11 December 2019

News Flash

अधुरं स्वप्न

चटका बसल्याप्रमाणे मी त्या निर्जीव यंत्राकडे बघत राहिले.

रेखा म्हणाली, ‘‘ पण मला नाही तसं वाटत. ताई, मी इथं मुलं झोपली की एकटी बसते आणि माझं दप्तर उघडून अभ्यास करते. ताई, इथं शाळा नाही, खेळ नाही. बाई नाहीत, मैत्रिणी नाहीत. मधल्या सुट्टीतला डबा नाही. ताई, मला नाही आनंद होत. मला नाही अभ्यास करावासा वाटत.’’ हलकेच फोन बंद झाला. चटका बसल्याप्रमाणे मी त्या निर्जीव यंत्राकडे बघत राहिले. तेरा-चौदा वर्षांच्या त्या मुलीनं शिक्षणातलं केवढं मोठं सत्य किती थोडय़ा शब्दात मला सांगितलं होतं.

देशातल्या कुठल्याही महानगरासारखं हेही एक महानगर. एकीकडे गगनचुंबी इमारती आणि त्याच्या पलीकडे झोपडपट्टी. हळूहळू त्या झोपडपट्टीचं एखाद्या ‘नगरात’ रूपांतर होतं. छोटी, पत्र्याची कशाबशा रचलेल्या घरांची बेसुमार वाढ होते आणि माणसं तिथं दाटीवाटीने राहू लागतात. अशाच एका वस्तीच्या अगदी प्रवेशद्वारातच मला रेखा भेटली. नावाप्रमाणेच एखाद्या नीटस रेघेसारखी सुरेख रेखा. रेखाची आणि माझी पहिली भेट मला तरी खूप संस्मरणीय वाटते. किती तरी र्वष झाली त्या भेटीला पण आता लिहिताना त्या भेटीचे बारीकसारीक तपशील जसेच्या तसे नजरेसमोर उभे आहेत.

एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी त्या वस्तीत पोचले. पौगंडावस्थेत प्रवेश केलेल्या मुलींच्या शिक्षणाविषयी काम करणारी संस्था होती ती. तिथल्या सामाजिक कार्यकर्तीनं पत्ता तर बरोबर दिला होता. पण त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तीच्या प्रवेशद्वाराशीच मी गोंधळून जाऊन उभी होते. त्या वेळी माझ्या मदतीला धावून आली ती रेखा. माझं लक्ष नव्हतं पण मला वाटतं, ती केव्हाची मला बघत होती. माझं हरवणं तिला समजलं होतं. त्यामुळे एकदम पुढे येऊन तिनं माझा हातच धरला. विचारायला लागली मला, ‘‘ताई कुठं जायचंय? मी येऊ सोबत तुमच्या? इथंच राहते मी.’’

मी रेखाकडे पहिलं आणि बघतच राहिले. गहू वर्ण त्याच्यावर खुलून दिसणारी कुरळ्या केसांची महिरप, गालांवर उतरलेल्या बटा, मोठे डोळे, पातळ ओठ आणि त्यातून डोकावणारे पांढरे दात. त्या दहा-अकरा वर्षांच्या मुलीला सौंदर्यानं आपलं दान उदार हस्ताने प्रदान केलं होतं. केसांचा लठ्ठ शेपटा पुढे घेऊन, पाय नाचवत ती मुलगी मला विचारत होती, ‘‘मी येऊ सोबत?’’ पुढची तीन एक र्वष रेखा माझी तिथली सोबतीण झाली. रेखा मूळची राजस्थानची. तिच्या पुष्कळ आरसे आणि गोंडे लावलेल्या परकर-पोलक्यावरून ते सहज समजून यायचं. राजस्थानातून आधी सुतारकामात कुशल असणारे वडील आले आणि खोली मिळाली तशी त्या गृहस्थानं आपल्या कुटुंबाला देखील इथं बालावून घेतलं. रेखाला चार भावंडं. रेखा सर्वात थोरली. पैशांच्या अभावाचा ताण आई-बापाच्या दोघांच्याही चेहऱ्यांवर सतत जाणवायचा. कामामुळे करवादलेली आई आणि बायको-पोरांवर डाफरत विडी ओढणारा बाप असं त्या कुटुंबाचं चित्र होतं. पण त्या दारिद्रय़ातही मुलं हसत होती, खेळत होती, मुख्य म्हणजे वस्तीच्या जवळच असलेल्या शाळेत जात होती.

