भाईनं रिक्षातून उडी मारण्याची तयारी केली. ज्या क्षणी नूरला ते समजलं, त्या क्षणी नूर उठली आणि जिवाच्या आकांतानं तिनं आपल्या भावाच्या गळ्याला मिठी मारली. ती नुसती मिठी नव्हती, तर मगरमिठी होती.. आपल्या आईवडिलांना वाचवण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करणारी ती नूर अर्थात प्रकाशाची तिरीप, तिच्या आईवडिलांच्या आयुष्यातली!

लहानपणी मी आजीबरोबर घराजवळच्या ज्ञानेश्वर मंदिरात जात असे. समोर पसरलेला अथांग सागर, देवळात ऐकू येणारी लाटांची गाज आणि कीर्तनकार बुवांची रसाळ वाणी यांचा इतका प्रभाव मनावर पडायचा की, त्या वेळी ऐकलेलं कधीच विसरता आलं नाही. त्यामुळेच कीर्तनकार बुवांच्या तोंडून ऐकलेली श्रावण बाळाची कथादेखील मनात कायमची घर करून राहिली. आपल्या अंध मातापित्यांना कावडीत घालून काशीयात्रेला नेणारा श्रावण वंदनीय होऊन बसला. त्यामुळेच पुढे अनेक वर्षांनी एक श्रावणी आयुष्यात आली तेव्हा एकदम वाटलं, लहानपणीच हिची भेट झाली होती की!

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन

या श्रावणीचं खरं नाव आहे नूर. आपल्या अब्बू, अम्मीची नूर. त्यांच्या म्हातारपणीची काठी. त्यांचा एकमेव आधार. आयुष्यातील आघातांनी खचलेल्या जीवांच्या आयुष्यातील प्रकाशाची तिरीप. नूर आपल्या आईवडिलांची चौथी मुलगी. मोठय़ा दोन बहिणी आणि एकुलता एक भाऊ. खूप मन्नते मागितल्यावर जन्मलेला, तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ. अब्बू आणि अम्मी त्याचे इतके लाड पुरवायचे की बस्स! खास करून अम्मी. नूर मला सांगत होती की, भाईला कशालाही नाही म्हणायचंच नाही, असा अम्मीचा आदेशच होता. त्या आदेशाचं पालन न करणाऱ्याला अम्मीच्या रोषाला सामोरं जावं लागे.

या अतिलाडाचा जो काही परिणाम व्हायचा तो झालाच. नूरच्या भावाची गाडी शाळेत असल्यापासूनच पार घसरली. वाईट संगत, शाळा बुडवणं, व्यसनांना जवळ करणं, सगळं कसं एकामागोमाग एक येत गेलं. घरातल्या पैशांनीच नव्हे तर चीजवस्तूंनीदेखील बाहेरची वाट धरली. नूरच्या वडिलांचा गाडय़ांचा व्यवसाय होता. गाडय़ा भाडय़ानं जात असत. चार गाडय़ा बाळगून होते नूरचे अब्बू; पण सैफ भाईनं सगळ्या गाडय़ा विकल्या. एक रिक्षा तेवढी राहिली. या सगळ्या काळात अब्बूंनी घाईघाईनं दोन्ही मुलींची लग्नं उरकली. आर्थिक डोलारा तर कोलमडत होताच, पण त्याच्या जोडीला समाजातली पत नाहीशी होत चालली होती. दारू, ड्रग्ज, बाहेरख्यालीपणा काही म्हणजे काहीच करायचं बाकी ठेवलं नव्हतं भावानं.

नूर सांगायची, व्यसनांनी एके काळी ढाण्या वाघ असणाऱ्या भावाची अक्षरश: दैना झाली होती. अम्मी मुलाला शेरभर दूध पाजायची, मटणाचा, कोंबडीचा खुराक तर कधीच चुकला नाही; पण व्यसनांनी देहाची चाळण झाली होती. ऐन तारुण्यात भाई म्हातारा झाला होता; पण आतला संताप, वैफल्य सोडत नव्हतं. बाहेरून नशेत घरी आला आणि बहिणी हाताशी सापडल्या, की बदडून काढायचा. कधी अम्मी, अब्बूंनाही त्याचा प्रसाद मिळाल्याखेरीज राहायचा नाही. असा काही काळ गेला आणि नूरच्या भावानं एक नवीन टूम काढली. राहतं घर तो स्वत:च्या नावावर करून मागायला लागला. मागणीनं हिंसा धारण केली. तेव्हा मात्र अम्मी-अब्बूच्या पायाखालची जमीन सरकली. राहतं घरच उरलं होतं त्यांच्यापाशी.

