25 October 2020

News Flash

आरसा

पालकांच्या वेळांसाठी मुले आसुसलेली आहेत

पालकांच्या वेळांसाठी मुले आसुसलेली आहेत हे वारंवार अनेक तऱ्हेने आमच्यासारख्यांना जाणवणारे सत्य व मुलांचे भावविश्व समजून घेण्याची तसदी न घेतल्यामुळे होणारे भीषण परिणाम आम्ही रोज बघतो. पालक हे मुलांचे पालनकत्रे, त्यांचे रोल मॉडेल, मित्र, गुरू असे बरेच काही असतात म्हणे! खरंच? प्रत्येक स्त्रीमध्ये एक आई दडलेली असते जी आपल्या मायेच्या पंखाखाली सगळ्या विश्वाला सामावू शकते असे म्हणतात. पण जगण्याच्या धकाधकीत, मोठय़ा आकांक्षांच्या मागे धावताना ते पंख कुठे तरी हरवलेले आहेत असे वाटते. म्हणून मुलांना बाहेर ती माया शोधण्याची गरज भासते.

माणूस असो की जनावर, त्यांच्या बाळांना जवळ घेणारे, माया करणारे कोणी तरी हवेच असते. काही दिवसांपूर्वी चुकलेले कुत्र्याचे एक पिल्लू आमच्या ऑफिसच्या परिसरात आले. त्याला दूध, बिस्कीट असे काही नको होते, मात्र सगळ्यांनी जवळ घ्यायला हवे होते. पाय मारून मारून साडय़ा खेचून ते ती माया शोधत होते. जवळ घेतले की कुशीत तोंड खुपसत होते. ही कुठल्याही पिल्लाची मानसिक गरज आहे. ‘चाइल्डलाइन’कडे येणाऱ्या एक एक केस बघितल्या आणि त्याचाच आरसा पालकांना दाखवावासा वाटला.

पाच वर्षांच्या हसऱ्या बडबडय़ा मिनीची आई तिचा अभ्यास घेत होती. आई उच्चपदस्थ अधिकारी आणि मिनी एकुलती एक. मिनीला आई खूप दिवसांनी भेटली होती. किती तरी गमतीजमती तिला सांगायच्या होत्या. मनीचे नवे पिल्लू, बाहुलीचा फ्रॉक, बाई किती दुष्ट आहेत, मत्रिणीची गंमत, पण आईच्या शिस्तीत मिनीचे हे बडबडणे बिलकूल बसत नव्हते. उद्याच्या इतिहासाच्या पेपरचा अभ्यास तिला घ्यायचा होता. आई एकीकडे इस्त्री करत होती, तिने तशीच गरम इस्त्री उचलली आणि मिनीच्या हातावर ठेवली. आता मिनी अजिबात बोलत नाही. शिस्तीच्या चटक्याने तिचे बालपण जळून गेले.

लक्ष्मीची आई वारली. तिच्या वडिलांनी सावत्रपणा नको म्हणून तिच्या मावशीशी लग्न केले. आई वारलेली, नवीन आई आलेली, लक्ष्मीला प्रचंड असुरक्षित वाटत होते. परिणामस्वरूप सात वर्षांची झाली असली तरी ती अंथरूण ओले करू लागली. शिक्षा म्हणून मावशीआईने शूच्या जागी चटके दिले. ते इतके चिघळले की तिला इस्पितळात दाखल करावे लागले. ती सतत एका बाजूला मान झुकवून, आवाज फुटणार नाही अशा स्वरूपात रडत असे. मग लक्षात आले की मारामुळे तिची मानच मोडलेली आहे आणि ठिकठिकाणी अंगावर माराचे वळ आहेत. मावशीला प्रामाणिकपणे वाटत होते की आपण हे मुलीच्या भल्यासाठीच करतो आहोत.

उमेश एका बालभवनात जातो, छान चित्रे काढतो, पण चित्रकलेच्या तासानंतर हाताबरोबर चित्रेपण धुऊन टाकतो. का विचारलं तर म्हणतो- ‘‘कशाला ठेवायचे, कोण बघणार? आई-बाबांना वेळ नाही.’’

