस्वच्छ वातावरणात शिजविलेला पूरक आहार-असे किती तरी.

‘पालक-शिक्षक संघां’चे अस्तित्व नाममात्र असते. तक्रार केल्यास शाळा-प्रशासन/शिक्षक पाल्याला त्रास देतील, अशा भावनेतून पालक शाळेतील असुविधांबद्दल, अन्यायी प्रथांबाबत तक्रार करीत नाहीत, संरक्षणाची खातरजमा करून घेत नाहीत.  शाळेची स्वच्छतागृहे, खरे तर अस्वच्छतागृहे, ही आणखी एक असुरक्षित जागा. काही वर्षांपूर्वी पुणे महा नगर पालिकांच्या शाळामंध्ये काम करीत असता, शाळेच्या शौचालयांत घाणेरडी अश्लील चित्रे काढून, मुलींबद्दल लिहून ठेवलेला मजकूर हे शाळा सोडण्याचे, गरहजर राहण्याचे कारण असल्याचे बऱ्याच मुलींनी सांगितले. वास्तविक हा मजकूर मुख्याध्यापकांच्या लक्षात यायला काही हरकत नव्हती. पालकांना मुलींनी सांगितले तर पालकांची सरळ प्रतिक्रिया असते- शाळा सोडा.

अनेक प्रतिष्ठित, भरपूर देणग्या घेऊन, मुख्याध्यापिकेच्या कार्यालयाचे सतत आधुनिक नूतनीकरण करणाऱ्या शाळेच्या स्वच्छतागृहात वाहत्या पाण्याची साधी सोय नाही. एका मोठय़ा पिंपातून पाणी घ्यावे लागते. छोटी मुले उडय़ा मारून पाणी काढतात. या प्रयत्नात बुडणे असंभव नाही. अशी स्थिती असणे हे शाळा प्रशासनाची मुलांच्या सुरक्षिततेबाबतची उदासीनता दाखवते.

अशा अस्वच्छ स्वच्छतागृहांचा मुलींच्या आरोग्यावर विशेष दुष्परिणाम होतो. पाळीच्या दिवसात त्यामुळे अस्वच्छता पाळली जाते अथवा शाळा बुडविली जाते. एकूणच मुले-मुली दोघेही स्वच्छतागृहाचा प्रयोग टाळतात व आरोग्याच्या तक्रारींना आमंत्रण देतात. एका सुप्रतिष्ठित शाळेचे वर्गच स्वच्छतागृहाच्या वरील जागेत होते. फुटक्या, पुरातन ड्रेनेज सिस्टीममुळे होणाऱ्या दरुगधित, मुलांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणे अवघड होऊन बसले होते.

शाळेतील नीट न करून घेतलेली आवारे/मदाने ही अपघातांना आमंत्रणे देतात. खड्डे वर आलेले अणकुचीदार दगड, कचरा/घाण! कित्येक शाळांच्या मोकळ्या जागा या निव्वळ कचराकुंडय़ा झालेल्या दिसतात. शिक्षक सर्रास गुटखा-तंबाखू-पान खावून पिचकाऱ्या मारतात. विद्येची मंदिरे अशी अस्वच्छतेची आगारे झालेली दिसून येतात.

मुलांच्या संरक्षणासाठी बालन्याय अधिनियम अस्तित्वात असूनही पोलीस ठाणे, बालन्यायमंडळ, बालकल्याण समित्या या मुलांसाठी आशादायक जागा आहेत, असे म्हणता येणार नाही. बालगुन्हेगारांवर पोलीस चौकी आणि निरीक्षणगृहे या ठिकाणी तर मारहाण, गुंडागिरीचा त्रास, अस्वच्छ, आरोग्यास अपायकारक सुविधा, आरोग्य विकासास बाधक आहार-पद्धती, याचा प्रयोग होतोच, पण बालन्यायमंडळातही खटल्याच्या ‘प्रोसिजर’च्या नावाखाली भरपूर भावनिक अत्याचार कसे होतात याचा अनुभव अगदी जवळून या मंडळाची सदस्य म्हणून मी घेतला आहे.

मोठय़ा गुंडांना वाचविण्यासाठी पोलीस मुलांना न केलेला गुन्हा कबूल करायला लावतात, त्यासाठी धाकदपटशा, मारहाणीपासून अडचणीच्या जागी चटके, विजेचे शॉक देण्यापर्यंत गोष्टी केल्या जातात.

बालहक्कांमध्ये असलेला सुरक्षितता व पर्याप्त जीवनस्तराचा अधिकार असा सगळ्यात स्वाभाविकरीत्या सुरक्षित मानल्या जाव्यात, अशा- आईचे गर्भाशय, घर, शाळा या जागा तसेच संरक्षणासाठी निर्मित पोलीस, बालन्यायमंडळ, बालकल्याण समिती, निरीक्षणगृहे इत्यादीमध्ये डावलला जाताना दिसून येतो.

जनावरांच्या जगात पिल्लांना कोणी हात लावू पाहील तर त्यांची आई स्वत:च्या आकारमानाचा, ताकदीचा, क्षणभरही विचार न करता, स्वत:च्या जिवाची जराही पर्वा न करता, समोरच्या बलवान शत्रूवर तुटून पडते- मग माणूस असो वा दुसरे जनावर. प्रसंगी त्या पिलाच्या मावश्याही जमा होतात बचावासाठी. दुर्दैवाने माणसात आज हे दिसत नाही. ना आईची कूस सुरक्षित राहिली ना बापाचे छत्र विश्वासाचे, ना गुरुची छाया ना राजाचे अभय. चुकून जगले वाचलेच तर स्वत:चा बचाव स्वत: करण्यासाठी सक्षम होणे हाच आज माणसांच्या बाळांसमोर एकमेव पर्याय दिसतो.

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:05 am

Web Title: there is no safe place for children
Next Stories
1 आता सहन होत नाही!
2 शिबिरांचे तुरुंग
3 संस्कारांचे वास्तव
Just Now!
X