त्यानंतरचे दिवस भयानक होते. नूर अम्मी-अब्बूंना सांभाळत होती. चुकूनमाकून शुद्धीवर असलेल्या भावाची मनधरणी करत होती, त्याचा परिणाम म्हणून नशा करून आलेल्या त्याच भावाचा मार खात होती. भीती ही एकच संवेदना नूरच्या मनाला व्यापून राहिली होती; पण लग्नाला मात्र तिनं ठाम नकार दिला होता. अम्मी, अब्बूला सोडून जाणं किती धोक्याचं ठरू शकतं, याची तिला पूर्ण कल्पना आली होती.

‘‘मग तो दिवस उजाडला.’’ नूर सांगत होती. ‘‘भाई त्या दिवशी घरात आला तोच हसत हसत. त्या दिवशी त्यानं नशा केली नव्हती. अगदी पानसुद्धा खाल्लं नव्हतं. खूप आनंदात दिसत होता तो. किती तरी वर्षांनी आम्ही त्याचं ते रूप बघत होतो.’’
‘‘भाईला तसं बघून अम्मी घाईघाईनं त्याचा आवडता चहा करायला उठली; पण भाईच नको म्हणाला. त्यानं रिक्षा आणली होती. त्यातून फिरायला जाऊ या म्हणाला.’’ नूर सांगत होती. ज्या क्षणी तिनं भावाचा बेत ऐकला, त्या क्षणी तिच्या मनात एकदम कल्लोळ माजला. तिला कशाची तरी भीती वाटली. भयंकर भीती. ते भय कसलं होतं ते तिचं तिलादेखील कळलं नाही; पण नूरच्या आत काही तरी हललं. त्यासरशी तिनं अम्मीसोबत चलण्याचं ठरवलं. भाई नाही म्हणाला; पण एरवी भावाला घाबरून गपगार होणारी नूर घाबरली नाही. तिनं आपला हट्ट सोडला नाही. शेवटी भाईलादेखील तिची बात मानावी लागली.
चौघे जण रिक्षातून निघाले. भाई रिक्षा चालवत होता. मागे तिघे जण बसले होते. अम्मी, अब्बू आणि त्यांना जिवापाड जपणारी नूर. अब्बू, अम्मी सारखे मुलाशी बोलत होते, हसत होते. मुलाकडून मात्र कसलाच प्रतिसाद नव्हता आणि नूर! ती फक्त भावाकडे बघत होती, त्याच्यावर ध्यान ठेवत होती.

पुढे जे काही घडलं ते नूरच्या तोंडून ऐकताना मी अक्षरश: थरारून गेले. नूर म्हणाली, ‘‘भाईनं एका टेकडीवर गाडी आणली. आम्ही गावापासून खूप लांब आलो होतो. पुढे खोल उतार होता. भाईनं तिथवर गाडी आणली आणि म्हणाला की, घर नावावर करून देत नसाल तर रिक्षा खाली दरीत सोडून देणार होता तो.’’

