11 December 2019

News Flash

सीता आणि गीता

सीताची आई तिच्या इतक्या लहानपणी गेली होती की तिला आईविषयी काहीच आठवायचं नाही.

सीताला आई नव्हती तर गीताला वडील. पण आई जाण्यानं कधीच न भरून येणारी हानी होते हे कदाचित गीताला जाणवलं. त्यातली खोल वेदना तिच्या लक्षात आली. म्हणून विरक्त सीतेला प्रवृत्त गीतेनं सावरलं. ‘सीता’ पुन्हा एकदा ‘भूमिगत’ होऊ नये म्हणून गीतानं तिला कर्मयोग शिकवला.

सीता भान हरपून नाचत होती, तिचा लयबद्ध पदन्यास बघणाऱ्या प्रेक्षकांचंही भान हरपलं होतं. अखेर एकापाठोपाठ एक गिरक्या घेत सीतानं आपलं नृत्य थांबवलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. किती तरी वेळ प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. माझेही हात सवयीनं टाळ्या वाजवत होते, पण डोळे मात्र गीताकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे तिच्या मुद्रेवर सीताविषयीचा अभिमान प्रतीत होत होता. आनंद, अभिमान, प्रेम या सगळ्या सकारात्मक भावनांनी गीताचा सावळा चेहरा फुलून गेला होता. भावपूर्ण डोळे चमकत होते.
सीता आणि गीता दोघीही मुलींच्या संस्थेत अनेक र्वष रहिल्या. सीताची आई तिच्या लहानपणीच गेली होती तर गीताला आई होती पण तिला वडिलांचं छत्र फार काळ लाभलं नव्हतं. साधारण एकाच वेळी संस्थेत प्रवेश घेणाऱ्या या समवयस्क मुलींनी (साधारण आठ-नऊ वर्षांच्या असतील त्या तेव्हा) परस्परांचं दु:ख जाणलं आणि मैत्रीचे हात एकमेकींच्या गळ्यात घातले ते कायमचेच. सीता आणि गीताची खरी नावं काय होती कोण जाणे! स्मृतीला कितीही ताण दिला तरी आठवतच नाहीत ती. त्यांच्या प्रगाढ मैत्रीमुळे त्यांची खरी नावं लोप पावली आणि त्या संस्थेच्या सीता आणि गीता झाल्या.
सीताची आई तिच्या इतक्या लहानपणी गेली होती की तिला आईविषयी काहीच आठवायचं नाही. आईचा मृत्यू आणि वडिलांचा पदोपदी दिसणारा बाहेरख्यालीपणा यांनी सीताच्या व्यक्तिमत्त्वात हळूहळू एक बदल झाला. ती काहीशी नव्हे बरीचशी विरक्त होत गेली. क्वचित कधी वडिलांच्या सततच्या आग्रहानं घरी जाऊन आली की काही ना काही यायचं तिच्या कानांवर. पुढे पुढे तर आपल्या आईच्या मृत्यूला वडीलच कारणीभूत आहेत असं तिच्या मनानं घेतलं आणि ती अधिकच उदास झाली पण तिनं नृत्य करणं नाही सोडलं. संस्थेत, खरं म्हणजे, काय आणि किती मिळणार नृत्याचं प्रशिक्षण! पण येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर उत्कृष्ट नृत्य करणारी सीता हा संस्थेचा हुकमाचा एक्का होता. त्यामुळे सीताला उत्तेजन खूप मिळालं संस्थेकडून. मला आठवतंय, सीताचा संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात ‘परफॉर्मन्स’ असायचाच. त्या वेळी सारं काही छान असायचं, दिसायचं, अपवाद फक्त तिच्या उदास मुद्रेचा आणि व्याकूळ डोळ्यांचा.
