22 August 2019

News Flash

श्रीमंत

भविष्याचं एकुलतं एक श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत असताना त्याला कर्करोगानं गाठलं

सुनीलनं दारिद्रय़ाचे व त्यापोटी येणाऱ्या अवहेलनेचे जबर चटके सोसले. त्यातून त्याची एक धारणा झाली, नव्हे ठाम निश्चय झाला, श्रीमंत व्हायचं. बस्स! श्रीमंत व्हायचं. कशाचाही मुलाहिजा बाळगायचा नाही. चांगल्या वाईटाचा विधिनिषेध ठेवायचा नाही. येनकेनप्रकारेण श्रीमंत व्हायचं..आणि तो झाला. पण..

सुनील आपल्यातून गेला, आपल्या जगातून कायमचा गेला, त्याला काही वर्ष उलटून गेली. ऐन पंचविशीच्या उंबरठय़ावर उभा असताना, भविष्याची किंवा भविष्याचं एकुलतं एक श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत असताना त्याला कर्करोगानं गाठलं आणि त्याला जितकं श्रीमंत व्हायचं होतं, तो झाला. चांगल्या मार्गाने झाला.
सुनील मला मुलांच्या संस्थेत भेटला तेव्हा तो जेमतेम बारा-तेरा वर्षांचा होता. विलक्षण देखणा, सुनीलकडे बघितलं की प्रेमच वाटायचं त्याच्याविषयी. पण त्याच्या या निष्पाप, निरागस चेहऱ्यापाठीमागे बरंच काही दडलं होतं. सगळ्यात मुख्य म्हणजे निराधार मुलांच्या संस्थांच्या अनेक शाखांतून तो अगदी बदनाम झाला होता. त्याच्या नावावर उचलेगिरी, हातचलाखी, गोड बोलून दुसऱ्याला फसवणं अशा अनेक गैरकृत्यांच्या नोंदी होत्या. उदाहरणच द्यायचं झालं तर संस्थेतून शाळेत जाताना एखादी वस्तू बाहेर घेऊन जाणं आणि ती विकून मौजमजा करणं हा त्याच्या डाव्या हातचा खेळ होता. अशा बऱ्याच तक्रारी आल्या की सुनीलची उचलबांगडी व्हायची. नव्या नवलाईचे चार दिवस घेतले स्थिरावायला की सुनीलरावांच्या अभिनव शक्कल लढवून घडवून आणलेल्या कारवायांना प्रारंभ व्हायचा.
शेवटी सुनीलला अशा ठिकाणी आणलं गेलं जिथून संस्थेचं प्रवेशद्वार ओलांडून बाहेर जायचीच बंदी होती. सुनील संस्थेच्या दरवाजाआड बंदिस्त झाला. तिथंच त्याची आणि माझी भेट झाली. सुनील संस्थेत येण्याआधीच सुनीलच्या कर्तृत्वाच्या बातम्या येऊन पोहोचलेल्या असायच्या. त्यामुळे सुनीलच्या संबंधात अधिकारीवर्गाचाच नाही तर कर्मचारीवर्गाचादेखील सावध पवित्रा असायचा. संस्थेत एखादाही गैरप्रकार (खास करून आर्थिक) घडला की सर्वाचं बोट हमखास सुनीलकडे वळलंच म्हणून समजा. मुलं चिडवायची, कर्मचारी वाईट वागायचे, अधिकारी डाफरायचे पण हा पठ्ठय़ा निर्विकार मुद्रेनं वावरत राहायचा. दु:खाचा, विषादाचा एकही भाव त्यानं कधी मुद्रेवर उमटू दिला नाही. तो कधी रागारागानं बोलला नाही की एकाकीपणाच्या जाणिवेनं रडला नाही.
याचं मला आश्चर्य वाटायचं. खूपच आश्चर्य वाटायचं. १३/१४ वर्षांच्या मुलाला इतकं निर्विकार राहता येईल, हे मला अशक्य वाटायचं. त्याच्या गोड, लाघवी हसण्यामागे त्यानं खूप काही दडवलंय असा भास व्हायचा. संध्याकाळी कितीदा तरी संस्थेतील झाडांच्या पारावर बसून आम्ही गप्पा मारल्या आहेत. त्यातूनच हळूहळू सुनीलच्या आयुष्यातल्या घटना समोर येत गेल्या. एका विदारक सत्याचं मला दर्शन झालं.