मृण्मयी तीन वर्षांची होती. रोज ‘चाइल्डलाइन’ला फोन करे. इकडचे तिकडचे खूप काही सांगे. गोष्ट सांग म्हणून हट्ट धरे. घरात कोणी काही बोलायला नाही म्हणून फोनवरच्या ताई, दादाशी बोले. एकदा म्हणाली, ‘‘नव्या शाळेत कविता शिकवली, ताई तू ऐकतेस का?’’ तिला म्हटले, ‘‘आईला ऐकव.’’ मृण्मयी म्हणाली, ‘‘तिला वेळ नाही.’’

राकेश आणि रिटा, आठ आणि सहा वर्षांची दोन भावंडे. रोज माझ्या मत्रिणीच्या घरी येऊन खेळतात. एक दिवस ‘भलत्याच’ खेळात रंगलेले मत्रिणीने पाहिले. काय करता विचारल्यावर, ‘‘आई-बाबा, आई-बाबा खेळतोय, आम्हाला बाहेरच्या खोलीत पाठवून आई-बाबा रोज हा खेळ खेळतात.’’ म्हणाली.

प्रीती नववीत शिकत होती. तिला सहामाही परीक्षेत मराठीत ९० गुण मिळाले. घरात संवाद असतो तो फक्त प्रीतीच्या करिअरचा. चर्चा असते ती आणखी आणखी मार्क कसे वाढतील याची. या ९० गुणांवर ना पालक समाधानी आहेत ना शिक्षक. पण त्याहून प्रीतीला अधिक दु:ख होते ते पालक-शिक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे. याहीपेक्षा तिने अधिक गुण मिळवावेत, जेणेकरून घराण्याचे व शाळेचे नाव मोठे होईल, ही ती प्रतिक्रिया. यात दिसल्या त्या पालक-शिक्षकांच्या आकांक्षा. मुलीला मिळाली अस्तित्व नाकारले गेल्याची भावना. त्यामुळेच ती आत्महत्येच्या विचारापर्यंत – मला नाकारणाऱ्या पालकांच्या जगालाच नाकारण्याच्या भावनेपर्यंत पोहोचली. मोठय़ा मुश्किलीने त्यातून तिला वाचविली.

अनामिका एका श्रीमंत सुशिक्षित घरातील एकुलती एक १४ वर्षांची मुलगी. आई प्रोफेसर, वडील मोठय़ा कंपनीत अधिकारी. भरपूर पॉकेटमनी, आधुनिकतेच्या नावाखाली. पण खरंतर मुलीला वेळ देता येत नाही या गोष्टीवर पांघरूण घालण्यासाठी. ‘‘आम्ही तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तिने हवे तसे वागावे अशी वल्गना.’’ मुलीने घरात एकटी, ‘बोअर’ झाली म्हणून भलत्याच पाटर्य़ा करायला सुरुवात केली. सॉफ्ट ड्रिंकपासून घरात असलेल्या दारूच्या बाटल्यांपर्यंत मजल गेली. इथून पुढे वाट ड्रग्सचीच!

अनेक शाळांमधून वयात येणाऱ्या मुलींशी बोलण्याचा प्रसंग येतो. तुम्हाला कसलीही अडचण आली तरी आई-बाबा नक्की मदत करतील अशी ग्वाही आमच्यासारखे देत असतात. आजच्या जगात हे आश्वासन मुलांना देऊन आम्ही दिशाभूल करत आहोत हे वारंवार जाणवते, कारण ही मुले फोन करून आई-बाबा घरात नसतात किंवा त्यांना ऐकायला वेळच नाही असे हमखास सांगतात. खासकरून मुलींना जर कोणी लैंगिक स्वरूपाचा त्रास देत असेल व त्यासाठी आईकडे मदत मागितली तर ७० टक्के केसेसमध्ये आई, ‘‘काही नाही, या वयात हा त्रास सगळ्यांनाच भोगावा लागतो’’, किंवा ‘‘याबाबतीत गप्पच बसायचं असतं’’ असे मोलाचे शिक्षण (?) देताना आढळतात. तर इतर वेळेस ‘‘बरं बघू’’ म्हणून दुर्लक्ष केले जाते. इमर्जन्सीमध्ये अगदी, ‘‘आत्ताच्या आत्ता’’ लगेच तातडीची मदत आवश्यक असते. हार्टअ‍ॅटॅक आलेल्या माणसाला थोडय़ा वेळाने/ वेळ होईल तेव्हा.. इत्यादी प्रकारे मदत करून जगवता येत नाही. त्याचप्रमाणे मुले ज्या वेळेला मदत मागतात त्या वेळेला त्यांची ती इमर्जन्सीच असते. वेळ नाही हे उत्तर/ टाळाटाळ इत्यादी चालू शकत नाही.