त्या मानानं गीता मोठी ‘चंट’ मुलगी होती. खूपच बुटकी, किंचित आडव्या बांध्याची, काळ्याभोर डोळ्यांची आणि मोठय़ानं बोलणारी. सीता आणि गीता म्हणजे विळ्या-भोपळ्याची मोट. अगदी दिसण्यापासून वागण्यापर्यंत. सीता उंच, गोरी, शेलाटय़ा बांध्याची आणि लांबसडक केसांची. या दोघी एकत्र चालायला लागल्या की गंमत वाटायची. सीताचं बोलणं ऐकायला कान द्यायला लागायचा, तर गीताला बोलताना थांबवण्यासाठी ‘आता पुरे’ अशी खूण करणं अपरिहार्यच होऊन जायचं. पण तरीही त्या मैत्रिणी होत्या. अगदी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. या मैत्रीचा प्रारंभ झाला तो गीताकडून. सीताला आई नसणं, वडिलांचं वर्तन बेताल असणं, यातून जी भावनिक पोकळी तिच्या मनात निर्माण झाली होती ती या वरवर आक्रमक दिसणााऱ्या मुलीनं अचूक हेरली आणि मैत्रीचा हात पुढे केला. खरं म्हणजे स्वत: गीता ‘गृहहीन’ या सदरातच मोडणारी होती. गीताच्या आईचे आणि गीताचे भावबंध कधीच जुळले नाहीत. नवऱ्याच्या अगदी अकाली मरणानंतर ‘आपला भाकरतुकडा’ (खास गीताच्या आईचे शब्द) आपण कमावून खाणारी ती स्त्री एकटी आणि स्वतंत्र झाली होती. ‘स्व तंत्रानं वागणारी.’ मुलगी मोठी झाली, कारणापरत्वे संस्थेतून घरी आली तरी दोघींचे खटके उडायचे. तरीही गीतानं सीताचा दुखरा कोपरा ओळखला आणि जाणलादेखील.
सीता आणि गीता यांच्याशी माझी भेट झाली तेव्हा त्यांना संस्थेत येऊनही चांगली पाच सहा र्वष झाली होती. चौदा पंधराच्या दरम्यान होत्या त्या. दोघींचं भविष्य धूसर होतं. वयोमर्यादा पूर्ण झाल्यावर काय करायचं, कुठं जायचं या विषयी मनात गोंधळ होता. मात्र एक, संस्थेतून लग्न करून बाहेर पडायचं याला दोघींचाही ठाम विरोध होता. त्या एकत्र बाहेर पडणार होत्या, एकत्र काम करणार होत्या आणि एकत्र राहणार होत्या.
सीता आणि गीता नववीत गेल्या त्या वेळी त्यांना परिस्थितीची बऱ्यापैकी जाणीव झाली होती. सीताच्या वडिलांनी सीताला घरी पाठवावं म्हणून संस्थेच्या पाठी धोशा लावायला सुरुवात केली होती. त्यातला धोका ओळखून संस्थेनं सीताच्या वडिलांना ठाम नकार दिला होता. गीतालाही संस्थेतच सुरक्षित वाटत होतं.
नववी आणि दहावी या दोनही वर्षांत मी या दोघींचाही सपाटून अभ्यास करून घेतला. दोघी काही स्कॉलर नव्हत्या. यथा तथा, पास होण्यापुरते मार्क मिळवून पास होणाऱ्या होत्या त्या. पण प्रामाणिक होत्या, जिद्दी होत्या. काही करून त्यांना स्वत:चं असं एक घरकुल थाटायचं होतं. ती जिद्द होती म्हणूनच अभ्यास करायच्या त्या.
सीता आणि गीता शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि दोघींनीही नर्सिगचा पर्याय निवडला. लवकर शिकायचं, पास व्हायचं आणि आपल्या पायांवर उभं राहण्याची निकड दोघींनीही ओळखली होती व ते वास्तव समंजसपणे स्वीकारलं होतं. हेच त्यांचं वैशिष्टय़ वाटतं मला. सुदैवानं या प्रयत्नांत अनेक समाज हितैषी लोकांची साथ लाभली आणि अगदी व्यवस्थित फी भरून सीता आणि गीता दोघींनीही नर्सिगला प्रवेश घेतला. यथावकाश तो कोर्स त्यांनी यशस्वीपणे पूर्णही केला.
मला आठवतंय, सीता आणि गीताला पहिली नोकरी मिळाली ती कर्करोगाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या रुग्णालयात. या रुग्णालयात कर्करोगाच्या अंतिम टप्प्याला येऊन पोहोचलेल्या रुग्णांनाच दाखल करून घेतलं जाई. या पोरीचं अगदी कोवळं वय बघता त्यांनी इथं काम करू नये असं मला वाटलं. मी त्या दोघींनाही तसं बोलूनही दाखवलं. पण सीता आपल्या निर्णयावर ठाम होती. सेवा करायची हाच परिचारिकांचा धर्म असेल तर मग कर्करोगाच्या रुग्णांची का नको हा तिचा सवाल होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गीतानं सीताच्या या निर्णयाला मूक संमती दिली. एरवी आक्रमक असणारी, भांडणारी गीता या वेळी मूक झाली होती. घर नसणं, आपली हक्काची माणसं नसणं याची दाहक जाणीव अगदी कोवळ्या वयात झाली तर मुलांच्या जडणघडणीत काय उलथापालथ होऊ शकते, याचंच ‘दर्शन’ घडत होतं आम्हाला.