सुनील कर्नाटकातील एका देवदासीचा मुलगा. त्याला एक थोरली बहीण होती. आई गावात होणाऱ्या शोषणाला कंटाळून आपल्या दोनही लहानग्यांना घेऊन एका माणसासोबत पळून शहरात आली. त्या माणसानं तिला लग्नाचं आणि सुखी संसाराचं स्वप्न दाखवलं होतं. पण शहरातलं वास्तव अधिक दाहक होतं. ज्यानं स्वप्न दाखवलं त्यानंच त्या स्वप्नांची रांगोळी केली. सौदा आधीच ठरला होता.
सुनीलची आई आणखी कोणाला विकली गेली. हा घाव जबर होता. सुनीलच्या आईनं आत्महत्या केली. तिनं जाळून घेतलं स्वत:ला आणि ही दोन पोरं उघडय़ावर पडली. एकमेकांचा हात धरत, परस्परांचे डोळे पुसत दोघं जण पुण्याला कसे पोचले हे मात्र सुनीलला अजिबात आठवत नसे, जणू तो काळ त्याच्यासाठी नव्हताच. मग पोलिसांचं सव्यापसव्य होऊन मुलं वेगळ्या संस्थेत गेली.
सुनीलनं दारिद्रय़ाचे व त्यापोटी येणाऱ्या अवहेलनेचे जबर चटके सोसले. त्यातून त्याची एक धारणा झाली, नव्हे ठाम निश्चय झाला, श्रीमंत व्हायचं. बस्स! श्रीमंत व्हायचं. कशाचाही मुलाहिजा बाळगायचा नाही. चांगल्या वाईटाचा विधिनिषेध ठेवायचा नाही. येन केन प्रकाराने श्रीमंत व्हायचं. ‘श्रीमंत माणसांना दु:ख नसतात. दु:ख फक्त गरिबांना असतात’ हा त्याचा ‘जीवन सिद्धांत’ होता. उचलेगिरीचं प्रयोजनच ते होतं. वानगीदाखल त्याच्यात व माझ्यात होणाऱ्या संवादाचं एक उदाहरण देते.
मी : सुनील, तुला कोण व्हावसं वाटतं?
सुनील : श्रीमंत व्हावंसं वाटतं
मी : कसा होणार श्रीमंत?
सुनील : काहीही करून.
मी : पण श्रीमंत कशासाठी व्हायचंय तुला?
सुनील : कशासाठी म्हणजे? श्रीमंतांना दु:ख नसतात. गरिबांनाच सगळी दु:ख असतात.
मी : मग हे उचल, ते विक, हे जे सगळं करतोस, ते श्रीमंत होण्यासाठीच का?
सुनील : अर्थात, त्याशिवाय झटपट श्रीमंत कसं होणार?
मी : पण तू झटपट श्रीमंत होतोस, त्यामुळे कोणी तरी झटपट गरीब होतं, त्याचं काय? खिसा कापणारा श्रीमंत पण ज्याची कष्टाची महिनाभराची कमाई त्यात गेली, तो गरीब होतो, त्याचं काय?
सुनील : म्हणजे, मग श्रीमंत होणं वाईट म्हणता?
मी : नाही. श्रीमंत होणं मुळीच वाईट नाही. पण दुसऱ्याला लुबाडून श्रीमंत होणं मात्र अगदीच वाईट.
सुनील : (विचारमग्न होत) ज्यानं माझ्या आईला फसवून विकलं, तसं करणं फारच वाईट.
अशी आमची प्रश्नोत्तर अनेक वेळा, थोडय़ा फार फरकानं व्हायची. किती वेळा या सगळ्यावर आम्ही बोललो असू. सुनील बदललाय, बदलतोय असं बरेचदा वाटायचं. अर्थात एखादी वेळ अशी यायची की माझ्या या गोड समजुतीचं सुनील अगदी पानिपत करायचा.
एकदा आम्ही इगतपुरी इथं असलेल्या प्रशिक्षण केंद्रात गेलो होतो. सुनील एवढय़ा व सुनील सारख्या परिस्थितीतून आलेल्या मुलांसाठीचं शिबीर होतं ते. तिथंही, आलेल्या मॅनेजमेंट गुरूंनी ध्येयाविषयी विचारताच सुनीलनं ‘मला हर्षद मेहता व्हायचंय’ असं सांगून त्यांची विकेट घेतली होती.
