28 January 2020

News Flash

शिबिरांचे तुरुंग

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी शिबिरे शोधण्याची पालकांची लगबग आणि शिबिरांच्या जाहिरांतींचीही.

|| डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

झाडावर चढणारी, पावसात मनसोक्त भिजणारी, दिवसभर गोंधळ घालून सोसायटीच्या काकांच्या, मावशांच्या शिव्या खाणारी, मग त्यांच्याचकडून पाणी मागणारी, फुलपाखरांमागे धावणारी, खाऊ वसूल करणारी, बंगल्याच्या काचा बॉलने फोडणारी ती वानरसेना गेली कुठे? सकाळपासून एकमेकांना हाकारे घालणे, रोज नवे खेळ शोधणे, कैऱ्या, बोरे, चिंचा पाडणे, चुकून पडणाऱ्या एखाद्या कैरीवर तुटून पडणारी, ती चिमणीच्या दाताने वाटून खाणारी भुतावळ गेली कुठे? ती गेली शिबिरे नावाच्या तुरुंगात.

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी शिबिरे शोधण्याची पालकांची लगबग आणि शिबिरांच्या जाहिरांतींचीही. का? मुलांना मोकळे राहू द्यायचे नाही, मनसोक्त जगूच द्यायचे नाही असे ठरवलेच आहे का? मुले शाळा सुटताना अथवा सुट्टी लागताना एवढी आनंदी का असतात, याचा विचार कधी केला आहे का? तुरुंगातून सुटका असते ती! मग मिळालेल्या स्वातंत्र्याला मारायला पालक दुसरे तुरुंग शोधतात. सोडाना त्यांना मोकळे-मुक्त, हवे ते करायला. असे म्हणताच पालक संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास अशा वल्गना करतात. पण या पळवाटा आहेत. खरे कारण आहे आम्हाला मुलांना वेळ द्यायचा नाही, नोकरीमुळे मुले कुठेतरी अडकवणे गरजेचे आहे अशी.

अनेक मुलांनी अनेकदा आम्हाला सांगितले आहे- शिबिरात जायचे नाही, बोअर होते. शिबिराच्या भरमसाट जाहिराती येतात. एका सुप्रसिद्ध दैनिकाने तर त्यासाठी पुरवणीच प्रसिद्ध केलेली आठवते. मुलांशी एकगठ्ठा बोलता येईल, ‘चाइल्डलाइन’ची माहिती सांगता येईल म्हणून या सगळ्या शिबिरांचा अभ्यास आम्ही केला. ८० टक्के बोगस होती. निव्वळ एखादी अप्रशिक्षित गृहिणी/व्यक्तीने २-४ तास मुलांना घेऊन कातरकाम/ओरिगामी/चित्रकला असल्या अ‍ॅक्टिव्हिटिज, आर्ट वर्कशॉपच्या नावाने घेणे, अथवा कुठली तरी गाणी लावून त्यावर नाचाचे नृत्यशिबीर, गोष्टी सांगून त्यावर फुटकळ नाटक-नाटक खेळणे, याचे नाटय़प्रशिक्षण वर्ग, कोणतेही प्रशिक्षण नसताना रोलर-स्केटिंग असे प्रकार दिसून आले. फी भरमसाट, पाणी, आवश्यक जागा, स्वच्छतागृहे कशाचीही सोय नाही. वयोगट वेगळे करता येत नाही, कारण पुरेशी संख्या नाही. या शिबिरातून होणाऱ्या आíथक शोषणाच्या, मुलांच्या अपघातांच्या केसेस ‘चाइल्डलाइन’कडे येतात ते वेगळेच. यापेक्षा मुलांना मोकळा वेळ दिला तर घर-घर, शाळा-शाळा, पोलीस-चोर, असे कितीतरी नाटय़ीकरण उत्तम करतात.