भाईनं रिक्षातून उडी मारण्याची तयारी केली आणि नूरला सगळं समजलं, लख्ख दिसलं. तो उडी मारून स्वत:चा जीव वाचवणार होता आणि या तिघांना मरण्यासाठी सोडून देणार होता. ज्या क्षणी नूरला ते समजलं, त्या क्षणी एका भित्र्या, दुबळ्या मुलीच्या अंगात काही तरी संचारलं. एका शक्तीनं जणू तिच्यात प्रवेश केला. ज्या भावाला पराकोटीची घाबरायची, त्याच्याविषयीच्या भीतीची नामोनिशाणीदेखील उरली नाही. नूर उठली आणि जिवाच्या आकांतानं तिनं आपल्या भावाच्या गळ्याला मिठी मारली. ती नुसती मिठी नव्हती, तर मगरमिठी होती. मिठी सोडवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करीत असतानाच भावाच्या कानात बहिणीचे शब्द पडले ‘मरना है तो सब एक साथ मरेंगे। अब्बू- अम्मी अकेले नही। जाना है तो चारों को जाना है।’ नूर सांगत होती, भाई तिची मिठी सोडवण्यासाठी धडपडत होता, नूरला मारत होता; पण नूरनं त्याला नाही म्हणजे नाहीच सोडलं. अब्बू- अम्मीला वाचवण्याच्या निश्चयानं तिला दहा हत्तींचं बळ दिलं.

तो क्षण गेला आणि नूरचा भाऊ शांत झाला, एकदम शांत. त्यानं गाडी वळवली आणि एक शब्दही न बोलता तो सगळ्यांना घरी घेऊन आला. नंतरचे आठ दिवस तो घरीच आला नाही. थोडय़ाच वर्षांत व्यसनांनी पोखरून गेलेल्या नूरच्या भावाच्या शरीरानं हार मानली व तो मृत्यूच्या स्वाधीन झाला. यथावकाश नूरचं लग्न झालं. एका गरीब, होतकरू तरुणाशी तिचा विवाह झाला. रोज नवरा कामावर गेल्यावर नूर आपल्या एकुलत्या एक मुलीला घेऊन आईबापाच्या घरी येते. दिवसभर त्यांची सेवा करते आणि संध्याकाळचा त्यांचा खाना तयार करून आपल्या घरी जाते. यात एका दिवसाचादेखील खंड पडलेला नाही. नूरच्या शोहरलाही ही व्यवस्था मान्य आहे, किंबहुना त्याच अटीवर नूरनं त्याच्याशी लग्न केलंय.

नूरच्या या असामान्य शौर्याविषयी नूर, अम्मी, अब्बू आणि मी कितीदा तरी एकमेकांशी बोललो. त्या संभाषणातून हाताला लागलं ते हेच की, त्यांच्यापैकी एकालाही नूरनं जे केलं त्याच्या उत्तुंगतेची जरादेखील जाणीव नाही. जेव्हा ती घटना घडली तेव्हाही नव्हती. खास करून नूरशी बोलताना जाणवायचं की, आपण केवढी शूर कृती केली याचं त्या पोरीला कधी पुरेपूर भानच आलं नाही. भावाला दुरून बघितलं तरी भीतीनं थरथर कापणारी ही मुलगी प्रसंग येताच तिनं त्या भावाशी दोन हात करायला मागेपुढे पाहिलं नाही. आपल्या आईबापाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा तिनं केली नाही. त्यांना सुखरूप घरी आणलं ही केवढी मोठी गोष्ट आहे. नूरचं त्या वेळचं वय असेल पंधरा-सोळा. त्या वयात हे करणं केवढी मोठी गोष्ट आहे; पण या घटनेची नोंद तिच्या घरात झाली नाही एवढं खरं.

नूर मला प्रातिनिधिक वाटते. हे असामान्यत्व मुलांमध्ये असतं, पण त्याला वावच मिळत नाही. त्याची नोंद घेतली जात नाही ना त्याचं कौतुक होतं. मुलांना जवळच्या वाटणाऱ्या चैतन्यमय सृष्टीसाठी ती वाटेल ते करायला तयार होतात. त्या क्षणी ती उत्तुंग उंची गाठू शकतात. दुर्दैवानं पुढे मोठी माणसं स्वार्थाचं कुंपण असं काही आवळतात त्यांच्याभोवती, की त्यांच्या ठायी असलेल्या उदात्ततेचा मागमूसही राहू नये. नूरने जे केलं ते उदात्तच होतं, तिच्या नावाप्रमाणे नूर होतं, प्रकाशाची तिरीपच ठरली ती तिच्या अब्बू-अम्मीच्या आयुष्यात!

–  रेणू गावस्कर