28 January 2020

News Flash

बेचिराख बालपण

लहानग्यांना बालपण नाकारणे यापेक्षा मोठा अन्याय नाही आणि एक दिवसाच्या कौतुकाने गमावलेले बालपण परत येत नाही.

 

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

१२ जून हा  जागतिक बालकामगार दिनम्हणून घोषित केला आहे. आपल्या येथील ८० टक्के बालकामगार खेडय़ात शेतीपूरक/घरगुती व्यवसायात, तर ६२ टक्के मुले धोकादायक व्यवसायात काम करतात. यातील ५० टक्क्यांवर मुले शाळेत जात नाहीत. म्हणूनच बालकामगार प्रथा कोणतीही दयामाया न दाखविता बंद पाडणे, असलेल्या कामगारांचे काही कार्यक्रमांद्वारे पुनर्वसन याची तातडीची गरज आहे. कायदा सक्षम आहे, मात्र आपली मानसिकता महत्त्वाची. दिसलेल्या बालकामगाराची तक्रार, नोंद पोलीस ठाण्यात किंवा चाइल्डलाइनसारख्या संस्थांकडे केल्यास बेचिराख बाल्यावस्थेतूून एखादा पक्षी नक्कीच नव्याने जन्म घेईल. नुकत्याच झालेल्या या दिनानिमित्त..

आयएलओने बालकामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १२ जून हा ‘जागतिक बालकामगार दिन’ म्हणून घोषित केला आहे. आपण रोज बालकामगार पाहतो, पण बिचारे, गरीब वगरे म्हणून दुर्लक्ष करतो किंवा काम देऊन उपकार करू पाहतो. १२ जूनला मोच्रे/ शपथा/ सरकारी कार्यक्रम, काही बालकामगारांना खाऊ/बक्षिसे देणे, असे कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. पुन्हा स्थिती जैसे थे.

लहानग्यांना बालपण नाकारणे यापेक्षा मोठा अन्याय नाही आणि एक दिवसाच्या कौतुकाने गमावलेले बालपण परत येत नाही. भारतातील ८० टक्के बालकामगार खेडय़ात शेतीपूरक वा घरगुती व्यवसायात, तर ६२ टक्के मुले धोकादायक व्यवसायात काम करतात. यातील ५० टक्क्यांवर मुले शाळेत जात नाहीत.

‘ज्ञानदेवी-चाइल्डलाइन’कडे नियमित बालकामगारांच्या केसेस येतात. गेल्या वर्षी ‘ज्ञानदेवी’च्या बालसेनेने (मुलांची मुलांसाठी संघटना) केलेल्या सर्वेक्षणात ३० दिवसांत १९० बालकामगार शोधले. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून बालकामगार येतात. बरेच वेठबिगार पद्धतीने आणले जातात. चहाच्या/खाद्यपदार्थाच्या गाडय़ा, हॉटेल/ढाबे, गॅरेजेस, दुकाने यात प्रामुख्याने ही मुले आढळतात. सुतारांची मुले, वेश्याव्यवसायातील मुली आणि घरगुती कामासाठी आणलेली मुलेही मोठय़ा प्रमाणावर असतात. त्यांना वय खोटे सांगणे, नातेवाईक आहे, शाळेसाठी इथे आणले आहे, असे सांगायला पढवलेले असते. या उत्तरांची कोणतीही शहानिशा करण्याची तरतूद अथवा मनोवृत्ती यंत्रणांमध्ये दिसून येत नाही. बहुतेक वेळेला हे जबाब ग्राह्य़ मानून मुलांना व त्यांच्या मालकाला सोडून दिले जाते. विकृत स्वरूपाची भीषण मारहाण, लैंगिक शोषण, कोंडवाडय़ागत निवारा, अपुरे-निकृष्ट अन्न, अशा स्थितीत ही मुले राहतात.