मुळात उन्हाळी शिबिरांची कल्पना आली कुठून? आणि ती संकल्पना होती तरी काय? परदेशात मुलं व युवक/युवती यांच्यासाठी मुळात यांची सुरुवात झाली. साधारणपणे जंगलात तंबूत राहणे, निसर्गातील साधनांच्या साहाय्याने जगणे अशा गोष्टींचा समावेश त्यात असायचा. शाळेत न शिकता येणाऱ्या गोष्टी शिबिरात सुरक्षित वातावरणात आत्मसात करता यायच्या. पालकांच्या दृष्टीने आधुनिक जगाच्या जीवनपद्धतीला हा उतारा होता. निसर्गात मुलांनी वेळ घालविल्यास मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम होतो असे काही मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे होते. जसजशी  या समर कॅम्पसमध्ये व्यावसायिकता येऊ लागली, तसतसा त्यांचा मूळ हेतू हरवला व ज्यापासून मुलांना दूर न्यायचे, जसे कॉम्प्युटर, रेडिओ आदी त्याचाच जाहिरातीत शिबिराचे आकर्षण म्हणून उपयोग होऊ लागला.

‘चाइल्डलाइन’ला मुलांच्या अनेक ‘तुरुंगाच्या’ तक्रारी येतात. घर हा त्यातला पहिला तुरुंग असतो. एक मुलगा फोन करून सांगत असे की मला ‘डब्यात बंद’ करून ठेवल्यासारखे वाटते. ‘का’ याची चौकशी केल्यावर नोकरी करणारी आई शेजाऱ्यांकडे किल्ली देते व हे पिल्लू घरी आले की त्याला घरात सोडून शेजाऱ्यांना बाहेरून परत कुलूप लावायला सांगितलेले असते. घरात खाऊ, खेळ, सगळे असते. पण ‘डब्यात बंद’ केल्यासारखे यामुळे मुलाला वाटते.

इकडे जाऊ नको-तिकडे जाऊ नको, इतक्या वाजेपर्यंतच खेळायचे, अमुकच खेळायचे, शाळेतून आल्यावर नाच/टेनिस/गायन/क्रिकेट अशा कोणत्या तरी कोचिंगला. या ठिकाणी वेळापत्रकाप्रमाणेच खेळायचे असते. बाई सांगतील तेच करायचे असते. नाचायचे ते नियमानुसार, टेनिस खेळायचे ते शिस्तीत, असे सगळे बेडय़ातील जीवन!

शाळेचा तुरुंग तर फारच मोठा. त्याबद्दल शाळा सुटताच होणारा ‘साईसुट्टय़ो’चा आनंद याची साक्ष देतो. येणाऱ्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहिली जाते. यातच शाळेचा पराभव आहे. सुट्टीत काय करायचे याचे मोठे इमले बांधले जातात. पण शाळेच्या तुरुंगातून बाहेर पडताच पालक या ना त्या शिबिराच्या चक्रात पोरांना अडकवून टाकतात. खेळाचे महत्त्व विशेषत: मुक्त खेळाचे महत्त्व मुलांच्या आयुष्यात फार मोठे असते. शरीर व स्नायूंचा विकास, सामाजिकीकरण अशा अनेक गोष्टी खेळांमधून मिळतात. मुक्त खेळातून आपल्या क्षमता तपासता येतात. पाठांतराने किंवा सरावाने जे आत्मसात होत नाही ते कायमस्वरूपी खेळातून आत्मसात होते. सर्व तऱ्हेच्या भावना मुलाला खेळातून व्यक्त करता येतात. खेळातून मुलाची सृजनशीलता खूप वाढते.