रेखा जेवढी देखणी होती, तेवढीच गुणी होती. नवनवीन शिकायची तिला भारी हौस. आपले हे प्रेरणास्रोत तिनं कसे काय टिकवले होते कोण जाणे! कारण रेखाच्या घरी तिच्या लग्नाचे पडघम तेव्हापासूनच वाजायला लागले होते. एवढी चौथी झाली की तिचे हात पिवळे करायचे, असे बेत घरात घाटत होते. मात्र लग्नाचा विषय निघाला की, तिसरीतली रेखा गोरीमोरी व्हायची. ‘मेरी स्कूल बंद हो जाएगी। असं डोळ्यांत पाणी आणून म्हणायची. आपल्या आईचं मन वळवण्यासाठी आर्जवं करायची. रेखाला गोष्टी ऐकण्याचं विलक्षण वेड होतं. पण ते नुसतं ऐकणं नव्हतं. ते कथामय होऊन जाणं होतं. गोष्ट थोडी पुढे सरकली की रेखा पुढं सरकलीच म्हणून समजा. म्हणजे आपण समजायचं की रेखा त्या गोष्टीतलं एक पात्र झाली आहे. गोष्टीतल्या पात्रांशी त्यांच्या सुख-दु:खाशी संपूर्णपणे एकरूपता साधण्याची किमया तिनं साध्य करून घेतली होती. सिंड्रेलाची गोष्ट तिची फार आवडती. त्यातली सिंड्रेला सुखी झाल्यावर, तिनं तिची राजपुत्राशी गाठ घालून देणाऱ्या परीला परत बोलावून तिच्यासारख्या अनेक दु:खी मुलींना सुखी करायला सांगायला हवं होतं, असं रेखाला वाटायचं. रेखाला गोष्ट सांगायला सांगितली की त्या गोष्टीचा शेवट बदलून तो संपूर्ण सुखान्त व्हायचा.

रेखाला लग्नाचं भय वाटायचं. आपलं लग्न झालं की शाळा थांबणार हे तिला माहीत होतं. पण रेखाच्या लग्नाची मोहीम अचानक थंडावली. दु:ख एवढय़ाचंच की ती मोहीम थंडावली खरी पण त्यामुळे तिचं शिक्षण नाही वाचू शकलं. झालं असं की रेखाच्या चुलत बहिणीचं राजस्थानात लग्न ठरलं. दहेज इतकं भारी होतं की त्यात रेखाच्या वडिलांनाही कर्ज काढणं भाग पडलं. रेखाची शादी तात्पुरती पुढे ढकलली गेली. पण मग दुसरंच संकट उभं राहिलं. रेखाच्या आई-वडिलांनी पैशांच्या गरजेपोटी घराच्या आसपास असलेल्या एका श्रीमंत घरात रेखाला मुलं सांभाळण्यासाठी नोकरीला ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसात मी दररोज रेखाच्या घरी जात असे. तिच्या आई-वडिलांची समजूत घालण्याची पराकाष्ठा केली मी. आमचं संभाषण सुरू असेतो रेखाच्या डोळ्यांतून सारखं पाणी यायचं. बारा-तेरा वर्षांच्या त्या मुलीला एकीकडे माझा आधार वाटायचा पण त्याच वेळी मी तिला वाचवू शकणार नाही, असंही तिला वाटत असावं.

आणि ते वाटणं पोकळ नव्हतंच. रेखा आपल्या वडिलांना जाणत होती. आईचं दबलेपण तिला समजत होतं. शेवटी व्हायचं तेच झालं. आमचा आग्रह वाढल्यावर रेखाच्या वडिलांनी तिला राजस्थानला पाठवून द्यायचा आपला निर्णय जाहीर केला. मग आम्हीच थांबलो. निदान रेखा इथं राहू दे, असा विचार केला. रेखाची शाळा सुटली. रेखा कामाला जाऊ लागली. याला खूप महिने झाले. सुरुवातीला रेखाचे फोन यायचे. मीदेखील तिला तिच्या वडिलांच्या नंबरवर फोन करत असे. कधी तरी रेखा फोनवरच ‘गोष्ट सांगा’ असा आग्रह धरायची. मग आम्हां दोघींनाही तिच्या शाळेच्या आठवणीनं भरून यायचं.

