आत्या म्हणून मला भाच्याचे कान टोचायच्या कार्यक्रमाला निमंत्रण आले. आधी इतके लहान बाळ हातात घ्यायचीच मुळी मला भीती वाटते. त्यात भावजय म्हणते, तुमच्या मांडीवर कान टोचायचे. मुश्किलीने १२ दिवसांच्या बाळाला मांडीवर घेतले. सोनाराने तयारी केली. आता तो तार घेऊन कान टोचणार तर मीच घाबरून ओरडले. सोनार अनुभवी होता. म्हणाला, गंमत बघा- पहिल्या कानाला बाळ हुं की चूं करणार नाही. खरेच! मात्र दुसऱ्या कानाला हात लावताच बाळ ठणठणून रडू लागले, मान स्थिर ठेवेना. आपल्याकडे १६ संस्कार वेगवेगळ्या वयात सांगितले आहेत. त्यातील हा महत्त्वाचा संस्कार- दु:खाची जाणीव देण्याचा. सावध होण्याचा, प्रतिकार करण्याचे हे बाळकडू. संस्कारामागचा अर्थही अवचितच गवसला.

‘चाइल्डलाइन’ अनेक शोषित बाळे नित्य हाताळते. भीषण यातनांना सामोरी गेलेली ही पिल्ले – त्यांना काय जाणवते न कळे. चक्क हसून दाखवतात. खूप त्रास होतो हे हसू बघताना. एका इस्पितळात दीड वर्षांची मुलगी दाखल केली होती. वडिलांनी गच्चीतून फेकून देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मुलगी म्हणून मुळात पोटातच मारण्यासाठी अनेक अत्याचार आईवर झाले होते. तरीही जन्मली म्हणून तिचे दूध तोडले, आजीने मिठाचे पाणी पाजले, पायावर वरवंटा घातला. पण जाको राखे साईयां.. काहीही करून मरत नाही म्हणून गच्चीवरून फेकायचा हा शेवटचा प्रयत्न होता. अंगावर चटके दिलेले होते, आतल्या आत हाडे तुटलेली होती, कुपोषण झालेले होते, पण तिच्याकडे जाताच एनआयसीसीयूच्या पलंगावरून गोड हसली..

एक २ वर्षांची बलात्कारित मुलगी पुण्याजवळच्या गावात बेशुद्धावस्थेत फेकून दिलेली पोलिसांना व एका संस्थेला नुकतीच सापडली. तिला ससूनमध्ये आणले. तोंडातून, योनीमार्गातून रक्तबंबाळ झाली होती. संबंध अंग सुकलेल्या रक्ताने भरले होते. सुजेमुळे डोळे दिसत नव्हते. योनीमार्ग, मूत्राशय फाटले होते -ज्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. ‘चाइल्डलाइन’च्या कार्यकर्त्यांनी तिला धरले, नर्सने तिला साफ केले, गळ्यातल्या गंडय़ाने मारण्याचा प्रयत्न झाल्याचेही लक्षात आले. पोरगी हसून दाखवते! त्या वेदनेच्या दर्शनाने नाही कोसळलो इतके ते हसू बघून आम्ही कोसळलो.

एक मावशी आपल्या ८/१० वर्षांच्या भाच्याला घेऊन माझ्याकडे आली. त्याची सख्खी आई वारली होती. त्याच्या वडिलांनी एक दुसरी बाई घरात आणून ठेवली होती. ती तिच्या स्वत:च्या मुलांचे व्यवस्थित करी. पण या चिमुरडय़ाला शाळेतून काढून घेतले होते. नोकरासारखे राबवत होती. पाणी भरणे, धुणी धुणे, भांडी घासणे सगळे तोच करीत होता. बेदम मार आणि उपासमार हा त्याचा खुराक होता. ही बाई आणि सख्खा बाप मिळून तुडवत, उलटा टांगून मारत, चटके देत. एक दिवस या बाईने कहर केला. मुलगा भूक लागली म्हणाला म्हणून त्याला त्या बाईने व तिच्या मुलाने खाली डांबून ठेवले व बाप त्याच्या अंगावर नाचला. बरगडय़ा जबरदस्त दुखावल्या. पोराच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. खरे तर तो जिवंत होता हेच आश्चर्य. पोरगा पळाला व जवळच राहणाऱ्या मावशीच्या घरात जाऊन पलंगाखाली लपला, तिथेच बेशुद्ध पडला. मावशी कामावरून आल्यावर तिला दिसला. तिची सांभाळायची तयारी होती, पण मुलाचा बाप जवळच राहत होता. रोज दारू पिऊन दारात तमाशा करीत होता. मावशीवरसुद्धा सासुरवाशीण म्हणून मर्यादा होत्या. ‘चाइल्डलाइन’मध्ये तो मुलगा स्थितप्रज्ञ चेहऱ्याने बसला होता. पण वारंवार पाय वर घेत होता. खाली घे म्हटले की हसायचा, क्षणभर पाय खाली सोडायचा. पुन्हा वर घ्यायचा. पाहिले तर लक्षात आले की पायावर खोल जखम होती, तीही चिघळलेली. काय झाले विचारले तर म्हणाला माईने (सावत्र आईने) तापत्या सळईने डागले, जेवण मागितले म्हणून. हे सर्व तो हसून सांगत होता. डोळ्यात मात्र वयाला न शोभणारा भाव होता. मला त्या दिवशी सकाळी बसलेल्या तव्याच्या लहानशा चटक्याची मी किती कौतुके केली हे आठवून अक्षरश: लाज वाटली.