अनेकदा मुले चित्र काढतात त्याचा अर्थ लागत नाही. चित्रकलेच्या शिबिरात चित्र कसे काढायचे ते आधीच ठरवले जाते आणि चित्रातली नसíगकता निघून जाते. एका घरात असे भांडण ऐकले की ५/६ वर्षांचा मुलगा सगळे कपडे उचकटून खेळताना पाहिल्यामुळे आईने त्याला बदडला. मुलाच्या मते त्याने कपडय़ांचा किल्ला केला होता. अशा या आईरूपी तुरुंगाने त्याची नवीन शोध लावायची इच्छाच मारून टाकली. आपण साचेबंद आयुष्य जगतो. त्याच साच्यात मुलांना ढाळू बघतो. कारण ते सोयीस्कर असते. एकदा रस्त्याने चालले असता शाळेतून घरी जाणारी मुले पाहिली. पाऊस येऊन गेला होता. वाटेत थारोळी होती. त्यातील काही मुलांनी पटकन त्या थारोळ्यात उडय़ा मारल्या. चिखल उडवला. त्यांचा आनंद अवर्णनीय होता. अशाच एका शिबिरात गेले होते. माती कामाचा तास होता. बाई येईपर्यंत पोरे मनसोक्त मातीत खेळत होती. कोणी पाणी ओतून मातीत थपाथपा हात मारत होते. कोणी चिखल एकमेकांच्या अंगावर टाकत होते, तर कोणी पूर्ण स्थिरचित्त होत मातीचे आकार बनवत होते. तिकडून बाई ऊर्फ तुरुंग अधिकारी आल्या. वस्कन ओरडल्या. पोरांना शिस्तीत बसवले व आज मातीपासून काय बनवायचे सांगितले. आता ९० टक्के मुलांचा रस संपला होता. चेहऱ्यावरचा आनंद मावळला होता. अशी ही शिबिरे मुलांचा आनंद हिरावणारी.

सुट्टीत पूर्वी बदल म्हणून मामाच्या गावी जाणे, कोकणात जाणे अथवा पालकांबरोबर एखाद्या रम्य ठिकाणी जाणे असे नियोजन असायचे. त्यात जे मोकळेपण होते, सहवासाची मजा होती, त्याचे मुलांच्या मानसिकतेसाठी कायमस्वरूपी उपचारात्मक मूल्य प्रचंड होते.

कायद्यानेसुद्धा मुलांना अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. मुलांना शिबिरात जायचे का नाही याबाबत मात्र त्यांचे मत विचारात घेतले जात नाही. किंबहुना आजच्या पिढीची अशा प्रकारे मानसिकता (brain wash) तयार केली जाते की शिबिरात जाणेच त्यांना गौरवाचे वाटू लागते. कारण तसे डोक्यात भरवलेले असते आणि पर्याय माहीतच नसतात. माझ्या घरामागे एक आवळ्याचे झाड आहे. त्याचे पडलेले पिचकलेले आवळे सापडले की याही वयात मला आनंद होतो. ऐन रस्त्यावर कैऱ्या पडलेल्या असतात. मुले खेळत असतात पण त्या उचलत नाहीत. हे छोटे छोटे आनंद त्यांना कधी दाखवलेलेच नाहीत. कारण शाळा, क्लास/शिबीर असाच त्यांच्या आयुष्याचा प्रौढ नियंत्रित प्रवास असतो.

रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीत एक सुंदर हकिकत सांगितली जाते. ते एकदा ‘शांतिनिकेतन’मध्ये झाडाखाली शिकवत बसले असता पाऊस आला, सगळी मुले आडोशाला पळाली, एक मुलगा मात्र भिजत राहिला. भेटीस आलेल्या एकाने विचारले तुम्हाला या मुलाची काळजी वाटत नाही का? तर त्यांनी उत्तर दिले, ‘‘याची नाही तर आडोशाला गेलेल्या मुलांची वाटते.’’ किती खरं आहे, एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात पालक, शिक्षक, शिबीर-अधीक्षक यांच्या तावडीत सापडलेल्या मुलांना चिखलात नाचण्याचा, पावसात भिजण्याचा, गारा वेचण्याचा, चिंचा-बोरे पाडून खाण्याचा, रानावनात फिरण्याचा, नवनवीन वनस्पती, कीटक अचानक सापडल्याचा, पक्षी दिसल्याचा आनंद मिळणार कसा?

चिमण्या दिसत नाहीत, चिवचिवाट ऐकू येत नाही म्हणून हळहळणाऱ्यांना लेकरांचा किलकिलाट हरपल्याचे दु:ख कसे होत नाही?

सोडा रे सोडा! मुलांना सुट्टीत तरी हवे ते करायला मोकळे सोडा.

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on May 5, 2018 1:34 am

Web Title: tips to understand your childs psychology part 7
Next Stories
1 संस्कारांचे वास्तव
2 दु:ख पचविण्याची ताकद
3 चित्रे इशाराही देतात!
Just Now!
X