एका बठकीसाठी गेले असता, चहा घेऊन एक आठ वर्षांचा मुलगा आला. त्याच्याकडून चहा घेण्यास मी नकार दिला. अधिक माहिती काढण्यासाठी त्याला जवळ घेतला. जवळ घेताच तो मुलगा आपला झाला. हा नेहमीचाच अनुभव! मायेच्या माणसापासून खूप दूर आलेली ही लेकरे थोडय़ाशा ओलाव्याने लगेच चिकटतात. त्याच्याकडून कळले की, तो आणि त्याच्यासारखी १५-२० मुले एकत्र राहतात. राजस्थानातून येऊन खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवर १२-१६ तास काम करतात. त्यांच्यातला १४ वर्षांचा दादा सकाळी किंवा रात्री एकदाच डाळभात शिजवितो. त्यावरच मुलांची गुजराण चालते. हातगाडीवाले काहीही खायला देत नाहीत. एकूण आढळते की, पोटाच्या भुकेपेक्षा या लहान लेकरांना मायेची भूक न भागल्याचे दु:ख जास्त असते. दोन गोड शब्द बोलताच ती ज्या प्रकारे आम्हासारख्या कार्यकर्त्यांना बिलगतात त्याने पोटात कालवाकालव होते. त्यांच्या भरून आलेल्या डोळ्यांतले भाव खूप काही सांगून जातात, मन हेलावून टाकतात.

आणखी एका मुलाला घरातून सोडवून आणला तेव्हा कळले की, दूरच्या नातेवाईक जोडप्याने घर सांभाळण्यासाठी गावाकडून शाळेत घालण्याच्या बोलीवर आणले होते. दोघेही नवरा-बायको सॉफ्टवेअर कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर होते. १० वर्षांचे हे पोर, त्यांच्या छोटय़ा बाळाला सांभाळत होते. स्वयंपाक, घराची स्वच्छता- सर्व मुलाची जबाबदारी. त्यापोटी त्याला एकदाच २ पोळ्या मिळत होत्या, त्याही संध्याकाळी ५ नंतर. घर मोठे असूनही त्याला छोटय़ाशा बाल्कनीत, एसीच्या खाली झोपायला लागत होते. जेवणासाठी एक प्लास्टिकची बशी व पाण्यासाठी जुना आइस्क्रीमचा कप होता. रोज मालकीण मारहाण व शिवीगाळ करीत होती. मालक कमरेच्या पट्टय़ाने फोडून काढत होता, सिगारेटचे चटके देत होता.

एक १३ वर्षांचा, पायावर खूप मोठी जखम असलेला मुलगा रस्त्याने सुसाट पळत असता, काही सद्हृदयांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेला. डॉक्टरीणबाईंना अवघड जागी जखमा आढळल्या. त्याला विश्वासात घेतला तेव्हा समजले की, दरवर्षी उत्तर प्रदेशातील त्याचा ‘चाचा’ गावाहून नियमित मुलांना पुण्याला आणतो. कुठेही हवा येण्याचा मार्ग नाही अशा पत्र्याच्या लहानशा खोलीत मुले राहतात. भंगार वेचणे, चोऱ्या, खाद्यपदार्थ, ड्रग्जची वाहतूक असे मालक सांगेल ते काम, विना-सुट्टी १२ तास करतात. दरमहा २०० रुपये व रोज एक बशी डाळभात मिळतो. मालकाद्वारे लैंगिक शोषण तर होतेच, शिवाय इतरांनाही मुले पुरविली जातात. त्याची आणि माझी भेट झाली ती पोलीस स्टेशनवरच. हे पिल्लू इतके घाबरलेले होते की, निरीक्षणगृहात त्याला दुसऱ्या दिवशी भेटायला गेले, तर त्याने धावत येऊन ‘‘मां’’ असे म्हणत मला घट्ट मिठी मारली. मुलांबरोबर राहणार नाही, स्वतंत्र खोलीत ठेवा, पाहिजे तर बाहेरून कुलूप लावा, असे वारंवार विनवीत होता. पुरुष जातीची त्याने प्रचंड भीती घेतली होती. त्याच्या गावातील ‘चाइल्डलाइन’च्या माध्यमातून त्याची आई शोधून, फोनवरून तिच्याशी बोलणे करून दिले तेव्हा तो थोडाफार शांत झाला. त्याची ती भेदरलेली नजर, शारीरिक वेदना, मायेच्या शोधासाठी दोन गोड शब्द बोलणाऱ्या कोणालाही बिलगणे हादरवून गेले. कुठलाही बालकामगार आज दिसला की, याचेही असेच तर दु:ख नसेल ना, असे नेहमी वाटते.

एका घरात १० वर्षांच्या मोलकरणीवर खूप अत्याचार होतात, असे ऐकल्यावरून तिला सोडवायला गेले असता काहीच त्रास नाही म्हणाली. तीन जिने चढून पाणी भरणे, लहान बाळाला सांभाळणे, घरातील इतर कामे, याचे तिला काहीच वाटत नव्हते. मात्र गळ्यावर नखाच्या खुणा! कसल्या? तर मालकिणीने गळा आवळला होता. दंडावर डाग कसला? तर इस्त्रीचा चटका दिला होता. गावी घरी घासभरही अन्न न मिळणाऱ्या या मुलीला घरात खायला भरपूर आहे हे सुख मोठे होते व मारहाण, अत्याचार हे मुलगी म्हणून सोसायचेच असते, ही आईची शिकवण होती.

