08 December 2019

News Flash

भंगलेलं स्वप्न..

घराबाहेर पडून काम शोधायचं, पैसे मिळवायचे, भावंडांना खाऊ घालायचं आणि आईचं दु:ख कमी करायचं, असं त्यानं ठरवलं. त्याचं ध्येय निश्चित होतं.

इमरान घरी, बांगलादेशी परत जावा यासाठी अगदी पार दिल्लीपर्यंत ओळखी काढण्याचं काम काही समाजहितैषी लोकांनी सुरू केलं. ‘स्पेशल केस’ म्हणून या सगळ्याला यश येईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली. आपल्यासाठी इतकी उच्चपदस्थ माणसं काम करताहेत, आपण घरी जाण्याची संभावना त्यामुळे निर्माण झाली आहे, हे बघताना इमरान अगदी आनंदून गेला. किती वर्षांनी त्याच्या मुखावर एखादी का होईना, स्मितरेषा झळकू लागली. पण..

भोपाळहून मला नेहमी इमरानची पत्रं येत. पत्रं नेहमीच आंतरदेशीय असत. कार्ड कधीच नसे. हिंदीतून लिहिलेल्या त्या पत्रात शुद्धलेखनाच्या अनेक चुका असत. पण मजकूर मात्र अगदी हृदयस्पर्शी. पत्राच्या खाली ‘इमरान’ अशी लपेटदार सही असायची. पण बाहेर ‘पत्र पाठवणारा’ म्हणून जे नाव असायचं ते ‘संतोष यादव’ हेच.

इमरान नियमित पत्रं लिहायचा खरा, पण कधी कधी आम्हा सर्वानाच भेटण्याची ऊर्मी अनिवार होऊन मुंबईत दोन दिवसांची रजा काढून दाखल व्हायचा. आमची भेट झाली की भरभरून बोलायचा. भोपाळच्या ज्या उद्योजकाकडे तो कामाला होता, त्याची इमरानवर मर्जी होती. त्याविषयी सांगायचा. याच भेटीत मी त्याला एकदा त्याच्या या दुहेरी नावाविषयी विचारलं. इमराननं किंचितही आढेवेढे न घेता त्या रहस्याचा उलगडा केला. इमरान म्हणे ज्या कारखान्यात काम करत होता त्याचा मालक हिंदू होता आणि त्याची आपल्या धर्मावर नितांत श्रद्धा होती पण इतर धर्मीय लोकांविषयी त्याला राग होता. इमरानच्या गुणांना ओळखून त्यानं त्याला नोकरीला ठेवलं खरं, पण नाव बदलण्याची अट घातली आणि इमराननं ती विनातक्रार मानली. इमरान म्हणाला, ‘‘मजहब के लफडे में हम जैसे गरीब लोग पडना ही नही चाहते। वो तो आप जैसे पढे-लिखे लोगों के झगडे है।’’ इमरान असं म्हणाला आणि त्याचा सारा इतिहासच डोळ्यांसमोर उभा राहिला.

इमरान बांगलादेशचा रहिवासी. तो अगदी लहान असताना त्याच्या वडिलांचा झाडावरून पडून त्यातच  अंत झाला होता. ही चार मुलं आणि आई मागं राहिली. आई मिळेल त्या कामावर जाऊ लागली. इमरान भावंडांत सगळ्यात मोठा. वडिलांचं कायमचं निघून जाणं व आईचं वणवणणं त्याला चटका लावून जायचं. किती तरी दिवस, महिने इमरान दु:खी होता, अस्वस्थ होता. त्यातच अधून मधून उपास घडायचे, आई रडायची, भावंडं कालवा करायची. इमरानला सगळं समजायचं. पण काय करावं हे मात्र उमगत नसे.

शेवटी त्याचा निश्चय झाला. इमराननं घर सोडायचं ठरवलं. घराबाहेर पडून काम शोधायचं, पैसे मिळवायचे, भावंडांना खाऊ घालायचं आणि आईचं दु:ख कमी करायचं, असं त्यानं ठरवलं. त्याचं ध्येय निश्चित होतं. त्याला मुंबई गाठायची होती. मुंबईत पैशांचे ढीग असतात. ही शेजारापाजाऱ्यांनी दिलेली माहिती इमरानला आश्वासित करत होती.