या दरम्यान कधी तरी मी त्यांना अरुणा शानभागची गोष्ट सांगितली. अरुणाचं अगदी कोवळ्या वयात नोकरीसाठी कारवारहून मुंबईला येणं तिची कर्तव्यदक्षता व स्पष्टवक्तेपणा, त्यानंतर तिच्यावर झालेले अत्याचार व पस्तीसहून अधिक र्वष एक मरणासन्न जीवन व्यतीत करण्याची तिला झालेली शिक्षा या सर्वाचा दोघींच्याही मनावर खोल परिणाम झाला. दोघीही स्वसंरक्षणाचे धडे घ्यायला लागल्या. कराटेसारखं कौशल्य आत्मसात करायला लागल्या. पण अरुणा शानभागनं नकळत दिलेली प्रेरणा एवढय़ावर थांबली नाही. सीता आणि गीतानं आसपासच्या मुलींपर्यंत ती प्रेरणा पोहोचवली. स्वसंरक्षणची गरज त्यांना समजावली आणि हे सगळं सहज झालं.
असेच काही दिवस गेले. महिने गेले. महिन्यांची र्वष झाली तोपर्यंत सीता आणि गीतानं त्या कर्करोग रुग्णालयातली नोकरी सोडली होती. पूर्वीच्या अनुभवांमुळे दोघींनाही अधिक चांगली नोकरी मिळाली. त्यातली दोघींची अट एवढीच की, त्यांना एकाच ठिकाणी नोकरी हवी होती. या अटीवर मात्र ‘नो कॉम्प्रोमाइज’. त्या ठाम असायच्या. त्या ठामपणानेच त्यांचा हट्ट पूर्ण व्हायचा. सीता आणि गीतानं एक छान खोली घेतली. आपला संसार थाटला. गीता सुरेख स्वयंपाक करायची. आम्हाला हौसेनं जेवायला बोलवायची. वाईट एवढय़ाचंच वाटायचं की सीताला या सगळ्यात कसलाच रस नव्हता. गीतानं एवढा हौसनं केलेला पुरणावरणाचा स्वयंपाकदेखील सीतानं कधी फार चवीनं चाखला आहे, असं दिसलं नाही. दिवसेंदिवस सीता विरक्त होत चालली. उदास भासू लागली. तिच्या वडिलांच्या वर्तनाचा तिच्यावर खोल परिणाम झाला होता.
रक्ताची नाती किती पोकळ असतात, फसवी असतात, हे तिनं जवळून पहिलं होतं. त्यातल्या त्यात जगण्याची प्रेरणा दिली ती गीतानं. तिच्यात सीताची सारी नाती एकवटून गेली खरी पण विरक्ती कमी नाही झाली. उदासीनता संपली नाही. आपल्या आईला वडिलांनी संपवलं या संशयाला सीताला मूठमाती देता आली नाही.
या दोघींच्या अतूट नात्याविषयी खूप प्रवाद उठले. पण दोघींनीही त्याला धैर्यानं तोंड दिलं. टीकेच्या उठलेल्या धुरळ्यानं त्या कधीच विचलित झाल्या नाहीत. आजही एकमेकींची सोबत करत त्या एकत्र राहतात. मला मात्र त्यांच्यासोबत झालेल्या सहवासानं सीता आणि गीता यांच्या नात्याचा एक वेगळा पैलू दिसतो. वाटतं, सीताची विरक्ती गीतानं जाणली. सीताला आई नव्हती तर गीताला वडील. पण आई जाण्यानं कधीच न भरून येणारी हानी होते, हे गीतानं जाणलं. त्यातली खोल वेदना तिच्या लक्षात आली. म्हणून विरक्त सीतेला प्रवृत्त गीतेनं सावरलं. ‘सीता’ पुन्हा एकदा ‘भूमिगत’ होऊ नये म्हणून गीतानं तिला कर्मयोग शिकवला. दोघींची जीवन-गीता सफल झाली.
eklavyatrust@yahoo.co.in

First Published on June 18, 2016 1:20 am

Web Title: inspriatonl stories of orphans and special childrens
Just Now!
X