28 January 2020

News Flash

असेही असते मुलांचे (भयावह) जग!

कुटुंबाची कोणती संकल्पना म्हणायची ही?

आई-बाबा, ताई-दादा, आजी-आजोबा, काका-काकी यांचं एकत्रित जग आता फक्त पुस्तकात, स्वप्नात राहिले आहे, असे म्हणावेसे वाटते. अशी कुटुंबे अजूनही असली तरी गोड-गोड बोलणारी, घास भरवणारी आई, प्रेमाने खाऊ, खेळणी आणणारे, मुलांशी क्रिकेट खेळणारे बाबा, गोष्टी सांगणारी आजी, लाड आणि फक्त लाडच करणारे आजोबा या आता किंवा यापुढे संग्रहालयात बघायच्या गोष्टीच म्हणता येतील, असे म्हणण्याचे कारण आम्हाला ‘चाइल्डलाइन’च्या माध्यमातून रोज दिसणारे मुलांचे भीषण वास्तव!

टाकून दिलेली मुले, रस्त्यावर राहणारी मुले, बालकामगार याबद्दल स्वतंत्रपणे केव्हा तरी बोलू. इथे बोलत आहोत ते रूढ अर्थाने कुटुंबात राहणाऱ्या मुलांचे वास्तव. कुटुंबसंस्था वेगवेगळ्या असतात. आईबाबा, मुले हे सर्वसामान्य कुटुंब; पण बदलत्या जगात कुटुंबसंस्थेची व्याख्यासुद्धा बदलावी लागणार आहे. त्याला बिघडलेली कुटुंबसंस्था म्हणावे की बदललेली, हा वादाचा विषय असू शकतो. त्यावर मतमतांतरे असू शकतात; पण मुलांच्या दृष्टीने या उद्ध्वस्त किंवा कोसळलेल्या संस्था, असे म्हटले तर चूक ठरणार नाही. वैधव्यामुळे अथवा घटस्फोटामुळे एकटी आई, एकटे बाबा नाइलाजाने पण सक्षमपणे कुटुंबसंस्था अबाधित ठेवताना दिसतात. अशी आई- आईबाबा, दोन्ही भूमिका, तर बाबा- बाबा-आई अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पार पाडतात. त्यांची मुलेही खूपदा स्वतंत्र बाण्याची झालेली दिसून येतात.

पण इथे काही असे अनुभव देते आहे ज्यावरून मुलांचे असेही जग असते हे वास्तव समाजापुढे येईल. एका कार्यशाळेच्या निमित्ताने बऱ्याच स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या होत्या. यात लालबत्ती भागाजवळच असलेल्या अशा भागात पाळणाघर चालविणारी एक संस्था होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेला अनुभव मन हेलावून गेला. या पाळणाघरात देहविक्रय करणाऱ्या महिलांची मुले येतात त्याचप्रमाणे कामकरी वर्गातल्या बायकांचीही. मुली-मुले तुझे बाबा, माझी आई असे बोलत असताना देहविक्रय करणाऱ्या बाईचे मूल ऐकत होते व मग नंतर म्हणाले की- ‘‘तुम्हाला एकच बाबा असतो का?’’ हे इतरांना धक्कादायक होते. मग तो म्हणाला- ‘‘मला तर खूप बाबा असतात, एका दिवसात एकसुद्धा.’’ त्याचे हे जग होते व त्याच्या दृष्टीने तेच नॉर्मल होते. एक आई आपल्या ३ वर्षांच्या बाळाचे लैंगिक शोषण तिच्या वडिलांनी केले म्हणून मदत मागायला आली. बोलण्याच्या ओघात तिने सांगितले की, ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे ते मुलीचे नसíगक वडील नाहीत. तर लग्न झाल्यानंतर आधीच्या मित्रापासून झालेले मूल आहे व ते नवऱ्याला माहीत आहे. ही उच्चविभूषित आई ड्रग्स व दारू याची व्यसनी होती.

कुटुंबाची कोणती संकल्पना म्हणायची ही?