उत्तरेकडून येणाऱ्या उच्चपदस्थ सरकारी व खासगी अधिकाऱ्यांकडे घरकामासाठी मुले आणली जातात हे वास्तव आहे. त्यांना सोडवायला गेले की, ‘‘आमचा नवरा कोण आहे माहीतये का’’ अशी धमकी मिळते. अर्थात आम्ही त्याला धूप घालत नाही; पण विशेषत: याचाच गरफायदा घेत बालकामगार पुरविणारी  दुकाने दिल्लीत झाली आहेत. कदाचित इतर शहरांतही असतील. छत्तीसगडहून दिल्लीमाग्रे पुण्याला पुरवलेल्या काही घरकाम करणाऱ्या मुलींना सोडविले व घरी पोहोचवले तेव्हा ही बाब लक्षात आली.

लहान वयात कामाला लागल्यामुळे एकूणच विकासावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. बौद्धिक विकास खुंटतो, हाडे नीट वाढत नाहीत. डोळ्यांना अपाय होतो, फुप्फुसांचे विकार होऊन ती कमजोर होतात. रोगप्रतिकारशक्ती कमी होते, लहान वयात कामाला लागल्यामुळे शिक्षण किंवा प्रशिक्षणाची संधी मिळत नाही. त्यामुळे प्रौढ वयात कमाविण्याची क्षमता मर्यादित रहाते. अपमृत्यूही होताना दिसतात. या सर्वाचा परिणाम राष्ट्राला भोगावा लागतो. मोठय़ा राष्ट्रीय संपत्तीचा हा विनाश असतो.

वर उल्लेखित सर्वसाधारण दुष्परिणामा व्यतिरिक्त व्यवसायानुरूप विशिष्ट धोक्यांना मुलांना सामोरे जावे लागते. काचकामात ९० टक्के मुलांना अतिउष्णता व धूळ यामुळे टी.बी,. डोळ्यांना अपाय, काच हाताळताना होणाऱ्या जखमा असे परिणाम असतात. फटाके उद्योगात डोळे/कातडीवर विषारी रसायनांचे परिणाम, गालिचा उद्योगात एका जागी सतत बसल्यामुळे कमरेखालच्या स्नायूंना अपाय व जननक्षमतेवरही परिणाम, घरकामात शारीरिक अतिरेकी श्रम, सामाजिक, भावनिक, लैंगिक, शारीरिक अत्याचारांना सामोरे जावे लागते. खाणी, स्लेट उद्योग इत्यादीमध्ये श्वासोच्छ्वासावर परिणाम होऊन लवकर मृत्यू होतो. पॉवरलूम व्यवसाय, कुलपे बनवणे, पितळी भांडी कारखाने यात रासायनिक वाफारे, अतिरेकी उष्णता यामुळे चक्कर येणे, दमवणूक, डोळ्यांवर/फुप्फुसांवर परिणाम होतो. संधिवातासारखी दुखणी, जखमा हेही परिणाम.

स्वतंत्रपणे काम करणाऱ्या मुलांना विविध प्रकारच्या पिळवणुकीला तोंड द्यावे लागते. गिऱ्हाईक, पोलीस, स्थानिक गुंड, मोठे व्यावसायिक यांच्याकडून होणाऱ्या शोषणाबरोबरच सीमावाद/दादागिरी यालाही तोंड द्यावे लागते. विविध गोष्टी रस्त्यावर/रेल्वेत विकणारे, वेश्याव्यवसाय, भिकारी, डोंबारी इत्यादींचा या गटात समावेश होतो.

काम देणारा मालक हा नेहमी उपकाराची, पोटाला लावल्याची भावना ठेवतो. बहुतेकांना बालकामगार कायदा चांगला माहीत असतो. तरीही स्वस्त व विनातक्रार काम करणारा म्हणून बालकामगार ठेवण्याकडे कल असतो. बालकामगार आयुक्तालय फारसे सक्रिय नाही. बालकामगार पद्धतीतील वाढती वेठबिगारी ‘चाइल्डलाइन’ने संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा दाखवून दिली आहे; परंतु फारशी कृतिशील कारवाई दिसून आलेली नाही. यात साधारणपणे मुले सांगतात की, पालकांना वर्षांचे एकरकमी १ किंवा २ हजार रुपये दिलेले असतात.