याहीपेक्षा आम्ही सगळे शरमलो जेव्हा दु:ख पचवायच्या मुलांच्या ताकदीचा साक्षात्कार अनुभवला तेव्हा. एका अनाथ मुलाला मध्यरात्री ‘चाइल्डलाइन’च्या ऑफिसमध्ये घेऊन आलो. तो मुलगा ८/१० वर्षांचा असावा तसाच होता, हसरा. कपडे खूप घाण होते. सकाळी अनाथाश्रमात सोडण्यापूर्वी त्याला म्हटले, चल आंघोळ करू. त्याचा शर्ट खूप डागाळला होता. पाठीला चिकटला होता. तो काढल्यावर चर्र झाले. पाठीवर ओली- मांस दिसेल इतकी खोल चिघळलेली भाजल्याची वीतभर जखम होती. त्यातून पाणी गळत होते. त्याला शर्ट चिकटला होता. ‘थंडी वाजली म्हणून शेकोटी केली, त्याने झोपेत भाजले,’ म्हणाला. ती जखम बघून आम्ही सगळेच सुन्न झालो होतो. कसे सहन करत होता, तेही हसून! त्याला प्रथमोपचार करून निवाऱ्यात पोहोचवला. प्लास्टिक सर्जरी करायची वेळ आली इतकी ती जखम खोल होती. ‘दुखतेय का?’- ‘हाऽऽ’, ‘आग होतेय का?’- ‘हाऽऽ’. पण हे सगळे संभाषण आम्ही रडत तर तो शांतपणे हसून, असे चालले होते.

एका सहा वर्षांच्या मुलीचे स्टेटमेंट न्यायालयाच्या कारवाईसाठी घेत होते. एका आश्रमात ४ ते १६ वर्षांच्या मुला-मुलींवर अनन्वित विकृत अत्याचार सतत २/३ वर्षे झाले होते. ३०/३५ मुलांना बोलके करून त्यांच्याकडून हकिकत जाणून घेणे, हे एक महादिव्य होते. स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवणे मुश्कील जात होते. दुसऱ्या खोलीत जाऊन मी व माझे सहकारी रडायचो, पुन्हा परत यायचो आणि पीडित बाळाचा सामना करायचो- पुन्हा तीच मुले जाताना छान ‘स्माइल’ द्यायची. या मुलीने कदाचित माझा उद्वेग जाणला. ती मलाच हसविण्याचा प्रयत्न करीत होती.

या आणि अशा मुलांची वेदना सहन करण्याची ताकद तरी काय असेल? ती कशामुळे येत असावी हा अभ्यासाचा विषय ठरावा. सोशिकता एक गुण म्हणून विषेशत: मुलींमध्ये आपल्याकडे रुजवला जातो. त्याचे दुष्परिणाम म्हणून स्त्रिया व मुली वाट्टेल ते अत्याचार जन्मभर सहन करतात. प्राक्तन म्हणत किंवा स्वत:लाच त्याबद्दल गौरवत. आपल्याकडच्या दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट या सोशिकतेचे उदात्तीकरण करून आगीत तेलच ओततात.

पण ही तर इतकी छोटी बाळे की असे संस्कार होण्याचा संभव नाही. कान टोचून दिलेला जगातील वेदनेचा संस्कार इतका मुरला का? पण तेव्हाची सावधानता निसर्गदत्त प्रतिकार गेला कुठे? हे वेदनेतील हसू मला न सुटलेले कोडे आहे. गंमत शाळेतील मुलांमध्येसुद्धा ही सोशिकता नित्य दिसते. जळताना पाहिलेली ताई, शाळेतून बाबाला गंमत सांगायला आलेला तर समोर फासावर लटकलेला बाबा, दारू पिऊन मारणारी आई.. हो आईच, सदाचीच अन्नाची कमतरता, दारुडय़ा बापाकडून, कावलेल्या आईकडून सतत होणारी मारहाण व शिवीगाळ, हे आणि असे त्यांचे नित्य जीवन आहे. पण इतकी आनंदी मुले तुमच्या माझ्या लाडाकोडाच्या घरातसुद्धा दिसणार नाहीत.

या सगळ्या मुलांच्या शारीरिक यातना दिसतात तरी. मानसिक यातना तर अदृश्य पण नक्कीच अगणित. ज्यावर पूर्ण विश्वास टाकायचा, त्यानेच केलेला अपरिमित अत्याचार, जिने मायेच्या पदराची उब द्यायची तिनेच केलेली केलेली अवहेलना, मित्रपरिवार समाज यांच्यासमोर झालेला सार्वजनिक अपमान.. या यादीला अंत नाही. अदृश्य, डागणारी पण असह्य़ वेदना नक्कीच. मग ही पचविण्याची ताकद कोठली?

– डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

anuradha1054@gmail.com