एका उच्चपदस्थ आजोबांनी व आजीने आमची मुलगी बाळंतपणाला आली व मूल टाकून गेली म्हणून त्याला घेऊन जा व त्याची व्यवस्था लावा, असे सांगत होते. ही मुलगी व तिचा नवरा दोघेही व्यसनी होते व आजी-आजोबांनी मूल सांभाळावे, असा आग्रह धरत होते. नाइलाज झाल्यावर कायद्याचा बडगा दाखवल्यावर बापाने मूल सांभाळण्याची व्यवस्था केली. अंगावर पित्या बाळाचा यात काय दोष? आणि त्याचे कोणते कुटुंब?

आय.टी. सेक्टर जसजसे वाढते आहे तसे पचणार नाही इतके पगार मिळू लागले. त्याचबरोबर बाहेरील राज्यांतून मुली नोकरीसाठी पुण्यासारख्या शहरात येऊ लागल्या. ज्या भागातून येतात तिथे मुलगी म्हणून प्रचंड बंधने त्यांच्यावर असतात. इथे पुण्यासारख्या शहरात स्वातंत्र्य व हातात खेळणारा पसा यामुळे नको इतक्या बंधनमुक्त राहतात. परत गेल्यावर पडद्याआडच राहायचे, तर जगून स्वातंत्र्य उपभोगून घ्या अशी वृत्ती असते. यातून अनेक जणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जगतात. यामध्ये मुलेही जन्माला येतात. त्यांना खुशाल अनाथाश्रमात सोडले जाते. सोडताना खूपदा बाप रडतो. मूल मी सांभाळतो, घेऊन जाऊ या म्हणतो; पण जराही मागे वळून न पाहता ती जन्मदात्री निघून जाते, असे अनाथाश्रमांच्या संचालिका सांगतात. ही बदलती आई आता दिसू लागली आहे.

करिअरच्या मागे धावताना वाढलेले वय, वेगवेगळ्या कारणांनी राहून गेलेले किंवा लग्न न करण्याचा निर्णय यामुळे अनेक एकटय़ा बायका मूल दत्तक घेतात, समर्थपणे वाढवतात. हीसुद्धा एक नवीन कुटुंबव्यवस्था. करिअरमागे असणाऱ्या अनेक मुली मूल पोटात वाढवायचे कष्ट नको व एवढा वेळही नाही म्हणून लग्न झाल्यावरही दत्तकाचा पर्याय निवडतात.

छत्र देणारा, संकटात ढाल बनणारा तो बाबा अशी कविकल्पना. प्रत्यक्षात ‘चाइल्डलाइन’कडे येणाऱ्या दरमहा ५ ते ६ लैंगिक शोषणाच्या केसेसमध्ये ७० टक्के अत्याचार करणारे बाबाच असतात हे वास्तव आहे. शिवाय हा एकदाच झालेला अत्याचार नसतो, तर वारंवार झालेला अत्याचार असतो. काही महिन्यांपूर्वी एक अशी बाई मत्रिणीसाठी मदत मागायला आली जिचे वडिलांशी बायकोसारखे संबंध होते. मदत मिळेल का, असे विचारत होती. पाठपुरावा केल्यानंतर लक्षात आले की, ५-६ वर्षांची असताना प्रथम वडिलांनी बलात्कार केला. नंतर नेहमीच करत राहिले. आईने नेहमीप्रमाणे आधी विश्वास ठेवला नाही आणि मग कुटुंबाच्या इज्जतीपायी मुलीला गप्प केले. मग मुलीनेही प्राक्तन म्हणून स्वीकारले. अशा घटनांबाबत बोलल्यावर नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या घटना झोपडपट्टीत, अशिक्षित घरात घडत असतील ना? पण सत्य याच्या विरुद्ध आहे. एका राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अत्यंत पूजनीय व्यक्तीच्या घरात २ वर्षांच्या मुलीवर वडील व आजी लैंगिक अत्याचार करीत होते व या घराण्याचे नाव मोठे पाहून या बाळाला वा तिच्या आईला कोणीही मदत करायला पुढे येत नव्हते. आई आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचली होती. योगायोगाने माझा लेख वाचून ती माझ्या संपर्कात आली व तिला व तिच्या मुलीला न्याय मिळवून देणे शक्य झाले. या बाळाने पुरुष जातीची भीती घेतली होती तर आजी या शब्दाचा धसका.