हळूहळू आमचा संपर्क थांबला. कधी तिकडून गेले की रेखाची हमखास आठवण यायची. शाळा सुटण्याच्या वेळी तिची भावंडं दिसायची. ‘रेखा आठवण काढते’ असं सांगायची. एकदा रेखाचा फोन आला. म्हणाली, ‘कामावर आलेय. घरात कोणी नाही म्हणून फोन लावलाय. या वेळचा रेखाचा आवाज काहीसा वेगळा होता. एखादी बातमी सांगताना होतो ना तसा. मी तिला काही विचारणार एवढय़ात रेखाच बोलायला लागली. ‘ताई, मला माझ्या इथल्या बाई लिहाय-वाचायला शिकवतात.’ रेखानं असं म्हटलं मात्र, मला अगदी भरून आल्यासारखं वाटलं. तिचं पुढचं बोलणं ऐकताना तर तो आनंद द्विगुणित झाला. रेखाच्या बाई तिला गोष्टींची पुस्तकं देत होत्या. चित्रांचे कागद देत होत्या. त्यांच्या लहान मुलाची इंग्रजी भाषेतली चित्रमय पुस्तकं देऊन तिला इंग्लिश शिकवत होत्या. एवढंच काय, रेखाकडे एक छोटं दप्तरदेखील होतं. रेखाचं बोलणं मी ऐकलं. अगदी लक्षपूर्वक ऐकलं. ती बोलायची थांबल्यावर मी बोलायला सुरुवात केली. मी रेखाचं अभिनंदन केलं. मन:पूर्वक अभिनंदन केलं. मी तिला म्हटलं, ‘अगं, रेखा जे हरवलं होतं, ते तुला मिळालं. तुला शिकायचं होतं, पुस्तक  वाचायची होती, ते झालं बघ. किती छान झालं गं फारच छान.’

मी कदाचित आणखी बोलत राहिले असते. माझा आनंद व्यक्त केला असता. पण रेखानंच मला थांबवलं. मला अडवत काहीशा थंड आवाजात ती म्हणाली, ‘‘ताई, तुम्हाला खरंच असं वाटतं की खूप छान झालंय? तुम्हाला खरंच खूप आनंद झालाय?’ मग क्षणभर थांबून माझ्या उत्तरासाठी न थांबता रेखा म्हणाली, ‘‘ताई पण मला नाही तसं वाटत. ताई, मी इथं मुलं झोपली की एकटी बसते आणि माझं दप्तर उघडून अभ्यास करते. ताई, इथं शाळा नाही, खेळ नाही. बाई नाहीत, मैत्रिणी नाहीत. मधल्या सुट्टीतला डबा नाही. ताई, मला नाही आनंद होत. मला नाही अभ्यास करावासा वाटत.’’

हलकेच फोन बंद झाल्याचा क्लिक असा आवाज झाला. चटका बसल्याप्रमाणे मी त्या निर्जीव यंत्राकडे बघत राहिले. तेरा-चौदा वर्षांच्या त्या मुलीनं शिक्षणातलं केवढं मोठं सत्य किती थोडय़ा शब्दात मला सांगितलं होतं. शिक्षण म्हणजे मोकळी हवा, शिकवणाऱ्या बाई, हव्याहव्याशा मैत्रिणी, मधली सुट्टी, डब्बा आणि हुंदडणं! या सगळ्या साखळीत वेगवेगळे विषय सामावलेले असतात. हे सगळं नसेल तर शिक्षण कसलं आणि काय!

इतरांना सिंड्रेलाची परी भेटावी आणि सगळ्यांनी सिंड्रेलासारखं सुखी आणि आनंदी व्हावं, अशी इच्छा करणारी रेखा! तिची आणि त्या जादूची कांडी फिरवणाऱ्या परीची चुकामूक झाली खरी. रेखाला परी भेटायला हवी होती, परीनं जादूची कांडी फिरवून रेखाला शाळा मिळवून द्यायला हवी होती. पण..

रेखाची आठवण येते. लाल, निळे आरशांचे, टिकल्यांचे परकर घालून मिरवणारी रेखा. तिचे कुरळे केस, सरळ नासिका, मोठे डोळे आणि त्यातून डोकावणारं अपार कुतूहल. रेखा म्हणजे मला पडलेलं एक सुंदर स्वप्न. अधुरं! अपूर्ण.

रेणू गावस्कर

eklavyatrust@yahoo.co.in

First Published on September 24, 2016 1:09 am

Web Title: incomplete dream
Just Now!
X