इमराननं काही काही करून मुंबई गाठली. ती कशी गाठली, त्या दरम्यान त्याला काय सोसावं लागलं, काय करावं लागलं. या विषयी इमरान चकार शब्द बोलत नसे. जणू त्यानं तो कप्पा कायमचा बंद करून टाकला होता. खोलात जाऊन कधी काही विचारलं तरी एरवी मोकळेपणानं बोलणारा इमरान प्रश्नांना शिताफीनं बगल द्यायचा. उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. मुंबईतल्या अनुभवांविषयी, त्या वेळच्या दारुण अपेक्षाभंगांविषयी मात्र तो मनमोकळेपणाने बोलत असे. मुंबईत पैशांचे ढीग कुठेच न दिसल्याने तर तो प्रारंभी कोसळलाच.

पहिले काही दिवस इमरानला उपास घडले. पण नंतर या महानगरानं इतर अगणित माणसांप्रमाणे इमरानलाही आपल्या पोटात सामावून घेतलं. इमरान हमाल बनला. ओझी उचलू लागला. रात्री दमून-भागून पुलाखाली आडवा झाला की मिटल्या डोळ्यांपुढे आईची, भावंडांची मूर्ती उभी राहायची. इमरान आपल्याला पैसे घेऊन परत जायचंय, असं मनाला सांगत स्वत:ची समजूत घालायचा. त्या सांत्वनाच्या प्रयत्नातली विफलता समजून की काय कोण जाणे, अश्रूंचे लोट गालांवर ओघळायचे.

त्या अश्रूंचा साक्षीदार शेजारीच झोपणारा शांतू होता. शांतू होता पंधरा-सोळा वर्षांचा पण दिसायला थोराड (हे सगळं इमरानचं वर्णन) प्रामाणिकपणे काम करून पोट भरण्यावर शांतूचा विश्वास नव्हता म्हणा किंवा परिस्थितीनं तो राहू दिला नव्हता. मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर महिलांची गर्दी हेरून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून घेण्यात शांतू वाकबगार होता. इमरानचा निष्पाप चेहरा त्याच्या मनात भरला. असा निष्पाप चेहरा म्हणजे शांतूच्या धंद्यात सोन्याची खाण! सोनसाखळ्यांच्या उचलेगिरीत शांतू आणि इमरान भागीदार झाले. मिळणाऱ्या पैशांचा मोह झाला इमरानला. जितके पैसे वेगानं येत होते, तेवढेच ते आईकडे लवकर पोचण्याची शक्यता त्याला खुणावत होती. पण अर्थातच ही भागीदारी फार दिवस चालली नाही. इमरानला पोलिसांनी पकडलं. बाल न्यायालयासमोर इमरान उभा राहिला. न्यायधीशांनी पत्ता विचारला. तो सांगता आला नाही. त्यामुळे इमरानची रवानगी रिमांड होममध्ये झाली. तिथे आला, काही दिवस राहिला आणि मग इमरान बदलत गेला. मूळच्या सत्प्रवृत्त इमरानला आपण चोरी करत होतो, याची जाणीव अस झाली. ‘आईला कळलं तर?’ ही भावना त्याला पोखरून टाकू लागली. त्या दिवसात इमरान तासन्तास शांत बसायचा. कुठे तरी, शून्यात टक लावून बघत राहायचा.

त्यातून इमरानला सावरलं ते वेल्डिंग कार्यशाळेनं. या कामात इमरानला खूप रस वाटला. इतक्या हुरूपाने तो शिकतोय म्हटल्यावर प्रशिक्षकांनीही त्याला शिकवण्यात कुचराई केली नाही. बघता, बघता इमरान एक कुशल वेल्डर तर झालाच पण एक शांत, समंजस मुलगाही झाला. वाईट एवढय़ाचं वाटायचं की, इमराननं या प्रक्रियेत खेळणं, हसणं, नाचणं या सर्व बालसुलभ आनंदांना तिलांजली दिली. आपला देश सोडून तो खूप लांब आला होता. पण परत तिथं जायची, कुटुंबासमवेत राहण्याची तीव्र आकांक्षा त्याच्या मनात तेवत राहिली होती. या सगळ्या घालमेलीत त्याचं बालपण संपलं, एवढं मात्र खरं.