ही काही विरळा केस नाही. याच प्रकारे अत्यंत विकृतपणे लैंगिक शोषण करणारी आजी व आíथक मदत करणाऱ्या धंद्यातील सहकाऱ्याला मुलीशी चाळे करू देणारा बाप व ते सारे डोळे झाकून पाहणारा आजोबा असेही कुटुंब पाहिले. महिला दिन विशेषांकात, गेल्याच शनिवारी या लैंगिक अत्याचाराच्या घटना पाहिल्या. या विरोधात आपल्याला जेवढा आवाज उठवता येईल तेवढा उठवला पाहिजे, जरी ते एखाद्याच्या कुटुंबात होत असला तरी.

स्वत:ला मित्राबरोबर फिरता यावे म्हणून मुलाला ड्रग्स देऊन झोपवणारी आईसुद्धा पाहिली. सहन होत नाही व उपायही करता येत नाही म्हणून हतबल आजी-आजोबा फक्त बघ्याची भूमिका घेतानाही पाहिले. यात लहान वयात दिलेली अफू व ड्रग्स याचा परिणाम मुलाच्या मेंदूवर व वाचेवर झाला. त्याला मरणापासून वाचवता आले एवढेच.

सर्रास वाढते घटस्फोट यावर भाष्य करायचे नाही; परंतु यात मुले भरडली जातात. त्याहीपेक्षा मुलांचा दोघेही आई-बाप शस्त्र म्हणून कसा वापर करतात ते रोज आम्ही पाहातो. दोन बोलकी उदाहरणे देते.

शनिवार-रविवार भेटायची परवानगी असलेल्या वडिलांनी मुलाला ‘चाइल्डलाइन’कडे आणले. त्याच्या अंगावर भरपूर जखमांच्या खुणा होत्या व तो खूप बारीकही होता. तक्रार अशी होती की, आठवडाभर आई त्याचे खूप हाल करते, चटके देते, जेवायला डबा देत नाही. मुलाशी एकटे बोलल्यावर त्यानेही तेच सांगितले; परंतु घरी गेल्यावर आजूबाजूला चौकशी केल्यावर पूर्ण चित्र उलटे समोर आले व मुलानेही पढवलेले बोलल्याचे सांगितले. मुलांना शस्त्र म्हणून वापरताना मुलेच कशी आईबापांचा वापर करतात हे दुसऱ्या एका मुलाने दाखवले. ५ वर्षांच्या पिंटय़ाला (नाव बदललेले आहे) आईबाप दोघेही घेऊन तक्रारी सांगत येत, पोलिसांकडेही जात. एक दिवस तो मला म्हणाला- ‘‘मी काय करतो, काही हवं असले की आईबद्दल वाईट बाबांना सांगतो व बाबांबद्दल आईला. मग मला हवे ते मिळते.’’

हेही एक मुलांचे जग. मोठी होऊन या मुलांचे काय होणार, हा खरंच एक अभ्यासाचा विषय आहे. परदेशात- अरे, तुझ्या आईवडिलांचा एकही घटस्फोट झाला नाही म्हणजे त्या मुलाची इज्जत कमी, अशी चर्चा मुलांमध्ये असते. त्या पिढीमधील मोठी झालेली मुले सख्खे व सावत्र सर्व आई-बाबांशी मस्त दोस्ती करून असतात असेही चित्र पाहायला मिळते.

त्यामुळे आपल्या मुलांचे नक्की जग, नक्की कुटुंब कोणते? ही एक संभ्रमाचीच बाब आहे असे म्हणावे लागेल.

– डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

anuradha1054@gmail.com

First Published on March 10, 2018 12:12 am

Web Title: tips to understand your childs psychology part 3
Next Stories
1 आरसा
2 जादू की झप्पी
3 आईबाबांचं लक्ष वेधण्यासाठी
Just Now!
X