गरिबी हे मुलांना काम करायला लावण्याचे कारण सांगितले जाते; पण ते पूर्ण असत्य आहे. मुलांच्या पशाने कोणतेच घर चालू शकत नाही. कमावणारी मुले सर्व पसा घरी देत नाहीत. अपरिपक्व वयात पशाचा वापर चन वा व्यसनाधीनतेसाठी होतो. शाळा मुलांना आवडेल असा अनुभव देत नाही. गळालेली मुले कामगारवृत्ती किंवा गुन्हेगारीत ओढली जातात.

या प्रवाहपतितांना पुन्हा प्रवाहात आणणे हा या समस्येवरील उपाय ठरू शकतो. पुण्यात ‘ज्ञानदेवी’ संस्थेने असा उपक्रम गेली ३० वर्षे यशस्वीरीत्या राबविला आहे. ‘गंमत-शाळा’ या उपक्रमामुळे प्रकल्प विभागातील शाळागळती १०० टक्के थांबून अभ्यासात यश मिळायला लागल्यामुळे, न्यूनगंड जाऊन अस्मिता व आत्मविश्वासाचे रोपण झाले. भंगार वेचणारी, घरकामे करणारी, बांधकाम व्यवसाय/दुकाने अशा ठिकाणी कामे करणारी आमची मुले, मिळालेल्या आधारामुळे आज पदवीधर-द्विपदवीधर होऊन मोठय़ा हुद्दय़ावर काम करीत आहेत. मुख्य म्हणजे आपल्यासारख्या इतरांना हात देत आहेत.

बालकामगार प्रथा कोणतीही दयामाया न दाखविता बंद पाडणे, असलेल्या कामगारांचे काही ‘ब्रिज प्रोग्राम्सद्वारे’ पुनर्वसन, याची तातडीची गरज आहे. कायदा सक्षम आहे. पण आपली मानसिकता महत्त्वाची. आपल्यापासून किमान सुरुवात करायची तर बालकामगार असलेल्या कोणत्याही ठिकाणी आपण सेवेचा लाभ घेण्यास नाकारू शकतो. दिसलेल्या कामगाराचा रिपोर्ट पोलीस किंवा ‘चाइल्डलाइन’सारख्या संस्थांकडे करू शकतो.

बांगडय़ांचा मला कोण सोस! हैदराबादच्या चारमिनारच्या चुडीबाजारात गरम लाखेवर लेकरांच्या छोटय़ा-छोटय़ा बोटांना खडे चिकटवताना पाहिले. आता अशा बांगडय़ांवर खडे नाहीत, भाजल्याच्या जखमा दिसतात. हातात बांगडय़ा घालताना किंवा सुंदर पेल्यातून काही पिताना, मऊशार गालिचावर झोपताना अपराधी वाटते. प्रत्येक उडणाऱ्या फटाक्याबरोबर कोणाचे तरी बालपण जळालेले दिसते. हवेच्या प्रदूषणासाठी फटाके उडवू नका, असा संदेश दिला जातो; पण फटाक्यांबरोबर बालपण करपतंय ते खरे तर सांगायला हवे आहे.

‘आईवडिलांच्या/कुटुंबाच्या आíथक दु:स्थितीला आम्ही जबाबदार नाही. जन्माला घातलेत तर सांभाळा,’ अशा बालकामगार लिखित मागण्या ‘ज्ञानदेवी’कडे आहेत. ‘मोठे’ ही प्रथा बंद करीत नाहीत, तर आपणच हालचाल करू या म्हणून गंमतशाळांच्या मुलांनी काही वर्षांपूर्वी दुकानांवर धाडी टाकून दुकानदारांना समज दिली, तर संस्थेची शाळांमधील बालसेना पुण्यातील बालकामगार शोधून त्यांचे प्रबोधन करीत आहे. माणूस म्हणून आपण काय भूमिका घेणार, हा बिनीचा प्रश्न आहे.

mansari.pathak@gmail.com  

chaturang@expressindia.com

First Published on June 16, 2018 1:05 am

Web Title: world child labor day child labor issue
Next Stories
1 मुलांसाठी सुरक्षित स्थानेच नाहीत?
2 आता सहन होत नाही!
3 शिबिरांचे तुरुंग
Just Now!
X