मात्र १६ ते १८ या दोन वर्षांत सुनील सावकाशीनं बदलत गेला. श्रीमंत व्हायची आकांक्षा तशीच राहिली. पण त्यासाठी वेगळे मार्ग स्वीकारावेत असं मात्र सुनीलला नक्की वाटायला लागलं. आपल्या आईला फसवून कोणी तरी श्रीमंत झाला आणि त्याची परिणती तिच्या मृत्यूत व स्वत:च्या पोरकं होण्यात झाली, हे त्याला वय वाढताना समजत गेलं. अतिशय बुद्धिमान होता तो. सुनील शालान्त परीक्षा पास झाला आणि माझ्या एका स्नेह्य़ानं त्याला नोकरी देऊ केली. ही नोकरी नेमकी शेअर्सच्या व्यवसायाची होती. सुनीलनं ती उडी मारून पकडली. श्रीमंत होण्याचा मार्ग जणू त्याच्यापुढे खुला झाला होता.
त्यानंतर मात्र सुनीलनं मागे वळून पाहिलं नाही. संस्थेच्या चार भिंतींत राहिलेला, व्यवहाराचं तसं प्रत्यक्ष ज्ञान नसणारा सुनील तो हाच, का असा अचंबा वाटावा इतक्या सहतेनं तो शेअर बाजाराच्या व्यवहारात पारंगत झाला. आपल्या पगाराचे पैसे त्यात गुंतवू लागला. ज्यांच्याकडे नोकरी करत होता त्यांचेही अनेक व्यवहार लीलया सांभाळू लागला. सुनील हळूहळू ‘श्रीमंत’ होऊ लागला, एवढंच नव्हे तर आमच्या सारख्या ‘गरिबांना’ शेअर्सच्या उलाढालीतून कमीत कमी धोका पत्करून श्रीमंत कसं होता येतं, याचे धडे देऊ लागला.
बघता, बघता सुनीलनं मुंबईच्या उपनगरात एक छोटी खोली भाडय़ानं घेतली. आम्ही सर्वानी त्या दिवशी एक छोटा समारंभ आयोजित केला. सुनीलनं आमच्यासाठी मसूर आणि दहीभात असा बेत केल्याचं मला आजही आठवतं. आईनं आत्महत्या केल्यावर वयाच्या चौथ्या वर्षी भीक मागून पोट भरणारा सुनील वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वकर्तृत्वानं हक्काच्या घरात राहू लागला.
दुर्दैवानं पुढल्या काही वर्षांत सुनीलला कर्करोगानं गाठलं. गळ्याकडे एक लहानशी गाठ दिसली व बघता बघता त्याचं पर्यावसान जीवनालाच वेढणाऱ्या अजगरात झालं. आम्ही सर्वानी सुनीलला त्या शेवटच्या वर्षांत खूप सांभाळलं. त्याची जमेल तेवढी सेवा केली. त्या वेळी मात्र आम्हाला जे समजलं, ते सर्वानाच हलवून सोडणारं होतं.
सुनील शेवटच्या काही दिवसात, मसाला मिल्कपासून मसाला डोशापर्यंतच्या अनेक चिजा मागत असे. पैसे साठवण्याच्या नादात आयुष्यातील अगदी छोटय़ा, छोटय़ा इच्छांनाही त्यानं तिलांजली दिली होती. अगदी लहान लहान मार्गानं पैसा मिळवला पण तो साठवण्याच्या नादात चांगलं खायला, चांगलं ल्यायला आणि चांगलं जगायला मात्र तो विसरला. शेवटच्या दिवसांत सुनील आपल्या बहिणीसोबत राहत असे. त्याच्या मृत्यूनंतर माझ्या स्नेह्य़ांनी सुनीलचे सर्व व्यवहार पूर्ण करून पैसे त्याच्या बहिणीला मिळतील अशी व्यवस्था केली.  सुनील श्रीमंत झाला. चांगल्या मार्गाने झाला. फक्त ती श्रीमंती उपभोगायला तो राहिला नाही याचचं दु:ख आहे.
eklavyatrust@yahoo.co.in

First Published on February 13, 2016 1:10 am

Web Title: stories about children and their mentality