या लेखमालेचा उद्देश पालकांना कुठेतरी आरसा दाखवणे हाही आहे. दिसणारं प्रतिबिंब काही खूप चांगले असणार नाही. पालक म्हणून स्वत:च आपले प्रतिबिंब तपासायला हवे आहे असे गेली १७ वर्षे आम्ही रोज अनुभवत असलेल्या मुलांच्या विश्वामधून लक्षात येत आहे. आपल्या बाळाचे कोणीच वाईट चिंतत नाही. जगण्याची धावपळ असते तीही लेकरांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच. पण प्रतििबब असे दाखवते की, ज्या पिल्लांसाठी ही धडपड चालली आहे, त्यांनाच त्यात स्थान नाही. आमची स्वप्ने, आमच्या आकांक्षा, आमचे पोट, आमच्या घराण्याची इज्जत या सगळ्यात ते बाळ मुळी आहेच कुठे? याला पालकत्व का म्हणावे?  हे तर मालकत्व. मग आई-बाबांचे लक्ष वेधण्यासाठी मुले काय वाट्टेल ते करतात- गैरवर्तणूक, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, पळून जाणे, आत्महत्या- यापैकी काहीही.

पालक आहोत तर माया नाही असे म्हणता येणार नाही, पण ती व्यक्त  करण्यात कुठेतरी काही तरी चुकते आहे नक्की. पालक-बालक संवाद असा कोवळ्या वयात तुटला तर तो पुढे सांधला जाणे जवळ जवळ अशक्यच. पालकांचे नुसते असणे आणि आर्थिक स्थर्य पुरविणे म्हणजे पालकत्व नक्की नव्हे, तर किंबहुना अमुक-तमुक पुरवितो म्हणून आमच्या आकांक्षानुसार मूल घडले पाहिजे हा अट्टहास सर्व करणीला मारक ठरतो. मुलाची आवड-निवड, त्याच्या आकांक्षा, त्याचा आनंद, त्याचे अंगभूत गुण हे खिजगणतीत नसतात. ही निव्वळ हुकूमशाही झाली. म्हणून प्रत्येक पालकाने एकदा स्वच्छ मनाने आपले बालपण आठवत या आरशात स्वत:चे प्रतिबिंब तपासावे, अशी मुलांची दु:ख पाहणाऱ्या आमच्यासारख्यांची कळकळीची विनंती.

अनेक शाळांमधून वयात येणाऱ्या मुलींशी बोलण्याचा प्रसंग येतो. तुम्हाला कसलीही अडचण आली तरी आई-बाबा नक्की मदत करतील, अशी ग्वाही आमच्यासारखे देत असतात. आजच्या जगात हे आश्वासन मुलांना देऊन आम्ही दिशाभूल करत आहोत हे वारंवार जाणवते, कारण ही मुले फोन करून आई-बाबा घरात नसतात किंवा त्यांना ऐकायला वेळच नाही, असे हमखास सांगतात. खासकरून मुलींनी तर कोणी लैंगिक स्वरूपाचा त्रास देत असेल व त्यासाठी आईकडे मदत मागितली तर ७० टक्के केसेसमध्ये आई, ‘‘काही नाही, या वयात हा त्रास सगळ्यांनाच भोगावा लागतो’’, किंवा ‘‘याबाबतीत गप्पच बसायचं असतं.’’ असे मोलाचे शिक्षण (?) देताना आढळतात.

( या लेखातील मुलांची नावे बदललेली आहेत.)

– डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

anuradha1054@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:19 am

Web Title: tips to understand your childs psychology part 2
Next Stories
1 जादू की झप्पी
2 आईबाबांचं लक्ष वेधण्यासाठी
3 आम्हाला खूप काही सांगायचंय!
Just Now!
X