बघता, बघता सहा र्वष उलटली. इमरानची संस्थेतली मुदत संपली. त्याच्या कामातील कौशल्यामुळे, चांगल्या वागणुकीमुळे लगेच नोकरी मिळण्याचीही व्यवस्था झाली. आम्हा सर्वाचा निरोप घेऊन इमरान भोपाळला गेला. इमरान भोपाळला स्थिरावला. चांगले पैसे मिळवू लागला. धर्माच्या ‘भानगडीत’ न पडता, यानं मालकानं सुचवलेलं ‘संतोष यादव’ हे नाव विनातक्रार स्वीकारलं. मात्र तो जसजसा कामात स्थिरावू लागला, चार पैसे गाठीशी बाळगू लागला, तसतशी इमरानची बेचैनी वाढू लागली. तो अस्वस्थ व्हायला लागला. आईची, भावंडांची आठवण त्याला जगू देईना. त्यांच्यासाठी त्यानं घराबाहेर पाऊल टाकलं होतं. त्यांच्याकडे त्याला परत जायचं होतं.

चार दिवसांची रजा घेऊन इमरान मुंबईला आला, तो परत जायचं ठरवूनच. सर्वानीच त्याची मानसिक अवस्था ओळखून प्रयत्नांना सुरुवात केली. अगदी पार दिल्लीपर्यंत ओळखी काढण्याचं काम काही समाजहितैषी लोकांनी सुरू केलं. ‘स्पेशल केस’ म्हणून या सगळ्याला यश येईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली. आपल्यासाठी इतकी उच्चपदस्थ माणसं काम करताहेत, आपण घरी जाण्याची संभावना त्यामुळे निर्माण झाली आहे, हे बघताना इमरान अगदी आनंदून गेला. किती वर्षांनी त्याच्या मुखावर एखादी का होईना, स्मितरेषा झळकू लागली. तेवढय़ात..

६ डिसेंबर उजाडला. देशभर मंदिर-मस्जिद वादावरून दंगली उसळल्या. विशेषत: मुंबईत दंगलीचा जोर वाढत होता. धार्मिक तणावानं वातावरण इतकं तापलं होतं की धर्माच्या भानगडीत पडायला नको म्हणून संतोष यादव हे नाव धारण करणारा इमरान घाबरून गेला. मुंबईचा इमरान, भोपाळचा संतोष. त्याला आपल्या आसपास काय चाललंय ते कळेना. वर्तमानपत्रावर नजर टाकतानाही त्याच्या हातापायांना कंप सुटत असे. यातच इमरानला कोणी तरी भीती घातली की इथून निघालास तरी तिथं पोचतोस की नाही कोण जाणे. त्यातच या देशातून आलास हे कळल्यावर तुझ्या कुटुंबाला झळ लागणार हे नक्की.

आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला झळ लागणार हे ऐकल्यावर मात्र इमरानचा धीर पार खचला. तो निराश झाला. हिंसक बनलेल्या मुंबईचा त्यानं कोणालाही न सांगता-सवरता निरोप घेतला. तो परत भोपाळला गेला.

मध्ये खूप दिवस गेले. इमरानचा काही ठावठिकाणा नव्हता. त्यानं आम्हा सर्वाशी संपर्क थांबवला होता. मग बरेच महिन्यांनी त्याचं एक पत्र (आंतरदेशीय) आलं. त्यात त्यानं लिहिलं होतं, ‘माँ के पास पहुँचना अब मेरे लिए जैसे नामुमकीन बन गया है। मजहब के झमेले मैं पडना नहीं चाहता था। लेकिन जैसे मैं खींच के अंदर आया। मेरा सपना टूट गया।’

इमरानची आणि माझी ती शेवटची पत्रभेट. प्रेमाच्या धर्मानं एकत्र आलेल्या आम्हाला हिंसेच्या अधर्मानं पार दूर ढकलून दिलं. धर्माच्या कारणानं, धर्माच्या नावाखाली दंगली होत राहतात. माणसं मरतात, घरं कोसळतात, जीवन उद्ध्वस्त होते. ज्यांना या हिंसेची, द्वेषांची झळ लागत नाही, अशी माणसं नाशाच्या, हानीच्या बातम्या वाचताना हळहळतात, चुकचुकतात. खिन्न होतात. पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्याचा रेटाच एवढा असतो की भावनांची तीव्रता ओसरत जाते, वरवर सारं शांत होतं. मनात दबा धरून राहते ती भीती.

एखादा इमरानही धार्मिक हिंसेपासून लांब असतो. पण तीच धार्मिक हिंसा त्याला सोडत नाही. ती त्याचं उरीपोटी, आयुष्यभरासाठी जपलेलं स्वप्नं भंगून टाकते. स्वप्न तुटतं. परत कधीच जुळून न येण्यासाठी!

-रेणू गावस्कर

eklavyatrust@yahoo.co.in

First Published on July 30, 2016 1:08 am

Web Title: destroyed dream
Just Now!
X